विषय क्रमांक - २ - 'स्वामी उर्फ अवधुतानंद उर्फ धुम्रानंद'

Submitted by कविता१९७८ on 4 July, 2014 - 15:02

मला एकदा आमच्या फॅमीली डॉक्टरांनी गो.नी.दांडेकरांचं 'कुण्या एकाची भ्रमणगाथा" हे पुस्तक वाचायला दिलं होतं , एका नर्मदा परीक्रमावासीच्या प्रवास वर्णन मला खुपच आवडले , वास्तविक अध्यात्म ह्या विषयापासुन मी खुप
लांब राहते कारणही तसेच आहे, हल्लीचे हे सर्व बापु, महाराज, बाबा, माँ , अम्मा म्हणजे मला अगदीच न पटण्यासारखी मंडळी. एक साईबाबा सोडले तर मला कुणावरही विश्वास नाही. प्रवचन करणारी , स्वतःला सिद्ध -साधु म्हणवुन घेणारी व मिडीयामधे आपला उदो उदो करवुन घेणार्‍या मंडळींविषयी मला अतिशय तिटकारा. ही लोकं अंधश्रद्धाळू मंडळीना नेहमी गंडवत असतात आणी यांच्या पुर्ण आहारी गेलेली मंडळी आपल्या अवतीभवती बरीच आहेत, त्यांना पाहुन त्यांची कीव करावीशी वाटते. ह्या मंडळींना माहीतच नाही की खरा सदगुरु हा ज्ञानाचा प्रकाश असायला हवा, त्याने आपल्यातील अज्ञानाचा अंधकार दुर करायला हवा पण तसे होतच नाही आणी लोकं नाही त्या लोकांना बळी पडुन स्वतःचं नुकसान करुन घेतात. पण हे पुस्तक वाचुन मला खर्‍या अध्यात्माबद्द्लचे जाणुन घेण्यात रस वाटु लागला. नंतर डॉक्टरांनी सुचवले की जगन्नाथ कूंटे यांची नर्मदा परीक्रमेवर काही छान पुस्तके आहेत ती वाचा. मी त्यांचे परिक्रमेवरचे पहिले पुस्तक 'नर्मदे हर हर" वाचायला सुरुवात केली. अवघ्या दिड दिवसात २५६ पानांचं हे पुस्तक मी झपाटल्यासारखं वाचुन काढलं. संसारात राहुन ही सन्यास घेता येतो हे जगन्नाथ कुंट्यांनी दाखवुन दिलंय ह्यात अर्थातच त्यांच्या पत्नी कालिंदी यांचा खुप मोठा सहभाग आहे. त्यांच्या मदतीशिवाय व त्यागाशिवाय जगन्नाथ कुंटेना हे शक्य झालं नसतं.

लहानपणापासुन त्यांना साधनेची गोडी होती ; स्वतःचं भान विसरुन ते घरातुन न कुणालाही न सांगता बाहेर पडत, बर्‍याच वेळानंतर ते भानावर आल्यावर त्यांना कळत असे की ते पुण्याहुन लांब हृषीकेशला ला आलेत
लहान असल्याने व तिथली भाषा समजत नसल्याने ते गोंधळुन जात पण कसेतरी सदगुरुच्या क्रुपेने ते परत घरी पोहोचत असत. घरची परिस्थीती अत्यंत गरीबीची तसेच सतत ते सद्गुरुच्या ओढीने घराबाहेर राहत असल्याने त्यांचे शिक्षण कमी झाले. लहान पणापासुन पैसे मिळवण्यासाठी त्यांना काबाडकष्ट करावे लागले. पण त्यांच्या पुरोगामी विचाराने प्रभावित होउन कालिंदीजी त्यांच्या प्रेमात पडल्या व कालिंदीजींच्या घरच्यांच्या विरोधात जाउन त्यांचा प्रेमविवाह झाला. जगन्नाथ कुंटेना त्यांचे मित्र ,कालिंदीजी व शिष्य जे मनोमन त्यांना गुरु मानत ते सर्व 'स्वामी' म्हणत. स्वामींचा स्वभाव विक्षिप्त होता. घर चालवण्यासाठी ते दिवसाचे वीस - वीस तास राबायचे तसेत ते केव्हाही घरातुन न सांगता निघुन जात ते बरीच वर्षे साधना करुन घरी परतत. कालिंदीजींनीही कधी त्यांना अडवले नाही. बर्‍याचदा जेव्हा ते घरातुन बाहेर जात, बर्‍याच ठिकाणी भटकत घरी परतत ते अवधुतावस्थेत म्हणजे अंगावर एकही कपडा नसे. दाढी वाढलेली , केसांच्या जटा वाढलेल्या अवस्थेत. गरीब व त्यातुन संसारात असलेले सन्यासी म्हणुन त्यांची खुप अवहेलना झाली पण कालांतराने लोकांना समजले की हे काही साधेसुधे गृहस्थ नाहीत तर एक अवलियाच आहेत.

मी प्रभावित झाले ते त्यांचे स्त्रीविषयीची मते वाचुन. त्यांच्या 'धुनी' या पुस्तकात त्यांनी सुसंस्कृत समाजातील स्त्रियांच्या स्थानाबद्द्ल जे वास्तव मांडले आहे ते अतिशय दुखद असुन सत्य आहे . आपला समाज जो भारतीय संस्कृतीचा टेंभा मिरवतो तो आज सुद्धा बायकांना पायातल्या चपलांपेक्षा जास्त कींमत देत नाही, स्त्री म्हणजे फक्त उपभोगाची वस्तु इतकेच महत्व स्त्रीला दिले जाते. ती चांगली बायको असु शकते, चांगली बहीण, मैत्रींण असु शकते हे ह्या पुरुषप्रधान संस्कृतीला मान्यच नाही. स्त्रिला कधीही सन्मानाने वागवले जात नाही, चुक कुणाचीही असो परंतु नेहमी स्त्रीचीच बदनामी केली जाते, तिच्याविषयी नेहमी द्वेषभाव पसरवला जातो. तिला नेहमी दुय्यम स्थान दिले जाते , स्त्रियांना साधनेच्या मार्गातील धोंड समजले जाते , पुरुषप्रधान समाज स्त्रियांना नरकाचे द्वार समजतो परंतु तिला भोगणार्‍या पुरुषाला मात्र काहीच बंधने नाहीत. स्त्रीचे सुंदर दिसणे सुद्धा तिच्यासाठी श्राप बनतो, परंतु खरे साधु संत स्त्रियांना नेहमी आदराने वागवतात. स्वामींनी कालिंदीजींनाही सन्मानाने वागवलं , त्यांचा आदर केला. त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांच्या मते प्रपंच्यात राहुन साधना करता यायला हवी, प्रपंच मोडुन संसारापासुन दुर जाउन साधना करुन काही उपयोग नाही याउलट प्रपंच नीट करुन हळुहळु त्यातुन विरक्ती यायला हवी , प्रपंच्या पासुन लांब पळुन जाण्यापेक्षा त्याला सामोरे जाउन त्यातुन वेगळे झाल्यास आपल्या वासना दबल्या न जाता त्यांची पुर्तता होउन आपण त्यापासुन विरक्त होउ शकतो त्यामुळे पुन्हा त्या वासना बळावत नाहीत किंवा साधक पुन्हा त्यात अडकत नाही.

श्री . वासुदेवानंद सरस्वती महाराज यांचे शिष्य श्री. वामनराव गु़ळवणी महाराज यांच्याकडुन त्यांना शक्तीपाताची दिक्षा मिळाली व 'अवधुतानंद' हे नाव मिळाले. त्यांनी सद्गुरुच्या आज्ञेवरुन ४ वेळा नर्मदा परीक्रमा केली. १९९९,२०००,२०००१ अशा तीन परीक्रमा लागोपाठ झाल्या. त्यांना ४थी परीक्रमा ३ वर्षे १३ महीन्यात पुर्ण करण्याची आज्ञा झाली. प्रत्येक परीक्रमेत त्यांना भेटलेले सन्यासी त्यांची साधना पाहुन थक्क झाले व त्यांना आपले गुरु मानु लागले , अर्थातच स्वामींनी ते नाकारले कारण त्यांना गुरुपद नको होते गुरु होणे म्हणजे अहंकार आलाच. आजकाल बरेच साधु सन्यासी लोकं मठाधिपती झाले आहेत, त्यांनी बराच शिष्य परीवार व प्रपंच जमा केला आहे हे साधुत्वाचे लक्षण नाही. जिथे माया आली , गुरुपद आले तिथे अहंकाराचा शिरकाव झाल्याखेरीज राहत नाही. खर्‍या साधकाने अहंकाराचा त्याग करायला हवा. साधुने विरक्त असायला हवे अगदि एकावेळची मागितलेली भिक्षा देखील त्याचवेळी संपवायला हवी तिचा दुसर्‍यावेळेसाठी संचय करणे म्हणजे संसाराचे लक्षण आहे, साधकाने पुढच्या वेळेचा पोटापाण्याचा विचार करु नये त्यासाठी सदगुरुवर भरोसा ठेवावा , सद्गुरु आपल्या शिष्याचा विचार करण्यासाठी त्याला काही हवं ते नको ते पाहण्यासाठी समर्थ आहेत. स्वामींवर सद्गुरुची अतिशय कृपा होती, ते कधीही एका ठीकाणी जास्त काळ राहत नसत त्यांच्या मते एके ठीकाणी जास्त काळ राहणे म्हणजे त्या ठीकाणाबदद्ल आसक्ती निर्माण होणे व साधुने नेहमी विरक्त असायला हवे अगदी जागेचाही मोह नको. त्यांनी कुणालाही आपले शिष्य बनवले नाही परंतु बर्‍याच जणांना पुण्याच्या श्री गुळ्वणी महाराजांच्या मठाचा मार्ग दाखवला.

स्वामींना चहाची अतिशय आवड होती. जेवण नाही मिळाले व चहा मिळाला तरी त्यांना ते मेजवानीप्रमांणे भासे. परीक्रमेत बरेच दिवस ते चहा पिउनच काढत असत कारण ते नेहमी नर्मदा मैयाच्या बाजुने व आडवळणाचा रस्ता पकडत जिकडे शक्यतो वस्ती नसे अशावेळी कुठे कुठे मिळालेल्या चहावर त्यांना ४-५ दिवस काढावे लागत. बर्‍याच ठीकाणी त्यांची अवहेलनाही होई, ढोंगीबाबांच्या सुळ्सुळाटामुळे बर्‍याचदा स्वामींवर देखिल आगपाखड होत असे पण त्यांनी कधीही वाईट मानुन घेतले नाही आपल्या सद्गुरुची इच्छा असे समजुन ते पुढे चालु लागत.

स्वामींना जशी चहाची आवड तशीच सिगारेटचीही आवड होती. सिगरेट हे त्यांना सर्व औषधच वाटे, चालुन चालुन थकले की सिगरेट प्यायचे , अन्न मिळाले नाही तर सिगरेटचा धुर सोडायचे , त्यांना सिगारेटचे इतके व्यसन होते ते इतका धुर सोडत असत व त्यातच मग्न असत की त्यांना बरेचदा 'धुम्रानंद' देखिल म्हंटले जाई. एकदा एका माणसाने धुम्रपानाचे तोटे स्वामींना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु स्वामींनी त्यालाच बोलण्यात इतके फिरवले की तो माणुसच अवाक झाला. त्या माणसाने स्वामीना सांगितले की एकेका झुरक्याने माणसाचे काही काळाचे आयुष्य कमी होते तर त्यावर स्वामी म्हणाले असे असेल तर मी सध्या मायनस १५०-२०० वर्षे जगतो आहे. हे ऐकल्यावर तो बिचारा माणुस काहीच बोलु शकला नाही.

साधना कशी करावी हे सुद्धा त्यांनी अगदी सोप्या भाषेत सांगितले आहे. आपल्या सदगुरुसमोर बसुन कींवा त्यांचे स्मरण करुन पद्मासनात बसावे , नाही जमल्यास आपल्याला सहज जमेल अश्या सहजासनात बसावे. हाताची मुद्रा ज्ञानमुद्रा असावी. डोळे घट्ट मिटुन घ्यावे , सुरुवातीला आपल्या मनात बरेच विचार येतील जितके आणी जसे विचार येतील तसे येउ द्यावेत त्यांच्या मते असे विचार येउन येउन एक दिवस आपले मन शुद्ध होईल मग हळुहळु आपण साधना करु लागतो, कुठलेही विचार दाबुन ठेवता कामा नये ते येउन वाहुन जाउ द्या, मनात राहील्यास त्याचे रुपांतर विकारात होते व ते विचार वाहु दिल्यास मन शांत आणी शुद्ध होते आणी आपण खर्‍या रुपाने सद्गुरुला शरण जाउ शकतो. साधकानं एक आपल्या सद्गुरुवर अनन्य विश्वास ठेवावा ते सर्व साधाकाकडुन करुन घेतात. साधनेनं आपल्याला पुण्य मिळत नाही पण पापाचा क्षय होतो व त्यामुळे मोक्ष मिळतो, पाप संपले म्हणजे ते भोगण्यासाठी पुन्हा माणसाचा जन्म घ्यायची गरज नाही व पुन्हा माणसाचा जन्म नाही म्हणजे पुन्हा पाप - पुण्ण्याची भानगड नाही.

त्यांची "नर्मदे हर हर" व साधनामस्त ही पुस्तके म्हणजे परिक्रमावासियांसाठी मार्गदर्शक आहेत, परीक्रमेसाठी कुठपासुन व कशी सुरुवात करायची, कुठुन कसे जायचे, प्रवासात भेटणारी मंडळी ह्यापासुन ते शेवटी कुठे पोहोचायचे याची संपुर्ण माहीती ह्या पुस्तकात दिली आहे तसेच 'नित्य निरंजन' व धुनी ही साधनेवरील पुस्तके म्हणजे सद्गुरुची कृपा मिळ्वण्याची, साधनेची धुनी अखंड तेवत ठेवण्याची मार्गदर्शिकाच आहेत. वयाच्या साठ वर्षानंतर त्यांनी सन्यास घेतला. एका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की तुम्ही आधीपासुन साधनेत आहात तर सन्यास घेतल्यावर तु म्हाला काय फरक जाणवला म्हणजे तुमच्या साधनेत काही फरक पडला का? त्यावर त्यांनी उत्तर दिले की काहीही फरक पडला नाही आधिही मी असाच विरक्त होतो जो आता सन्यास घेतल्यावर आहे.

त्यांचे 'कालिंदी' हे पुस्तक त्यांच्या बायकोनं ने अध्यात्मात केलेल्या प्रगतीवर आधारीत आहे. स्वामींची अध्यात्मिक प्रगती व्हावी या करीता त्यांच्या बायकोने बरेच त्याग केले, सन्याशाची बायको यामुळे त्यांची समाजाने अवहेलना केली, एकटी पडलेली स्त्री असे समजुन बर्‍याच लोकांनी त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ह्या सर्व अडचणींना धीराने तोंड देउन आपल्या मुलांना मार्गी लावले. संसाराचे चटके सोसले परंतु ह्यबद्दल स्वामींना कधीही दोष दिला नाही. योग्यवेळी स्वामींनी सन्यास घेतल्या नंतर त्यांनी सुद्धा वानप्रस्थाश्रम स्विकारला. जंगलप्रेमी असल्याने घरापासुन दुर राहुन नर्मदा कीनारी एका गावाच्या सेवेसाठी त्यांनी स्वत़:ला विना मोबदला वाहुन घेतले, त्या सर्वांच्या 'कालिंदीनानी' झाल्या.

असे हे जगन्नाथ कुंटेजी उर्फ स्वामी उर्फ अवधुतानंद उर्फ धुम्रानंद ज्यांनी साधनेची उच्चतम पातळी गाठली, ज्यांच्याकडे पैशाचे ऐश्वर्य नसेल पण सदगुरु कृपेचे ऐश्वर्य अमाप आहे, अध्यात्म्याच्या दिव्य प्रवासातील एक सच्चा साधक.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी जगन्नाथ कुंटे यांची बहुतेक सर्व पुस्तके वाचली आहेत पण मला सर्वात आवडणारी पुस्तके म्हणजे, 'नर्मदे हर हर', 'साधनामस्त' आणि 'नित्य निरंजन'. बाकी 'कालिंदी' आणि 'धुनी' मला एवढी नाही आवडली.

तुम्ही परिचय छान करुन दिलात स्वामीजींचा. त्यांचा मुलगा 'कृष्णमेघ कुंटे' ह्याच्याबद्दल मी प्रथम महाराष्ट्र टाईम्समधे वाचलं होतं, तो वन्यजीव अभ्यासक आहे आणि त्याने त्यासंबधी चार रविवार पेपरमधे लिहीलं होतं. मग जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' वाचलं.

छान ओलख! नर्मदे हर हर आवडलेलं एक छान पुस्तक! हे पुस्तक वाचून व सौ चितल्यांची सीडी ऐकून एकदा त्री परिक्रमा करायची तीव्र इच्छा आहे.........

मंजु - माझीही ईच्छा आहे परिक्रमेची पण अंतर १२०० ते १२५० की.मी असल्याने १ महीन्या पेक्षा जास्त वेळ लागु शकतो, ऑफीस मधुन तितकी सुट्टी मिळणे अवघड

सुंदर परिक्षण केले आहे. श्री कुंटे यांची योग्यता फारच वरची आहे. कधी त्यान्ना भेटता आले तर फार बर वाटेल.
तुमचे लेखन फार सहज सुंदर झाले आहे.
परिक्रमा करायला साधरण ३ - ४ महिने लागतात. पायी करायची असल्यास. माझ्या काकांनी केली आहे. त्यामुळे मला माहिती कळली. माझीही परिक्रमा करायची फार इच्छा आहे. कधी जमते बघुयात. Happy
जर साधना करायची असेल तर खालील लिंक बघा. श्री कुंटेयांनी संदर्भ दिलेला पुण्यातला हाच तो आश्रम.
http://www.mahayoga.org/intro.htm