फेमिनिझम ऑन व्हील्स

Submitted by सई केसकर on 3 July, 2014 - 06:41

सध्या टी. व्हीवर एका चार चाकी गाडीची जाहिरात येते आहे. त्यात एक पन्नाशीतला माणूस गाडी विक्रेत्याला खूप खोदून खोदून प्रश्न विचारत असतो.
"मी हातातला ब्रेक न लावता गाडी उतारावर पार्क केली तर?" हा त्यातला सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात बुचकळ्यात टाकणारा प्रश्न (इतका अनुभवी सुटाबुटातला (आणि तोही) पुरुष अशी चूक का करेल?). सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून समाधान झाल्यावर तो ती गाडी त्याच्या तरूण मुलीला भेट देतो. यातून एक गोष्ट अगदी जगमान्य (भारतात तरी) होते. ती म्हणजे, बायकांना गाडी चालवायची अक्कल नसते.

आता अशा पूर्वग्रहदुषित रस्त्यांवर गाडी चालवताना माझ्यासारख्या नवीन चालीकेला आलेले पुण्यातील अनुभव मी इथे नमूद करणार आहे. पुण्यातल्या वाहन चालकांचे काही ठराविक प्रकार आहेत. यात कमालीची स्त्री-पुरुष समानता आढळून येते. फरक एवढाच की गाडीत किंवा गाडीवर स्त्री असल्यास तिचा स्पेशल उद्धार होतो.

१. लटकलेले नवरे/बायका : कधी कधी पार्किंग मिळणं महामुश्किल असेल अशा ठिकाणी दुरूनच डावीकडे दोन-तीन गाड्या अशा संथ गतीनी रस्ता अडवून पुढे सरकायचं नाटक करत असतात. शेजारी एखादं मोठं ग्रोसरी स्टोर असतं, किंवा त्याहूनही भयानक साड्यांचं दुकान असतं. यात बसेले सत्पुरुष दुकानात गेलेल्या बायकोसाठी बाहेरच पार्किंग न करता उभे असतात. अशावेळी मी जोरात हॉर्न वाजवते. मग ते काचेतून, "ती बाया आतून त्रास देतेय, तू निदान बाहेरून तरी देऊ नकोस" असा कटाक्ष टाकतात. किंवा जागा आहे की! अशा अर्थाचा हात करतात आणि चिडून माझ्याकडे बघतात. या क्याटेगिरित क़्वचितच स्त्रिया दिसतात.

२. धूमकेतू: तुम्ही शांतपणे सरळ रेषेत गाडी चालवत जात आहात आणि अचानक तुमच्या उजवीकडून दुचाकीचा एक धूमकेतू पूर्ण रस्ता पंचेचाळीस डिग्रीच्या कोनात कापत डावीकडे जातो. तुम्ही घाबरून ब्रेक दाबता, त्यामुळे मागचे सगळे पुरुष "काय बाई आहे" अशा अर्थाचे हॉर्न वाजवू लागतात. धूमकेतूंच्या गाडीला आरसे नसतात (असले तरी ते त्यांच्या तोंडाकडे बघत असतात). आपल्या गाडीला आरसा नाही म्हणून निदान आपण आपली नाजूक मान वळवून मागून कुणी येतंय का ते पाहावं असं सुद्धा या धूमकेतूना वाटत नाही. बेसिकली धूमकेतूंना असं वाटतं की रस्त्यावर ते सोडून कुणीच गाडी चालवत नाहीत. आणि असतील तर आपल्या आणि त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी त्यांची आहे, आपली नाही. या क्याटेगिरित स्त्रियांचं प्रमाण फार जास्त आहे. आणि दुर्दैवाने अशा आडव्या जाणा-या बऱ्याच गाड्यांवर पुढे लहान मुलं उभी केलेली दिसतात.

३. गप्पा गोष्टी: हा वर्ग बघितला की आपण कॉलेजमध्ये असताना कित्ती संतापजनक वागायचो याची जाणीव होते. दोन (किंवा कधी तीन) दुचाकी समांतर रेषेत, शक्यतो रस्त्याच्या मध्ये, गप्पा मारत बैलगाडीच्या वेगानी जात असतात. त्यावरील लोक एकमेकांशी उरलेल्या गप्पा मारत असतात. ऑफिस मध्ये बोलता न येणारे विषय, कॉलेज मधल्या आत्ता उपस्थित नसलेल्या माणसाबद्दलची मतं, किंवा कुणाशीतरी झालेल्या भांडणाचा उहापोह! असे कुठलेही विषय या गाड्यांवर चालू असतात. यांना आपण मागून हॉर्न वाजवतोय हे कळायलाच खूप वेळ लागतो. मग ते एक त्रासिक नजर तुमच्याकडे टाकून, उपस्थित केलेला मुद्धा संपवून मगच तुम्हाला रस्ता देतात. या क्याटेगिरित स्त्री-पुरुष दोघेही समान उपस्थिती दाखवतात.

४. इंडिकेटरांध : तुम्ही वळण्याआधी पूर्ण तीस सेकंद इंडिकेटर दिलेला असतो, गाडीचा वेग कमी केलेला असतो, आरसा बघत जेव्हा तुम्ही वळू लागता तेव्हा मागे एक आश्चर्यचकित चेहरा दिसतो. त्यापाठोपाठ उजव्या हाताची सगळी बोटं पंख्यांसारखी उघडून केलेली "काय राव" ही हस्तमुद्रा येते. चारचाकींच्या इंडिकेटरना दुचाकी सारखा अलार्म करण्याची गरज मला अशा वेळी फार जाणवते. पण असे इंडिकेटरांध लोक कानात हेडफोन्स घालून बहिरेदेखील झालेले असतात. या क्याटेगिरित पुरुष जास्त असतात. त्यातही, खूप साऱ्या अल्युमिनीयमच्या किटल्या लावून चाललेले गवळी! गवळी कदाचित माझ्याच नशिबात येत असतील. त्यामुळे तो मुद्दा सोडून द्यावा.

५. मोझार्ट नंतर आम्हीच: हल्ली पुण्यात कानात हेडफोन्स लावून, बुलेट किंवा तसल्याच कुठल्यातरी अगडबंब मोटरसायकल वरून, झोकात जाण्याची पद्धत आहे. हे लोक नवीन नवीन नोकरीला लागलेले असतात बहुतेक. त्यामुळे कॉलेज मध्ये जे आई बाबांनी करू दिलं नाही ते सगळं ते नोकरीच्या पहिल्या वर्षात करायचा प्रयत्न करत असतात. यातील बरेचसे लोक रामलीला मधल्या रणवीर सिंग सारख्या मिश्या ठेवतात. हेल्मेट घालत नाहीत (मिशा कशा दिसणार मग?). एक तर हे मिळेल तिथे घुसतात, कानातल्या गाण्याच्या तालावर यांचं वाहन जात असतं, आणि त्यांना हॉर्न ऐकू येत नाहीत. मग खूप ठणाणा केल्यावर ते आपल्या दिशेने असा "चिल आंटी" असा लूक टाकतात. उतरून त्यांना लेक्चर द्यावं म्हंटलं तर "आंटी" हे संबोधन माझ्या कल्पनेतून वास्तवात येईल याची भीती असते. या क्याटेगिरित पुरुषच असतात.

६. बचाव! गाडी मागे जा राही है! : स्त्री चालक असून सुद्धा एक खूणगाठ मीदेखील बांधलीये. चढाच्या सिग्नलला कधीही दुसऱ्या स्त्रीचालीकेच्या मागे गाडी थांबवू नये. आधी या सिग्नल लागला म्हणून फोनवरच्या अर्धवट गप्पा पूर्ण करण्यात मग्न असतात. मग अचानक (त्यांच्यासाठी) सिग्नल हिरवा होतो. मागून हॉर्न वाजू लागतात आणि त्या गडबडीत यांच्या कल्च-ब्रेकचं संतुलन बिघडतं! मग गाडी तुमच्या दिशेने मागे येऊ लागते. या परिस्थितीत अजून हॉर्न वाजवून नुकसानच होतं. कधी कधी एक पूर्ण सिग्नल अशा झटापटीत गेलेला मी पहिला आहे. त्यामुळे "ती स्त्री" व्हायचं नाही यासाठी मी खूप प्रयत्न करते.

७. अवघे विश्वची माझी पिकदाणी: पांढऱ्या शुभ्र स्विफ्ट गाडीच्या पांढऱ्या शुभ्र सीटवर बसून, पांढरा शर्ट, पांढरी विजार, रे बॅन, अशा अवतारात सिग्नलला पचकन तंबाखूची लाल लाल पिचकारी टाकणारे महाभाग या क्याटेगिरित येतात. अशाच अवतारातले लोक खूपदा चुकीच्या दिशेने (ट्रिपल सीट) पूर्ण रस्ता गाडी चालवत जातात. त्यांना काहीही बोलता येत नाही कारण ते काय करू शकतील याचा काहीही नेम नसतो. त्यामुळे सतत अशी वागणूक सहन करण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. याही वर्गात पुरुषच आढळून येतात.

८. तीनच सेकंद राहिलेत! निघा आता!: जेव्हा सिग्नल चे पाच सहा सेकंद बाकी असतात, तेव्हा हे लोक मागून हॉर्न वाजवून डोकं उठवतात. आणि मग उगीचच सिग्नल हिरवा होईपर्यंत थांबणे हा "तत्वाचा" प्रश्न होतो. आणि आपण म्हणजे या अतीव व्यस्त, महत्वाच्या पुरुषांच्या मार्गात येणारा उशीर वाटू लागतो. या वर्गातही पुरूषच जास्त असतात. तसंच एखाद्या वृद्ध जोडप्यासाठी गाडी हळू केली तरीदेखील मागून निषेध व्यक्त करणारे असतातच.

पुण्यात दोन वाहनचलकांमध्ये झालेल्या क्षुल्लक तंट्यात चूक कुणाचीच सिद्ध करता येत नाही आणि कुणीही माघार घ्यायला तयार होत नाही. खरं तर असल्या भांडणात बरेचदा दोघांचीही चूक असते कारण पुण्यात वाहतुकीचे नियम मोडणारे लोक सर्रास आढळून येतात. बायकांना गाडी चालवता येत नाही म्हणून गप्पा मारत असले तरी वाहतुकीचे नियम अगदी बिनधास्त तोडणारे, भरधाव वेगाने गाडी चालवणारे, जोखीम पत्करून ओव्हरटेक करणारे, मद्यपान करून रात्री अपरात्री मोठ्या मोठ्या गाड्या चालवणारे, मुलींना 'कट' मारून जाताना स्वत:चा आणि आजूबाजूच्या वाहनचालकांचा जीव धोक्यात टाकणारे, ट्राफिक जॅम असताना फूटपाथवरून बिनधास्त वेगात गाडी घेऊन जाणारे, सामान्यत: सगळे पुरुषच असतात.
त्यामुळे कुणीतरी हे सगळे दुर्गुण लक्षात घेऊन अजून एक जाहिरात बनवली पाहिजे. खास पुरुषांच्या बेजबाबदारपणासाठी!

http://saeechablog.blogspot.in/2014/07/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच्....मला हॉर्न वाजवनार्यांचा खुप राग येतो...माझ नेहमीचा वाक्य त्यांच्यासाटी 'एवडीच घाई आहे तर विमानात जात जा' कींवा जर गाडी पुडे घ्यायला जागा नसेल तर्'आता काय ऊडुन जाउ का ?'नाही तर तु जा'.... Proud

हात मिलाव, सई. ती जाहिरात अन अशाच अनेक जाहिराती डोक्यात जातात बघ. कारण नसताना उगाचच बायकांना टारगेट करतात Angry

मस्तच.. सगळे प्रकार हमखास अनुभवाला येणारे.. धूमकेतू तर अगदीच.. पण मी पुरूष धूमकेतू जास्त पाहिलेत..
यात अजून काही म्हणजे बायकांनी ओव्हरटेक केलेलं सहन न होणारे.. यात विशेषतः तरूण वर्ग.. डबल्/ट्रिपल सीट बसले असतील तर यांचा अहंकार दुप्पट/ तिप्पट होतो.

लेख आवडला.
विशेष शेवटचे मुद्दे.तो सगळं सफेदवाला मुद्दा तर अगदी डिट्टो.

(एक दुचाकीची (हिरोचीच का?)जाहिरात आहे त्यात ती बाई गाडी पार्क करण्याचा प्रयत्न करत असते आणि गाडीवाला कूल राहून बघत असतो,त्याच्या त्या गाडीमुळेच त्याला हे जमते. Happy )

अवघे विश्वची माझी पिकदाणी:>> असं कुणी केलं की मोठयाने 'छी...! घाणेरडा...!' ओरडतो. कोण ओरडलं ते काही कळ्त नाही कारण तो पर्यंत गाडी पुढे हललेली असते.

प्रसंग एकला : एका ताईने गाडी आडवी मारली. (ठिकाण : भारती विद्यापीठाच्या मागील रस्ता)
मी : पळून निघालाय का?
ताई : ए चल निकल
मी : ( निघून गेलो.)
अमहाराष्ट्रीयन, भारती विद्यापिठात शिकणारी (च असणार), एका बाजुने अंगरखा घसरवून रस्त्याने फिरणार्‍या आणि आपल्या ओपन स्त्रीत्वाचा गैरफायदा घेण्याच्या मानसिकतेत जगणार्‍या कोणत्याही मुलीसोबत भांडण्याची शक्ती आता मझ्यात उरलेली नाही.

प्रसंग दुसरा : एका मावशीनी गाडी आडवी मारली. (ठिकाण : भारती विद्यापीठाच्या मागील रस्ता)
मी : एवढ्यात कशाला मरताय?
मावशी : खुसपुस! (मानेला हिसडा)
मी : जरा मोठ्यानं बोला ना.. चुकता ते चुकता वर नाटकं...
मावशी : अहो मी काय म्हणतिये..
बायको (माझ्या मागे बसलेली माझीच बायको) : अरे त्या सॉरी म्हणाल्या.
मी : (निघून गेलो) कधी कधी आपल्या स्त्री असण्याचा गैरफायदा न घेणार्‍या प्रामाणिक चालक महिलाही गाडी आडवी घालू शकतात.

अशा अनेक प्रसंगांनंतर मी काढलेले अभ्यासपुर्ण निष्कर्ष असे :

काही पुरूष गाडी चालवताना चुकतात
काही स्त्रीया गाडी चालवताना चुकतात
काही पुरूष उत्तम गाडी चालवतात
काही स्त्रीया उत्तम गाडी चालवतात

निश्चीत केलेले वर्तन :
कुठल्याही स्त्रीने गाडी चालवताना चूक केली की दाताड काढून हसायचे आणि निघून जायचे.
कुठल्याही पुरुषाने गाडी चालवताना चूक केली की दाताड काढून हसायचे आणि निघून जायचे.

कायद्याने सक्ती आहे म्हणून स्वतः हेल्मेट घालणारे आणि लहान पोर बिना-हेल्मेटचं पुढे उभं करून नाही तर आई/बाबाच्या मागे सीटवर बसवून दुचाकी चालवणारे कूल(!) पालक बघितले असतीलच.

तसेच नियम आहे म्हणून ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीटवर बसलेल्या पालकांनी सीट बेल्ट लावलेला आणि पोरं मागे सुटी बसलेली/झोपलेली/खिडकीला नाक लावून उभी असलेली पण बघितलं असेल.

ही कूल लोकं नियम पाळत असल्याने कुठल्याही प्रसंगात त्यांची चूक कबूल करत नाहीत. त्यांची चूक नसतेच कारण ते हेल्मेट-बिल्मेटचे नियम पाळतात. त्यांनी मागून येऊन गाडी ठोकली तरी आपण लवकर ब्रेक लावल्यानं असं होतं.

तृप्ती, तू अजून पुढच्या पॅसेंजर सीटवर आपण सीटबेल्ट लावून तान्ह्या ते शालेय या वयोगटातल्या पोरांना तसेच मांडीवर कौतुकाने बसवून नेताना पाहिलेलं दिसत नाहीयेस

पॅसेंजर सीटवर आपण सीटबेल्ट लावून तान्ह्या ते शालेय या वयोगटातल्या पोरांना तसेच मांडीवर कौतुकाने बसवून नेताना पाहिलेलं दिसत नाहीयेस<<<

कौतुक म्हणून त्या मुलाचे दोन्ही हात स्टिअरिंगवर ठेवून (चालू गाडी) दोन तीन सेकंद स्वतःचे हात सोडणे पाहिले आहेत का? मी पाहिले आहे.

मस्तं लेख..
मुंबईमधे असे प्रकार थोऽऽडे कमी बघायला मिळतात...
ते धुमकेतू झुंडीने जातात, एकाला जागा दिली की २५ घुसतात.. जाताना आपल्या गाडीचा आरसा हलवून जातात..

अवघे विश्वची माझी पिकदाणी:>> असं कुणी केलं की मोठयाने 'छी...! घाणेरडा...!' ओरडतो. कोण ओरडलं ते काही कळ्त नाही कारण तो पर्यंत गाडी पुढे हललेली असते.

असल्यांच्चा मलाही खुप राग येतो. त्यांना प्रती उत्तर म्हणुन जमल्यास ओवर्टेक करुन त्यांच्यावर उड्नार नाही, पन त्यांना कळेल असं थुंकतो आणि गाडी स्लो करतो. जेणे करुन त्यांना माझ्यावर राग काढायला मिळावं.
मग सहजीकच ते माझ्यावर ओरडनार, मग मी हसुन "काका तुमचंच अनुकरण केलंय, मगाशी तुम्हीही असंच शेणखाउन थुंकलात ना" म्हंटलं की तोंड पाहण्यासारखं होतं त्यांचं. त्यांची चुक त्यांना कळते की नाही माहीत नाही, पण जाम चिड्चिड झालेली तर दिसते.

"काका तुमचंच अनुकरण केलंय, मगाशी तुम्हीही असंच शेणखाउन थुंकलात ना" म्हंटलं की तोंड पाहण्यासारखं होतं त्यांचं. >>> मस्त आयड्या आहे पण
फारच धोकादायक मार्ग आहे हा. सगळेच काका राग दाबणारे नसतात. एखादा तुम्हाला दाबून टाकेल.

सई, मस्त खुसखुशीत लेख Lol
गाडी चालवणारी मुलगी असेल तर बिनधास्त कुठेही रस्ते क्रॉस करणारे लोकही दिसतात. मुलगी गाडी थांबवेल, अंगावर घालणार नाही असा विचार करतात बहुधा. ( गाडी मोठी असेल तर मात्र असा रस्ता क्रॉस करत नाहीत )

हबा, Lol
लहान पोर बिना-हेल्मेटचं पुढे उभं करून, पॅसेंजर सीटवर आपण सीटबेल्ट लावून तान्ह्या ते शालेय या वयोगटातल्या पोरांना तसेच मांडीवर >> ++ अगदी हायवेवरही चालतं. इ. एक्स. हायवे ऐरोली ब्रिज अशा ठिकाणीही पाहिले आहे.
मुलाचा हट्ट म्हणुन पाठी बसणार्‍या मुलाचे तोंड उलट्या दिशेने ( रस्त्याकडे ) ठेवुनही चालवतात काही जण.

लेख तर मस्तच.
अजुन एक प्रकार म्हणजे हिंजवडीतले टमटमवाले....
इतके डेंजरस चालवतात कि आपल्याला आपली गाडी आणि आपली बॉडी दोन्ही सुखरुप पाहिजे असेल तर त्यांच्या चहूबाजूंनी प्रत्येकी २-२ फुट जागा ठेवूनच आपली गाडी चालवण्याला पर्याय नसतो.

मस्त लिहिलं आहेस ! दर दोन वाक्यांआड आणि प्रतिसाद वाचतानाही 'अगदी, अगदी' होत होतं Happy

कुठल्याही गल्लीतून बाहेरच्या रस्त्यावर वळताना मागे बघायचंच नाही हे अगदी व्यवच्छेदक लक्षण आहे.

लोकं सिग्नल पाळत नसल्याने रस्ता क्रॉस करता येत नाही ह्या अनुभवातून गेल्यामुळे हल्ली सिग्नलला थांबल्यावर मागचे हॉर्न ऐकून मला आसुरी आनंद होतो Wink फक्त दुरुनच सिग्नल आहे हे जोखून स्पीड शिस्तबद्ध कमी करत मागच्याला भानावर आणावे लागते नाहीतर मागची गाडी धडकण्याची शक्यता जास्त.

@ ह. बा

काही पुरूष गाडी चालवताना चुकतात
काही स्त्रीया गाडी चालवताना चुकतात
काही पुरूष उत्तम गाडी चालवतात
काही स्त्रीया उत्तम गाडी चालवतात

पण स्टेरियोटाइप बायकानांच का करतात?:प

लेख मस्त!
पण ती जाहिरात बायकांचे ड्रायव्हिंग टार्गेट करते असे वाटले नाही, एका बापाला मुलीची वाटणारी काळजी असा अर्थ मी लावला.

मस्त लेख!
ह्यात बरिच भर टाकता येइल अजुन,
'स्लॉथ कॅटेगरी' - तुम्हाला असेल घाई आम्हाला काय त्याचे? आम्ही २०-३० च्याच स्पीड ने चालवणार..रस्ता बारीक असेल तर ना ओव्हरटेक करता येते, ना उडत जाता येते.

'मेरी मर्जी कॅटेगरी'- ह्या कॅटेगरीतले लोक्स मनाला वाटेल तेंव्हा रस्ता क्रॉस करतात, असेल तुम्हाला काळजी तर मारा ब्रेक. एकदा अशीच सरळ चालेली काकू अचानक रस्ता क्रॉस करायला वळाली, कचकचुन ब्रेक दाबावा लागला, वर परत शिव्या 'कारे डोळे फुटले काय? 'सॉरी काकू, चुक झाली', आता त्यांना समजाउन सांगणे की काकू तुम्ही अचानक वळलात आणि काहीही न बघाता रस्ता क्रॉस करायला लागलात म्हणजे मुर्खपणा झाला असता Uhoh

'इंडीकेटर शोपिस कॅटेगरी'- ह्यातले लोक्स इंडीकेटर न दाखवताच वळतात, इंडीकेटर दाखवणे म्हणजे कमीपणा वाटतो की काय माहीत, ह्यात तथाकथित उच्च शिक्षित, MNCत काम करणारे पण पाहिलेत. आता अनुभवावरुन शिकलोय की कोण वळणार आहे ते बॉडी लँग्वेज वरुन लक्षात येतं, (तरीही कधी कधी अंदाज चुकतोच). इतका राग येतो की सांगावसं वाटतं 'बाबारे तो इंडिकेटर वापरायचा नसेल ना तर काढुन घे आणि कंबरेला लाव दोन्ही बाजुनी दोन.'

मग तिथे फॉर अ चेन्ज पुत्ररत्न दाखवायचं होतं की, गाडीला हॅन्डब्रेक न लावता उतारावर पार्क करणारं....
एकुणातच बायकांच्या ड्रायव्हिंगबद्दल असलेली सार्वजनिक मते बघितली तर जाहिरात इतकी साळसूद असेल असं वाटत नाही Wink

@अग्निपंख

इतका राग येतो की सांगावसं वाटतं 'बाबारे तो इंडिकेटर वापरायचा नसेल ना तर काढुन घे आणि कंबरेला लाव दोन्ही बाजुनी दोन.'
>> हा हा हा. फारच जिव्हरी लागलंय बहुतेक!

@वरदा

बरोब्बर! मुलींना न येणार्‍या गोष्टींमध्ये ड्राईव्हींग ही एकच नाहीये!
असे खूप स्टेरियोटाइप आहेत.
आणि ते अनफेअर आहेत हे मुलींना देखील पटवून द्यावं लागतं.

Pages