हासू न चेह-यावर, केला सलाम नाही!

Submitted by profspd on 3 July, 2014 - 06:37

हासू न चेह-यावर, केला सलाम नाही!
माझ्याकडे तुझे का कुठलेच काम नाही?

जन्मात मी कुणाचा झालो गुलाम नाही!
केला खुशामतीचा कोणा सलाम नाही!!

उचलून जीभ नुसती टाळ्यास लावतो तू....
वाचाळतेस तुझिया कुठला लगाम नाह

मी बासनात मजला बांधून ठेवले मग.....
दुनियेकडे पुरेसे देण्यास दाम नाही!

वार्धक्य खंत खाते, आयुष्य चाळताना.....
जगलो कसाबसा मी, जगलो तमाम नाही!

बाजूस ठेवलेल्या प्रश्नांस हाक देतो....
जेव्हा असे पहातो, कुठलेच काम नाही!

धरसोड फार करतो, त्याचाच त्रास होतो!
माझ्याच निर्णयावर का मीच ठाम नाही?

केली व्रतस्थतेने बिनतोड नोकरी मी....
आराम आज करतो, तोही हराम नाही!

आवाज आतला मी ऐकून शेर लिहितो.....
हे हात फक्त माझे, माझा कलाम नाही!

या आजच्या पिढीला कळते सखित्व कोठे?
राधा कुठेच नाही, कोठेच श्याम नाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतल्यात गुलाम आणि सलाम आल्यामुळे पुढचे अनेक काफिये तंत्रानुसार अयोग्य ठरतील.

गझल पूर्ण वाचली नाही.

या आजच्या पिढीला कळते सखित्व कोठे? >>> असे का म्हणावे? काही बातम्या वाचून की उनाड विध्यार्थी बघून?
सखित्व कळण्यासाठी आताचा काळच फार चांगला आहे.

अनेक शेर आवडले ही कवाफी पळवावी अश्या विचारात आहे मी अनेक महिने अडकून पडलेल्या शेराची गझल करता येऊ शकेल मला म्हणून ...
धन्यवाद ह्या कवाफीबद्दल

शेरात विठ्ठलाच्या का दंगतो असा मी
माझा गुरूर येथे माझा गुलाम असतो

असा तो शेर आहे

धन्यवाद
लक्षातच नाही आले गझलेच्या धुंदीत मतल्यातील चुकीबद्दल!
पहातो काही करता येते का ते!
लक्षात आणून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

बदली मतला आवडला

मी ऊग्र दर्प आहे त्या अमृतांजनाचा
वासात साफ नकली मी झंडुबाम नाही

असा एक सुचला ...सीरीयसली ..मी चेष्टा करत नाहीये सहजच सुचला Sad

बरेचसे शेर आवदले
बदल केलेला शेर जास्तच आवडला

पण असं एकाच गझलेत २ वेळा 'सलाम-सलाम' आलं तर चालतं का? (ओअहिली ओळ आणि तिसरी ओळ)

तिसर्‍या शेरात पण नाही चा टायपो झालाय Happy

बासनात >>> हे म्हणजे काय? Uhoh

पण असं एकाच गझलेत २ वेळा 'सलाम-सलाम' आलं तर चालतं का?<<<<<<

अगदी खात्रीने सांगतो की चालतं ! एखादा काफिया त्याच रचनेत पुन्ह्यांदा घ्यायचा की नाही हा निर्णय टोटल्ली शायराचा असतो रियादेवी Happy

बासन बहुतेक विद्या बालन च्या नात्यातलं असावं कुणीतरी मलाही नक्की माहीत नाही

एकच काफिया एका गझलेत कितीही वेळा वापरला तरी चालतो!
पूर्ण गझल देखिल एक काफिया वापरून लिहू शकतो
अर्थात मतल्यात दोन काफिये असतात
आधीच्या मतल्यात गुलाम व सलाम असे काफिये वापरले होते! या गझलेमधे ते चुकीचे होते कारण असे केले तर काफियातील न बदलणारी अक्षरे 'लाम' अशी प्रत्येक काफियामधे वापरायला हवी होती!
मग मी पूर्वीचा मतला शेर म्हणून ठेवला व नव्या मतल्यात सलाम व काम हे काफिये वापरले व सुटका करून घेतली!
म्हणजे आता काफियामधील न बदलणाारे अक्षर फक्त 'म' असेल जे या गझलेत पाळले गेले आहे! अलामत आकारांती सर्व शेरात पाळलेली आहे!

भूषणरावांचे आभर त्यांनी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली!
................प्रा.सतीश देवपूरकर