विषय क्रमांक २ : माझा पहिला मित्र

Submitted by अमेय२८०८०७ on 3 July, 2014 - 06:06

गाण्याची दोन पुस्तके उघडी आहेत, पेटी अर्धी मांडीवर अर्धी जमिनीवर आहे, आजोबांचं गाणं अगदी रंगात आलंय आणि पेटीच्या उंचीची (!) आम्ही दोन तीन नातवंडं पेटीसमोर हलणार्‍या भात्याची गंमत जमिनीला नाक लावून बघत बसलोय..... आजोबांच्या अगदी पहिल्या आठवणींचे हे दृश्य-चित्र आहे. काही वेळाने कोणातरी नातवंडाला त्या पेटीच्या समोरील छिद्रात बोट घालून बघायची हुक्की यायची आणि सुरांनी साथ सोडल्यामुळे त्यांचं गाणं ब्रेक लागल्यासारखं थांबायचं. अर्थात नातवंडांवर रागवायचं वगैरे असतं हे त्यांना माहितच नव्हतं. फारफारतर .."अगं ह्या सगळ्यांना एकदम कुणी आत सोडलंय? एकादोघाला बाहेर घेऊन जा बघू!" अशी घोषणा माजघराच्या दिशेने व्हायची आणि पुन्हा ते गाणं तितक्याच उत्साहात सुरू व्हायचं.

मी शाळेत जायच्या अगोदरच आजोबा शिक्षणाधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. घरातच असायचे त्यामुळे आम्हा पोरांना आमच्यातलेच एक वाटायचे. बाबा-काका इत्यादी अरसिक माणसांना कामाच्या व्यापापायी घराभोवतीची मोडकी रिक्षा, ती मोडल्याची संभाव्य कारणे, गंगावेशीत दूध देणार्‍या म्हशी आणि चुरचुर धार काढणारी शिसवी माणसे, शेजारच्या गॅरेजमध्ये डोळ्यांवर गॉगलकाच लावून वेल्डींग करणारे कामगार, गारा, पाऊस, "दही घ्या दही".. म्हणत फिरणार्‍या दहीवाल्या, फुलपाखरे, धनुष्य-बाण, टेंबलाईची जत्रा अशा रंगीबेरंगी गोष्टींत काही म्हणता काही इंटरेस्टच नव्हता. सकाळ झाली की निमूटपणे डबा खांद्याला लावून ही माणसे कामावर जात. या गोष्टींमधली गंमत शेअर करायला आजोबांशिवाय दुसरे माणूस आम्हा पोरांच्या तावडीत सापडता सापडत नसे.

जगात चाललेल्या सर्व गोष्टींत त्यांना प्रचंड रस होता. बर्‍याच विषयांवर सखोल माहिती होती आणि ज्याबद्दल माहिती नाही त्यावर अधिक वाचण्याचा, समजून घेण्याचा उत्साह होता. नाती, मैत्री, आन्हिके, सण, सुट्ट्या, छंद सगळ्यांचाच त्यांनी उत्सव केला. वेळ जात नाही म्हणून कंटाळवाणेपणाने जांभया देत बसलेले त्यांना मी कधीही पाहिल्याचे आठवत नाही. उलट दिवसाला २४ तासच का आहेत म्हणून ते नक्कीच चरफडले असणार, असे आता नक्की वाटते.

स्वयंपाकघरात खुडबुड करणे हा त्यांचा आवडीचा उद्योग. आजी अजून निवृत्त व्हायची होती त्यामुळे अकरा साडेअकराला तिची रिक्षा गेली, की आजोबांच्या हालचालींत एक आगळा डौल येई. विरुद्ध पक्षाचे खेळाडू काहीतरी जादू होऊन फ्रीझ झाले आहेत आणि गोल मारायला पूर्ण मैदान मोकळे आहे अशा आवेशात ते स्वयंपाकघरात जात. जेवणात मसाला-तेल बेताचे असावे, तळणीचे पदार्थ जास्त खाऊ नयेत वगैरे मतांनी युक्त स्वैपाक करणार्‍या आजीचे जेवण कधी मनास आले नाही तर (ती नोकरीला गेल्यावर) मुक्तहस्ताने ते झालेला स्वैपाक मनाप्रमाणे 'सुधारत' असत. शिवाय कामाचा उरक एवढा होता की केलेला घोटाळा भांडी-ओटा व्यवस्थित धुऊन निस्तरतही असत पण आजी ही 'शेरलॉक होम्सच्या' शाळेची हेडमास्तरीण असल्याने एखाद्या भांड्याची बदललेली जागा, ज्यादाचा चमचा अशा खुणांवरून ती त्यांचे उपद्व्याप हातोहात पकडत असे. त्यानंतर आजीने सोडलेले वाग्बाण शिताफीने चुकवत गालात हसत बसलेले आजोबा पाहणे हीही एक मजाच होती.

नित्यनियमाप्रमाणे आमच्या शाळा सुरू झाल्या. शिक्षणाची स्पर्धा व्हायच्या जरासा आधीचा काळ असल्याने आम्हाला शाळेत गोडीही वाटू लागली पण फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड म्हणून आजोबांचे स्थान अबाधित राहिले. एकट्या आजोबांना सगळे विषय शिकवणे शक्य नाही म्हणून सरकारने शाळा नावाची सोय केली आहे असे माझे बराच काळ मत होते. सामान्यज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र कुठला म्हणून विषय त्यांना वर्ज्य नव्हता आणि प्रत्येक विषयावर पुस्तकांपेक्षा काहीतरी अधिक माहिती नेहेमी त्यांच्याकडे असे. "आजोबा वाक्यं प्रमाणं..." या उक्तीनुसार आम्ही बेफाट जगत होतो.

आजोबा काय होते? त्यांनी तसं काय वेगळं मुद्दामहून शिकवलं ? औपचारिक भाषेत व्याख्या करणं कठीण आहे. त्यांनी फुलांना रंग-गंध असतात हे सांगितलं, इंद्रधनुष्य दाखवलं, रेडिओवरच्या भूपाळ्या ऐकवल्या, कराग्रे वसते लक्ष्मी म्हणवून घेतलं, सर्कस दाखवली, विदूषकाच्या गमतीजमतींमागे सखोल सराव असतो याची जाणिव करून दिली, ग्रंथालयात जाण्याची सवय लावली. पुढची वीसेक वर्षं तरी मला उपयोग नाही ह्याचा विचार न करता बँकेतले साधे व्यवहार शिकवले, सिनेमे दाखवले, मध्यंतरात आईसक्रीम चाखवलं, केवळ प्रवासाचा आनंद म्हणून मुसळधार पावसात गंगावेश ते गांधीनगर डबल डेकर प्रवास घडवला. कंडक्टरशी बोलून त्याच्या कामाबद्दल जाणून घे म्हणून सांगितलं. अभ्यास सांभाळून टीव्ही बघायला प्रोत्साहन दिलं. रंकाळ्यावर वाळूत खेळण्यासोबत पाण्याकडे बघण्यातही मजा आहे याचा आनंद दिला. पंचगंगेच्या पाण्याची पातळी मोजणारी मच्छिंद्री म्हणजे काय, ते सांगितलं. अंबाबाईच्या देवळावर शंकराचे मंदिर आहे आणि फक्त श्रावण सोमवारातच ते उघडतात ही गंमत दाखवली. ऋतू कसे होतात, अमेरिका कुठे आहे, प्रोजेक्टर कसा बनवायचा...छे! त्याकाळी जेजे काही माहिती होते त्याचा स्रोत आजोबाच होते..फक्त आजोबा...आणि असे आजोबा आपल्याला आहेत म्हणून मी कॉलर ताठ करुन बिनदिक्कत कुठल्याही विषयावर मतप्रदर्शन करत असे. आजोबांच्या बळावर एकदा कॉलेजात जाणार्‍या दादाशी पद्मा टॉकीजला दोन आठवड्यांपूर्वी कुठला पिक्चर लागला होता याबद्दल कुल्फीची पैज लावून जिंकल्याचं आठवतंय, कारण पेपरमधील चित्रपटखेळांचं पान खेळाच्या, राजकारणाच्या पानाइतकंच आवडीनं वाचण्याची सवय त्यांनीच लावली होती.

खाताना बोलू नये याचा काटेकोर पुरस्कार करणारे आजोबा चालताना बोलण्यात मात्र अगदी रंगात येत. नोकरीच्या निमित्ताने सगळा पश्चिम महाराष्ट्र त्यांनी पालथा घातला होता. घाटातून वाहने जात नसत त्याकाळात पायी घाट उतरून कोकणातील शाळा तपासल्या होत्या. त्या प्रवासाचे, दिवसांचे अनेक किस्से त्यांच्याकडे ताजेतवाने होते. सोबत चालताना कितीही अंतर असले तरी आजोबांमुळे ते अगदी सुसह्य होऊन जाई आणि आईबापाबरोबर कोपर्‍यापासूनच रिक्षाचा हट्ट धरणारी चिल्लीपिल्ली आजोबांबरोबर मोठीमोठी अंतरे अगदी सहज चालून जात असू. आपणासी जे जे ठावे..या वचनानुसार हातचे राखून न ठेवता आजोबांनी आम्हाला सगळे भरभरून दिले.

अर्थात केवळ जुन्या आठवणींत रमण्याचा त्यांचा अजिबात स्वभाव नव्हता. नव्याची ओढ होती, कुतूहल होते. इतर म्हातार्‍या माणसांप्रमाणे काळ त्यांच्यासाठी थांबलेला नव्हता. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन उमेद घेऊन येत होता आणि त्याचा विनियोग पूर्ण उत्साहाने होत होता.

हळूहळू आम्ही मोठे झालो. घरट्याबाहेर भरार्‍या वाढू लागल्या. आजोबांशी संवाद नाही म्हणले तरी कमी कमी होत गेला पण त्यांनी काय दिले आहे याची समज उत्तरोत्तर वाढतच गेली. पहिल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांचे पथ्यपाणी वाढले, हिंडण्या फिरण्यावर मर्यादा आल्या. मनसोक्त आयुष्य जगलेल्या आजोबांना मन मारून दिवस काढताना पाहणे थोडे क्लेशाचे होऊ लागले. अबोल आजोबा हल्ली काही दुसर्‍याच विचारांत असल्यासारखे वाटू लागले.

त्या रात्री जेवण अगदी रंगात आले होते. काहीतरी विषयावरून हास्यविनोद चालू होता, कधी नव्हे ते आजोबाही जुन्या उत्साहाने सामील झाले होते. एवढ्यात आजोबांनी घास टाकून डोकं धरलं. घास लागला म्हणून मी पाण्याचा ग्लास पुढे करणार इतक्यात त्यांनी मनगट तोंडात धरून जोराने चावायला सुरूवात केली. पुढची काही मिनिटे त्यांच्या तोंडातून वेदनेचा एक भेसूर हुंकार येत राहिला आणि दहा पंधरा मिनिटांनी त्यांची शुद्ध हरपली. त्यानंतर ते कधीच कुणाशीही परत बोलले नाहीत, शुद्धीवरही आले नाहीत. मेंदूत झालेल्या रक्तस्रावामुळे झालेली हानी भरुन न येण्यासारखी होती.

शेवटच्या दिवशी केवळ श्वास चालू असलेल्या आजोबांना आम्ही घरी आणले. पूर्ण रात्रभर सगळे घर बिछान्याभोवती खिळून होते. अनेक आठवणी निघाल्या. सोनेरी वर्खाचे क्षण सगळ्याच कुटुंबियांना दिलेल्या आजोबांच्या प्रत्येकाकडे अनंत स्मृती होत्या. काही काळातच ते आपल्यात नसणार आहेत आणि कालांतराने त्यांचे शारीरिक अस्तित्व केवळ एक धूसर आठवण राहणार आहे हे कळण्याइतपत सगळीच नातवंडे मोठी झाली होती.

आजोबा निघून गेले, बोरकर म्हणतात त्याप्रमाणे अगदी 'नि:संग अवधूतासारखे' कुठलीही आस मागे न ठेवता गेले. दहा पंधरा दिवसांनी लायब्ररीत गेलो. कार्डवर मागील पुस्तकाच्या नावापुढे असलेली त्यांची सही वाचताना कमावण्या-गमावण्याचा एक मोठा धडा मला मिळाला. घशातला आवंढा रोखत लायब्ररीबाहेर पडलो, दणादण सायकल मारत त्यांच्या आवडत्या पंचगंगेच्या घाटाकडे गेलो. पावसाने भरून वाहत्या नदीला सुन्नपणे बघत असता डोळे कधी भरून आले कळलेच नाही.

बावीस वर्षे झाली आहेत, आठवणीतला चेहेरा धूसर झालाय, फोटो बघून उजाळा द्यावा लागतो खरा पण माझ्या या पहिल्या मित्राच्या विविध आठवणी मात्र अजूनही सोनसळी आहेत...अगदी लख्ख !

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्या प्रिय आजोबांना सादर दंडवत अमेय.. ___/\___
खुप तन्मयतेने पोचवलेस आजोबा. डोळ्यांसमोर लांबलचक लपेट उलगडत नेल्यासारखे आजोबा आणि आजुबाजुचे तुम्ही, ते सगळे रम्य दिवस जसेच्या तसे उभे केलेस.
पण असं खुप घाईत, तारीख उलटून निघाल्यासारखं गडबडीत का लिहिलंयस? जरा सावकाशीने, शांतपणे आणखी बरंच लिहू शकला असतास असं वाटलं.

आणि मलाही माझ्या आजोबांकडे नेलंस तू... Happy

मस्त, आवडलंच !

माझेही पहिले मित्र माझे आजोबाच, पत्ते आणि क्रिकेटची सामाईक आवड हे त्यामागचे एक कारण..

खुप ओघवतं आहे वर्णन अमेय. खुप गोड लिहीता लिहीता नंतर चटका लावलास बाबा, आजोबांच्या आजारपणाचा.

आजोबांच्या खुप गोष्टी तुझ्यात उतरल्या आहेत असं वाटतं, त्यांचा खवय्येपणा, त्यांची पदार्थ करण्याची आवड, वाचन आणि उत्साहीपणा.

ग्रेट होते तुझे आजोबा.

अमेय....

आपलं कोल्हापूर आणि हा शहराच्या दाही दिशांना भरभरून वाढलेल्या जीवनशैलीची पखरण आपल्या बोलण्यातून, वर्तनातून तुम्हा सार्‍या नातवंडावर मनमुराद करणारे ते शिक्षणाधिकारी आजोबा. रितिरीवाजानुसार ते असतील तुमचे आजोबा पण तुमच्या लेखावरून स्पष्ट दिसत्ये की त्यानी तुम्हाला वा तुम्ही त्याना आपला एक ज्येष्ठ मित्र, सखा, मार्गदर्शक, शिक्षक मानले होते आणि तसे ते होतेही. एनसायक्लोपिडीआ नंतरच्या आयुष्यात तुम्ही हाताळला असेल पण अगदी शालेय जीवनात आजोबारुपी चालताबोलता विश्वकोश तुमच्या संगतीत, अगदी हक्काने, होता....त्याचे फार मोठे महत्त्व होते ते तुमच्या जडणघडणीत उपयोगी पडले.

फार भावुक झाला आहात तुम्ही लिहिताना हे स्पष्ट जाणवते वाचकाला....आणि हीच तर खरी माया एखाद्या व्यक्तीविषयी. काळाच्या नियमानुसार आजोबाना एके दिवशी तुमची संगत सोडणे अपरिहार्य होते....सृष्टीचा तो नियमच असतो....ते गेले म्हणजे शरीर गेले....राहिला आहे त्यांच्यामागे तुमच्याजवळ तो हा आठवणीचा ठेवा. तो किती अमोल आहे ते तुमची भाषाच बोलते लेखातील.

अमेय मित्रा....

फार सुरेख लिहिले हे तू...आणि वाचता वाचता मी पण माझ्या पपांच्या, म्हणजे माझ्या आजोबांच्या आठवणीत रममाण झालो. आजोबा असेच असतात नाही ?

मस्त !!

अमेय, केवढा मोठा ठेवा असतो हा ! किती गोड नातं आपल्याला जगाकडे बघायला शिकवणारं आणि त्या मानाने अनुल्लेखित.
तुमच्या खास खूप सुंदर कधी नर्मविनोदी कधी भावविव्हल शैलीत आलं हे सगळं.

अमेय, छान लिहीलयं. वाचताना भावुक होउन आपल्या आजीच्या आठवणी सांगणारे माझे बाबाच डोळ्यासमोर आले . आणि माझ्या आजोबांची आठवणं ही आली.

मस्त लिहलय Happy
एकट्या आजोबांना सगळे विषय शिकवणे शक्य नाही म्हणून सरकारने शाळा नावाची सोय केली आहे असे माझे बराच काळ मत होते.>>> हे वाक्य भारीय...

फारच छान शब्दबद्ध केल्यात लहानपणीच्या लोभस आठवणी !

>>त्याकाळी जेजे काही माहिती होते त्याचा स्रोत आजोबाच होते..फक्त आजोबा...आणि असे आजोबा आपल्याला आहेत म्हणून मी कॉलर ताठ करुन बिनदिक्कत कुठल्याही विषयावर मतप्रदर्शन करत असे Happy

खरेतर पुर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीचा हा एक मोठा फायदाच होता की जुनी आणि नवी पिढी यांमधे असलेल्या मैत्रीमुळे केवळ माहितीचाच नव्हे तर संस्कारांचा पण फार मोठा साठा हस्तांतरित केला जात होता. आता गेल्या काही वर्षांपासुन या बदललेल्या लाईफ स्टाईलने या प्रकाराला जणू खिळ घातली गेली आहे.
माझ्या आईवडिलांच्या पिढीतले लोक जास्त करून टि.व्हि.च्या आहारी गेलेले दिसत आहेत. Sad

Pages