कृपया कथा पूर्ण करा - नम्र विनंती

Submitted by बेफ़िकीर on 2 July, 2014 - 12:40

जाधवरावांनी धुतलेली कोंबडी पिळून वाळत टाकली आणि ते सज्जात दोन हातांवर उभे राहून बाहेर पाहू लागले. झाडांची मुळे हिरवीगार होती आणि डोळ्यांना दिसत होती. झाडांची झालेली वाढ मात्र अदृष्य होती. वाळत पडलेल्या कोंबडीने पकाक पक असा आवाज केला व जाधवराव तिला म्हणाले की अडीच वाजता सन्याशी येईल. ते ऐकून सोळा टिटव्या उडाल्या. नाना पाटेकर वेडा आहे नाना पाटेकर वेडा आहे असे म्हणत एक पॅसेंजर ट्रेन लांबवरून निघून गेली.

जाधवराव घरात आले. मंगलाबाई आंघोळ करून गोदीच्या लग्नात ज्येष्ठ जावयांसाठी घेतलेल्या व त्यांनी फणकार्‍याने नाकारलेल्या टॉवेलने आपला सुडौल देह पुसत होत्या. लिप्रिल वीस एम जी च्या दोन गोळ्या भिंतीवर टांगलेल्या घुबडाच्या नाकात टाकून जाधवरावांनी लांबूनच विचारले

"चीन युद्धादरम्यान माझ्यासाठी घेतलेल्या सपाता कुठे आहेत?"

चपापून मंगलाबाईंनी अंगभर टॉवेल पांघरला व मादक नजरेने १३९ अंशाच्या कोनातून कटाक्ष टाकत उद्गारल्या:

"इश्श्य त्या खाऊनच नाही का हैबती बैल तडफडून मेला कारगिलच्या दरम्यान?"

जाधवरावांचा भुतांवर फार विश्वास! त्यांनी घरात वावरणार्‍या भुतांसाठी कित्येकदा गोबी मांचूरियन पार्सल आणलेले होते. त्यांचा इमेल आय डी सुद्धा जी एम बी अन्डरस्कोअर जे अ‍ॅट द रेट मंगलाबाई हॉट कॉम असा होता. जी एम बी म्हणजे गोबी मांचुरियन भुते, जे म्हणजे जाधवराव! हॉट म्हणजे गरम आणि कॉम म्हणजे कमोडिटी!

त्यातच क्षितीजाकडून आलेल्या एका निरपराध कवडश्यावर बसून बाबू नावाचा एक नोकर तेथे प्रवेशला. त्याला पाहून मंगलाबाईंनी खडसावून विचारले.

"ताबडतोब ये म्हणून सांगितले आणि इतका उशीर?"

"प्रकाशवेगाने आलो बाईसाहेब, साडे तीन लाख किलोमीटर सेकंदाला"

"चल कटकट सुरू कर"

बाबूने दोन मेलेले उंदीर एकमेकांवर आपटायला सुरुवात केली. सर्वत्र कट कट असा आवाज भरून राहिला. त्याच जुनूनमध्ये मंगलाबाईंनी मानेवर लिपस्टिक ओढली.

जाधवराव हर्षोल्लासित होऊन शवासन करू लागले.

एक आगळाच नाद सर्वत्र भरून राहिला. पिशाच्चयोनीतील काही आत्मे पिंगा घालत शवासनातील जाधवरावांच्या छाताडावर चिकटायचा प्रयत्न करत 'भुतकाईले भुता फेविकॉलसे' असे आक्रोशू लागले. मंगलाबाईंनी मोबाईल हातात घेतला आणि आपण फक्त मोबाईलच हातात घेतला हे कळताच संतापून एक भूतही हातात घेतले.

ते हातात घेतलेले भूत कोणाशीतरी चॅट करत असल्यामुळे मंगलाबाईंनी मोड आलेले सहा कवी फोडणीला टाकून त्यांचे सूप बनवले.

शवासनामार्फत इस्रो बरखास्त करून जाधवराव बर्म्युडा ट्रँगल वाचू लागले.

ही कथा पूर्ण करण्यास कृपया हातभार लावा. कथावस्तू, वातावरण, पात्रनिर्मीती हे सगळे स्पष्ट झालेले आहेच.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर सर, तुमच्या बाकीच्या कथा वाचून सांगतोय. तुमच्या तोडीचे कथालेखन खुपच कठीण आहे.
बिलकुल हटके.... Happy

Pages