विषय क्रमांक दोन - चैतन्याचा झरा

Submitted by शोभनाताई on 1 July, 2014 - 00:37

चैतन्याचा झरा.

'स्काइपवर येऊ शकाल का?' पटवर्धनांचा सकाळी ११.३० ला फोन आला.खर तर माझा स्वयंपाक व्हायचा होता इतरही कामे होती.पण त्यांच्या स्वरात इतका उत्साह होता.मला नाही म्हणवल नाही.त्यांचा मुलगा त्यावेळी जपानमधून संपर्कात होता.त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा प्रयोग करून पहायचा होता.मला अंतरजालावरील बाबी हाताळण्याचे अत्यंत जुजबी ज्ञान,त्याना माझ्यापेक्षा थोडेच जास्ती आणि जपान मधल्या तज्ज्ञ मुलाची अशा आमच्याबरोबर गाठ होती.तांत्रिक अडचणी येत होत्या.पण अनेक खटपटीनंतर प्रयोग किंचित पुढे सरकला.व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झाल नाही पण होऊ शकेल असा अंदाज आला.पटवर्धनांनी मनावर घेतलं म्हणजे ते पूर्णत्वाला जाणारच यात काही संदेह नाही.दोन दिवसापूर्वीच मिटींगमध्ये चर्चा झाली आपल्या सर्वांच्या तब्येतींचा विचार करता, मिटींगसाठी येण्याजाण्याचा व्याप करण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केल तर काय हरकत आहे.आम्ही बोलबच्चन. त्यांनी मात्र लगेच कृती केली. त्यांच्यामुळे अशा अनेक गोष्टी माझ्याकडून शिकल्या जातात.त्यांच्या संपर्कात राहणे हेच एक प्रकारचे शिक्षण असते.

.शरच्चंद्र पटवर्धन म्हणजे पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक.वय वर्षे ७९..परंतु संस्थापक म्हटलेलं त्याना अजिबात आवडत नाही.म्हटल तर ते दुरुस्त करून म्हणतात 'मी साधा कार्यकर्ता आहे.' हे फक्त बोलण्यापुरत नाही.त्याना तसच वाटत असत.त्याप्रमाणे त्यांची कृतीही असते.समारंभात मंचावर त्याना जबरदस्ती बसवावं लागत.त्यांच्या कामाला योग्य ती आणि तेवढीच दाद दिली तरी ते अवघडतात.

पटवर्धन आम्हाला प्रथम मधुसूदन शेंडे यांच्या घरी मिटींगमध्ये भेटले.पहिल्या भेटीतच लक्षात आल हे वेगळ रसायन आहे.पार्किन्सन्स मित्रमंडळात आम्ही सामील झाल्यावर अनेक वेगवेगळे पैलू उलगडत गेले..

१९९२ मध्ये त्यांच्या पत्नीला पार्किन्सनन्स झाल्यापासून पार्किन्सन्सवर विविध माध्यामातून बरीच माहिती गोळा केली.डॉक्टर मोहित भट यांचेकडून पार्किन्सन्स फौंडेशन ऑफ इंडियाबद्दल समजल. त्यांचे सभासदत्व घेण्याचा व इतर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण विशेष प्रतिसाद मिळाला नाही.मग आपणच का असा गट सुरु करायचा नाही या कल्पनेतून २००० मध्ये पार्किन्सन्स स्वमदत गट सुरु केला.

'आपणच' हा त्यांच्या कोशातला महत्वाचा शब्द.दरवर्षी निघणार्‍या आमच्या मासिकात शुद्धलेखनाच्या होणार्‍या चुका त्यांच्यासाठी यातनामय असतात. आता बातमीपत्र सुरु करायचं आहे.तर म्हणाले,त्या चुका पाहण्यापेक्षा आपणच का डीटीपी शिकून घ्यायचं नाही? पुणा इंजिनीअरींग कॉलेजमधून सिव्हील इंजिनिअर झालेले पटवर्धन आईच्या आजारपणामुळे नोकरी सोडून पुण्याला आले.अमोनिया प्रिंटींग,झेरॉक्स, सायक्लोस्टाईल,नंतर इलेक्ट्रानिक क्षेत्रात कॅल्क्युलेटर रिपेअरिंग असे उद्योग आपणच शिकून केले.संगणक नविन आल्यावर संगणकाचे क्लास,खुप ज्ञान होते असे नाही पण जे येते ते शिकवायाचे हे करताना आपल शिकण होईल हा दृष्टीकोन. अशी आपणचची यादी खूप मोठी आहे.

स्वच्छ शुद्ध विचार, स्वच्छ शुद्ध बोलण आणि स्वच्छ शुद्ध लिहिण यात विचाराची स्पष्टताही आली.आणि त्याप्रमाणे वागण हा त्यांचा स्थायी भाव आहे.कोणतेही निर्णय घेण्यामागे असा विचार असल्याने ते आपल्या निर्णयाबद्दल ठाम असतात.आणि त्यानुसार आपली भूमिका इतरांपर्यंत पोचविण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात.मी म्हणतो म्हणून ऐका अस नाही तर माझ म्हणण खोडून काढा. मी मान्य करीन. असा त्यांचा खाक्या असतो.याबाबतच एक उदाहरण सांगायचं तर सुरुवाती पासून वर्गणी न घेण,मासिक,पुस्तके विनामूल्य देण याबाबत ते ठाम आहेत.पहिल्याबाबत कोणाला फार विरोध नव्हता.दुसर्‍याबाबत 'रुका हुवा फैसला' सिनेमाप्रमाणे एकेक मोहरे त्यांच्या बाजूनी होत गेले. पुस्तकाबाबत मात्र हे मान्य होत नव्हत. ना नफा ना तोटा या तत्वावर तरी मुल्य ठेवाव अस सर्वाना वाटत होत.याबाबत जवळजवळ सर्वजण एका बाजूला आणि ते एका बाजूलां अशी परिस्थिती होती.पण ते शेवटपर्यंत खिंड लढवत राहिले.त्यांच्या डोळयाच ऑप्रशन होत.पण तरी त्यादिवशी त्यांची बाजू मांडणार्‍या विविध मुद्यांच टिपण काढून ते बर्वेंच्या घरी देऊन गेले. तेही सायकलवर.

या वयातही उन असो, पाउस असो,सर्व ठिकाणी त्यांचा सायकलवर संचार असतो.मिटिंग दुपारी तीनला असली तर आम्ही बंद गाडीतून आरामात येऊनही थकलेले.तर पटवर्धन मात्र सायकल चालवत येऊनही हसतमुखाने आणि उत्साहानी कामाला लागलेले.आतापर्यंत मंडळाच्या जितक्यां म्हणून मिटिंग झाल्या त्या सर्वाना त्यांची एखादा अपवाद वगळता१००% उपस्थिती.तीही सक्रीय'.कुठे कमी तिथ आम्ही' ही वृत्ती.आता मिटींगची ठिकाणे सर्व पेशंटना माहित झाली पण सुरुवातीला आल्यावर पेशंटला नेमक कस जायच समजाव म्हणून छोटीछोटी पत्रके करून आणलेली असत. शिवाय सेलोटेप,छोटी कात्री असायची.वजन काटा तर ते आजतागायत आणतात.वजन कमी होण हे पार्किन्सन्समधील मह्त्वाच लक्षण. प्रत्येकानी दर महिन्यात वजन पाहावं अस त्याना वाटत असत.वही करून त्यानुसार नोंदी करण्याचाही प्रयत्न .झाला. याबाबत सारे उदासीन. पण तक्रार न करता ते वजन काट्याच ओझ आणतातच.एखादा वक्ता अचानक आला नाही तर वेळ निभाऊन नेण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर सामग्री असते.शुभार्थींची(पेशंट) काळजी,त्यांच्या शुभंकरांपेक्षा (केअर टेकर)यांनाच जास्त असते.

ते सतत पुण्यातील आणि पुण्याबाहेरील शुभार्थीना फोनवरून कौन्सिलिंग करत असतात.तिशीत पार्किन्सन्स झालेल्या एका शुभार्थीने सांगितले.'आत्महत्या करावीशी वाटली.पण पटवर्धनकाकानी हे कसे चुकीचे आहे हे इतक्या छान प्रकारे समजून सांगितले की आता पीडी होऊन दहा वर्षे झाली.खूप सोसावे लागते पण आत्महत्येचा विचार मात्र पूर्ण पुसला गेला'.ते फक्त त्यांच्या पत्नीचे शुभंकर नाहीत तर जोजो भेटेल पिडीग्रस्त त्यांचे शुभंकर आहेत.पीडी पेशंट स्वत:ही विचार करणार नाही इतका त्यांनी पेशंटच्या भूमिकेत जाऊन जगण्यातील बारीक सारीक बाबींचा विचार केलेला असतो.पार्किन्सन्सवरच चिकित्सकपणाने केलेलं वाचन त्याला असलेली अनुभवाची, निरिक्षणाची जोड,पिडीग्रस्तानी आनंदी राहावं यासाठीची धडपड या सर्वातून निर्माण झालेलं लेखन,शुभंकर,शुभार्थींसाठी दिशादर्शक आणि पिडीवरील लिखाणात मोलाची भर घालणार आहे.अत्यंत वस्तुनिष्ठपणे केलेले तटस्थ,तर्कशुद्ध,तरीही रटाळ न होता संवाद साधणार्‍या ओघवती भाषेत लिखाण हे त्यांचे वैशिष्ट्य.

लिखाणात तटस्थता असली तरी शुभंकर म्हणून त्यांच्या वागण्यात अत्यंत हळुवारपणा असतो.सेवा करण हा स्त्रियांचा गुण हा समज त्यांनी खोटा ठरवला.आमची भेट झाली तेंव्हा त्यांच्या पत्नीला पीडी होऊन १४ वर्षे झाली होती.वहिनींचा मुळातला अशक्तपणा,त्यात गीळण्याची समस्या या बाबी लक्षात घेता इतकी वर्षे त्यांच्या पीडीला आटोक्यात ठेवण्यात पटवर्धनांचा वाटा खूप मोठ्ठा वाटा आहे.त्यांचा आहार,विहार व्यायाम,त्याना वेळ देण आणि अवकाशही देण यांचा सुंदर मेळ त्यांनी घातला होता.वहिनी अधून मधून सभाना येत.याबाबतीतला निर्णय वहिनींचा असे. त्या असल्या की सायकलीला थोडा आराम मिळे.एरवी त्यांच्या शबनम मध्ये टीपणासाठी वही,पेन,औषधाच्या रिकाम्या छोट्या बाटलीत पाणी,इतराना देण्या साठी आणलेली काही उपयुक्त कात्रणे असत.वहिनी बरोबर असल्या की त्यांच्या औषधांची भर असायची.सभेवर नियंत्रण ठेवताना वहीनींच्या औषधांच्या वेळेवर लक्ष असायचे.पतीपत्नी म्हणून आणि शुभंकर शुभार्थी म्हणून त्यांचे परस्पर सबंध आदर्श असेच.घरी हे दोघच असले तरी वहिनींनीही त्याना कधी आपल्यासाठी अडकवून ठेवले नाही.आणि पटवर्धानानीही बाहेर किती राहायचं याच भान ठेवलं.बाहेर असले तर मधून मधून फोन करून चौकशी आणि कितीवेळ थांबावं लागेल हे सांगून त्याबद्दल चालेल ना ही विचारणा.सगळ कस नेमक!

त्यांच्या नेमकेपणाचा प्रत्यय इतरत्रही येत राहतो.त्यांच्याकडे प्रत्यक्ष बोलताना किंवा फोनवर बोलताना ते म्हणतील 'थांबा थांबा पुन्हा सांगा' आपण ओळखाव आपल्या विधानात गडबड आहे त्याचं पाहिलं थांबा यायच्या आत बर्‍याचवेळा आपल्या विधानातील गडबड लक्षात आलेली असते.आपण फारसा विचार न करता पटकन सरधोपट विधान करतो. मग अस स्वत:लाच तपासण होत. थांबा म्हणताना आपल्याला नीट ऐकू न आल्याची शक्यता त्यांनी गृहीत धरलेली असते.आपण मनाशी ठरवतो पटवर्धनांशी बोलताना घाइगडबडीत, गुळमुळीत विधाने करायची नाहीत.खर तर कधीच करायची नाहीत.तरीही त्याना थांबा थांबा म्हणायला लावण्याचे प्रसंग येतच राहतात.

पटवर्धनांना फोन करायचा म्हणजे व्यवस्थित वेळ घेऊनच फोन करायला हवा.आम्हाला दोघानाही खूप गोष्टी शेअर करायच्या असतात.शुभार्थींची यादी अद्ययावत करण्याच काम पटवर्धन करतात.अत्यंत किचकट असे हे काम ते समर्थपणे करतात.नवीन पेशंट येतात, काहींचा मृत्यू,पता बदल, फोन बदल असे सारखे चालू असते.फोनवर या सर्वांची देवाणघेवाण होते,नवीन उपचार,शुभार्थीच्या मृत्यूच्या वेळची परिस्थिती, त्यानुसार मंडळाच्या कामाची दिशा ठरवणे अशा अनेक गोष्टी असतात.पटवर्धन म्हणजे पीडीवरील चालता बोलता कोश त्यामुळे बरीच नवी माहिती समजते, काही चुकीची माहिती दुरुस्त होते.कधीतरी साहित्य इतिहास असेही विषय निघतात.त्याना लहान मुलासारखे अनेक गोष्टीबद्दल कुतूहल असत.अनेक प्रश्न असतात शंका असतात.एकदा त्यांनी विचारल संस्कृत आपण देवनागरीत पाहतो तस इतर लिपीत असत का?प्रथम कोणत्या लिपीत सुरुवात झाली वगैरे.अर्धवट माहितीवर उत्तर देऊन चालणार नव्हत मग मी माझ्या ओळखीतल्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना विचारल.काहीवेळा या विषयावर बोलण्यासाठी स्वतंत्रपणे भेटू अस बोलण होत.पण ते घडत नाही.शुभंकर शुभार्थींसाठी सहल असली की मात्र अशा ठेवणीतल्या गोष्टी बाहेर पडतात.

एका सहलीत त्यांनी आठवणीतील जुनी गाणी आणली.ती कोणाची ओळखायची होती.एकदा विविध वलयांकित व्यक्तींच्या फोटोवर आधारित ओळखा पाहू हा खेळ करून आणला होता.त्यासाठी सर्वाना पुरतील इतक्या प्रती काढण,उत्तरे लिहिण्यासाठी कागद असा सर्व खटाटोपही केला होता.एकदा ओरीगामिच्या स्पर्धेसाठी विविध आकाराचे कागद कापून आणले होते. या सर्व खेळात पीडी पेशंटच्या क्षमता,मनोरंजनाबरोबर उपयुक्तता याचाही त्यांनी विचार केलेला असतो.प्रत्येक सहलीत वहिनी बरोबर असायच्या.या वर्षी मात्र त्यांच्या डोळयाच ऑप्रशन झाल त्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत.अशावेळी त्यांच्या कुटुंबियांपैकी घरी कोणीतरी मदतीला येत.उगाच इतराना त्रास द्यायचा नाही.पण गरज असेल तेंव्हा मदत घेण्यास अनमान करायचं नाही अशी त्यांची वृत्ती असते.

पार्किन्सन्स मित्रमंडळाला अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार मिळाला त्यावेळी वहिनी दिनानाथ हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होत्या.त्याआधी बरेच दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांच्या मुलांनी हॉस्पिटलचा सर्व चार्ज घेतला होता त्याना त्यांची कामे करण्यासाठी मोकळे ठेवले होते.पुरस्कार सोहळ्यास ते आले होते.स्टेजवर पुरस्कार घेण्यासही ते गेले.पण हा सन्मान पाहण्यास वाहिनी उपस्थित नव्हत्या.सोहळा संपल्यावर वहिनींना सन्मान चिन्ह दाखवण्यासाठी ते घेऊन गेले.या सन्मानात पटवर्धनांबरोबर त्यांचाही वाटा होताच ना?काही दिवसातच वहिनींचे निधन झाले.हे होणार हे माहिती असले तरी.त्रास हा होतोच पण 'मृत्यू एक चिरंतन सत्य'असा स्वीकार त्यांच्या वागण्या बोलण्यात होता.भेटायला येणार्‍यांसाठी एका कागदावर हॉस्पिटलमध्ये ठेवल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत काय-काय झाले ते लिहिले होते.तो कागद ते येणार्‍यांना देत होते नंतरच्या सभेला ते आले तेंव्हा यादीतले बदल असलेला कागद दिला.डिलिटच्या लिस्ट मध्ये शुभलक्ष्मी पटवर्धन नाव होते हे नाव डिलिट करताना किती यातना झाल्या असतील त्याना?का नसतील माहित नाही.पण माझ्या मात्र डोळ्यातून पाणी आले.काही दिवसातच दिनानाथ हॉस्पिटलमध्ये पार्किन्सन्स मुव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी तर्फे पीडीवर कार्यक्रम होता.इथेच वहिनी अनेक दिवस होत्या. माझ्या नात्यातल्या दोन व्यक्ती बरेच दिवसापूर्वी येथे गेल्या.तर माझे पाय दिनानाथ मध्ये जाताना अजून लटपटतात.त्यामुळे वाटलं पटवर्धन येतील?पटवर्धन आले थोडे उशिरा. कारण ९० वर्षाच्या व्याह्यांना भेटण्यास ते तळेगावला गेले होते.ते पटवर्धनाना भेटायला येऊ शकत नव्हते म्हणून हेच गेले.

सध्या ते महाराष्ट्रातील नाटक मंडळींचा अभ्यास करत आहेत.त्यासाठी ते भरतनाट्य मंदिराच्या वाचनालयात जात असतात.हे त्याचं काम स्वांतसुखाय आहे. स्वांतसुखाय अस काम कोणी करूच शकत नाही ही माझी धारणा पटवर्धनांकडे पाहून बदलली.

शुभार्थी गेल्यावर अपवाद वगळता शुभंकरांच येण बंद होत.पण ही तर त्यांचीच निर्मिती.हे काम सुरु करताना वहिनी निमित्य असल्या तरी ते सर्वांचे शुभंकर होते.त्यांची भूमिका वैश्विक होती..धार्मिक लोकाना पाखंडी वाटू शकणारे,विज्ञाननिष्ठा आचरणात आणणारे चैतन्याचा अखंड झरा असे पटवर्धन मला तरी खरे अध्यात्मिक वाटतात.आचार्य भागवतांनी मांडलेल्या कर्मयोगी अध्यात्माची संकल्पना जगणारे स्वत:ला वैश्विक बनवणारे कर्मयोगी.अध्यात्म जगणारे अध्यात्मिक.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages