गढूळ

Submitted by anjali maideo on 30 June, 2014 - 13:16

गढूळ

तिच्या घराबाहेर एक छोटस कुंड होतं .रोज सकाळी जेव्हा ती काम करत घराबाहेर येई तेव्हा त्यात डोकावून पाही.तिच्या मनासारखं शांत असे त्यातील पाणी इतकं की त्याचा तळही सहज दिसे डोकावल्यावर.अगदी थेट जसा तिच्या मनाचा थांग लागे तिच्या डोळ्यात डोकावल्यावर.ती त्यात आपले प्रतिबिंब नेहमीच न्याहळी.
काल रात्री बाजारातून परतताना अचानक आलेल्या पावसात तिला तो भेटला.......खूप वर्षानी.तसाच,वळवाच्या पावसासारखा .खूप दिवसांनी भेटल्यावर जस औपचारिक बोलणं होतं तेच खर तर त्यांच्यात झालं.पण....पावसाबरोबर आलेल्या वा-यासारखा तो मनात जणू थैमान घालत होता. खूप वर्षांपूर्वी 'नाही' म्हणताना तिला काहीच वाटले नव्हते पण काल बाजारातून परत येताना सर्व गोष्टी सांभाळताना तिची जी त्रेधातिरपीट उडाली त्यापेक्षाही मनात गर्दी करत असलेल्या जुन्या आठवणीतून घराची वाट काढत येणं जास्त जड गेलं तिला. पण हे असं तेव्हा काहीच नव्हतं झालं.
आज सकाळी घरातलं कुणी बाहेर काम करताना म्हणालं कालच्या पावसात ह्या कुंडाची त-हाच झाली म्हणायची.ती धावत धावत ते पहायला बाहेर आली.पाणी गढूळ झालं होतं. प्रतिबिंब तर नव्हतंच .ती घरात जाता जाता म्हणाली....काही नाही गाळ ढवळून निघालाय होईल उद्या शांत.

अंजली मायदेव
१७/६/२०१४

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users