विषय क्र.१- ''मोदी जिंकले ! पुढे काय ?''
इतिहासाचे आपण साक्षीदार होणे म्हणजे काय ते या लोकसभा निवडणुकीमुळे कळलं. आपलं जीवन आपल्या राष्ट्रीय जीवनाइतकंच निरर्थकपणे जाणार अशी खात्री असताना मोदी जिंकले ! या महान लोकशाहीने आपला नवा पुरुषावतार जन्माला घातला आणि ‘राजा कालस्य कारणं’ की ‘कालो राजपुरुषस्य कारणं’ हा गोल गोल तात्विक प्रश्न सुखावलेल्या मनाला चाळा म्हणून सुचला.ते असो.
पुढे काय ? परीकथेचा शेवट सोपा असतो. ‘’आणि ते राजाराणी सुखासमाधानाने राहू लागले’’ यावर कथानक संपते. असा एक राजा ( इथे पंतप्रधान म्हणू या हवं तर ) देशाला मिळाला ज्याला राणी असून नसल्यासारखी.त्याचं संन्यासीपणही मिडीयाने गाजवलेलं. हाही आदिबंध या देशाला रुचेलसाच आहे ! राजाने संन्यस्तवृत्तीचं असणं इथल्या मिथकांचा एक भाग आहे.’उपभोगशून्य स्वामी‘ असं ज्याला खरोखरच म्हणता येईल असा एक लोकनायक पंतप्रधानपदी विराजमान झाला.
आशा पालवल्या खऱ्या.
चिवट असतात आशा. पदोपदी निराश करणाऱ्या वर्तमानाच्या उरावर ताज्या गवतपात्याच्या कोवळीकीने उगवून येतात ! आणि हा तर अनेक वर्षांच्या नेतृत्वदुष्काळानंतर आलेला पावसाळा !
तेव्हा आशा पालवल्याच.
मोदी आले ! आरएसएस आणि बीजेपी राजकीय अज्ञातवासातून बाहेर आले. सत्तारूढ झाले ! ब्राह्मणांचीच कुळे सुखावली असं म्हणणं चुकीचं आहे. आरएसएसमध्ये एक मोठी फळी बहुजनांची आहे.संख्येने थोडे असतील, पण जातीभेदविहीन हिंदुत्वाची स्वप्नं बघणारे काही खुळचट लोकही आहेत.मोदी अगदी याच वर्गातून आणि पुन: थेट तळागाळातून आलेले तेव्हा त्यांचं येणं याहून जास्त प्रतीकात्म आणि सर्वसंमत गोष्ट या काळात घडणे शक्य नव्हते !
अशक्य ते शक्य झालं.
अरे होय होय ! पण पुढे काय ?
वेड्या मना, किती भाबडेपणा करशील ! मोदी या साजऱ्या सर्वमान्य प्रतीकावर पैसे लावणारे भांडवलदार ते पाहा वसुलीसाठी उभे आहेत ! गॅस किमती वाढवण्यासाठी अंबानीकुलोत्पन्न किती उत्सुक आहेत हे नव्याने सांगायला हवं काय ? रेल्वे भाडेवाढ, पेट्रोल, डिझेलच्या किंमती , गेल्या दहा वर्षात प्रकर्षाने भडकत चाललेली महागाई, शेतकऱ्यांची वाताहत, त्यातच क्षितिजावर दाटून आलेले भीषण अवर्षण ..
या अस्मानी सुलतानीमध्ये मोदी नावाचं एकुलतं एक प्रतीक कितीसं टिकून रहाणार आहे ?
पण एकांड्या शिलेदाराचा प्रयत्न चालू आहे आणि तो जोरकस आहे. त्या माणसासाठी,त्याच्या नेतृत्वकुशलतेसाठी आईच्या धडधडत्या हृदयाने गरीब सामान्य जनता प्रार्थना करत आहे . आपणही डोळसपणे त्याच्या चुका,त्रुटी समजून घेऊन त्याचं दैवतीकरण न करता त्याच्या निखळ माणूसपणावर , जिगरबाज संघर्षावर विश्वास ठेवू या. त्यांच्या अवतीभोवतीची बरीच माणसं त्याच्या वकूबाची दिसत नाहीत. ती तसली माणसं मुळात फारशी निपजतच नाहीत ! पण मोदी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा आणि इमानदार माणसांना पुढे आणण्याचा कसोशीचा प्रयत्न करत आहेत हे तरी दिसतं आहे आपल्याला.
मग अपेक्षांची ही छोटीशी यादी त्यांना सादर करू या ! त्यांच्याच वेळोवेळीच्या वक्तव्यांमधून या अपेक्षा पोसल्या गेल्या आहेत . बापा, आता हे लक्षात ठेवावंच लागेल तुला.
१. महागाई,रोजगारनिर्मिती, औद्योगिक वाढ ,जीडीपी वगैरे-
हे सगळे परस्परांशी संबद्ध मुद्दे.
मध्यंतरी, चीनच्या प्रगतीवरचा ‘’How did China Take Off ‘ हा याशेंग हुआंग याचा एक पेपर वाचनात आला होता . १९७८ ते २०१२ या काळात चीनने साध्य केलेली आर्थिक प्रगती आणि गरीबी निर्मूलन यावर वाचताना सतत आपल्या देशाची आठवण नाही आली तर नवल. परकीय मदत न घेता कम्युनिस्ट चीनने जे साध्य केलं , त्यांच्या डेंग झियाओपिंगसारख्या नेत्यांना , मध्यवर्ती बँक व अन्य महानगरीय/ ग्रामीण बँकांना , त्यांच्या प्लानिंग कमिशनला जे जमलं ते भारताला आता तरी जमेल का तुमच्या व्यवहारकुशल गुर्जर नेतृत्वाखाली मोदी ? १९७८ मध्ये चीनमध्ये १.५७ दशलक्ष शहरी आणि ग्रामीण लघुउद्योग होते .१९८५ मध्येच ही संख्या १२ दशलक्ष ओलांडून गेली होती. चीनची ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक उद्योगप्रवण आहे, पण भारतातही ग्रामीण लघुउद्योगप्रवण राज्ये आहेतच.राजकीय इच्छाशक्ती , नेतृत्वशक्तीची कमी आहे. योजना सुसूत्र करून राबवल्यास, प्रामाणिक अधिकाऱ्यांना सबल केल्यास भारताचेही चित्र का बदलणार नाही ? चीनमध्ये कम्युनिस्ट दहशतीचा वापर केल्यामुळे योजना अमलात आणणे सोपे गेले असेल पण त्यांचे हे गृहच्छिद्र दाखवून आपण आत्मसंतुष्ट राहू शकतो का? सार्क राष्ट्रांच्या नव्या सत्तासमन्वयाची जुळवाजुळव करताना, वाणिज्य करार करताना, हा जवळचा राष्ट्रप्रगतीचा धडा आपल्याला प्रेरणा देऊन गेला पाहिजे.
छोट्या निमशहरांची,दळणवळणाची वाढ करण्याची घोषणा तुम्हीही आपल्या निवडणूक प्रचाराच्या भाषणात केली आहे,मोदीजी.तेव्हा हे सर्व आठवून ‘अच्छे दिन’ येणार की काय असं वाटू लागलं आहे, आपण आमचा अपेक्षाभंग करणार नाही अशी आशा आहे. मान्य आहे की याला वेळ लागेल, आधीच खूप वेळ फुकट गेला आहे, पण ते काय म्हणतात ना, Well begun is half done !
२. शेती
भारत हा शेतीप्रधान देश आहे हे अगदी शाळेपासून घोकलेले वाक्य रोज विपर्यस्त स्वरूपात समोर येत असते. जो सगळ्यांना जगवतो त्या बळीराजाला कुणीच वाली नाही.मोदीजींनी शेतीमालाच्या नाशिवंत स्वरूपाची जाण ठेवणारी विधाने केली आहेत. प्रभावी वितरण व्यवस्थेसाठी भारतीय रेलचा अधिक अर्थपूर्ण वापर कसा करता येईल हे सांगितले आहे. पण याहून अधिक विचार शेतीसाठी तरी त्यांच्याकडे असल्याचे जाणवत नाही. पुन: एकदा चीनमध्ये डेंगने ४०० दशलक्ष गरीब लोकांना ३० वर्षात दारिद्र्यरेषेच्या वर आणले तशी आशा भारतीय गरीब शेतकऱ्यांसाठी आज तरी दिसत नाही. दुष्काळ, कालबाह्य अपुरी साधने ,पाणीप्रश्न,पाटबंधारे परिस्थिती, कर्जबाजारीपणा असे अनेक पैलू या महासमस्येला आहेत.यातून बाहेर पडण्यासाठी मोदींना विचारमंथन करावे लागेल, नव्या नीती बनवाव्या,राबवाव्या लागतील. युद्धपातळीवर अन्नप्रश्नाकडे, शेतीमालाची नासाडी थांबवण्याकडे लक्ष द्यावे लागेल.
३. सीमासुरक्षा
अतिशय ढिसाळ आणि सच्छिद्र सीमांचा देश, भारत. आपली ही ओळख आपला आत्मसन्मान रसातळाला नेणारी आहे.कुणीही, विशेषत: अतिरेक्यांनी यावे, टिचकी मारून जावे ! बांगलादेशमधून येणारे निर्वासित आसाम आणि बंगालच काय, मुंबईच्या झोपडपट्ट्या भरून फोफावत आहेत. यातून भयावह प्रश्न , नागरी संहार उभे रहात आहेत हे आसाममध्ये अलिकडे घडलेच. त्यांना पाठीशी घालणारी देशद्रोही यंत्रणा आहेच, पण आजवर त्यांना राजाश्रयही होता. धर्माचं आणि झोपडपट्टीच्या मतांचं राजकारण होतं. हे आधी थांबवा.पाकिस्तानातून येणारे अतिरेकी याच जंजाळात सुरक्षित आसरा शोधत असतात .लष्करी कारवाईपेक्षाही हे अवघड जागीचे दुखणे आहे.
पण त्याचा बीमोड राष्ट्रीय भावनेतून करणे अशक्य नाही.
४ . स्त्रियांसाठी सुरक्षित भारत !
बलात्कार ,अत्याचार, स्त्रीभ्रूणहत्या या बातम्या वाचून मने निर्ढावली आहेत अशावेळी मोदीजी, आपण गुजरातमध्ये स्त्री सुरक्षित असल्याचं एक भक्कम विधान केलं आहे. देशाच्या संदर्भात कायद्याची कठोर अंमलबजावणी , सहसा धनदांडग्या असलेल्या गावागल्ल्यामध्ये बस्तान बसवलेल्या बलात्कारी लोकांना पाठीशी न घालणारी न्यायनिष्ठूर यंत्रणा सबल करणे अशी पावले उचलून पूर्णपणे ढासळलेल्या समाजजीवनाचं पुनर्वसन करणं सरकारचं आद्य कर्तव्य आहे..
५. समान नागरी कायदा
देशासमोरचा ज्वलंत प्रश्न. एरवी समाजवादाची घोषणा फक्त करायची संविधानातून .
SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC having justice liberty,equality and fraternity ! शब्द बिचारे केवळ वारा ! सर्वांना एकच कायदा लागू करायला हिंमत पाहिजे. आणि लांगूलचालन संपवायला निडर वृत्ती पाहिजे .शरिया कायद्याचा अंमल संपवून समान नागरी कायद्याची तत्वे मुसलमान समाजाला लागू केली पाहिजेत.फ्रान्ससारखं छोटं राष्ट्र justice liberty,equality या शब्दांची बूज राखतं आणि स्त्रियांच्या बुरख्याची जंगली पद्धत बंद करतं !
६ .काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन
काश्मीर खोऱ्यातून विस्थापित रक्तलांच्छित होऊन ते देशोधडीला लागले आणि आम्ही फक्त पहात राहिलो ! कॉन्ग्रेसी राज्यकर्त्यांकडून कसली अपेक्षाच नव्हती ! जाती आणि धर्मांचं भिकार राजकारण अद्यापही चालू आहे त्या दुर्देवी पक्षाकडून. त्यांच्या हाती देश जावा हा एक भयानक दुर्भाग्ययोग होता.’ And the world remained silent’ या परिस्थितीवर अशोक पंडित यांनी बनवलेल्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.. दु:ख किती साजून दिसतं ना कलेच्या विश्वात ? मोदी, तुम्ही वास्तवात सामना करा या परिस्थितीशी.
आर्टिकल ३७० हा याच दुखऱ्या भागातील पुढचा टप्पा . काश्मीर खोऱ्यात मुक्त वाणिज्य, जनव्यवहार, संपर्क सुरू व्हावा, त्याची प्रगती व्हावी, शांती नांदावी हे कविकल्पनेइतकं भ्रामक आज वाटत आहे , पण हे आव्हान तुम्ही घ्यावं ,जवानांचं , हुतात्म्यांचं बलिदान आजवर फुकट गेलं होतं.. आता ?!
७.आरक्षण
संविधानकर्त्यांनाच जे आरक्षण १९६५ पर्यंत अभिप्रेत होतं, ते आमचं जीवन संपलं तरी चालूच रहाणार असं दिसतं आहे. याची सामाजिक सांस्कृतिक कारणे काहीही असोत , पण निदान ते वाढू नये म्हणून तरी आशा करावी की नाही ? मराठा , जाट अशा जातीही या महामेळाव्यात सामील होत आहेत, मुस्लिमांना सामील केले गेले आहे.या देशाचा दुर्दैवी भूतकाळ एखाद्या पिशाच्चासारखा वर्तमानाच्या नरडीवर स्वार झाला आहे. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे ,पण राजकीय लाभासाठी या शस्त्राचा झालेला वापर देशाच्या भविष्यासाठी घातक आहे , अधोगतीकडे नेणारा आहे .. ही यादी वाढवू नका,आरक्षणाचे लाभार्थी अत्यंत तळागाळातील पददलित असतील याची खात्री करणारी यंत्रणा निर्माण करा .
८. मैला कामगार – अतिपददलित-
पोटाची खळगी भरण्यासाठी डोक्यावरून मैला वाहून नेणारे,धोकादायक वायूंनी भरलेली गटारे, मॅनहोल्स साफ करणारे अतिपददलित वर्गातले लाखो गरीब मैला कामगार स्त्रीपुरुष भयावह जीवन जगत आहेत, मृत्युमुखी पडत आहेत, रोगांचे जिवंत वसतीस्थान होत आहेत.’The shame of Nation’ असं गांधीजींनी ज्याचं वर्णन केलं ती ही परिस्थिती त्याविरुद्ध कायदा करूनही देशभर अस्तित्वात आहे, आपण मुंबईसारख्या महानगरातही याबद्दलच्या बातम्या वाचून पुढे जातो.Samuel D. Permutt यांनी केलेल्या एका संशोधनानुसार देशाच्या 55% लोकसंख्येला आजही पाणी फ्लश करणारी स्वच्छतागृहे नाहीत त्यामुळे ही परिस्थिती तशीच चिघळत राहिली आहे.
Shame of Nation ! या अतिदुर्बल घटकांसाठीच तर कल्याणकारी राज्यव्यवस्था असली पाहिजे ! त्यांच्या दुर्दशेतून त्यांना बाहेर काढा,ही शेवटची अपेक्षा व्यक्त करून एका सामान्य व्यक्तीच्या दृष्टीने केलेलं हे लेखन इथे संपवत आहे.
देशासमोर अगणित प्रश्न आहेत, ही माझी लहानशी अग्रक्रमांची यादी.
पुढे काय ? भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे, एकाधिकारशाही नाही.मोदींच्या कार्यपद्धतीला अनेक मर्यादा आहेत, भ्रष्टाचार तर आहेच आहे देशव्यापी प्रमाणात.
पण इतिहास घडायचाच असेल तर आजही आशा अपेक्षा बाळगून आहोत आम्ही , कारण,
कित्येक दशकांनी या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमचा आत्मविश्वास जागा झाला आहे.
-जिगीषा
छानच जमलाय लेख, मुद्देसूद आणि
छानच जमलाय लेख, मुद्देसूद आणि शैलीही छान.
तेवढे एक शीर्षकात विषय क्रमांक एक असे करून घ्या
चांगलाच जमलाय
चांगलाच जमलाय लेख!
मुद्देसूद.
आणि अगदी आमच्या मनातलं लिहिल्यासारखा.
नुसताच भाबडा आशावाद नाही आणि नेमक्या अपेक्षा व्यक्तं केल्या आहेत.
खुपच सुंदर आणि विषयाला धरुन
खुपच सुंदर आणि विषयाला धरुन लिहिलंय. फाफटपसारा अजिबात नाही, उगीच कौतुके नाहीत की टीकाही नाही.
सामान्य माणसे, ज्यांना कोणती पार्टी राज्यकर्ती आहे याच्याशी देणेघेणे नाही तर जे कोणी आहेत त्यांच्यामुळे जीवन थोडे सुसह्य तर ठिक असे वाटते, त्यांच्या मनातले आजचे भाव नेटके मांडलेत. तुमची विशलिस्टही छानेय.
आता निवडणूकीच्या वेळी जी स्वप्ने दाखवली गेली ती थोडा वेळ लागुन का होईना पण साकार झाली तर ठिक, नाही झाली तर काय? सवय आहेच गेल्या साठ वर्षांची....
सुरेख लिहिलंय...
सुरेख लिहिलंय...
धन्यवाद अभिषेक, शीर्षकात बदल
धन्यवाद अभिषेक, शीर्षकात बदल केलाय
मला भावलेला common minimum program रेखाटण्याचा माझ्या परीने प्रयत्न, आभार सर्व प्रतिसादकांचे प्रोत्साहनासाठी.
जिगीषा
जिगीषा जी....
नमस्ते....बर्याच दिवसांनी तुमचे नाव इथे आल्याक्षणीच मनी आनंद अशासाठी दाटला की तुमच्या लेखणीतून कागदावर (आता स्क्रीनवर म्हणतो) आलेले विचार आणि त्यांच्या कक्षा किती अभ्यासपूर्ण असतील याची खात्री पटते. झालेही तसेच. हा लेख स्पर्धेसाठी नसून तुमच्या मनातील "मोदी" या विषयाबाबतीत साचलेले एकवटलेले विचार आमच्यासमोर मांडण्याची संधी मिळाली आहे आणि तुम्ही ते अत्यंत व्यवस्थितरित्या समोर ठेवले याचे भान ठेवून मी तो वाचला आणि आता उलट प्रायोजकांचे आभार मानावेत असेच वाटू लागले आहे, कारण या निमित्ताने जसे तुम्हाला विषयाबाबत विचार उघडपणे प्रकट करावेसे वाटले तद्वत ते मला वाचण्याचा आनंद मिळाला त्याचे महत्त्व अधिक आहे.
धर्मनिरपेक्ष राजकारण तसेच सर्वधर्मसमभाव हा केवळ निवडणूकपूर्व घोषणा होत्या की लोकांना मूर्ख बनविण्याचा तो एक ठरलेला प्रयोग असतो याचे उत्तरही राजकारणात यशस्वी ठरलेलेच देवू शकतो. आपण फक्त अपेक्षा व्यक्त करू शकतो. आरक्षणाचा मुद्दा हा असा एक वर्ग झाला आहे या महाकाय देशात की सरकार कोणतेही असो त्याला या प्रश्नाला वा अडथळ्याला बगल देवून जाता येणार नाही...राज्य करताच येणार नाही. सूर्य उगवल्यापासून तो मावळेपर्यंत हा विषय अखंडपणे या देशाच्या जडणघडणीत राहाणार आणि सर्वांना तो जसा समोर ठेवला जाईल तसा स्वीकारणे अटळ आहे. म. गांधी याना अभिप्रेत असलेली धर्मनिरपेक्षता ही आम्हालाही जशीच्यातशी अपेक्षित आहे अशी सर्कस कॉन्ग्रेसपासून भाजप पर्यंतच्या सार्याच पक्षांनी लीलया केल्याचे दिसते. म.गांधींच्या आश्रमात प्रार्थना जरूर होत असत पण गांधींनी मंदिरे बांधण्यास कधी प्रोत्साहन दिल्याचा इतिहास नाही. गल्लीबोळात कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगविलेल्या बाबा, महाराज, साधूसंतांच्या भेटीस गांधी कधी गेले नाहीत....पण राज्य करणारे सरकार आणि त्यातील मंत्रीपदांच्या खुर्चीवर विराजमान होणार्यांना गावोगावी मंदिरे हवीत त्याचबरोबर बाबा, बुवा, साधू यांचेही आशीर्वाद हवेत...
हा विरोधाभास मिटवू शकतील तर ते एकटे नरेन्द्र मोदी होय असे मला सातत्याने वाटते. धर्म ही अफूची गोळी आहे....ती विवेकविरोधी चीज आहे (म्हणून विज्ञानविरोधीही आहे असे म्हणावे लागते), मध्ययुगीन, सरंजामी वृत्तीची जोपासना करणारी आणि तशीच कट्टर संस्था असल्याने बुद्धिप्रामाण्यवादी होण्यासाठी ती आड येते म्हणून त्याग करणे नीतांत गरजेचे आहे.....
हे काम नरेन्द्र मोदी यानी करून दाखविले तर ते खर्या अर्थाने सी.ई.ओ. ठरतील. तुमच्या लेखातील भावना आणि अपेक्षा हीच बाब प्रकर्षाने व्यक्त करते. "आत्मविश्वास जागा झाला आहे..." अशी तुम्ही स्पष्ट कबुली दिली आहेत लेखात....हाच विश्वास मोदींच्या कार्यालाही प्राप्त होतो आणि त्यानी या देशाला दाखविलेले बदलाचे स्वप्न स्वप्न न राहता त्याला प्रत्यक्ष रुप मिळावे असेच या निमित्ताने मी म्हणतो.
जिगीषा यांच्या लेखनाइतकीच
जिगीषा यांच्या लेखनाइतकीच अशोक यांची प्रतिक्रिया साचलेल्या एकवटलेल्या भावनांना वाट करून देणारी.
धर्माच्या नावाखाली जेवढा अधर्म , रक्तपात मानववंशाच्या इतिहासात आणि वर्तमानात झाला असेल तेवढा दुसऱ्या कोणत्याही कारणाने झाला नसेल या विपर्यस्त वस्तुस्थितीला काय म्हणावं !
अशा परिस्थितीत भारतासारख्या व्यामिश्र संमिश्र संस्कृतीच्या देशात ''धर्मनिरपेक्षता ही आम्हालाही जशीच्यातशी अपेक्षित आहे अशी सर्कस कॉन्ग्रेसपासून भाजप पर्यंतच्या सार्याच पक्षांनी लीलया केल्याचे दिसते'' हे अशोक यांचे म्हणणे खरेच आहे..
या सर्व शब्दांनी भ्रमनिरास केलाच आहे, आता देशासमोरचे ठोस प्रश्न , जसे उदाहरणादाखल जिगीषा यांनी त्यांच्या अग्रक्रमात दिले आहेत , त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून मोदी आणि त्यांची टीम काही करू शकते का ते पहायचं, नाहीतर, एका विद्वान मित्राच्या शब्दात सांगायचे तर ''Great new concepts , homogenized to mediocrity अशी एक व्यवस्थापन शास्त्रात संकल्पना आहे. तसे नमोंचे होऊ नये ही सदिच्छा ! ''
लेख आवडला.
लेख आवडला.
धन्यवाद स्वाती, अशोक, भारती !
धन्यवाद स्वाती, अशोक, भारती !
छान, मुद्देसूद लिहिलं आहे.
छान, मुद्देसूद लिहिलं आहे.
लेख आवडला
लेख आवडला
खुप छान मुद्देसूद आणि नेमक्या
खुप छान मुद्देसूद आणि नेमक्या शब्दात मांडलय.
लेख आवडलाच. सीमा सुरक्षेवर
लेख आवडलाच. सीमा सुरक्षेवर तुम्ही विवेचन केलंच आहे.
देशान्तर्गत बोकाळलेल्या नक्षलवादावरही या सरकार ने विशेष लक्ष द्यावं असं वाटतं... २४०+ जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. आणि हे खरोखरच चिंताजनक आहे.
धन्यवाद नव्या प्रतिसादकांचे
धन्यवाद नव्या प्रतिसादकांचे
श्रीयु, होय, खरं सांगायचं तर नक्षलवाद हा मुद्दा मनात होता, पण पटलावर घेतला नाही.. फार गुंतागुंतीचा
विषय .दारिद्र्य, आत्यंतिक विषमता आणि अन्याय अशा घनदाट काट्याकुट्यातून जाणारा .
या तीन गोष्टींवर प्रभावी इलाज करण्यातून रस्ता उलगडत जाईल संवादाचा ..
मुद्देसूद, परखड आणि प्रभावी
मुद्देसूद, परखड आणि प्रभावी लेख.
<अपेक्षांची ही छोटीशी
<अपेक्षांची ही छोटीशी यादी>
या यादीत छोटीशी भर...
अपेक्षा मोदींच्या जिवावर पूर्ण होतील असे मानणे भाबडेपण होईल. पोलीस, सरकारी खाती, न्यायदान यंत्रणा विविध जनसंपर्क विभाग यांच्यात राजकारण्यांचा हस्तक्षेप संपवला, सरकारी कामकाजात सुसूत्रता व शिस्त जागवण्याची धमक वरिष्ठांनी दाखवली व समाज घटकांनी तोडफोड व आक्रस्ताळे हातखंडे वापरायला नकार दिला तर राष्ट्र निर्माण कार्यात कमालीचा धडाका येईल.
ब्रिटिश म्हणत, 'भारतीय बेस्ट ऑफ सर्व्हंट आहेत. जर त्यांना बेस्ट मास्टर मिळाला तर ते जगाला आदर्श ठरतील.'
अगदी १००% सहमत शशिकांतजी, आज
अगदी १००% सहमत शशिकांतजी, आज महिना उलटून गेल्यावर हे वाचताना यातील काही मुद्द्यांवर राष्ट्रीय विचारमंथन , कार्यवाही अशी सकारात्मक सुरुवात झाल्याचे जाणवते आहे .लोकमानसाची स्पंदने नवे पंतप्रधान निश्चित जाणून आहेत काश्मीर , नक्षल दंडकारण्य आणि अस्वस्थ ईशान्य ही मोठी आव्हाने आहेतच..
हं. अकरा वर्षे होत आली.
हं. अकरा वर्षे होत आली. किती अपेक्षा पूर्ण झाल्या? अपेक्षित नसलेलं काय झालं ? ते भलं वाटतं की बुरं?