मी नाही बोलणार जा........

Submitted by अमोल परब on 27 June, 2014 - 20:57

अवनी आज प्रचंड घुश्श्यात होती. घरी आल्या आल्या तिने सोफ्यावर दफ्तर आपटलं आणि तडक वर आपल्या खोलीत निघून गेली. ज्योती किचनमधुन बाहेर पाणी घेउन येईपर्यंत वरुन धाडकन दरवाजा आपटल्याचा आवाज आला. तिला आजच हे प्रकरण थोड विचित्रच वाटलं. सहसा अवनी अस कधी वागायची नाही. हा थोड़ी हट्टी होती, ती तर सगळीच मुलं ह्या वयात असतात पण इतरांप्रमाणे अवनी कधी आततायीपणा करायची नाही. आईविना पोर म्हणून ती तिच्या आजीची ज़रा जास्तच लाडकी होती एव्हढंच. पण बाक़ी अवनी होती अगदी गोड आणि लाघवी. पूर्वी दंगा करून घर डोक्यावर घेणारी अवनी मम्मा गेल्यापासून मात्र थोडी बदलली होती. एकेवेळची बडबडी मस्तीखोर अवनी आता बरीचशी शांत आणि खुपशी समजंस झाली होती. कधी कधी असा अवेळी आलेला पोरकेपणा लहान वयात मुलांना उगाचच मोठं करून टाकतो असाच काहीसा प्रकार अवनीच्या बाबतीतही झाला होता. त्यामुळेच की काय आजचा हा प्रकार ज्योतीला ज़रा खटकला आणि तिने तो लगोलग देवघरात पोथी वाचत बसलेल्या आजीच्या कानावर घातला. नेमक काय झालं असावं हे जरी तिला माहीत नसलं तरी पोरीचं काहीतरी जबरदस्त बिनसलं आहे, हे त्या म्हातारीला जाणवलं होत. पण आज तर कधी नव्हे ती अवनी शाळेत जाताना खुप खुश दिसत होती. मग अस मध्येच काय झाल अचानक? काही कळत नव्हतं. आजी तडक अवनीच्या रूमकडे निघाली. अवनीने आतून दरवाजा बंद करून घेतला होता.
 
"अवनी बाळा काय झालं? दार उघड पाहू. हे बघ मी आलेय... आजी....अशी दार बंद करून का बसलीयस? तुला कुणी काही बोलल का?  काय झालं ते सांग तरी? तू पहील दार उघड पाहू"
 
दार ठोठावत आजी बोलत होती. पण दार उघडायला जस जसा वेळ लागत होता, तस तसा बाहेर उभ्या असलेल्या आजी आणि ज्योतीचा धीर खचत होता. आजी आता अवनी ला मोठ्यांनी हाका मारीत आपल्या कापर्या हातांनी जोरात दार वाजवत होती.
 
"अवनी बाळा दार उघड बाळा... काय झालय ते सांग तरी मला. तुला शप्पथ आहे माझी...."

"मी नाही बोलणार जा......"
 
आतून अवनीचा रडवेला आवाज आला. अवनी चा आवाज ऐकल्यावर दोघीनांही थोड हायसं वाटलं. आजीने पुन्हा एकदा दार वाजवलं.
 
      हा समजतो कोण स्वत:ला?. ह्याला काय एकट्यालाच काम आहेत? आणि एव्हढ कसलं काम करतो हा ऑफिसमध्ये ? आज माझ्या स्कूलमध्ये एन्युअल डे होता. मी काल रात्री त्याला बजावून सांगितलं होत की उद्या तुला यावचं लागेल म्हणून. ह्या वर्षी मी शाळेच्या नाटकांत सिंड्रेलाचं काम करतेय हे ही माहिती होत त्याला. एव्हढ सांगुन सुध्दा आज तो आला नाही. सगळ्यांच्या घरातून कोण ना कोणतरी आले होते. जेनिताचे तर मम्मा, पप्पा आणि दादापण आला होता.फ़क्त माझ्या एकटीचेच कुणी नव्हतं तिथे. आजीला तर माझ्या बेडरुमपर्यंत पण येता येत नाही. गुडघे दुखतात हल्ली तिचे फार. त्यादिवशी डॉक्टरकाका पण घरी येउन गेले. आता आजी घरी एकटी आहे म्हटल्यावर ज्योती तरी कशी येणार? आज मम्मा असती तर, ती नक्की आली असती. माझ्या एंट्रीला सगळ्यां सोबत तिनेही टाळ्या वाजवल्या असत्या. तश्या एंट्रीला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पण त्या त्यांनी सिंड्रेला स्टेजवर आली म्हणुन वाजवल्या. त्यात एकही टाळी माझ्यासाठी नव्हती. पण ती आता देवाबाप्पाकडे कायमची रहायला गेलीय म्हटल्यावर आता मी तरी काय बोलणार? आज येऊ दे तर त्याला घरी मग बघतेच कशी? आज तर मी त्याला सरळ सांगणारच आहे की, सोडुन दे ही असली घाणेरडी नोकरी. काय कामाची आहे. कधी बघावं तेव्हा नुसत काम नी काम. सकाळी सकाळी सगळे उठायच्या अगोदर निघून जातोस ते डायरेक्ट मध्यरात्री उगवतोस. वर जाताना कुणाला सांगत ही नाहीस. आजीला नाही तर नाही निदान मला तरी उठवत जा ना!!! आता मी मोठी झालीय रे. आता मला चहा ही बनवता येतो. ज्योतीने शिकवलाय मला चहा बनवायला. अगदी तुला आवडतो ना तसा. आलं टाकलेला. तू पण ना ग्रेट आहेस. चहात काय काय टाकुन पितोस? त्यादिवशी आजी सांगत होती तुझ्याबद्दल की एकदा तुला आलं टाकलेला चहाचं हवा होता. आणि घरात आलंच नव्हतं. तर तू हट्टाने तिला चहात आल-लसणाची पेस्ट टाकायला लावली होतीस म्हणे. अन मोठ्या चवीने चांगले दोन कप चहा प्यायला होतास. हे सांगताना तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. मी बघतेय पाहिल्यावर तिने ते अलगद पुसून घेतलं. तिला वाटलं की मला कळलं नाही, पण मला बरोबर माहिती आहे की ती का रडत होती ते ? हल्ली तू बदलला आहेस हे माझ्याप्रमाणे तिला ही जाणवलं आहे ते, पण ती ते बोलून नाही दाखवत. पण खरच तू खुप बदलला आहेस. पूर्वी कस सगळ छान छान होत. आपण सगळे किती मस्त मज्जा करायचो. मी आणि तू सकाळी एकत्रच निघायचो. मी शाळेत जायची आणि तू ऑफिसला. फार मज्जा यायची तुझ्या गर्लफ़्रेंडसोबत शाळेत जायला. तू तुझ्या बाईकला गर्लफ़्रेंड म्हणतोस हे माझ्या मैत्रिणिंना सांगितल्यावर त्या किती हसत होत्या माहितीय?  दुपारी तूला प्रोमीस केल्याप्रमाणे मी सगळा होमवर्क पूर्ण करुन ठेवायचे. संध्याकाळी तू आलास की मग खरी मज्जा यायची. काय मस्ती करायचो आपण तेव्हा. ज्योती आणि आजी दोघीही अगदी हैराण व्हायच्या. रात्री झोपायच्या वेळेस तुझ्या मांडिवर डोक ठेवल्यावर तू माझ्या केसांतुन हात फ़िरवत असताना गाणं गायचास. मला तेव्हा कळायचं नाही कुठलं म्हणायचास ते, पण ऐकायला मस्त वाटायचं. तुझ गाणं ऐकता ऐकता झोप कधी लागायची ते कळायचंच नाही. मला नाही वाटत की, आपली कुठली सुट्टी घरात गेली असेल. दर विकेंडला आपण कुठेतरी बाहेर फिरायला जायचो. तुला समुद्र फार आवडायचा. कारण महिन्यातून निदान दोनदा तरी आपण समुद्रावर जायचोच जायचो. ए..मम्मा तुला इथे समुद्राच्या किनारीच पहिल्यांदा भेटली होती ना रे?  म्हणुन तू इथे मला घेउन येतोस ना सारखा सारखा. मला माहितीय तुला मम्माची फार आठवण येते ती. मला ही येते कधीकधी. पण मला मम्मा निटशी आठवत नाही. मी तिचे फ़ोटो पाहिलेत आपल्या जुन्या कपाटातल्या अल्बममध्ये. मुन्ना मावशी म्हणते की मी अगदी मम्मासारखी दिसते म्हणुन. हो....का रे?
      जाऊ दे तुला विचारण्यात आता काही फ़ायदा नाही. तू काय सांगणार? हल्ली तुला माझ्याशी बोलायला तरी वेळ आहे का? आज काय तर म्हणे कसलीतरी मिटिंग आहे रात्री घरी यायला उशीर होईल, उद्या काय तर म्हणे मी चार दिवसासाठी ऑफिसच्या कामासाठी बाहेर गावी चाललोय. मला एक कळत नाही जर का माझा फोन ही उचलायला तुझ्याकडे वेळ नाहीय, तर मग हे सगळं आजीला सांगायला तुला बरा वेळ मिळतो? बरोबर आहे....आजी बिचारी भोळी आहे तिला शेंडी लावायला सोप्प आहे. माझ्यासमोर तुझी कुठलीही कारण चालणार नाहीत हे पक्क ठावुक आहे तुला. म्हणुन आजकाल तू माझे फोन ही घेत नाहीस? मला कळतय की तुझ ऑफिसला जाण माझ्या शाळेत जाण्याइतकच गरजेच आहे, पण आम्हाला निदान रविवारची तरी एक सुट्टी देतात तुला तर तेव्हढीही नाही देत का रे? की तू मुद्दामून घेत नाहीस? ऑफिस इतकीच तुझी अजुन कुणाला तरी तितकीच जास्त गरज आहे हे तुला कळत कस नाही? आणि रात्री नक्की येतोस किती वाजता तू? काल रात्री बाहेर कसला तरी आवाज झाला म्हणून खिडकीत आले बघायला तर तुला अंगणात खाली एकटाच फिरताना पाहिलं. बापरे!!!!!काय अवस्था करून घेतलियस स्वत:ची?? एकतर जवळपास महिन्याभरानंतर तुला पहात होते आणि तेहि अश्या हालत मध्ये. आजकाल ऑफीसमध्ये फार काम असत का रे तुला? फार दमलेला दिसत होतास. पूर्वी कसा नेहमी मस्त रहायचास. ऑफिसवरुन आलास की सगळ्यांत पहिल्यांदा मला शोधायचास. आता तुला पाहिल तर तू स्वत:च कुठेतरी हरवल्यासारखा दिसत होतास. मी तुला हाक मारली. पण तुझ लक्ष्यच नव्हतं. चांगल्या दोन तीन हाका मारल्यावर एकदा कुठे तू माझ्याकडे पाहिलसं आणि साधं हसला पण नाहीस. थोडावेळ थांबुन मग मी ही पुन्हा झोपायला निघून आले. मध्येच कसली तरी चाहुल लागली तर तू होतास माझ्या बेड शेजारी. तुला पाहून किती बरं वाटलं माहितीय. तुला आठवतं माझी एक बाहुली होती ती. अरे ती नाही का? जी हरवल्यावर मी पुर्ण दिवस जेवले नव्हते. किती कासावीस झाला होतास तु. एक दिवस सुट्टी घेउन तू ती बाहुली घरात शोधत होतास. अन एक दिवस अचानक कपाट साफ करताना ती सापडल्यावर तेव्हा जस मला वाटलं होत ना अगदी तस्सच त्या रात्री तुला पाहुन मला वाटलं. मी तडक उठून बसले. तू माझ्याकडे पाहून हसलास... नेहमीसारखा. मघाशी मला वाटलेल की, तु माझ्यावर रागावला बिगवला आहेस की काय? पण तस काही नाही, हे पाहून जीवात जीव आला माझ्या. मी तुला मिठी मारली. आई ग!!! अरे बाहेर फिरताना स्वेटर तरी घालायचस. कसला गारठला होतास. एकदम बर्फासारखा.पण तू कधी कुणाच ऐकशील तर खरं. मग पुढची रात्र तुला इतक्या दिवसाच्या गमती सांगण्यातच संपली. पुन्हा तुझ्या मांडीवर डोक ठेवून पुर्वीसारखी झोपले. इतके दिवस फ़क्त डोळे मिटुन पडून रहायचे तुझी वाट बघत पण झोप काही यायची नाही. मग ना मी तुझे नी माझे पूर्वीचे दिवस आठवायचे. माझा बर्थ डे, आपली पिकनिक, आपण आजीच्या वाढदिवसाला तिच्यासाठी बनवलेला सरप्राईज केक अश्या कितीतरी गोष्टी. मग उशिरा कधीतरी डोळ्यांसमोर गडद काळोख व्हायचा आणि सगळं शांत व्हायचं. पण आज ह्या कश्याचीच गरज नव्हती. मस्त झोप लागली. सकाळी उठून पाहिलं तर तू नेहमीप्रमाणे कुणालाही न सांगता निघून गेला होतास. मी सगळीकडे शोधलं तुला तू नव्हतास कुठे. आजी देवघरांत पोथी वाचत होती. आजी नेहमी त्या पुस्तकातलं वाचुन, एव्हढ काय त्या देवाला सांगत असते हे त्या देवालाच ठावुक. ज्योतीला विचारून काही उपयोग नव्हता. पण आज सकाळी मला फार मस्त वाटत होत. एकतर आज माझा अन्युअल डे होता. त्यात पुन्हा मी नाटकात सिन्ड्रेलाच काम करणार होती. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तू आज माझ्या शाळेत यायच प्रोमीस केल होतस. मी पुर्ण दिवसभर तुझी वाट पहात होते.पण तू नाही आलास. शेवटी शेवटी तर नाटकातले बरेचसे संवाद मी होलच्या मेन दरवाज्याकडे बघूनच म्हटले. पण तू नाही आलास. मला वाटलेल की निदान बक्षिस समारंभाच्या वेळीस तरी तू येशील, पण तु..........
      अवनीला समोरची खिडकी आता धूसर दिसू लागली. तिला आता ह्या घडीला अगदी एकट एकट फिल येत होता. तेव्हढ्यात जोरजोरात दार वाजवायच्या आवाजाने अवनी भानावर आली. सोबत आजीची हाक ही ऐकू येत होती. खरतर तिला ह्या क्षणाला कुणाशी काहीही बोलायच नव्हतं. पण शेवटी आजीचा आवाज ऐकल्यावर तिच तिलाच रहावल नाही. तिने दरवाजा उघडला आणि दारातच आजीला मिठी मारून तिच्या कुशीत हमसून हमसून रडू लागली. अवनीला सुखरूप पाहून आजीला हायसं वाटलं पण तिला अस रडताना पाहून ती एकदम काळजीत पडली.
 
"अवनी बाळा काय झालं इतक रडायला?. ए सोनू सांग ना...."
" मी नाही बोलणार आता कधी त्याच्याशी. तो खुप वाईट आहे."  एव्हढ बोलून अवनी पुन्हा रडायला लागली.
"अग पण कोण????? आणि कुणाशी नाही बोलणार आहेस तू?"
"पप्पाशी......."
अवनीने अस म्हणताच त्या दोघीहीजणी एकामेकांच्या तोंडाकडे पाहू लागल्या. ज्योती काही बोलणार तेव्हढ्यात आजीने तिला अवनीसाठी पाणी आणायला पाठवले. ती गेल्यागेल्या अवनीला समोर उभ करून आजी म्हणाली "अवनी शांत हो पाहू आधी आणि मला नीट सांग नक्की काय झाल ते."
आजीने अस विचारल्यावर अवनीने काल रात्रीपासून घडलेला प्रकार आजीला सांगितला " सांग ना आजी अस का करतोय तो? त्याला कळत नाही आहे का की, मला किती त्रास होतोय त्याच्या अश्या वागण्याचा ते? का लांब लांब रहातो माझ्यापासून तो हल्ली?  सगळ्यांकडे त्यांचे त्यांचे मम्मा पप्पा आहेत. माझ्याकडे फ़क्त तोच आहे आणि आता तो पण असा मला टाळतोय. हल्ली तो मला कधी भेटत नाही माझा फोनही घेत नाही. तो फ़क्त तुझ्याशीच काय तो बोलतो. फ़ोनपण तुलाच करतो. आज रात्री येउच दे त्याला. मी त्याला सरळच सांगणार आहे की, त्याला जर का माझा एव्हढाच कंटाळा आलाय तर मग मी माझ्या मम्माकडेच जाते कशी?"
अवनीने अस बोलताच आजीने अवनीला छातीशी घट्ट धरून घेतलं आणि रडायला लागली.
" नको ग अशी बोलूस राणी. तुझ्याशिवाय माझ दुसर आहे तरी कोण? मी बोलते तुझ्या पप्पाशी. माझ्या इवल्याश्या पोरीला रडवतो म्हणजे काय? थांब चांगली खडसावतेच त्याला. पण तू कुठेही जाऊ नकोस. नाही ना जाणार??"
"खरच?????बोलशील तू त्याला?"
"हो...पण एका अटिवर ह्यापुढे कधीही मला सोडुन जायच्या गोष्टी मनातसुध्दा नाही आणायच्या. शपथ घे माझी" हे बोलताना आजीचा केविलवाणा झालेला आवाज अवनीला जाणवला.
“तुझी शपथ... मी तुला आणि पप्पाला सोडुन कुठेही नाही जाणार”
एव्हढ बोलुन अवनीने आजीला गच्च मिठी मारली. दोघीजणी एकामेकांना घट्ट धरून बसल्या होत्या. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. रुममध्ये एक प्रकारची उदासी पसरली होती. अवनीच्या प्रश्नांनी आजीच्या डोक्यात विचारांच काहुर माजलं होतं
"अग मी काय समजावणार त्याला? आणि कसं समजावणार त्याला? तुला वाटतं तितकं सोपं नाही ते बाळा. तो आता माझ्या ऐकण्यातला राहिलेला नाही. तू बरोबर बोललीस तो लांब गेलाय ...आपल्यापासून खुप लांब. कधीही परत न येण्यासाठी. त्या दिवशी तुला शाळेत सोडायला गेला तो परत आलाच नाही. बराच वेळ झाला तो आला नाही म्हणुन त्याचा फोन लावला. तर खुप वेळानंतर समोरून फोन कुणितरी उचलला, तो तुझा पप्पा गेला हा निरोप देण्यासाठी. तुझा त्याच्यावरचा राग सहाजिकच आहे. पण त्यात त्याची काही चुक नाही ग बाळा. चुक कुणाची असेल तर तर ती माझी आहे जिने तुला तो फ़ोनवरचा निरोप आजवर दिलेला नाही. कसा देऊ? हिम्मतच होत नाही. तुझी मम्मा गेली तेव्हा तुला जो धक्का बसला त्यातून तू आताशी कुठे सावरत होतीस. डॉक्टरांनी त्यावेळेसच तुझी नाजुक परिस्थीती पाहून ह्यापुढे तुला कुठलाही मानसीक आघात सहन होणार नाही अस सांगितलेले. त्या दिवसापासून तुझ्या पप्पाने तुला अतिशय फ़ुलासारखं सांभाळल. तुला कधी मम्माची कमी जाणवेल अशी परिस्थीतीच येउ दिली नाही. तुझ्या पप्पासोबत तो तुझी मम्मादेखिल झाला. पण आज एव्हढि मोठी जबाबदारी माझ्या अंगावर टाकुन तो निघून गेलाय. तो आता आपल्यात नाही ही गोष्ट मला ही सहन होत नाहीय. तुझ्या त्याच्याबद्दलाच्या प्रश्नांची खोटी उत्तरं देताना माझी फार दमछाक होतेय ग राणी. मला नाही झेपत हे सारं आता ह्या वयात. अचानक काही न कळवता चालता बोलता निघून गेलास, तसाच एक दिवस परत निघून ये आणि सोडव मला ह्यातुन. आता तूच सांग हे सगळं मी कस समजावू त्याला?" आजीला आता स्वत:च स्वत:ला आवरणं कठिण होत होतं.
       तेव्हढ्यात ज्योती पाणी घेउन आली. तिच्या येण्याने भानावर आलेल्या आजीने आपले अश्रु आवरते घेतले. "चल बाळा बराच वेळ झाला. आता दोन घास जेवून घे बघू. ज्योती तू अवनी घेउन जा खाली आणि पानं वाढायला घे. मी येते हळुहळु मागुन. बराच वेळ झाला माझी पोर उपाशी आहे. अगं लहान मुलांना अस फार वेळ उपाशी ठेवु नये. नाहीतर त्यांची आजी लवकर म्हातारी होते."आजीने अस म्हणताच अवनी खुदकन हसली. तिला अस नॉर्मल झालेली पाहून आजीलाही बरं वाटलं. अवनी ज्योतीसोबत दारापर्यंतच गेली असेल की काहीतरी आठवुन गरकन मागे वळली आणि आजीकडे येउन म्हणाली."आजी तू आज बोलशील ना त्याला? पण जास्त ओरडु नकोस हा त्या बिचार्याला. खरच त्याला ऑफिसमध्ये खुप काम असणार, नाहीतर तो अस कधी करणार नाही. त्याला सांग तो कामात एव्हढा बिझी आहे ना, तर ठीक आहे. मी नाही त्रास देणार त्याला. पण जेव्हा कधी त्याला वेळ मिळेल ना तेव्हा मला दिवसातुन एकदातरी भेट किंवा नुसता एक फोन कर म्हणावं. ते देखिल चालेल मला. नक्की सांगशील ना???"  आजीने फ़क्त मान डोलावली. अवनी खुश होउन रूमच्या बाहेर पळाली.
दाराकडे पहात असताना आजीच लक्ष्य दरवाजाच्या बाजुच्या भिंतीवर लावलेल्या त्याच्या फ़ोटोवर गेल "किती गोड हसायचा तो. देवाचा पण ना कधी कधी खुप राग येतो. त्याच गणितच मला कळत नाही. माझी सोन्यासारखी लेकर माझ्या डोळ्यादेखत माझ्यापासून हिरावून घेताना त्या देवाला काहीच कस वाटल नाही. माझा नाही तर निदान त्या इवल्याश्या जीवाचा तरी विचार करायचा. पण एक कळत नाही अवनी काल रात्री तो तिला भेटला होता अस का म्हणाली? खरच का तो तिला भेटायला इथे परत आला असेल? असेल ही फार जीव होता त्याचा तिच्यावर.पण अवनी सांगते त्याप्रमाणे हे जर का खर असेल तर तू पुन्हा आलास ना की एक काम कर फ़क्त एकदा आणि फ़क्त एकदाच तुझ्या या आईलाही भेट. फार आठवण येते रे तुझी. तुझा जसा अवनीमध्ये जीव अडकलाय ना.. तसाच माझाही तुझ्यासाठी जीव तुटतोय रे... ह्या म्हातारीच एव्हढ काम करशील ना"  आजी विचारात गढलेली असताना तेव्हढ्यातच अवनीची खालून हाक ऐकू आली " आज्जी.... येतेयस ना??? मी केव्हाची थांबलेय तुझ्यासाठी"
"आले आले... अगं तुझ्या पप्पालाच फोन लावत होते. पण हा कधी फोन उचलेल तर शपथ. कधी बघावं तेव्हा नुसत कामातच असतो.काय करायच ह्याच काही कळत नाही.आज ज़रा का तो वेळेवर घरी आला नाही ना.., तर मी पण त्याच्याशी या पुढे कधी बोलणार नाही....." त्याच्या फ़ोटोकडे एकवार डोळे भरुन पहात गळ्यात अडकलेला हुंदका कष्टाने पोटात ढकलत, जडावलेल्या पायांनी, मोठमोठ्याने बडबडत ती जिन्याच्या दिशेने चालु लागली.

 
 

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोळे भरुन आले... Sad

खरंच, आई बाबा किती गरजेचे असतात, आपण कितीही मोठे झालो तरीही...

छान लिहिलय..

परब साहेब तुमच्या हातात जादु आहे ..
मी मागचे १ तासापासुन डोळेच पुसत आहे....! नेमके आजच मि फ्रि आहे... कामात मन वळवले असते..
मन हेलावुन गेले आहे..
हँट्स ऑफ टु फॉर यु....
Love your writteing

छान Happy

Pages