हशीखुशीने उभा जन्म मी जाळत होतो!

Submitted by profspd on 26 June, 2014 - 02:06

हशीखुशीने उभा जन्म मी जाळत होतो!
शब्द दिलेला जिंदगीस मी पाळत होतो!!

कधी वाचले, कधी जाणले आपणास मी?
षटीसहामासी मी मजला चाळत होतो!

कधी न रडणारा म्हणुनी मज दुनिया म्हणते....
सारे अश्रू एकांतातच ढाळत होतो!

उगाच नाही हृदय व्हायचे कोरी पाटी.....
रोज रोज ते नेमाने खंगाळत होतो!

चिंब व्हायचो घडीघडीला तुझ्या सरींनी....
तुझ्या उन्हाने मधे मधे मी वाळत होतो!

दिव्यत्वाचा स्पर्श जाहला दिठीस माझ्या....
कुठे अलौकिक दिसले की, मी भाळत होतो!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उगाच नाही हृदय व्हायचे कोरी पाटी.....
रोज रोज ते नेमाने खंगाळत होतो!<<< छान!

त्या 'घडीघडीला; ऐवजी 'अधेमधे मी' किंवा 'कधीकधी मी' किंवा 'तुझ्यानुसारे' हे (चढत्या क्रमाने) छान वाटेल नाही? अर्थात तो शेर मी किंचितसा वेगळा केला असता हे वेगळे! Happy