विषय क्रमांक २ - आमच्या दाते बाई

Submitted by आशिका on 26 June, 2014 - 01:26

जून-जुलै महिन्यातील एक दुपार आणि बाहेर पडत असलेला धुवाधार पाऊस. तिसर्‍या मजल्यावरच्या आमच्या वर्गात खिडकीजवळच्या बाकावर बसून आषाढातल्या पावसाचे विहंगम सौंदर्य पाहण्यात मी गढून गेले होते. सायन स्टेशनबाहेरचा तो एरवी गजबजलेला परिसर, दुपार आणि त्यात पाऊस यामुळे शांत पहुडला होता. फळे, भाज्या विक्रेते आपापल्या गाड्यांवर प्लॅस्टिक घालुन आडोशाला उभे होते. रस्त्याच्या दुतर्फा असलेली अशोक, वड, पिंपळ ही झाडे नुकत्याच न्हाऊन आलेल्या, ओलेचिंब केस पाठीवर मोकळे सोडलेल्या, हिरवाजर्द शालू नेसलेल्या नवरीसारखी तजेलदार दिसत होती. त्यावर काही पक्षी अंग चोरुन बसले होते. खाली शाळेच्या कँटीनमधुन भजी, बटाटेवड्याचा खमंग वास, आता लवकरच मधली सुट्टी होणार असल्याची वर्दी देत, भूक चाळवत होता. खिडकीच्या गजावर पावसामुळे जमलेले पाणीदार मोती तसेच्या तसे हाताच्या मुठीवर पकडण्याचा खेळ मी खेळत होते. मधूनच पावसाचे तुषार अंगावर येत होते. डोक्यात पावसावरील कविता जन्म घेत होती.

या नेत्रसुखद दृश्याचा आस्वाद घेत असताना, कानांवर मात्र अगदी विसंगत असे काहीसे पडत होते. "विषुववृत्तापासून आपण जसे ध्रुवीय प्रदेशांकडे जावू लागतो तस-तशी सूर्याची उष्णता....." असे काहीसे... हो, दाते बाई भूगोल शिकवत होत्या. अचानक विषुववृत्त, अक्षांश, रेखांश हे शब्द थांबून बाई कुणालातरी हाकारत आहेत असे वाटले आणि मी दचकुन बाईंकडे पाहिले. "आशिका S S, अगं तिसर्‍या हाकेला पाहिलेस? सांग आता". मी धडपडत उभी राहिले आणि अगदी बाळबोधपणे "काय सांगू बाई?” असं बोलून गेले. माझे शब्द ऐकताच वर्गात हशा पिकला. दाते बाईंच्या चेहर्‍यावरही मिश्कील हास्य होते. “अगं प्रश्न विचारला ना मी तुला?” "नाही ऐकला बाई मी, सॉरी, माझं लक्षच नव्हतं", मी खाली मान घालून कबूल केलं. दाते बाईंनी जणू काही झालेच नाही असे भासवून "कोण सांगेल बरं" असे म्हणून सर्व वर्गावर नजर फिरवली आणि मी गपचूप खाली बसले.

खरे तर शिक्षकी पेशाला साजेसे खड्या आवाजात एक लेक्चर दाते बाई मला देवू शकल्या असत्या किंवा काही शिक्षा करु शकल्या असत्या. पण नाही , ओरडणे, शिक्षा करणे हे बाईंच्या स्वभावातच नव्हते.मात्र या व अशा वागण्याचा अपेक्षित परिणाम विद्यार्थ्यांवर होत असे. कदाचित शालेय वय होते म्हणून असेल, पण शिक्षेस पात्र असे वर्तन घडूनही बाईंनी शिक्षा केली नाही यामुळेच पुन्हा असे वर्तन शक्यतो घडत नसे. मीही मग भूगोलाच्या तासाला बाई काय शिकवतायत यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करु लागले.

....तर अशा या आमच्या समाजशास्त्र शिकवणार्‍या दाते बाई. पाचवीपासून दहावीपर्यंत इतिहास, भूगोल,नागरिकशास्त्र आम्हाला शिकवीत असत. त्यामुळे आमच्या वर्गाशी त्यांचा संबंध प्रत्येक वर्षी आलाच, त्यात सहावी, सातवी, आठवी व दहावी ही चार वर्षे त्या आमच्या वर्गशिक्षिकाही होत्या. यामुळे तर त्या अगदी प्रत्येकालाच व्यवस्थितपणे ओळखत होत्या.

आम्ही त्यांना 'वसू' म्हणत असू, अर्थात त्यांच्या पाठीमागे, वसुधाचा शॉर्ट्फॉर्म 'वसू'. पण वसुधा हे काही त्यांचं पहिलं नाव नव्हतं तर ते त्यांचं वर्णन होतं. दाते बाई वसुधा अर्थात पृथ्वीशी साधर्म्य साधता येईल अशा शरीरयष्टीच्या होत्या, अरुंद मानेमुळे अधिकच ठेंगण्या व स्थूल वाटत असत. तसेच वर्गात येताना बर्‍याचदा आपल्यासोबत त्या पृथ्वीचा गोल हातात नाचवत येत असत, म्हणून त्या आमच्या 'वसू' होत्या. रुपा-वर्णाने म्हणाल तर दाते बाई म्हणजे अस्सल कोकणस्थ ब्राम्हण, गोर्‍या, घार्‍या. मात्र त्या घार्‍या डोळ्यांत बेरकी नजर कधीच आढळली नाही आम्हाला. ते नेत्र कायम प्रेमाने ओथंबलेलेच दिसत. प्रसन्न, हसतमुख असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.

दाते बाईंना अध्यापनाचे कौशल्य साधले नव्हते असे मुळीच नाही. किंबहुना गाठीशी बर्‍याच वर्षांचा अनुभव असल्यामुळे अध्यापन म्हणजे त्यांच्या हातचा मळ होता. पुस्तकाशिवाय त्या इतिहासाचे धडे गोष्टीरुपाने सांगत असत. पण त्या सनावळी, हवामान, भौगोलिक परिस्थिती, नागरिकशास्त्रातील राष्ट्रपतीपदासाठीची पात्रता, कर्तव्ये या सगळ्या रटाळ बाबींचा आम्हाला भारी कंटाळा येई आणि वर नमुद केल्याप्रमाणे माझ्यासारखे नमुने बर्‍याचदा बाईंना सापडत. मात्र बाई अशा सगळ्या केसेस अतिशय शांतपणे हाताळत. कधी अंगावर खेकसणे नाही, आवाज चढवून बोलणे नाही, तर सहजच बोलल्यासारखे त्या विद्यार्थ्याला समजावत. एकदा तर एक मुलगी पहिल्या बाकावर बसली असताना चक्क इतिहासाच्या तासाला डुलक्या घेऊ लागली. बाईंनी शांतपणे तिला उठवून तोंड धुवून यायला सांगितले.

दाते बाई सायनलाच शाळेपासून काही अंतरावरच रहात असत. त्यांचा मुलगा आमच्याहून एक वर्षाने लहान. ती दोघे पायीच शाळेत येत असत. मोठी मुलगीही होती त्यांना कॉलेजला जाणारी. दाते बाईंच्या यजमानांचे त्यांचा मुलगा दोन वर्षांचा असतांना आकस्मिक निधन झाले होते व त्या एकट्या दोन मुलांना वाढवत होत्या, असे आम्ही ऐकुन होतो. त्यांची आर्थिक परिस्थितीही बेताचीच असावी, हे दर आठवड्याला रिपीट होणार्‍या त्यांच्या साड्यांवरुन लक्षात येत असे. १९८०-९० च्या काळात प्रायव्हेट शाळेतील शिक्षकांना पगार तरी कितीसा असणार होता? नियतीने केलेल्या आघातामुळेच का नकळे पण त्यांचा स्वभाव असा शांत, संयमी झाला होता.

त्यांना बघुन मला नेहमीच माझी आई आठवत असे. त्यांनी कधी कुणाला जवळ वगैरे घेऊन असे आंजारले-गोंजारले नव्हते, अगदी पाचवीत असतानाही नाही. पण तरीही , कदाचित अगदी लहान वयात देवाघरी गेलेली माझी आईच मी त्यांच्यात शोधत आले होते, म्हणून असे वाटत असावे.

सातवीत असतांना एकदा त्यांचा तास होता. मी त्या दिवशी कमालीची अस्वस्थ होते. अडनिडं वय, मानसिक स्थित्यंतरे याचा परिणाम असावा. काय होत होतं ते सांगू शकत नाही पण मी रोजची ‘मी’ नव्हते. दाते बाईंनी शिकवत असतानाच हे हेरलं. तास संपला आणि त्या निघून गेल्या.पण लगेच शिपायाबरोबर माझ्यासाठी निरोप आला ” दाते बाईंनी शिक्षकांच्या खोलीत बोलावलं आहे “ म्हणून मी तिथे गेले. त्या एकट्याच होत्या. मला त्यांनी जवळ बसवून घेतले आणि पाठीवर हात ठेवला. त्या क्षणीच मी हमसाहमशी रडू लागले. त्या फक्त मला थोपटत होत्या, काही न बोलता. ना त्यांनी मला काही विचारलं, ना मी काही सांगितलं, मात्र आतुन अगदी शांत शांत वाटत होतं. अगदी जिव्हाळ्याच्या कुणाशीतरी खूप काही बोलल्यासारखं... “तुला काही बोलायचं असलं तर तू माझ्याशी केव्हाही बोलू शकतेस", असा विश्वास त्यांनी दिला. मी हो म्हटले आणि आता बरे वाटतेय असे सांगुन वर्गात आले. त्या दिवसापासुन मनातल्या मनात त्यांना आईच समजत गेले.

इतर मुलींनाही दाते बाई म्हणजे "शाळेतली आईच" वाटायच्या. आई जशी बाबांच्या रागापासून बचाव करते तसंच काहीसं बाई आमच्यासाठी मुख्याध्यापकांकडे शब्द टाकायच्या. लायब्ररीची पुस्तके घरी न्यायची परवानगी मागणे असो किंवा दहावीचे शेवटचे वर्ष म्हणून झकास सहल आयोजित करा हे मागणे असो, आम्ही दाते बाईंचाच वशिला लावायचो.

एकदा तर असेच काहिसे काम बाईंमार्फत करुन घेण्यासाठी आम्ही त्यांना आग्रह करत होतो आणि त्या खट्याळपणे बोलून गेल्या "या वेळी वसू वशिला लावणार नाही" हे शब्द कानी पडताच आम्ही अवाक झालो. आम्ही ठेवलेले टोपणनाव त्यांना माहित होते तर, पण इतक्या खिलाडूवृत्तीने त्यांनी हे सारे घेतले की आमची त्यानंतर हसुन हसुन पुरेवाट झाली होती. प्रत्येक व्यक्तीशी त्याच्या वयाचे होवून, त्याला समजून घेत त्याच्याशी वागणे, बोलणे या बाबतीत बाईंचा हात कुणाला धरता आला नाही.

मुली तर होत्याच पण अनेकदा वर्गातील मुलांनाही मी एकेकटे बाईंशी चर्चा करताना, त्यांचे मार्गदर्शन घेताना पाहिले आहे.

बाईंचा कामातील उरक वाखाणण्याजोगा होता. अभ्यासेतर अनेक उपक्रमांची जबाबदारी मुख्याध्यापिका दाते बाईंवर सोपवत. मग त्या विविध स्पर्धा असोत, सांस्कृतिक कार्यक्रम वा सहल, बाई हसतमुखाने सर्व तडीस नेत असत.

वर्षे सरत होती आणि दहावीचे वर्ष आले. 'दहावी अ' चा वर्ग म्हणून सर्वांची भिस्त आमच्यावर कारण त्या काळी 'अ' वर्ग म्हणजे हुशार मुलांचा, असं मानंलं जायचं, म्हणजे मार्कांच्या स्पर्धेत. त्यात गुणवत्ता यादीत कमीत कमी एक तरी जण येणे ही शाळेची परंपरा होती. पहिल्याच दिवशी मुख्याध्यापकांचे भाषण झाले, "तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत वगैरे"ते ऐकुन जरा दडपण आले, पण जेव्हा समजले की दाते बाईच वर्गशिक्षिका आहेत, तेव्हा सर्वांना धीर आला. तुम्ही सगळे नक्की यशस्वी व्हाल याची खात्री आहे मला असंच काहीसं दाते बाईंची आश्वस्त नजर आम्हाला सांगत होती.

दाते बाईंच्या मुशीतुन घडलेली आम्ही सारी लेकरं या वर्षी जबाबदारीनं वागत होतो, मन लावून अभ्यास करत होतो. या वर्षभरात बाईंनी सर्व मुलांवर प्रचंड मेहनत घेतली. अगदी झाडून सर्व मुलांवर, हुशार मुलांसाठी वेगळ्या टीप्स, शिकवणे हे त्यांच्या नियमांत बसत नव्हते. त्यांनी कधीच हुशार मुलांना खास वागणूक दिली नाही. सर्वांकडून भरपुर सराव करुन घेतला, पेपर्स सोडवून घेतले, तपासून दिले, तक्ते वगैरे करुन उजळणी करण्याचे तंत्र शिकवले. या विषयातही गणित व विज्ञानासारखे गुण मिळवता येवू शकतात हे जणू त्यांना दाखवून द्यायचे होते.

या वर्षी पालक सभा बोलावली गेली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीबद्दल शिक्षक संबंधित पालकांशी विचार्-विनिमय करणार होते. दाते बाई म्हणजे आमच्या सर्वांच्या मनोरुपी देव्हार्‍यातील 'आराध्य देवताच', हे घरच्यांनाही इतक्या वर्षांत कळून चुकलं होतं. प्रत्येक पालक त्यामुळेच दाते बाईंकडे आपल्या मुलाची चौकशी करत होता. माझे बाबाही याला अपवाद ठरले नाहीत. त्यांनी माझ्याबद्दल बाईंना विचारताच बाईंनी फक्त माझ्या पाठीवर हात ठेवला नि चेहर्‍यावर तेच आश्वस्त करणारे स्मित हास्य. जणू काही निकालानंतरच त्या शाबासकीची पाठ थोपटत आहेत.

हे वर्ष फारच लवकर सरलं आणि निरोपसमारंभाचा दिवस उजाडला. या दिवशी बाईंनी स्वरचित कवितेचं वाचन केलं सर्वांसमोर ...'वर्ग माझा दहावी अ चा' असं शीर्षक होतं कवितेचं. ज्या आमच्या वर्गाला बाई सतत सहा वर्षे ज्ञानदान करीत आल्या होत्या, त्या वर्गातील त्यांच्या लेकरांचे स्वभावविशेष, बाईंना आमच्याबद्द्ल काय वाटतं याचे रसभरीत वर्णन होते त्या कवितेत. सर्व उपस्थितांच्या डोळ्यांतुन पाणी आलं कविता ऐकून. बाईंचाही स्वर कापरा झाला होता कविता वाचताना.

त्याच दिवशी एक गुपित कळलं आम्हाला, सहा पैकी चार वर्षे दाते बाईच वर्गशिक्षिका म्हणून लाभण्याच्या योगायोगामागचे खरे कारण काही वेगळेच होते. ते म्हणजे बाई स्वतःच आमचा वर्ग मागून घेत असत आणि या गोड हट्टापुढे मुख्याध्यापिका मान तुकवत असत. मुख्याध्यापिकांकडून हे ऐकताच आम्ही नि:शब्द झालो, एकंदर बाईंनाही आमचा सहवास हवाहवासा वाटत होता तर.

परिक्षा झाली, निकाल लागला. गुणवत्ता यादीत मुले येणे, १००% टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होणे असे सारे मानाचे शिरपेच शाळेच्या मुकुटात खोवले गेले. बाईंच्या विषयातील बोर्डाचे प्रथम पारितोषिकही आमच्या शाळेला मिळाले. त्यामुळे दाते बाईंचीही कॉलर ताठ झाली. एकूण काय तर इतक्या वर्षांत शाळेने जे भरभरुन दिले त्याच्या बळावर पंख पसरुन भरारी घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करुन आम्ही शाळेतुन बाहेर पडलो. वेगवेगळ्या क्षेत्रांत, देशांत विखुरलो. शिक्षण, नोकरी, लग्न, मुलेबाळे, संसार यात तेवीस वर्षे निघून गेली. या दरम्यान दाते बाईसुद्धा बढती मिळत पुढे जात राहिल्या आणि सहा वर्षे 'मुख्याध्यापिका' हे पद सांभाळून सेवानिवृत्त झाल्या एव्हढे त्यांच्याबद्दल समजले.

गेल्याच वर्षी आमच्या वर्गाचे स्नेहसंमेलन झाले.... रि-युनियन. इतक्या वर्षांनी सगळे परत भेटलो. प्रत्येक जण दहावीनंतरची वाटचाल आणि शाळेतील आठवणी सांगत होता. विशेष म्हणजे दहावीनंतरचा प्रत्येकाचा प्रवास जरी वेगवेगळा असला तरी प्रत्येकाच्या शाळेतील रम्य आठवणींत दाते बाई होत्याच होत्या; त्यांच्याभोवतीच आठवणींचे गोफ विणले गेले होते. किंबहुना शाळेच्या आठवणी उणे दाते बाई करता बाकी काहीच शिल्लक रहात नव्हते जणू. शाळा म्हणजे दाते बाई हेच समीकरण प्रत्येकाच्या मनात फिट्ट झाले होते. त्या दिवशी त्यांची प्रकर्षाने आठवण झाली. केवळ सहा वर्षांचा आमचा आणि दातेबाईंचा सहवास आणि तो ही दररोज फक्त पस्तीस मिनिटे एव्हढाच, पण आयुष्यभराची शिदोरी बनला होता. स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहुन, अनेकानेक पातळ्यांवर जीवनाला सामोरे जात, बर्‍यापैकी परिपक्वता प्राप्त झालेले आम्ही आज बाईंच्या आयुष्याची कल्पना करु शकत होतो. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीत कसं सारं एकटीनं हसतमुखानं निभावलं असेल, हे जाणवलं. त्याच दिवशी एक विचार पक्का झाला 'बाईंचा पत्ता शोधून त्यांना भेटायचं'.

सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं आणि आम्ही काही जण दाते बाईंना भेटायला त्यांच्या घरी गेलो. खूप खूष झाल्या त्या सर्वांना बघुन आणि आम्हीही. स्वतःच्या मुला-नातवंडांनी भरलेल्या गोकुळात सुखेनैव रहात होत्या. "वानप्रस्थाश्रम एंजॉय करतेय", म्हणाल्या. नातवाला सांभाळायला असलेल्या मदतनीस बाईंना त्या आमचे प्रत्येकाचे स्वभावगुण, आवडी-निवडी सांगत भरभरुन बोलत होत्या. आमच्याबरोबर आमची मुलेही होती. आईच्या/बाबांच्या टीचरला बघायला उत्सुक अशी. बाईंना पहाताच मुलांनी 'वसू टीचर' म्हणून गलका केला. बाईंनी या सगळ्या नातवंडांचे कोड-कौतुक केले. आज जणू त्यांना त्यांची एक्सटेंडेड फॅमिलीच भेटली होती.

मनात आलं ब़ख्खळ पैसा, मानमरातब मिळवून देणारी इतकी सारी कार्यक्षेत्रं असतात. पण मातीच्या गोळ्याला चाचपुन, प्रसंगी चापटी मारून आकार देणारं आणि त्याचं मूर्तीत रुपांतर करणारं हे जे ‘शिक्षकाचं’ कार्यक्षेत्र आहे त्याला तोड नाही. आ़ज दाते बाईंकडे रग्गड पैसा नसेल कदाचित, पण आमच्यासारख्या त्यांच्या कैक विद्यार्थ्यांच्या मनातील एका हळव्या कोपर्‍यात 'दाते बाई' विराजमान आहेत, अनभिषिक्त साम्राज्ञीसारख्या... असं कुणाच्या मनातलं अढळ स्थान मला तरी नाही वाटत दुसरं कुठलं व्यावसायिक कार्यक्षेत्र मिळवून देवू शकत असेल. हीच बाईंची खरी दौलत आहे, जी वर्षांगणिक वाढतेच आहे, चक्रवाढ व्याजासारखी !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विशाल चंदाले, मामी, माधुरी१०१, सायो, राया, शैलजा, सई प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
@ सई:- हो नक्कीच, बाईंना हे देईनच वाचायला नंतरच्या भेटीत.

आशिका...खरच छान लिहिले आहेस...

मला पुन्हा एकदा आमच्या सराफ मॅड्मची आठवण आली. त्यांनी सुदधा कधी मुलांना शिक्षा केली नाही. आम्ही केलेल्या चुकांचे त्या स्वतः प्रायःश्चित घेत असत. त्यांचे एक वाक्य अगदी मनावर कोरलय - "माझा विद्यार्थि काहिही झाला तरी चालेल पण तो त्या क्षेत्रात अव्वल झाला पाहीजे. मग ते क्षेत्र चांगल असो वा वाईट"

शेवटचा परिच्छेद तर अप्रतिमच झाला आहे...मन भरुन आलं...

सराफ मॅड्म ना शोधलच पाहीजे. धन्यवाद आशिका...!!!

मातीच्या गोळ्याला चाचपुन, प्रसंगी चापटी मारून आकार देणारं आणि त्याचं मूर्तीत रुपांतर करणारं हे जे ‘शिक्षकाचं’ कार्यक्षेत्र आहे त्याला तोड नाही

मस्त Happy

हर्पेन, sanjitast, वेका, आशुडी, कंसराज, राधिका, प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद.

आवडलं.
शाळाशिक्षकांबद्दल असं भरभरून आणि कृतज्ञतापूर्वक लिहिणं हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. (पुढल्या पिढीतले फार थोडे अश्या आठवणी काढतील.)

Pages