विषय क्र. २ जॅमी

Submitted by नंदिनी on 25 June, 2014 - 22:34

“मी जेव्हा कधी मरेन ना, तेव्हा प्लीज जॅमी आल्याशिवाय मला आग लावू नकोस” रात्री अडीच वाजता डोळ्यांत पाणी आणून मी नवर्‍याला झोपेतून उठवून सांगितलं. नवरा कंप्लीट गोंधळात. त्याला संदर्भच समजत नव्हता. जॅमी नुसता खदाखदा हसत होता. “पण तुला आगच लावायची असेल तर आताच लावून टाकू” या त्याच्या वाक्याने नवरा ताडकन जागा झाला. जॅमीची नईनवेली बायको मात्र “हे चाललंय काय?” मोडमध्ये होती. तसंही जॅमीशी लग्न झाल्यापासून ती कायम याच मोडमध्ये आहे आणि राहील. कारण, जॅमी ही व्यक्तीच तशी आहे.

एखाद्या माणसाचं व्यक्तीचित्रण करणं हे फार बोरींग काम असतं, असं माझं स्पष्ट मत आहे. एकतर आपण त्या व्यक्तीला शंभरटक्के ओळखत असण्याचे चान्सेस फार कमी. आपण स्वत:लाच शंभर टक्के ओळखत नसतो, दुसर्‍य़ाला काय ओळखणार? एखादी व्यक्ती आपल्याला त्या त्या वेळेला त्या परिस्थितीमध्ये कशी दिसली यवरूनच आपण त्या व्यक्तीबद्दल मत बनवणार. इतरांची मतं कदाचित वेगळी असूदेखील शकतात. नव्हे, बर्‍याचदा ती असतातच. मी जॅमीबद्दल काहीतरी लिहितेय म्हटल्यावर “रात्री दोन वाजता बायकोला घराबाहेर काढणारा पाजी माणूस” इथपासून ते “त्याच्याइतका सच्चा माणूस जगात कोण नसेल” इथवरची सर्व मतं आली. हो. जॅमीची ही दोन्ही रूपं खरी आहेत. कारण, जॅमीला “प्रीटेन्ड” करून जगता येत नाही. तो त्या क्षणापुरताच जगतो. भूतकाळ भविष्यकाळ वगैरे त्याच्या लेखी नसतात. वर्तमानकाळामध्येच मनसोक्त जगणं ही त्याच्या आयुष्याची व्याख्या. म्हणून तो जुन्या जखमा लपवू शकतो. भूतकाळामधल्या कुठल्याही वाईट घटनेवर तो सहजगत्या विनोद करू शकतो. “माझं काही चुकलंच नाही” असं म्हणण्यापेक्षा “मी तेव्हा असं वागायला नको हवं होतं” हे चार लोकांत कबूल करताना त्याला लाज वाटत नाही.

आम्ही अगदी रोज भेटणारे घनिष्ठ मित्र नाही. इतकंच काय, हे लिहिताना आठवलं की माझ्या फेसबूक फ्रेण्डलिस्टमध्ये तो अद्याप नाही! मी त्याला अरेतुरे करावं इतका तो माझ्या वयाचा नाही, अहोजाहो करण्याइतका मोठा पण नाही. कधीतरी तीन-चार महिन्यांतून आम्ही फोनवर बोलतो. हा फोन करायची वेळ साधारण रात्री बारानंतर कधीही असते. दोघंही निशाचर प्राणी. कपभर चहा, जुनी गाणी आणि इतर मित्र-मैत्रीणींचं गॉसिप एवढ्यावर आम्ही पहाटेपर्यंत गप्पा मारत बसतो. जॅमीचं आणि माझं जुन्या गाण्यांवर बरंचसं पटतं. त्याच्यामते, १९७५ नंतरचं सगळं संगीत भंगार. त्याआधीचा कुठलाही सिनेमा असू देत, जॅमीला गाणी पाठ असणारच. शिवाय प्रत्येक गाण्यावर एक खास टिप्पणी. एकदा पहाटे चार वाजता फोन करून म्हणाला, “बघ, या गाण्यात काय जबरदस्त ऑप्टिमिझम आहे... माणसानं इतकं आशावादी असावं.” वाटलं काहीतरी चांगलं प्रेरणादायी गाणं ऐकवेल. ऐकवलं ते देवच्या शराबीमधलं.. “कही ना कही कभी ना कभी कोई ना कोई आयेगा” मी कपालबडवतीमोडमध्ये.

मी नववीची परीक्षा दिलेली. आठवड्याभरात दहावीचे व्हेकेशन क्लासेस चालू होणार, तेव्हा फिरायला सोयीचं व्हावं म्हणून पप्पांनी बजाजची सनी गाडी घेऊन दिली होती. सायकलची चांगली सवय असल्यानं मला सनी बर्‍यापैकी व्यवस्थित जमायला लागली होती. त्यामुळे दोन दिवस गल्लीमध्ये चालवून झाल्यावर मी दुपारी मैत्रीणीकडे गाडी घेऊन गेले. जाताना व्यवस्थित गेले, आणि परत येताना घर अगदी दोन मिनिटांवर असताना वळणावर गाडीचा कंट्रोल गेला आणि आपटले. गाडीचा आवाज ऐकून समोरच्या घरामधले बाहेर आले. सगळे ओळखीचेच होते. मला काही लागलंय का, पाणी हवंय का? घरी माझ्या आईला निरोप दे. गाडी धड चालवता येत नाही का? एवढ्या लहान वयात गाडी हातात दिलीच कशाला? वगैरे शास्त्रोक्त पूजा बांधणे चालू होते. एकानं मात्र सगळ्यांकडे दुर्लक्ष करून आधी गाडी उचलली आणि तपासली. वाकडं झालेलं हॅण्डल सरळ केलं. आणि मग विचारलं, “चालवत कोण होतं?” रामायण घडून गेल्यावर पण दशरथानं तीन बायका केल्याच कशाला असं विचारल्यागत.

हाच या स्टोरीचा हीरो. गाडी घरी आणून लावली तेव्हा त्याचं नाव समजलं. याच्याबद्दल ऐकून होते, पण इतके दिवस मी त्याला भेटले नव्हते कारण, आधी हा शिकायला -नोकरीला गावाबाहेर होता. रमझानच्या सुट्टीसाठी आला होता. मी त्याला क्वचित नावानं हाक मारली असेल. “मी राहुल द्रविडसारखं फार शांत, समजूतदार आणि डीपेण्डेबल माणूस आहे, म्हणून मला जॅमी म्हणतात” असं त्यानं त्याच्या बायकोला माझ्याचसमोर सांगितल्यावर मी पुन्हा एकदा कपालबडवती. बहुतेक बायकोला अजून पेरूचा जॅम करून दिला नसावा..

आमच्या कॉलनीमध्ये प्रत्येक बंगल्याच्या आजूबाजूला बरीच झाडं होती. आमच्या दारात माड आणि आंबे होतेच, शिवाय चिकू आणि पेरू होते. पेरू अगदी झाडभर लगडलेले असायचे. एकदा जॅमी पिशवीभर पेरू घेऊन गेला. कॉलनीमधलं कुणीही येऊन पेरू न्यायचं. एवढे खाणार कोण? त्या संध्याकाळी एक वाडगाभर पेरूचा जॅम आमच्या घरी पोचता झाला. उत्तम पेरवांचा वाईटातिवाईट जॅम कसा बनवावा याची एक प्रचंड गुप्त रेसिपी आहे. जॅम फ्रीझमध्ये ढकलला गेला. दुसर्‍या दिवशी परत पेरू घेऊन गेला, परत सेम चवीचा वाडगाभर जॅम परतवणी आला. आठवड्याभरात फ्रीजमध्ये असले चार-पाच वाडगे कॉलनीमध्ये बहुतेकांकडे जमा झाले. त्याच्या आयशीनं घरात पेरू आणलास तर तंगडं मोडून ठेवीन अशी प्रेमळ सूचना दिली आणि मी त्याचं बारसं जॅमी केलं. जॅमीची सुट्टी संपली आणि परत नोकरीसाठी गल्फमध्ये निघून गेला. सुदैवानं घरमालकानं आता पेरू काढून टाकलाय. पण जॅम बिघडला म्हणून याचे किचनमधले प्रयोग थांबलेले नाहीत. याचवर्षी अख्ख्या चार फणसांचं आईस्क्रीम करून अख्ख्या गल्लीला फेफरं आणलं होतं.

पण तेव्हा आमची अगदीच जुजबी ओळख होती. तोंडदेखलं हाय-हॅलो म्हणण्याइतकीच. नंतर दीड वर्षांनी तो परत सुट्टीवरून परत आला आणि मग ज्याला आपण मैत्री वगैरे म्हणू शकतो तशी ओळख झाली. फिल्मी गाणी हा समान दुवा सापडलाच, शिवाय एक सीक्रेट होतं. झालं असं होतं की, तिच्या घरी जॅमीबद्दल समजलं होतं आणि तिचं घराबाहेर पडणं वगैरे बंद. आमच्या कॉलनीच्या आसपासच कुठेतरी तिचं घर होतं. अशावेळेला मी या दोघांमधली पोस्टमन होते. मी तिची मैत्रीण बनून तिच्या घरी फोन लावायचे, ती फोनवर आली की, हे महाशय बोलणार. पण त्या मुलीचं लग्न नंतर लगेचच लावून दिलं आणि हे प्रकरण संपलं. व्यवस्थित प्रेमभंगाचं दु:ख साग्रसंगीत साजरं करून. दारू पिणं, रडणं वगैरे फार कॉमन गोष्टी. सलग तीन दिवस तिच्या बापाच्या घरापर्यंत आवाज जाईल एवढा दणदणीत स्पीकर लावून त्यावर एकसोएक रडकी गाणी लावली होती. अख्ख्या गल्लीला त्यावेळी “साथी ना कोइ मंझिल” आणि “है दुनिया उसीकी” ही गाणी तोंडपाठ झाली असावीत.

हे प्रकरण संपायच्यादरम्यान माझ्या बंडखोरीची नुकती सुरूवात होती. नुसती जनरेशन गॅप नव्हती, अख्खं भगदाड होतं. घरामध्ये रोजच आईसोबत वादावादी. तिचं अमुक करू नको, याच्याशी बोलू नको, तिच्यासोबत फिरू नको, आणि असलंच कायकाय. तिचं पूर्ण चुकीचं होतं अशातला भाग नाही, पण तेव्हा ते पटायचं नाही. अभ्यासात लक्ष नव्हतंच. उंडगेगिरी चालू होती. का कुणास ठाऊक, आईनं एके दिवशी जॅमीला घरी बोलावलं, आणि मला काहीतरी बुद्धी शिकवायला सांगितलं. आता हा सुपरउंडगा, मला काय शहाणपण शिकवणार.... “काय करायचं ते कर, कसं वागायचं तसं वाग, पण आईबापाशी वाद घालायचा नाही. ते जे काय म्हणतील त्याला होय बाबा म्हणायचं, गप्प रहायचं, आणि नंतर या कानानं ऐकून त्या कानानं सोडून द्यायचं, समजलं?” सल्ला पटण्यासारखा होताच पण अमलात आणायला फार कठीण. अरेला कारे विचारायची प्रचंड सवय. “आणि तरीही आईबाबा ओरडायला लागले तर जास्त माथा भडकवायचा नाही. आपल्याला जे करायचं आहे तेच्च करायचं” हा इतका सुंदर सल्ला जॅमीने मला माझ्याच आईसमोर बसून दिला. तो बोलत असताना आईच्या चेहर्‍यावरचे भाव अजूनही आठवलं की हसू येतं.

पण मला जसं हवं तसंच वाग, असा सल्ला देणार्‍या जॅमीने मात्र स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला. घरच्यांनी सांगितलं त्या मुलीशी लग्न केलं. मुलगी दिसायला अतिशय सुंदर पण प्रचंड गरीबी. जॅमीकडे पैशाला कमी नव्हती, घर फार मोठं. एकाच कॉलनीमध्ये सर्व भावाबहिणींची घरं, वेगवेगळे असले तरी एकत्र कुटुंब असल्यासारखंच रहायचे. शिवाय सतत येणारे-जाणारे भरपूर.
दानं उलटीच पडत गेली. हे लग्न झाल्यानंतर महिन्याभरातच त्याच्या लहान भावाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर त्यानं गावातच रहायचं ठरवलं. संसारामध्ये सुरूवातीपासूनच काहीनाकाही विसंवाद होतेच. दोन वेगवेगळ्या ग्रहावरच्या व्यक्ती असल्याइतकं टोकाची व्यक्तीमत्त्व. चोवीस तास एकत्र राहून ते सगळंच विकोपाला जायला लागलं. भांडणं इतकी वाढली की जॅमीनं घरात राहणंच सोडलं. दिवसभर कामासाठी बाहेर आणि रात्री असंच या मित्राच्या नाहीतर त्या नातेवाईकाच्या घरी. आयुष्यातला सगळ्यांत कठीण काळ.

.. आणि माझ्यादेखील. जॅमीच्या वर्तमानाचे प्रश्न होते, आणि माझ्या भवितव्याचे. याच काळात आमची मैत्री एकदम अंबुजा सीमेंटसारखी मजबूत वगैरे झाली. एकमेकांना मनातलं बोलायला आम्ही हक्काचं श्रोते झालो ते आजतागायत. तसं बघायला गेलं तर जॅमीच्या बाबतीत निर्णय सोपा होता, वेगळं होण्यासाठी त्याची पत्नीदेखील तयार होती, पण याचं भलतंच. “तिच्या घरात खाणारी चौदा तोंडं. परत पाठवली तर नोकराणीपेक्षा खालची अवस्था होइल. माझ्या घरांत दोन वेळच्या जेवणाची तरी चिंता नाही. बाकीचं काय सांभाळून घ्यायचं.” हे ऐकल्यावर त्याच्या पायावर माथा टेकवला. अक्षरश: जगणं मुश्किल केलं होतं तिच्याबद्दल असा विचार? सगळं व्यवस्थित चालावं म्हणून त्यानं मनापासून प्रयत्न केले. पण फक्त त्याचीच परवड होत राहिली. टाळी जशी एकाहातानं वाजत नाही, तसं नातंदेखेल एकाच बाजूनं निभावून चालत नाही.

एके दिवशी कायम बर्फाच्छादित असलेल्या जॅमीचादेखील संयम संपला, तिला रातोरात माहेरी पोचवून आला. एक नातं म्हणायला संपलं. नंतर कागदोपत्री घटस्फोटाचं लफडं चालू झालं. या चार वर्षामध्ये जॅमी अगदी भट्टीतून तावूनसुलाखून निघाला. “आपलंच आपल्याला समजतं, आपण किती पाण्यात आहोत. ज्यांना जीवाभावाचं मानतो, ते अशा वेळेला काय वागवतात त्यावरून आपलीच लायकी समजते. जगण्याची समीकरणं सोपी होतात” असल्या दु:खांमध्ये माणसं जेव्हा रडतात, हरतात तेव्हा फार वाईट वाटतं, पण त्याहून जास्त त्यातली दाहकता जाणवते जेव्हा स्वत:च्याच आयुष्यामधल्या अपयशांवर स्वत:च विनोद केले जातात. फार भयाण आणि भेसूर वाटतं. जॅमी प्रत्येक वेळी भेटल्यावर वरकरणी खूप खुश वाटायचा. नेहमीसारखे त्याचे जोक्स, पीजे आणि गाण्यांच्या गप्पा चालू असायच्या, पण सगळंच विस्कटलं होतं.

आम्ही ते घर बदललं, मी मुंबईला शिकायला आले, पण कधीही गावी गेले की कॉलनीमध्ये एक चक्कर व्हायचीच. अशीच एके संध्याकाळी मी त्याच्या बहिणीच्या घरी होते, तेव्हा जॅमी दुसरीकडे एकटाच राहत होता. तोही कामानिमित्त आलेला. प्रचंड उशीर झाला होता म्हणून मी घरी सोडतो म्हणाला.. तिथून बाहेर पडताना आमचे एक कॉमन मित्रमहाशय आले, आणि एक छोटासा नाट्यमय प्रसंग घडला- असे नाट्यमय प्रसंग तेव्हा रोजच घडत होते. त्यामुळे सगळा मूड खराब झाला होता. तिथून बाहेर पडलो तेव्हा दोघंही गप्पा मारायच्या मन:स्थितीमध्ये नव्हतो. दोघांच्याही आयुष्यामधला चक्रीवादळाचा काळ. शांत चालत निघालो ते पार भाट्यापर्यंत. त्याची गाडी असतानासुद्धा आम्ही चालतच का निघालो आणि भाट्याच्या रस्त्याकडे कशाला गेलो ते आता काही केल्या दोघांनाही आठवत नाही. म्हणायला सोबत चालत होतो, प्रत्यक्षात तो त्याच्या तंद्रीत मी माझ्या. भाट्याच्या खाडीजवळ आल्यावर अचानक मी विचारलं, “आता परत कसं जायचं?” रात्रीचे तीन वाजले होते. पैसे नव्हते. मोबाईल नव्हता. अजून काही साधन मिळायची शक्यता नव्हती. काय करणार? आलो परत चालत. यावेळी मात्र अंताक्षरी खेळत. आम्ही अंताक्षरी खेळताना अटी लावून खेळतो, म्हणजे तू फक्त आरडीचीच गाणी गायची, मी फक्त रहमानची गाणी म्हणणार. किंवा कधीकधी अख्खं गाणं म्हणायचं, गाण्याची सुरूवात अंतर्‍यापासूनच करायची. त्यादिवशी आम्ही त्याच्या घरी पोचलो तेव्हा पहाटेचे सहा वाजले होते. भाट्याच्या पुलावर गाणी म्हणणारी भुतं फिरत असतात असं ऐकीवात आलंय. तरी रात्री सांभाळून जावे ही कळकळीची सूचना!!!

याच सुट्टीमध्ये कधीतरी आम्ही करार केला. दोघांपैकी कुणीही आयुष्यामध्ये परत नात्याच्या गुंतागुंतीमध्ये अडकायचं ठरलं, तर सर्वात आधी एकमेकांना सांगायचं. मी जेव्हा लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा जॅमीला कळवायचं विसरले. एके रात्री दोन वाजता फोन वाजला आणि पलिकडून, “ओ नंदू, तेरा हुआ अब मेरा क्या होगा?” हे तालासुरात ऐकायला मिळालं आणि मला एकदम रडूच आलं.

गेल्या पंधरा वर्षामध्ये मी आणि जॅमी क्वचित भेटलो असू, तरीही आम्ही असले सच्चे दोस्त कधी बनलो ते कळलंच नव्हतं. अजूनही कळलं नाही. जॅमी परत नोकरीसाठी परदेशी गेला, मीपण मुंबई सोडून गोवा-मंगळूर-मद्रास अशा दक्षिण भारतभ्रमणावर निघाले. अधूनमधून येणारे फोन फार कमी झाले. मी संसारात अडकून गृहकृत्यदक्ष गृहिणी झाल्याने मला अजिबात वेळ नव्हता. आमच्या ग्रूपमधले तीन एक्के सोडले तर उरलेले सगळेच दुर्री-तिर्री बनले. जॅमीशी फारसं बोलणं राहिलं नव्हतं.

एके दिवशी पहाटे साडेचारला फोन वाजला. पलीकडे कोण असणार? “अरे यार, मी कन्फ़्युज झालोय. काय करू ते सुचत नाही” अशी सुरूवात केल्यावर मी एकदम ऍलर्ट मोडमध्येच. अर्थात उगाच मला चिडवण्यासाठी. प्रत्यक्षात जॅमीचा निर्णय घेऊन झाला होता. डॉक्टरकी शिकलेल्या मुलीने याला पसंत केलं होतं. घरचे सर्वजण तयार होते. जॅमीच्या आजोबांनी लग्नाची तारीख ठरवली होती. १४ फेब्रुवारी. “अरे, आमच्या घरांतले म्हातारे असले चावट झालेत. ही अशी लग्नाची, ती पण दुसर्‍या लग्नाची तारीख कोण ठरवतं का?” असं त्यानं म्हणून पाहिलं, पण छे! आम्ही कशाला ऐकणार. जॅमीच्या लग्नाचा एक बायप्रॉडक्ट असा झाला की, आमचा शाळाकॉलेजकॉलनी असा जो सामायिक ग्रूप होता, तो वेगवेगळ्या शहरदेशखंडामध्ये (नशीब अजूनतरी ग्रहांवर नाही) गेल्यामुळे पूर्णपणे विखुरलेला होता, तो या निमित्ताने ऑनलाईन का होइना, एकत्र आला. जॅमीचं लग्न झालं साधेपणानेच. पण अख्खा ग्रूप त्यावेळेला तिथं हजर होता. जे प्रत्यक्ष गेले नाहीत ते ऑनलाईन हजर होते. मेहंदीच्या कार्यक्रमात त्याला गाणं म्हणायचा आग्रह केल्यावर त्याने सवयीनं डायरेक्ट “मेरा यार बना है दूल्हा” म्हणायला सुरूवात केली. अख्ख्या खानदानानं कपालबडवती केलं आणि मित्रांनी त्याचं विमान खाली उतरवलं.

“काळ्या पाण्याची शिक्षा” असा जोक केलास तर याद राख अशी धमकी मला आधीच देऊन ठेवली होती. लग्नानंतर तीन दिवसांनी जॅमी बायकोला घेऊन चेन्नईला आला. पुढे अंदमानला जाणार होता. दोन दिवस आमच्या घरामध्ये हे नवपरिणीत जोडपं अगदी घरच्यासारखं होऊन राहिलं. दुनिया गोल है या उक्तीनुसार मिसेस जॅमी ही चिपळूणला माझ्या नवर्‍याच्या वर्गामध्येच होती असा शोधदेखील लागला.

एकंदरीत जॅमीचं आता निवांत चाललंय. गावामध्येच दुकानबिकान टाकलंय. लोकं शेठ म्हणून हाक मारतात. ग्रामपंचायतीमध्ये निवडूनपण आलाय. शिवाय हौस म्हणून शास्त्रीय संगीत शिकायला सुरूवात केलीये. गल्लीमधले लोक प्रचंड वैतागले असणार पण त्याला इलाज नाही. स्पीकरवर लावलेल्या रडक्या गाण्यांपेक्षा परवडलं.

एखादी व्यक्ती आपल्याजवळ आहे याहीपेक्षा मनाच्या किती जवळ आहे हे फार महत्त्वाचं असतं. काही व्यक्तींचा संबंध थोडा येतो, पण तरीही ती व्यक्ती अख्ख्या आयुष्याचा पट बदलते.. जोपर्यंत आयुष्य सुखाचं आहे, कसलाही त्रास नाही तोपर्यंत जॅमीची आठवणसुद्धा येत नाही, पण कधीही सगळे दरवाजे बंद झाल्यासारखं वाटतं, तेव्हा तो हमखास आठवतो. आजवर त्यानं माझं एकही प्रॉब्लेम सोडवून दिलेला नाही, पण रडण्यासाठी, मनमोकळं करण्यासाठी हक्काचा खांदा मात्र कायम दिलाय.

... आणि कित्येकदा तेच फार गरजेचं असतं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहील आहे.. कस काय ते माहित नाही पण तुझ्या लेखनातले जॅमी चे संदर्भ नकळत शोधायला लागले मी..:)

पण याचं भलतंच. “तिच्या घरात खाणारी चौदा तोंडं. परत पाठवली तर नोकराणीपेक्षा खालची अवस्था होइल. माझ्या घरांत दोन वेळच्या जेवणाची तरी चिंता नाही. बाकीचं काय सांभाळून घ्यायचं.” >>> खूप सुंदर विचार होता हा. पण जपता आला नाही हे दुर्दैव.

“आपलंच आपल्याला समजतं, आपण किती पाण्यात आहोत. ज्यांना जीवाभावाचं मानतो, ते अशा वेळेला काय वागवतात त्यावरून आपलीच लायकी समजते. जगण्याची समीकरणं सोपी होतात” असल्या दु:खांमध्ये माणसं जेव्हा रडतात, हरतात तेव्हा फार वाईट वाटतं, पण त्याहून जास्त त्यातली दाहकता जाणवते जेव्हा स्वत:च्याच आयुष्यामधल्या अपयशांवर स्वत:च विनोद केले जातात. फार भयाण आणि भेसूर वाटतं. >>> खूप छान लिहीलत.

आज काहितरी चांगले वाचल्याची भावना आपल्या कथेने मनात आली.

अप्रतिम!!! केवळ अप्रतिम लेखन!!!

So sweet. Very well written. A writer of your capability should now move out of personal experiences and spread your creative wings.

ओघवतं, चित्रदर्शी लिखाण!
आवडलं. Happy

(मला ही मैत्रीची गोष्ट अधिक वाटली. व्यक्तिचित्रणात अभिप्रेत असणारी एक गोष्ट - जॅमी डोळ्यांसमोर उभा राहणे - तर तो फारसा झाला नाही. मे बी, शब्दमर्यादेमुळे??)

ललितादेवी,

>> व्यक्तिचित्रणात अभिप्रेत असणारी एक गोष्ट - जॅमी डोळ्यांसमोर उभा राहणे - तर तो फारसा झाला नाही.
>> मे बी, शब्दमर्यादेमुळे??

मला वाटतं की जॅमीची आणि लेखिकेच्या फारशा भेटी झाल्या नसाव्यात. कमीतकमी वेळात घट्ट मैत्री असं काहीसं.घडलं असावं. त्यामुळे व्यक्तिचित्रण कमी आणि मैत्रीचित्रण जास्त आहे. पण जे काही आहे ते प्रत्ययी आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

Pages