त्यांनी जरी कितीदा मज मोजले तरी,

Submitted by profspd on 24 June, 2014 - 12:43

त्यांनी जरी कितीदा मज मोजले तरी,
काढायला न जमली माझी सरासरी!

मी जन्मजात वारा, पायात भिंगरी....
असतोच मी कुठे रे, माझ्या तरी घरी?

गेले रित्याच पोटी तारुण्य बापुडे.....
तोंडात दात नाही, हातात भाकरी!

हे पोट आड आले, अभिमान लोपला....
घालून मान खाली केलीच नोकरी!

धस लागला कितीदा, आयुष्य फाटले....
ना झाकली गरीबी, केले रफू जरी!

अंत:पुरात जागा मी मागतो कुठे?
चालेल काळजाची पडण्यास ओसरी!

चिरकूट एक होतो मी, मान्य हे मला....
चुंबळ म्हणून आलो कामी तुझ्या तरी!

आली वयाप्रमाणे मज पोच शेवटी....
मी शांतचित्त झालो जपताच श्रीहरी!

प्याले विटंबनांचे इतके पिले अरे......
श्रीकंठ जाहलो मी विष प्यायल्यापरी!

झोपेमधेच येते भेटायला गझल.....
स्वप्नात रोज माझ्या येतेच ती परी!

ओठांवरीच अलगद येते गझल नवी.....
मग लेखणीस माझ्या येतेच तरतरी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे पोट आड आले, अभिमान लोपला....
घालून मान खाली केलीच नोकरी!

अभिमान ऐवजी स्वाभिमानाच्या समानार्थी शब्द वापरला तर हा चांगला शेर होऊ शकेल.

छान

जरी तरी परी असे काफिये निव्वळ काफिये म्हणून पाहता फारशी मजा देत नाहीयेत
कवाफी तशी नाविन्यपूर्ण काफिये सहज हाताला लागतील अशी होती