विषय क्रमांक २ - लेखाचे नांव 'तांबोळी'!

Submitted by बेफ़िकीर on 22 June, 2014 - 10:31

"ह्याला काम सांगत जाऊ नका कटककर, हा चोरटा आहे"

सोसायटीतील एका उत्साही काकांनी मला ही माहिती पुरवली आणि मी वरवर होकार दर्शवून मनात म्हणालो की आपल्याला तरी हा काही असा असेल असे वाटत नाही. मग नेहमीचाच विचार मनात आला की हल्ली माणसे तरी दिसतात तशी कुठे असतात. मी त्याला गाडी धुण्याचे काम सांगितले पण मनात अढी तशीच राहिली. हा खरंच चोरटा असला तर गाडीत आपण ठेवत असलेल्या वस्तूंचे काय करेल असे वाटू लागले. सोसायटीतील गाड्या रोज धुणारे एक काका वेगळे होते, जे माझी गाडीही धुवायचे. पण ते गाडी बाहेरून धुवायचे. हा मनुष्य गाडी आतून धुवून पुसून लखलखीत करत असे. आता कोणाच्याही गाडीप्रमाणे माझ्याही गाडीत सीडीज, काही इतर वस्तू, टोलसाठी सुट्टे पैसे वेगळे ठेवलेले वगैरे काय काय प्रकार होते. चिंता दूर सारून मी कामाला लागलो आणि तब्बल दिड तासाने तो गाडीची किल्ली वर घेऊन आला. माझ्या हातात किल्ली देत चेहर्‍यावर एक दमलेले, किंचित बेरकीपणा पेरलेले पण आशाळभूतपणाने ओथंबलेले हसू आणून म्हणाला......

"लय धूळ होती साहेब, आता बघा खाली येऊन गाडी"

"झाली का?"

"हा! बघा ना खाली येऊन"

"नाही असूदेत, नीट बंद केली ना?"

"हा"

शंभर रुपये घेऊन तो निघून गेला.

'हा' म्हणताना किंवा काहीही बोलताना त्याच्या चेहर्‍यावर एकदम निष्ठावंत कार्यकर्त्याचे भाव येत असत. मान जोरजोरात हालवून तो बोलत असे. 'तुम्ही फक्त काम सांगा, मी लग्गेच तयार आहे' असे काहीसे भाव त्याच्या चेहर्‍यावर असत. मला त्या चेहर्‍यावर चोरटेपणा काही जाम आढळत नव्हता. पण आता ह्या माणसापासून जपून राहायचे इतके मात्र मी मनात ठरवले.

संध्याकाळी गाडी सुरू केली आणि वायपर्स तुफान वेगात हालू लागले. एअरकंडिशनरमधून गरम वारे येऊ लागले आणि तेही पावलांच्या दिशेने! आरसा भलतीकडेच वळलेला होता. पाण्याच्या बाटल्या, सिगारेटचे पाकीट, काडेपेट्या असे सर्व काही सीटवरच विखरून ठेवलेले होते. सर्व काही जागच्याजागी आणताना मी मनातच त्याच्या नावाने वैतागवाडी व्यक्त केली. मात्र गाडीत नजर फिरवली तेव्हा जाणवले की गाडी खरोखरच उत्तम स्वच्छ झालेली होती.

आपली गाडी आता एकदम स्वच्छ आहे ह्या आनंदात मी फिरायला निघालो. मनात अगदी खोलवर कुठेतरी एक विचार काही ठोस स्वरूप घेत होता. तो विचार असा होता, की बहुधा चोरटा असे नांव पडल्यामुळे आपण चोरटे नाही आहोत हे सिद्ध करण्यासाठी हा माणूस अगदी मन लावून काम करत असेल आणि नेहमीच करत राहील.

इनोस गुलाब तांबोळी ह्या मुस्लिम इसमाने माझ्या मनात स्वतःसाठी एक मिलिमीटर स्क्वेअर जागा त्यादिवशी निर्माण केली. ते साल होते इसवीसन २००१!

आज वय ५८! मुसलमान! जन्म कुर्डुवाडी येथील! बायकोचे नांव अबिदा! तीन मुली, शमिना, आस्मा आणि नग्मा! दोन मुले, सिकंदर आणि आमीर! आज सिकंदरचे आणि तीन मुलींचे निकाह झालेले असून सर्वजण आपापल्या संसारात गढलेले आहेत. धाकटा आमीर पंजाबच्या एका कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहे. तांबोळी आपल्या पत्नीसह कोथरुडमध्ये एका झोपडपट्टीत राहात आहे. कोथरुड हे उपनगर खर्‍या अर्थाने निर्माण होण्याआधीपासून तो इथेच असल्याच्या खुणा त्याच्या चेहर्‍यावरील सुरकुत्यांमध्ये दिसून येतात. कृश शरीर बघावे तेव्हा काही ना काही साफसफाई करत असते. अल्लाहने तांबोळीची नियुक्तीच जणू मध्यमवर्गीयांच्या सोसायटीतील आणि मनांमधील कचरा नष्ट करण्यासाठी केली असावी. सोसायटीने त्याला गृहीत धरणे ह्यातच तो त्याच्या आयुष्याचे सार्थक समजत असावा. कोणताही अर्ज न करता, कोणतेही शिफारसपत्र न वापरता, कोणतीही मुलाखत न देता आणि कोणतेही अपाँईटमेंट लेटर न मिळवता इयत्ता सहावी शिकलेला तांबोळी आज सहा सोसायट्यांमधील जिने, पार्किंग लॉट्स आणि गाड्या साफ करत असतो. त्याचा काळा रंग, हिरवा धर्म आणि पांढरट डोळे हे त्याला कामे मिळण्यातील सर्वात मोठे दुर्दैवी अडथळे ठरतात. पण चिवटपणा, कष्टांतील सातत्य, प्रामाणिकपणा आणि अबोलपणे केव्हाही कोणतेही काम करण्यास तयार असण्याची वृत्ती ह्या अडथळ्यांना पार करते.

घरी आलेल्या गरिबाच्या हातावर काही ना काही ठेवण्याच्या आईने केलेल्या संस्कारांना स्मरून एक दिवस मी किल्ली द्यायला दारात आलेल्या तांबोळीच्या हातावर घरात सकाळीच आणून ठेवलेल्या फळांपैकी एक सफरचंद आणि दोन केळी ठेवली. शंभर रुपये आणि वर फळे मिळाल्यामुळे तांबोळीच्या चेहर्‍यावर एक विचित्र समाधानी हसू आलेले दिसले. नंतर घरातील कोणीतरी मला 'एक सफरचंद तू खाल्लेस का' असे सहज विचारले आणि मीही सहजपणे 'नाही, तांबोळीला दिले' म्हंटल्यावर मला बोलणी ऐकावी लागली. 'केळी दिलीस ते ठीक आहे, सफरचंद केवढ्याला आहे माहीत आहे का' वगैरे!

इ.स. २००४ मध्ये एक दिवस मला तांबोळी आमच्या पार्किंगमध्ये उदासवाणा बसलेला दिसला. मला पाहून सटपटत उठला आणि चेहर्‍यावर अत्यंत लाचार हसू आणत म्हणाला की मोठ्या मुलीचे लग्न आहे, अडीच हजार रुपये हवे आहेत. मी नैसर्गीकपणे ही मागणी टाळण्याच्या प्रवृत्तीने 'उद्या बघू' म्हणालो आणि जोरजोरात मान डोलावून तो सायकलवर टांग टाकून निघून गेला. त्या काळी तो महिन्यातून एकदा माझी गाडी आतून साफ करत असे. परिचय बर्‍यापैकी होता. पैसे द्यायला हरकत नव्हती, पण ते तो परत देऊ शकणार नाही असे मनात वाटत होते. दुसर्‍या दिवशी तांबोळी थेट घरीच आला आणि दारात आशाळभूतासारखा उभा राहिला. मी त्याला खाली थांबायला सांगितले आणि पाच मिनिटांनी दोन हजार रुपये खाली नेऊन दिले. 'दोन हजार आहेत' असे म्हंटल्यावर त्याने नेहमीसारखी जोरजोरात मान हालवली आणि सायकलवरून निघून गेला. आपले पैसे गेले आणि ते वसूल करायचे असल्यास ह्या माणसाने वीस वेळा गाडी धुवायला हवी असा हिशोब करत मी घरी आलो. संध्याकाळी ही बाब मी घरच्यांना सांगितल्यावर बायको व वडील माझ्यावर टीका करू लागले. 'कोण कुठला तांबोळी, आता गेले पैसे' वगैरे! मी काही बोललो नाही. त्यानंतर तांबोळी पैसे न घेता गाडी साफ करू लागला. असे त्याने कितीवेळा केले असावे हा हिशोब ठेवता आला नाही कारण......

पुढच्या वर्षी माझा अपघात झाला. ह्या अपघातानंतर मी घरी आलो आणि घरात सतत माणसांचा वावर होऊ लागला. माझी प्रकृती बघायला येणारे अनेकजण एकमेकांशीच गप्पा मारत तासतास घालवू लागले. ह्या गर्दीत केव्हातरी दुपारी तांबोळी येऊन गेला. माझ्या खोलीत जमीनीवर उकिडवा बसून नुसता माझ्याकडे पाहात राहिला. इतर लोक असल्याने आणि ते त्याच्यामतानुसार त्याच्यापेक्षा खूपच वरच्या वर्गातील असल्यामुळे त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. अगदी कोपर्‍याला चिकटून त्याला बसलेला पाहून मीच जरा त्याची चौकशी वगैरे केली. तीन चार मिनिटांतच तो उठला आणि हात जोडून म्हणाला की 'मी जातो, बरे व्हा साहेब'. मी होकारार्थी मान हालवून त्याला विसरून गेलो. तो जाताच आई आत येऊन तीन सफरचंद माझ्याइथे ठेवत म्हणाली, 'आत्ता देऊ का रे कापून एक?' मी नको म्हणालो आणि विचारले सफरचंद कोणी आणली? आईने पाहुण्यांच्या सरबराईत व्यस्त असताना घाईघाईने उत्तर दिले......

"तांबोळीने"

आमच्या घरातील मोलकरीण गावाला जाणार असे कळले तेव्हा बायकोने तांबोळीला त्याची मुलगी काम करेल का असे विचारले. तांबोळीची अतिशय सुस्वरूप आणि तांबोळीला न शोभणारी अशी दुसरी मुलगी आस्मा आमच्याकडे केर, फरशी करू लागली. दोन महिन्यांनंतर आम्हाला अधिक योग्य बाई कामाला मिळाली आणि आस्माचेही लग्न ठरले. पण ह्यामुळे एक झाले, तांबोळीचे आमच्या घरातील बस्तान तेवढे जरा अधिक बरे बसले. आता दिवाळीच्या आधी जी घरसफाई केली जाते त्यासाठी तांबोळी घरात येऊ लागला. माळे, भिंती, फरश्या, पंखे असे सर्व काही साफ करू लागला. मग नंतर हे दिवाळीऐवजी तीन एक महिन्यांमधून घडू लागले. जाताना तो कामाचा मोबदला आणि थोडे खायचे पदार्थ घेऊन जायचा. काम करत असताना त्याला चहा बिस्कीटे दिली की कप विसळायची घाई करायचा पण स्वयंपाकघरात पाय ठेवायचा नाही. तांबोळीने नेहमीच अस्पृश्यता पाळली, पण स्वतःची! आम्हाला त्याचा स्पर्श होऊन आम्ही विटाळू नयेत ह्याची प्रचंड काळजी घ्यायचा तो! मळकट कपड्यांच्या आतील त्याच्या पिचलेल्या शरीरात एक न्यूनगंड त्याचा आत्मा बनून वावरत असे. बहुधा हा न्यूनगंडच त्याला चोर ठरवत असावा.

इ.स. २०१० मध्ये माझ्या आईचे निधन झाले आणि तांबोळी तसाच नुसता येऊन पाच मिनिटे बसून गेला. अबोलपणे बसणे हे त्याचे भावना व्यक्त करण्याचे एकमेव व प्रभावी माध्यम होते. शब्दांच्या अतीवापरामुळे बरबटलेल्या आपल्यासारख्यांच्या दिनचर्येवर तांबोळीच्या कमनशिबाने मारलेला झाडू होता तो! पण तोवर तांबोळी मनाला भिडावा असे फार काही विशेष झाले नव्हते.

ते झाले इ.स. २०१३ साली! तांबोळी दुपारी घरी आला. घरी मी एकटाच होतो. तसाच जमीनीवर बसला. तो पैसे मागणार हे मला त्वरीत समजलेले होते. फक्त कारण समजून घ्यायचे होते. म्हणाला पाच हजार रुपये हवे आहेत. धाकट्या मुलाला खूप चांगले मार्क्स मिळाले आहेत, पण पंजाबला जावे लागेल. त्याला पैसे कमी पडत आहेत. हे पैसे मिळाले तर पाचपैकी निदान एक तरी मुलगा पुरेसा शिकेल आणि माझं आयुष्य धन्य होईल म्हणाला! त्या बदल्यात पैसे फिटेपर्यंत घरातील आणि गाडीची साफसफाई करेन म्हणाला.

बोलता बोलता तांबोळीचा आवाज खोल खोल चालला होता. त्याच्या एरवी निस्तेज असणार्‍या डोळ्यांमधून चक्क आसवे गळू लागली होती. जगाने निदान त्याच्या प्रामाणिक आणि चांगल्या हेतूच्या कार्यात तरी त्याची साथ द्यावी अशी एक आर्त मागणी तो करत होता. कोणत्या प्रकारच्या भावनिकतेचे तो प्रतिनिधित्व करत होता हे समजत नव्हते, पण त्याक्षणी मला तांबोळी सोडून सगळे जग चोरटे वाटले होते. त्याच्यापासून संधी चोरणारे, नशीब चोरणारे, श्रेय चोरणारे जग! मी रडणार्‍या तांबोळीला स्कूटरवरून एटीमपाशी घेऊन गेलो आणि पाच हजार रुपये दिले. एकरकमी पाच हजार रुपये हातात आलेल्या तांबोळीच्या चेहर्‍यावर जादू झाली. आत्तापर्यंतचा लाचार चेहरा जाऊन त्याजागी लहान मुलाला अपेक्षा नसताना फुगा, किंडरजॉय आणि आईसक्रीम एकाचवेळी मिळावे तसे हसू आले. त्या हासण्यात 'मशीनमधून असे क्षणभरात पैसे मिळतात' ह्याचे वाटलेले नवल, एक माणूस आपल्याला इतक्या लगेच पैसे देऊ शकतो ह्याचे नवल आणि सगळे प्रश्नच एकदम निकालात निघाल्याचा आनंद व्हावा तसा लबाड आनंद असे सगळे काही मिसळलेले होते. मला तांबोळीचा राग आला. तो आत्तापर्यंत अभिनय करत होता असे मनात आले. पण आता नोटा त्याच्या हातात होत्या. मग मी मिळालेल्या पोझिशनला स्मरून पाटीलकीची भूमिका घेत त्याला म्हणालो, 'मुलाला भेटायला आणा एकदा, बघूदेत तो शिकण्याबाबत गंभीर आहे का नाही ते'! जोरजोरात मान हालवत तांबोळी सायकलवर बसला. पण मला फसवून घ्यायचे नव्हते. म्हणून मग मी त्याच्याकडून वदवून घेतले की तो आता दर आठवड्याला घरातील साफसफाई करायला येईल.

त्यानंतर महिना दोन महिने तांबोळी आमच्याकडची कामे फुकट करू लागला. मग त्याला बोलावणेच कमी होऊ लागले कारण ते काम करणार्‍या आधीच एक बाई घरात होत्या. गेल्या आठवड्यात मीही त्याला दिलेल्या पैशांचा हिशोब न ठेवता गाडी पुसण्याचे शंभर रुपये त्याला देऊन टाकले. तरीही ते त्याने स्वीकारायला नको होते ही अपेक्षा माझ्या मनात आलीच. ज्याने इतरांकडून अपेक्षा ठेवण्याला लबाडी म्हंटले जाते आणि ज्याच्याकडून इतरांनी अपेक्षा ठेवण्याला हक्क म्हंटले जाते तो इनोस गुलाब तांबोळी!

पहाटे पाच वाजल्यापासून सोसायट्या झाडतो. सकाळी सात वाजल्यापासून गाड्या धुतो. बाकीचे गाड्या धुणारे ज्या टाकीचे पाणी वापरतात ते पाणी तांबोळीला घ्यायला त्याच गाड्या धुणार्‍यांनी मज्जाव केलेला आहे. ह्याचे कारण तो मुसलमान आहे असे नव्हे तर तांबोळी हा त्यांच्यासाठी नंतर निर्माण झालेला स्पर्धक आहे. त्यामुळे तांबोळी घराघरात जाऊन दोन दोन बादल्या पाणी खाली नेतो आणि त्या त्या घरच्यांची गाडी धुवून देतो.

तो कोणत्याही सोसायटीचा अधिकृत वॉचमन नाही. खरे तर तो ह्या जगाचाच अधिकृत घटक समजला गेलेला नाही आहे. त्याची कोणालाही उगाच आठवण येत नाही. मात्र जेव्हा कोणालातरी त्याची आठवण येते, तेव्हा ती फार तीव्रतेने येते हे तांबोळीच यश आहे. किंबहुना हे त्याचे ह्या जगात टिच्चून राहण्यासाठीचे भांडवल आहे. त्याला व्यसन नाही. सूर्य मावळतो तेव्हा थकलेला तांबोळी एका बाकावर बसलेला असतो, एकटाच! तेव्हा त्याच्या डोळ्यात ना उद्याची प्रतीक्षा दिसते ना आजच्या आठवणी! त्याच्या डोळ्यात दिसतो एक प्रश्न! जो दोन हात वर करून आकाशाकडे पाहून अल्लाहला विचारण्याच्या पात्रतेचा असतो. 'मी इथे का आहे आणि मी असा का आहे' हा तो प्रश्न! आजूबाजूचे जग चिवचिवत, किलबिलत असते, वेगात धावत असते. मोबाईलवर बोलत आणि सुगंधांची उधळण करत झगमगत्या रात्रीची प्रतीक्षा करत असते, तेव्हा बाकावर बसलेला तांबोळी प्रचंड मिसमॅच वाटत राहतो. लोक त्याच्याकडे सहजही पाहात नाहीत अश्यावेळी! हाच माणूस सकाळी दहा मिनिटे विलंबाने आल्यामुळे आपण किती भडकलो होतो हेसुद्धा लोकांना आठवू नये इतका तांबोळी बिनमहत्वाचा ठरतो.

तांबोळी दुनियेत आला, प्रजा वाढवली आणि एक दिवस निघून जाईल! गाड्या कोणीतरी पुसेल, जिने कोणीतरी झाडेल! सफरचंद हे फळ गरीबाला देण्यायोग्य नाही पण गरीबाकडून स्वीकारण्यायोग्य असू शकते हा विचार तेव्हाही टिकलेलाच असेल! पण आधुनिक, वेगवान, श्रीमंत, सुखासीन आणि इग्नोरंट जगाच्या भ्रामक भपक्यावर अल्लाहने मारलेला तांबोळी नावाचा साधेपणाचा झाडू तेवढा नसेल!

हा तो तांबोळी!

IMG_1425.JPG

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सफरचंद- कशा कशात जीव अडकतो नाही..? माणसाचा?
गेल्या गणेशोत्स्वात केलेल्या सत्यनारायण पुजेची फळे, नारळ वगैरे, आम्ही आमच्या वॉचमन भैया ला दिले होते तेव्हा ही इतरांनी असाच गहजब केला होता, ते आठवले.

छान लिहीले आहे. आवडले.
+७८६

पहिलीच एंट्री बेफींची म्हणजे स्पर्धेचा जोरदार शुभारंभ ..
शेवटचे दोन प्यारा खास बेफी स्टाईल !

अतिशय अप्रतिम व्यक्तिवर्णन. लिखाण भिडलं. आणि अशा लोकांना मिळणार्‍या वागणुकिला कुठेतरी आपणही जबाबदार आहोत, अपराधी वाटलं.

आवडलं. Happy

फोटोसुद्धा आवडला. त्या सामानात सामानाचाच भाग होऊन बसलेला दिसतो आहे तांबोळी.

तांबोळी दुनियेत आला, प्रजा वाढवली आणि एक दिवस निघून जाईल! गाड्या कोणीतरी पुसेल, जिने कोणीतरी झाडेल! सफरचंद हे फळ गरीबाला देण्यायोग्य नाही पण गरीबाकडून स्वीकारण्यायोग्य असू शकते हा विचार तेव्हाही टिकलेलाच असेल! पण आधुनिक, वेगवान, श्रीमंत, सुखासीन आणि इग्नोरंट जगाच्या भ्रामक भपक्यावर अल्लाहने मारलेला तांबोळी नावाचा साधेपणाचा झाडू तेवढा नसेल!
... मनाला स्पर्शुन गेल, मनाला हुरहुर लावणारा लेख आवडला.

स्पर्धेसाठी असो वा नसो, पण वाचन झाल्या क्षणीच मनी भावना आली....अप्रतिम चित्रण. तांबोळीने लेखकाचे भावविश्व व्यापून टाकले आहे आणि मला वाटते कमीजास्त प्रमाणात अशा सेवाभावी व्यक्ती प्रत्येक सोसायटीच्या मस्टरवर असतात. लेखकांनी तांबोळींच्या गरजेला वेळोवेळी केलेली आर्थिक मदत ही त्या व्यक्तीने योग्य कारणासाठी उपयोगात आणली असेल का नाही हा भाग अलाहिदा....पण त्याला तशी मदत करण्यामागे दाखविलेली तत्परता लक्षणीय वाटली.

"...थकलेला तांबोळी एका बाकावर बसलेला असतो, एकटाच! तेव्हा त्याच्या डोळ्यात ना उद्याची प्रतीक्षा दिसते ना आजच्या आठवणी!...."

~ हे वाक्य अगदी प्रतिकात्मक वाटले समाजातील एका घटकाचे....तांबोळी अक्षरशः नजरेसमोर आला.

बेफि, नेहमीप्रमाणे सुरेख! तुमचा कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा नजरिया एकदम हटके असतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं! एखाद्याच्या दिसण्या-बोलण्या-वर आणि समाजातील स्थानावर विसंबून आपण आपल्याही नकळत किती पूर्वग्रह बाळगून असतो हे जाणवले!

फार फार सुंदर लेखन. भारतात असताना असे काही तांबोळी आसपास पाहिले आहेत. प्रभावी व्यक्तिचित्रण. अभिनंदन!!

बेफी.....
नेहमीप्रमाने अप्रतिम...

>>तांबोळी दुनियेत आला, प्रजा वाढवली आणि एक दिवस निघून जाईल! गाड्या कोणीतरी पुसेल, जिने कोणीतरी झाडेल! सफरचंद हे फळ गरीबाला देण्यायोग्य नाही पण गरीबाकडून स्वीकारण्यायोग्य असू शकते हा विचार तेव्हाही टिकलेलाच असेल! पण आधुनिक, वेगवान, श्रीमंत, सुखासीन आणि इग्नोरंट जगाच्या भ्रामक भपक्यावर अल्लाहने मारलेला तांबोळी नावाचा साधेपणाचा झाडू तेवढा नसेल!<<+++१

अतिशय प्रभावी व्यक्तिचित्र. खुप खुप आवडलं.
अशी अनेक माणसे आपल्या आजुबाजूला वावरत असतात पण आपापल्या चष्म्यातून लोकेट होतातच असं नाही, झाली तरी झपाटतात असंही नाही. तुम्ही मात्र भारीच पकडलंयत तांबोळींना.

Pages