फुलासारखे अंतरंगी फुलावे!
ऋतू कोणताही असो दरवळावे!!
पहा सूर देतेच ही जिंदगानी...
नसू दे गळा, मात्र गाणे म्हणावे!
भलेही रुतू देत पायात काटे....
उरातून ओठांवरी गीत यावे!
गझल खुद्द चालत उतरतेच हृदयी....
जिण्याच्याच मस्तीमधे गुणगुणावे!
असू देत घरघर कितीही जिवाला....
सतत चालता बोलता गीत गावे!
बरे वेंधळेपण असे आज वाटे....
जगाचे पहाया नको बारकावे!
दगाबाज कोणीच ना वाटते मज....
कितीही जरी लोक करतात कावे!
अरे, सूर्यकूळामधे जन्मलो मी....
मला माहिती की, कधी मी ढळावे!
असे योग्य, प्रत्येक वस्तूस, जागा....
तिथे ती असावी, असे आवरावे!
झुळकतेस जेव्हा झुळुक होउनी तू....
डहाळीप्रमाणेच मीही डुलावे!
गगन मोकळे कैकदा साद देते....
मला वाटते पंख मी फडफडावे!
कुठेही कधी चांगले पाहिले की,
मला वाटते अंतरी गोंदवावे!
नसे अन्नदानापरी पुण्य दुसरे....
अरे, तोंडचे घास काढून द्यावे!
कुठे पाहिजे ते हरेकास मिळते?
कशाला उगा सारखे रे, झुरावे?
हृदय आपले आरसा एक असते...
स्वत:लाच त्याच्यात निरखीत जावे!
मनासारखा ना कुणी अन्य वैरी....
सदा सर्वदा चांगले ते करावे!
मनावर नियंत्रण मिळवणे न सोपे...
जपाच्याच वाटेवरी त्यास न्यावे!
कशाला हवा द्वेष, मत्सर नि हेवा?
हरेकातले चांगले तेच घ्यावे!
पहा या तरू, वल्लरींचे बहरणे.....
कळीसारखे आत तूही खुलावे!
असा जोम पायात कोठून येतो?
नभातील मज एक तारा खुणावे!
कुठे जायचो लावण्या मी न वर्णी...
सतत पाहिली तीच ती फक्त नावे!
असे देव चोहीकडे, ठाम श्रद्धा....
मला सांगते मन कुठेही रुळावे!
मला सांगतो हेच कानात वारा.....
परागांप्रमाणे कुठेही रुजावे!
कधी भूतकाळी, भविष्यात केव्हा.....
मनाच्या झुल्यावर मजेने झुलावे!
जगाने मला नेहमी आठवावे.....
असे काम हातून माझ्या घडावे!
असे वाटते संपले कार्य माझे.....
अरे, वेळ झाली, अता मी निघावे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१
छान आहे. ते एक नारायणराव ठोसर
छान आहे.
ते एक नारायणराव ठोसर होते त्यांनी याच जमिनीत बरेच शेर लिहिलेत.
धन्यवाद
धन्यवाद