मोजून मित्र अगदी मज दोन-चार होते!

Submitted by profspd on 18 June, 2014 - 09:30

मोजून मित्र अगदी मज दोन-चार होते!
पण तेच मित्र माझे दिलदार यार होते!!

अपयश मला मिळाले, त्यानेच हे शिकवले....
हरतो मनात जेव्हा, तेव्हाच हार होते!

धेंडांत त्या विसंगत मी एकटाच होतो....
माझ्याकडे पुरेसे लौकिक न फार होते!

वा-याशिवाय दुसरे कोणीच ना फिरकले....
चोवीस तास माझे उघडेच दार होते!

का वाटणार नाही मी प्रेत? बंद डोळे....
गझलेत दंग होतो, तन थंडगार होते!

अधरांवरी जशी तू येतेस गझल बनुनी....
झंकारते हृदयही, तेही सतार होते!

कामात व्यस्त इतका, लक्षातही न आले.....
कॅलेंडरात कोठे रविवार वार होते?

घायाळ होउनीही, झालो न मी शहाणा....
निधडा फिरायचो मी पण, भ्याड वार होते!

नव्हतो पचायला मी इतका कधीच सोपा....
गझलेत जीवनाचे संपूर्ण सार होते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मजा आली (आज माझाच मूडच चांगला असावा अशीही शक्यता आहे Wink )

अपयश मला मिळाले, त्यानेच हे शिकवले....
हरतो मनात जेव्हा, तेव्हाच हार होते!<<< वाचताच भिडला हा शेर !!!

कॅलेंडरात यंदा रविवार फार होते?<< असे केल्यास?? एकदा रविवार म्हटल्यावर पुन्हा वार हा शब्द मला अनावश्यक वाटला . कृ.गै.न Happy