काजव्यांना कळत नाही....

Submitted by profspd on 18 June, 2014 - 04:00

काजव्यांना कळत नाही....
सूर्य का हा ढळत नाही?

तू कुठे आलीस अजुनी?
प्रहरही हा टळत नाही!

सूर्य मी आहे असा की,
जो कधी काजळत नाही!

डास, चिलटांस्तव अता मी....
आयुधे पाजळत नाही!

रोज खंगाळीत आहे....
मन अताशा मळत नाही!

थांबणे पिंडात नाही....
पाय का हा वळत नाही?

लिंबुटिंबू शर्यती या....
मी अताशा पळत नाही!

मानसिक व्यायाम करतो....
त्यामुळे मी चळत नाही!

स्वप्न माझे हेच आहे....
की, कुणी जळफळत नाही!

टाचली इतक्या खुबीने....
की, जखम भळभळत नाही!

केवढी मुर्दाड वस्ती.....
रक्त का सळसळत नाही?

हा फरक सूर्यात आहे....
तो स्वत:स्तव जळत नाही!

पोचल्या गव-या स्मशानी....
का तुला हे कळत नाही?

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही शेर नक्कीच छान आहेत

पोचल्या गव-या स्मशानी....<<<< हे वक्य वाचून अवाक झालो
आईशप्पथ हाच खयाल / हाच मिसरा मला आज सुचलेला अगदी डिक्टो