चला थोडे जाणून घेऊया होमिओपॅथीच्या शोधाबद्दल !!

Submitted by poojas on 18 June, 2014 - 03:31

गेली दोनशे वर्षाहून अधिक वर्ष रुग्णांच्या मनावर राज्य करणारी ही उपचार पद्धती तशी अपघातानाचे जन्माला आली. "डॉ. सॅम्युअल हॅनीमन" नामक एका जर्मन डॉक्टरांनी या पॅथीचा शोध लावला. घडलं असं की स्वतः पेशाने एम.डी.अ‍ॅलोपॅथीक प्रॅक्टीशनर असणार्‍या डॉ. हॅनीमन यांना एक गोष्ट मनोमन छळत होती ती म्हणजे आपण आपल्या रुग्णाला कायमस्वरूपी का बरं करू शकत नाही.१७८१ सालापासून ते तत्कालीन उपचार पध्ह्ती वापरत होते पण ती उपचार पद्धती त्यांना सदोष वाटत होती ती तिच्या सोबत होणार्‍या साईड इफेक्ट्स मुळे. शिवाय तात्पुरतं बरं करण्याकडे तिचा कल होता. म्हणूनच संशोधक, लेखक आणि आनुवादक होण्याचा मार्ग त्यांनी स्विकारला.

याच प्रवासात १७८९ साली “A Treatise of Materia Medica” by Dr. William Cullen, या पुस्तकाचा अनुवाद करताना एक ओळ त्यांच्या निदर्शनास आली.त्यांनी स्वतः त्या ओळीच्या मुळापर्यंत जायचं ठरवलं ती ओळ अशी होती की... " सिंकोना (Peruvian bark) नावाची वनस्पती, ज्या पासून क्विनाइन (quinine) उत्पन्न होतं, याचं जर का निरोगी व्यक्तीने सेवन केलं तर त्याच्यात मलेरिया सदृश लक्षणंं निर्माण होतात, आणि तेच मलेरिया झालेल्या रोग्यास दिल्यास मलेरियाचं समूळ उच्चाटन ही होतं, आणि हे सारं शक्यं होतं ते तिच्यातील कडवटपणामुळे."

मुळात कडवट पणाचा आणि रोगनिवारणाचा काय संबंध ? कडू तर किरायतं ही असतं, कारलं सुद्धा आणि मेथी सुद्धा !!! मग या सार्‍यांच्या सेवनाने का बरं मलेरिया बरा होत नाही???

म्हणूनच स्वत:वर प्रयोग करायचा त्यांनी ठरवलं. आणि अहो आश्चर्यम !! त्यांच्या धडधाकट शरीरावर सिंकोनाचं सेवन करताच मलेरियाची लक्षणं आली. आपल्या शिष्यांवर ही हा प्रयोग केला तरी ही तेच घडलं. आणि तेव्हा 'similea similibus curentur'. म्हणजेच 'Like cures like',हे तत्वं , जे होमिओपॅथीचं आदीतत्वं आहे ते जन्माला आलं. ज्याला आपण बोली भाषेत "काट्याने काटा काढला" असं म्हणतो.

ज्याचा अर्थ असा की.. निसर्गातील ज्या गोष्टी निरोगी माणसामध्ये जी लक्षणं निर्माण करतात, त्या स्वरूपाची लक्षणे रोग्यामध्ये आढळल्यास, त्याचं निराकारण करण्यासाठी त्या नैसर्गिक गोष्टी उपकारक ठरू शकतात.

उदाहरणार्थ- कांदा सर्वांना रडवतो.. सर्दी सदृश लक्षणं निरोगी माणसात उत्पन्न करतो. हाच कांदा होमिओपॅथीमध्ये सर्दी बरी करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. पण तसं पाहता सर्दीचेही प्रकार आहेत. नाक गळणारी सर्दी, नाक चोंदणारी सर्दी, सायनस इन्फेक्शनमुळे वारंवार होणारी सर्दी, अ‍ॅलर्जीक सर्दी इत्यादी..... म्हणून
व्यक्ती तितक्या प्रकृतीप्रमाणे माणूस बदलला की होमिओपॅथीमध्ये औषध बदलतं!

तर मित्रहो... अशी उदयास आली होमिओपॅथी !!

ग्रीक भाषेत ज्याचा अर्थ होतो, होमिओ म्हणजे समान/ सारखी, ('homoios' means 'like' आणि पॅथोज म्हणजे पीडा अथवा त्रासदायक लक्षणं (patheia' means 'suffering').

त्यानंतर ही बरंच संशोधन झालं आणि आज तीन हजाराहून अधिक औषधं रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. १७९० सालापासून ते आत्तापर्यंत रुग्णांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही उपचार पद्धती आज जगातील दुसर्‍या क्रमांकाची आणि सर्वाधिक लोकप्रिय पॅथी म्हणून प्रसिद्ध आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरेच होमिओपॅथी प्रभावी आहे का ?
मला एक फारच बाळबोध शंका आहे, होमिओपॅथी आणि आयुर्वेदात शस्त्रक्रिया करता येऊ शकते का ? म्हणजे असा काही विचार या शाखांमधे आहे का ?

पूजा, छान लेख. अजूनही लिहीत रहा.

महेश, होमिओपॅथी आणि आयुर्वेदात शस्त्रक्रिया करता येऊ शकत नसाव्यात. ( असं मला वाटतं.) पण अ‍ॅव्हरेज माणसाच्या आयुष्यात शस्त्रक्रिया करण्याची वेळ अशी कितीदा येते? ती सोडून उरलेल्या वेळी, वरील उपाययोजना करता येणं सहज शक्य आहे. अर्थातच हा ज्याच्या त्याच्या चॉईसचा प्रश्न आहे. पण म्हणून सगळी पॅथीच मोडीत काढणं बरोबर नाही.

महेश,
आयुर्वेदात शस्त्रक्रिया आहेत. शस्त्रक्रिया करणे यात तीन बेसिक प्रकार येतात. जे तुटले ते जोडणे, जे नको ते खुडणे. अन जे निसर्गाचे चुकले ते दुरुस्त करणे.
पैकी तुटलेले जोडणे : म्हणजे जखमेला टाके. नको ते खुडणे म्हणजे समोर दिसणारे अर्बुद, किंवा सहावे बोट कापणे. (To excise a tumour)

चुकले त्याची दुरुस्ती हा कठीण प्रकार आहे. सुश्रुताने वर्णन केलेल्या ऑपरेशनमधे खूप प्रसिद्ध ऑपरेशन्स २ आहेत. पहिले मोतिबिंदूसाठीचे अन दुसरे त्याकाळी नाक-कान कापण्याची शिक्षा दिली जाई. (शूर्पणखा आठवतेय?) तर या कापलेल्या नाकाऐवजी कपाळावरील चामडीचा रोटेशन फ्लॅप घेऊन केलेली प्लॅस्टिक सर्जरी.

या सुश्रुत नामक वैद्याने अनेक सर्जिकल इन्स्ट्रूमेंट्सही निर्माण केली आहेत, अन शल्यक्रीया देखिल 'निर्माण' केल्या आहेत. अमुक आजार का होतो, याच्या आकलनापासून, तो कसा रिपेअर करता येईल इथपर्यंत तेदेखिल त्या काळी करणे हे खरेच प्र च ण्ड बुद्धिमत्तेचे काम आहे.

हे मी पूर्वीही लिहिले आहे, अन याबद्दल अधिक डीटेल पुन: कधीतरी. मी वैद्यकाच्या इतिहासावर थोडं लिहिणार आहे इथे. सध्या अभ्यास अन टाचणं काढणे सुरू आहे.

होमिओपथी, ऑन द अदर हँड..... लेट्स टेक द पिल मेड फ्रॉम ह्यूमन फीटस दॅट अगाऊ हॅज पोस्टेड.

लाईक क्युअर्स लाईक.

व्हिव्हा होमिओपथिया.

अनेक देशांनी भंगारात काढली आहे >> हे कोणते देश तेही लिहा.
भारत, जर्मनी, अमेरिका येथे चालू आहे. अमेरिकेतल्या माझ्या गावात होमिओपॅथी कॉलेज व फार्मसीसुद्धा आहेत. ठराविक पोटेन्सीची औषधं ओव्हर द काऊंटर देखील मिळतात.

माझ्या तोकड्या ज्ञानाच्या आधारे मी माझ्या अमेरिकन डॉ. ला एक औषध सांगितलं होतं.(कारण मला जो त्रास वारंवार होतो तो तिला पण होतो) तिनी एकंदर होमिओपॅथीवर, नेटसर्फ करत काही वाचन केलं आणि चक्कं ते औषध आणून घेतलं. तिला त्याचा उपयोग झाला व आता त्या कारणाकरता ती तेच औषध घेते.

प्रत्येक गोष्टीचा आपला आपला फायदा तोटा असतो. प्रश्न फक्त मनाची कवाडं उघडी ठेवण्याचा असतो. असो.

like cure like . मधुमेही व्यक्तीला उपचार मह्णून साखर खायला द्यावी काय?
मुतखडा झालेल्या व्यक्तीला क्षारयुक्त पाणी औषध म्हणून द्यावे काय?

One should study and experience well before you give opinion about anything .Each pathy has advantages and limitations.There are few allopaths who are practicing homeopathy successfully.In stead of wasting time in arguments Dr. should try to find out how he can help his patients.

धन्यवाद मंडळी.. Happy

माफ करा महेश.. थोडा विलंब झाला प्रतिक्रिया देण्यास..
पण बघते तर पुन्हा एकदा रान पेटलेलं दिसलं. होमिओपॅथीचा "ह" ही माहीत नसलेले लोक का बरं इतके पेटून उठतात देव जाणे. असो !!

आम्हासि ज्ञान आहे.. म्हटले थोडे वाटावे.. आता कोणास काय भावे अन काय ठावे .. देव जाणे !! असो..

महेश तुमचा प्रश्न... खरेच होमिओपॅथी प्रभावी आहे का ?

मला वाटतं ज्यांनी होमिओपॅथी अनुभवली आहे त्यांच्याशी एकदा बोलून घ्या, म्हणजे तुमचं शंका निरसन होइल.
कारण मी एक डॉक्टर या नात्याने जर या वर काही वक्तव्य केलं तर लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल किंवा मी होमिओपॅथीची जाहीरात करतेय असा गैरसमज होईल.

गेली पाच वर्षे मी स्वतः क्लासिकल होमिओपॅथीची प्रॅक्टीस करत आहे, आणि क्लिनिक निव्वळ होमिओपॅथीच्या जोरावर व्यवस्थित सुरु आहे. सर्दी, ताप, खोकल्या पासून डायबिटिस, हायपरटेन्शन अथवा ओवेरिअन सिस्ट, किडनी स्टोन सारखे सर्जिकल विकार सुद्धा बरे झालेत आणि शस्त्रक्रिया टाळता आली असल्याने पेशंट्स समाधानी आहेत.
बहुतांशी पेशंट्स सगळं काही ट्राय करुन मग होमिओपॅथी अनुभवायला येतात. त्यात जेव्हा यश येतं तेव्हा ते कायम्स्वरूपी होमिओपॅथीचा आधार घेतात. हा माझा वैयक्तिक अनुभव झाला.

तुमचा दुसरा प्रश्नः

मला एक फारच बाळबोध शंका आहे, होमिओपॅथी आणि आयुर्वेदात शस्त्रक्रिया करता येऊ शकते का ? म्हणजे असा काही विचार या शाखांमधे आहे का ?

मी होमिओपॅथीसंबंधीत मार्गदर्शन करु शकेन.

मुळात डॉ. हॅनीमन यांनी होमिओपॅथीचा शोध लावला तेव्हा काही मार्गदर्शक तत्वं जगासमोर मांडली.
त्यातलं एक तत्वं असं म्हणतं की रुग्णाला शक्यतो जमेल तितके वेदनारहीत उपचार द्यावे. आजारी व्यक्ती मुळातच वेदनेत असते तेव्हा अधिक सुया टोचून त्यांना जर्जर करु नये.
आणि म्हणूनच निव्वळ पिल्स किंवा टिंक्चर वापरून होमिओपॅथिक औषधी वापरून आजार बरा करता येणं शक्य आहे. जर तोंडावाटे गोळ्या घेता येत नसतील, खास करुन लहान बाळांमध्ये, तर डायलूट करुन पाण्यातून औषध देता येऊ शकतं. किंवा बेशुद्धावस्थेतील पेशंट मध्ये ऑल्फॅक्टरी म्हणजे नाकावाटे औषधाचा वास हुंगुन ही उपचार करता येतात.

फाय्ब्रॉईड, सिस्ट, पित्ताचे खडे किवा किडनी स्टोन, पोटाचा अल्सर, टॉन्सिलायटीस, अॅडीनॉईड अशा आजारावर शस्त्रक्रिया न करता ही फक्त होमिओपॅथी औषधाने बरं होता येतं.

पण फ्रॅक्चर झाल्यास निव्वळ औषधाने हाड जागेवर बसत नाही, ते तुम्हाला प्लास्टर करुन बसवावेच लागते. हाड लवकर जुळावे यासाठी होमिओपॅथीक औषध उपलब्ध आहे. किंवा इमर्गन्सी केसेस मध्ये रक्त वाहतेय तेव्हा टाके घालावेच लागतात. अर्थात त्या त्या केस वर आणि involved complications वर होमिओपॅथी किती गुणकारी आहे हे आम्ही ठरवतो.
शुगोल यांनी म्हटल्याप्रमाणे..
प्रत्येक गोष्टीचा आपला आपला फायदा तोटा असतो. प्रश्न फक्त मनाची कवाडं उघडी ठेवण्याचा असतो. असो.

बाकी होमिओपॅथीचा द्वेष करणार्या मित्रांचे देव भले करो... आणि आयुष्यात त्यांच्यावर होमिओपॅथी घ्यायची वेळ न येवो ही सदिच्छा !!!. न जाणो विश्वास बसायचा होमिओपॅथीवर आणि मग स्वतःवरचा विश्वास उडायचा !!!

होमियोपॅथीबद्दल एकंदर फारसं पटत नाही.पन तो वेगळा भाग्.
एक सांगा,होमियोपॅथीची औषधं देताना त्यावर लेबलं लावलेली नसतात.ना कंटेंट ची ना किंमतीची.त्यातून वाट्टेल तशी किंमत मारतात अंगावर.त्याचं काय?

अमितव्,इन जनरल विधान केलंय.
दारु कशी वाईट असते हे सांगायला दारु पिऊन बघायची गरज असते का राव.काहीही आपलं.. Happy

poojas
जर होमिमोपथी आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांवर तपासली (क्लिनिकल टेस्ट, प्रयोगांची वारंवारीता इत्यादी) तर काय निश्कर्ष निघतात हे वाचायला अधिक आवडेल.

फाय्ब्रॉईड, सिस्ट, पित्ताचे खडे किवा किडनी स्टोन, पोटाचा अल्सर, टॉन्सिलायटीस, अॅडीनॉईड अशा आजारावर शस्त्रक्रिया न करता ही फक्त होमिओपॅथी औषधाने बरं होता येतं.>>>>>

सीरीयसली??? "फक्त" अ‍ॅलोपथीच्या औषधांनीदेखील हे रोग बरे होत नाहीत असं ऐकलं होतं. तिथं सर्जरी आवश्यक आहे तिथे करावीच लागते. तिथे होमिओपथी नक्की काय काम करतं?? युटेरसमधील फायब्रॉइडने हेव्ही ब्लीडींग होत असेल तर होमीओपथी कसा उपचार करू शकतं?? ब्लीडींग ताबडतोब थांबवता येतं का?

अॅडीनॉईड >> गुगल न करता, माझ्यामते नाक आणि तोंड ह्यांच्या मधला कुठला तरी भाग. चू.भू.दे.घे. पण हा रोग आहे जे नव्यानेच कळले

पुजा चांगला लेख लिहला आपण..मी स्वतः अनुभव घेतला आहे जे अ‍ॅलोपॅथीने नाही जमत ते होमियोपैथि ने साध्य होत