माझ्यातला चांगुलपणा वर आण तू

Submitted by बेफ़िकीर on 17 June, 2014 - 12:40

माझ्यातला चांगुलपणा वर आण तू
हो चांगला......मी चांगला हे जाण तू

सारे जुने होते तुझ्यासाठी नवे
केलेस काहीही कुठे निर्माण तू

तीही पुढे भासेल चंद्रासारखी
केलीस ह्या विश्वामधे जी घाण तू

नाही तिथे पडतो असा पाऊस मी
ज्यातून येते रोप तो पाषाण तू

सांगायचे होते......मला समजून घे
पण ठेवले नाहीस तितके त्राण तू

निश्चिंत कोणीही कसे नाही इथे
हैराण मी हैराण जग हैराण तू

घेशील जितका तेवढा वाढेल तो
सैलावलेल्या चिरगुटांचा ताण तू

शरणागती घेण्यास ते होते उभे
उडवायची होतीस दाणादाण तू

मनचे लपवण्याची चलाखीही तुझी
मन मोकळे करण्यातही वरताण तू

जर व्हायचे नव्हते तुला माझे कधी
तर घ्यायचे होतेस माझे प्राण तू

माझ्यामुळे तू गाजली होतीस पण
लावण्य होतो मी नि माझी खाण तू

इतकेच सांगायास मी आलो इथे
थोडेतरी वात्सल्य अंगी बाण तू

समजायची ज्यांना गझल ती समजली
कर 'बेफिकिर' आता महानिर्वाण तू

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यातला चांगुलपणा वर आण तू
हो चांगला......मी चांगला हे जाण तू

सारे जुने होते तुझ्यासाठी नवे
केलेस काहीही कुठे निर्माण तू

- जास्त आवडलं

सांगायचे होते......मला समजून घे
पण ठेवले नाहीस तितके त्राण तू

निश्चिंत कोणीही कसे नाही इथे
हैराण मी हैराण जग हैराण तू

व्वा !

(माझ्यातल्या चांगुलपणाने तुमच्यातल्या चांगुलपणाची ही गझल वर आणली असावी Wink )

सेम रदिफाची माझी गझल आठवली :

या जगाशी साधले नसल्यामुळे संधान तू
भरजरी आहेस इतका पण तरीही म्लान तू

धन्यवाद .