प्रिय बाबांस,

Submitted by poojas on 16 June, 2014 - 01:50

पुन्हा एकदा चालू म्हणते
मुठीत तुमच्या देऊन बोट
गाई ss गाई ss .. म्हणता व्हावी
छाती उशी अन गादी पोट..

झू ss झू ss म्हणूनी विमानातूनी
रोज यायचा घास मुखी
काऊचिऊची अंगतपंगत
जगणे कैसे सदासुखी..

चौपाटीवर सुट्टी व्हावी
रोज साजरी रविवारी
त्या सार्‍याहून तुमचा घोडा
मज वाटे कित्ती भारी..

काटे चमचे घेऊन हाती
संस्कारांचे दिले धडे
नसता आई नुसती घाई
स्वैपाकाची त्रेधा उडे..

चुकायचे अन शिकायचे
हा मंत्र दिला घडण्यासाठी
बघता बघता झालो मोठे
आठवणी उरल्या पाठी..

हक्काने जे मागत गेलो
अजून मागतो पुन्हा पुन्हा
कधी कधी तर रागे भरूनी
सुधारला हर एक गुन्हा..

प्रगती पुस्तक आता वाटते बरे
तरीपण कमी कही..
सुधारण्या मज उधार एकच
बाबा तुमची हवी सही..!!

poojaS..

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

lovely poem