एलहगो : नव्या मालिकेची ओळख - पायलट एपिसोड

Submitted by ब्रह्मांड आठवले on 14 June, 2014 - 06:40

नमस्कार

या घरात या. हे जे घर आपण बघत आहात ना, त्याच्या भिंतींना भडक रंग लावले आहेत. समोरासमोरच्या भिंतींना लाल आणि पिवळ्या अशा रंगसंगतीत घर रंगवले आहे. खिडक्यांना जे पडदे आहेत ते अ‍ॅक्रीलिकच्या बटबटीत डिझाइनचे, घराचा हॉल भला मोठा ........ आणि हॉलच्या मधोमध फिकट निळा आणि सोनेरी रंगसंगतीचा थ्री प्लस थ्री सीटर सोफासेट आहे. सोफ्याखाली दो-यादो-याच्या किंवा मुघल डिझाईनच्या कार्पेट ऐवजी सोलापुरी चादर अंथरलेली आहे यावरून हे घर मराठी सीरीयल मधलं आहे असा अंदाज केला असेल तर तुमचा अंदाज चुकलाय असं अजिबात नाही. तुम्ही अत्यंत चाणाक्ष आणि सराइत प्रेक्षक आहात. घराच्या बाहेर कॅमेरे नाहीत, कारण हे मुंबई पुण्यापासून अतिशय दूर जिथे लाखभर रुपये एकर भावाने जमीन मिळते अशा रत्नागिरीतल्या समुद्रापासून दूर असणा-या अडचणीच्या डोंगरावर आहे. त्यामुळे घरातले शॉट्स वेगळे आणि मुंबई पुण्यातले वेगळे. ते तुम्हाला जोडून दाखवले जातील. जास्तीचा भोचकपणा नको.

या घरात आता जे दृश्य दिसतेय त्यात महिलांचा भरणा (आणि वरचष्मा ) दिसून येत आहे. खिडक्यांचे पडदे जरी बटबटीत असले तरी महिलांच्या अंगावर भरजरी कपडे आहेत. पायापासून ते केसापर्यंत या महिला दागदागिन्यांनी लगडलेल्या आहेत. पुरूषांना महिलांचे आउटडेटेड झालेले सलवार सूट्स विथ ओढणी नवीन फॅशन म्हणून नेसवण्यात आलेले आहेत. त्याला हल्ली राजेशाही पोशाख म्हटले जाते. लग्नात त्यावर डिझाइनर फेटा देखील असतो. तर असा एक बांड आणि तरणा पुरूष सलवार सूटमधे शुंभासारखा उभा आहे ( आणखी काय करणार मालिकेत ?). तर महिला एकमेकींकडे पाहून नेत्रकटाक्ष टाकत आहेत. आपल्याला आता वाटेल की हे सर्व जण बाहेर चाललेले असावेत. कारण स्त्रियांच्या पायात डिझाइनर पादत्राणे आहेत तर पुरुषांच्या पायात मोझडी आहे. पण छे ! हा तर यांचा घरगुती गप्पांचा पोशाख आहे. ( बाहेर पिकनिकला वगैरे जाताना पुरूष मंडळी बिनबाह्याचे बनियन आणि बर्म्युडा आणि महिलावर्ग टू पीस बिकिनी पेक्षा एक दोन इंचांनी भव्य काहीतरी अशा पूर्णपोषाखात असतो).

चला तर आता आपण ओळख करून घेउयात.
जो पुरूष आता धरून आणल्यासारखा उभा आहे त्याला खरंच धरून आणलेले आहे. म्हणजे घरातल्या एका स्त्रीने त्याला फोनवरून सज्जड दम भरलेला आहे की आता जर तू येऊन मी सांगेन तसंच बोलला नाहीस तर परिणाम काय होतील हे तुला ठाऊक आहे. ती स्त्री कोण हे आपल्याला कळणारच आहे. सोफ्यावर आकाशी रंगाच्या तलम साडीवर धोत-याच्या फुलांचं डिझाइन असलेली आणि अंबाडा घालूनही केसांची एक बट उजव्या खाड्यावरून पुढे सोडलेली जी ललना आहे ना घा-या डोळ्यांची ती या तरुणाची पूर्वीची प्रेयसी. ललना तरुणाकडे तिरक्या नजरेने पाहतानाच एक नजर इतर महिलांकडे ठेवून आहे. तिचे लग्न आता या तरुणाच्या एक्स वाईफच्या एक्स हजबंडशी झालेले आहे. हा एक्सच्या एक्सचा म्हणजे ललनेचा करंट हजबंड कोणत्याही क्षणी इथे येणार आहे. त्याचीही दोन बायकांच्यामागील एक्स वाईफ समोरच्या सोफ्यावर बसलेली आहे. तिचं लग्न तरूणाच्या मोठ्या भावाशी झालेलं असून या तरुणाबरोबर तिचं अफेअर सुरू झालेलं आहे असं मोठ्या भावाच्या आणि पर्यायाने तरुणाच्या धाकट्या बहिणीला वाटतंय. तिचा प्रियकर पोलीस अधिकारी असून मागच्याच भागात तो खरा पोलीस अधिकारी नसून एक बदमाष असल्याचे उघडकीला आलेले आहे. अर्थात आपल्या स्क्रीनवरच्या मानवांपर्यंत ही बातमी पोहोचलेली नाही. धाकटी बहीण सर्व कार्यात उत्साहाने सहभाग घेणारी, उत्साही असून गरोदर आहे. ही बातमी सोफ्यावरच्या एका महिलेला लागलेली असून ती खोट्या पोलीस अधिका-याने सोडून दिलेली आणि या घराच्या मालकाबरोबर लिव्ह इन रिलेशनमधे राहत असलेली एक सात्विक स्त्री आहे. नुकत्याच या महिला वटपौर्णिमेच्या मेरी गो राउंडला जाउन आलेल्या आहेत.

बदमाषाने सोडलेल्या आणि लिव्ह इन रिलेशनमधे असणा-या सात्विक स्त्रीचे अद्याप बदमाषाबरोबरही प्रेमपूर्वक संबंध आहेत. भिन्न लिंगी व्यक्तीबाबतीत कुणाबद्दलही मनात कटुता न ठेवता सर्वांशी प्रेमाने रहा हा संदेश प्रत्यक्षात आणणारी ही देवमाणसे अशा रीतीने या दिवाणखान्यात एकत्र जमलेली आहेत. त्याचं कारणही आपल्याला थोडंफार कळालंच आहे. या स्त्रियांचं आपसातलं नातं हे देखील असंच रंजक असून त्यासाठी सव्वाशे रुपये मनीऑर्डरने पाठवल्यास नातेसंबंधाची सूची आणि ट्रीव्ह्यू पाठवण्यात येतो. सूचीची सदस्यता घेतयानंतरही अधूनमधून लक्षात ठेवण्यास अवघड केल्यास केवळ तीस रुपये रिन्युएल फीज पाठवल्यास बदललेल्या नात्यांची केवळ सूची पाठवण्यात येते.

आपण सहज समजण्यासारख्या गोष्टी आता समजून घेतलेल्या आहेतच. गुंतागुंतीच्या गोष्टी आपल्याला आता माहीतच होणार आहेत. हे घर आबा कारखानीस यांचे आहे. आबा म्हणजे दणकट प्रकृती असलेले आणि केसांना मधून झिरोची मशीन आणि साईडने टाल्कम पावडर लावलेले आजोबा. यांना छोट्या छोट्या गोष्टीत लेक्चर देण्याची आणि आलोकनाथ सारखं हसण्याची भारी खोड आहे. ते नेहमी बेडवर तरी पडून असतात किंवा झुलत्याखुर्चीत डोळे मिटून कुणाशी तरॊ बोलत असतात. पाठीला रग लागल्यावर खिडकीत जाऊन पाठमोरे उभे राहतात. पाठमोरे बोलण्याची सवय त्यांनी प्रदीपकुमार, रेहमान, भारतभूषण यांच्याकडून उचलली आहे. बंगला निर्मनुष्य ठिकाणी असल्याने शेजा-यांनी भांडायला येण्याचे प्रसंग घडत नाहीत.

आबांची फार मोठी इस्टेट आहे. त्यांचे पूर्वीचे नाव आठवले असून अनेक कारखाने काढल्याने ते विस्मरणात जाऊन लोक त्यांना कारखानीस याच नावाने ओळखतात. सुरुवात त्यांनी बिडीच्या कारखान्यापासून केली. पुढे द्राक्षापासून वाईन हा सेमिनार बारामतीत ऐकल्यानंतर द्राक्षाचे मळे विकत घेउन त्यापासून मोठा कारखाना काढला. काही मंत्र्यांना चव आवडल्याने त्यांना धंद्यात भागीदार करून घेतले. तेव्हापासून राजकारणात दबदबा. एक मोठं नाव. सरकारच्या वतीने मोठमोठ्या उद्योगांना जमिनी संपादन करून देणे हा त्यांचा मुख्य धंदा झालेला आहे. त्यात अनेक मित्रही झाले आणि शत्रूही निर्माण झालेले आहेत.

त्यांची तीन मुलं आहेत. ती सकाळी जातात आणि संध्याकाळी येतात. ज्या वेळी घरात असतात तेव्हां घरातल्या बायकांचं ऐकतात. त्यांचे जे काही उद्योगधंदे असतील त्यातल्या घटना घरातल्या बायकांमुळेच घडतात हे आपल्याला कळून येईलच. घरात कुठली वस्तू कुठे ठेवायची यावरूनही शह आणि मातचा खेळ रंगतो. जिच्या मनासारखे होते ती सर्वांकडे पाठ करून आणि कॆमे-याकडे तोंड करून गरागरा डोळे फिरवत स्लो मोशनमधे हसते. त्या वेळी टुरडुंग टुरडुंग टुरडुंग असं पार्श्वसंगीत ऐकवले जाते. पाठमोरी आणि या संगीताचा आपसात कसलाही संबंध नाही हा खुलासा करणे इथे आवश्यक आहे.

(क्रमश:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मालिकेचं कथानक हे प्रेक्षकांच्या आवडीनुसार पुढे जाणार आहे. तरी प्रेक्षकांना पुढे काय घडणे अपेक्षित आहे हे सुचवावे ही नम्र विनंती.

डेलीसोप बघायचाच एवढा कंटाळा आहे की लिहायचं म्हणजे लईच होतं की हो... एलहगो म्हणजे एकाच लग्नाच्या हजार गोष्टी का?

डेलीसोप बघायचाच एवढा कंटाळा आहे की लिहायचं म्हणजे लईच होतं की हो >>> हाताला ब्लीच करा...ई-ब्लीच अन लिहा. हे म्हणजे ते आपल्या ह्यांच्यासारखं झालं हो, कंटाळेश्वर हो

मी खोचक बोललो नाहीये वर,प्लीज.
कंटाळेश्वर.. नाव भारीए..पुण्यातला पत्ता वाटतोय..
ई-ब्लीच हे काय? उगाच कै च्य कै..
मला वाटलं की कथानक पुढे सरकलं बघतोय तर हे साहेब वरती चार येळा... घ्या..

ब्रआ...

^^^
खोचक ? तशी शंका पण नाही आली. कंटाळा आला म्हणून हात धुवा म्हणणार होतो ते ब्लीच करा म्हटलं, ई मेल तसं ई ब्लीच !!!

अतिअवांतर झालं.. Happy