आजीची गोष्ट

Submitted by लाल्या on 12 June, 2014 - 21:50

Tiger.jpgखूप खूप वर्षांपूर्वी, एक होतं गाव,
आजी माझी सांगायची, आटपाट त्याचं नाव.
या आटपाट नावाच्या गावात, रहायचा एक वाघ,
त्याने लावला होता सपाटा - ह्याला त्याला खाऊन टाक.

सगळा गाव हादरला,
वाघोबाला घाबरला,
सगळे गेले कोतवालाकडे,
तो त्यांच्यावरच डाफरला.

"तुमचे प्रॉब्लेम तुम्ही बघा, आपल्याला नको टेन्शन,
नोकरी करतो झोपायची, नंतर मिळतं पेन्शन."

सगळे गेले कोतवालाच्या मोठ्या साहेबाकडे,
"वाघापासून वाचवा' असं घालायला साकडे.
साहेब सुद्धा इमाने-इतबारे झोपला होता छान,
टेबलावरती हात आणि हातामध्ये मान.
सगळ्यांच्या ओ(रडण्याने) त्याला क्षणभर आली जाग,
झोपेतनं उठवलं - त्याचाच आला राग.

रागाने तो झाला लाल,
बोलला- "याद राखा जर परत याल,
दिसतोय ना हा दांडा माझा?
त्याने सपाटून मार खाल!"

गावाला आता कळेना कि कुणाचे पाय धरावे,
घर-जमीन सोडावे, कि वाघाच्या तोंडी मरावे.

तरी गावाने ठरवलं कि अशी हार नाही खायची.
राजाच्या दरबारी जाऊन तिथे लेखी कम्प्लेंट द्यायची.
राजा नक्की काढेल मार्ग आपल्या प्रजेसाठी.
त्याला कशी घाबरवणार कोतवालीची काठी?

गावाची काही ज्येष्ठ मंडळी राजाकडे गेली,
तिथलं दृष्य पाहून त्यांची वेडी आशाही मेली.
ज्याने झाला होता त्रस्त आटपाटचा भाग,
राजाबरोबर बसला होता तोच दुष्ट वाघ.
या दोघांची जोडी काही एकटीच नव्हती,
कोतवाल आणि साहेब सुद्धा होते अवती भवती.
राजाच्या गळ्यात होतं वाघाचं लॉकेट,
साहेबाचं दिसत होतं फुगलेलं पॉकेट.
पार्टी होती मस्त,
डिशेस जबरदस्त.
राजा आणि कोतवाल सोडून
काहीच नव्हतं स्वस्त.

बुफे मधल्या डिशेस समोर बोर्ड होते खूप,
"प्रजेचा खीमा", "लोकशाहीचं सूप".
"टेररिस्ट स्पेशल" आणि "स्कॅम कोफ्ता",
"जमीर माखनवाला" आणि "करप्शन हफ्ता".

सगळा प्रकार पाहून, मंडळी तळमळली,
हातात काहीच नव्हतं, तशीच मागे वळली.
पुन्हा येऊन वस्तीत, घेतली एक सभा,
सगळ्यांना समजावला वाघाचा दबदबा.
जे आहे नशीबात ते गप्प भोगू,
वाघाच्या भितीमध्येच सार्‍यांनी जगू,
जेव्हा खूप अनावर होईल आपला राग,
तेव्हा जाऊन फेसबूक वर ओकू थोडी आग.

आज बघून देशाची सगळी मशीनरी,
वाटतं - "आजी...म्हातारे...तू होतीस व्हिजनरी!"

- माधव आजगांवकर.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users