दुरावा, राग, चिडखोरी खुबीने टाळता येते!
न हस्तांदोलने केली तरीही हासता येते!!
प्रथम भेटीमधे व्यक्ती जराशी चाळता येते!
घरोबा जाहल्यावरती, चवीने वाचता येते!!
निसर्गाचाच तूही अंश, घे तू काळजी त्याची....
नको बागा, परंतू रोपटे तर लावता येते!
महागाई भले वाढो, नसू दे लठ्ठ मिळकतही....
शिताफीने कमी पैशातही रे, राहता येते!
जरी रक्तातले नाते असो वा ते नसो वेड्या.....
अरे, माणूसकीची सोयरिक जोपासता येते!
कशाला सांग, धावावे सुखाच्या मागुनी मोठ्या?
किती बारीक गोष्टींतून सुख हे वेचता येते!
गरज पडते कुणालाही कुणाची जीवनामध्ये....
सलोखा ठेवला म्हणजे, कुणाला मागता येते!
मनाच्या सागराचा थांग का रे सांगता येतो?
स्वत:मध्ये बुडी मारून मग झेपावता येते!
कुठे रे, चंद्र अन् तारे हरेकालाच मिळती का?
जुई, जाई, गुलाबाला खुशीने माळता येते!
हवे चिंतन, मनन, वाचन, हवा व्यासंगही मोठा!
अशाने काव्य हृदयीचे सहज उच्चारता येते!
-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१
आवडले शेर.
आवडले शेर.
व्वा छान अश्या कव्यातून
व्वा छान
अश्या कव्यातून आपल्यातील सुंदर स्वच्छ मनाचा माणूस नेहमीच दिसून येतो ज्यावर इथे सगळेच जण प्रेम करतात
धन्यवाद
धन्यवाद