रॉय

Submitted by हायझेनबर्ग on 5 June, 2014 - 21:31

मृगाच्या पहिल्याच पावसाच्या सरीवर सरी कोसळतांना खिडकीतून दिसणारा ऊधाणलेला समुद्र बघून रॉयला आजही तेवढाच आसुरी आनंद झाला. दिवसाची कामं संपवून घरांकडे लगबगीनं धावणारी रंक आणि रावांची जनता बघतांना अतीव ऊत्साहात त्याने खिडकीतून ओरडत दोनचार शिव्यांच्या गारा सटासट भिरकावल्या.
'रन यू बास्टर्ड्स रन हां हां', 'लर्न टू रिस्पेक्ट मदर नेचर यू सेल्फिश, ब्लडसकिंग पॅरासाईट्स'. मागच्या काही महिन्यांत साठलेल्या रागाचा, तिरस्काराचा त्याने घश्याच्या शिरा तुटेपर्यंत ताणत आणि मनाचं समाधान होईपर्यंत ओरडून निचरा केला. निचरा झालेलं मन पुन्हा रागाने, तिरस्काराने भरून जाईल आणि तेव्हासुद्धा आपण असेच ओरडत असू हेही त्याला अताश्या सवयीचं झालं होतं. तेराव्या मजल्यावरून कितीही ओरडलं तरी मुसळधार पावसांत रस्त्यावरच्या कुणालाही ते ऐकू जाण्याची आजिबातच शक्यता नव्हती आणि कुणाला शिव्या देण्याएवढं त्याचं कुणाशी वैर ही नव्हतं. पण तरी असं ओरडून 'जरा मोकळं वाटतं' हा त्याला हल्लीच लागलेला शोध होता. 'जगातली सगळी माणसे आपल्यासाठी फक्त चित्रांचे विषय आहेत आणि बाकी ह्या जगातल्या कुणाशीही आपला काहीही संबंध नाही' हे आठवून त्याच्या चेहर्यावर मंद स्मित झळकले. शांत आणि समाधानी डोळ्यांनी तो हातातल्या व्हिस्कीच्या ग्लासातून हेलकावणार्या झाडांपलिकडचा समुद्र घोटघोट पीत खिडकीत बसून राहिला.

सातच्या ठोक्याला दारावरची बेल वाजली आणि त्याला आजच्या क्लायंट मिटिंगची आठवण झाली.
संध्याकाळच्या मिटींग्ज खरंतर त्याला आवडत नसत पण ह्यावेळी त्याचा नाईलाज होता.

सर्वदमन रॉय?

हो मीच. या!

हॅलो. मी शिरिन.

हॅलो!!

ह्म्म! स्ट्रेंज!

स्ट्रेंज? का काय झालं?

काही नाही! अनपेक्षित शब्द निघून गेला.

हरकत नाही, तुम्ही पहिल्याच नाहीत तशी प्रतिक्रिया देणार्‍या.

तुम्हाला प्रशस्त वाटत असल्यास तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता पण त्याची गरज नाहीये.

तशी गरज खरंच नाहीये पण पुढची चर्चा करतांना तुम्हाला विचित्रं वाटू नये म्हणून मी आत्ताच सांगून टाकतो. माझे डॅड ब्रिटिश होते आणि आई भारतीय, दोघेही हिप्पी आणि बहूतेक चरसीसुद्धा. मी तीन वर्षांचा असतांना मला आजी-आजोबांकडे ठेऊन ते दोघे मेडिटेशनसाठी भारतात आलेल्या बीटल्सना भारावून त्यांच्या मागोमाग इंग्लंडला गेले आणि तेव्हापासून मी ईथेच आहे. मी काही त्यांना पुन्हा बघितले नाही. मी रंगरुपानं जरी वेगळा असलो तरी माझ्या वागण्याबोलण्यात ती ब्रिटिश छटा तुम्हाला दिसणार नाही. वडिलांचं आडनाव मी वापरत नाही आणि मला रॉय म्हंटलेलं आवडतं.

स्प्ष्टीकरणाची गरज नव्हती. पण ठीकंच झाले, औपचारिकता टाळून थेट बोलणे शक्य होईल. अपॉईंटमेंट देण्यास फार वेळ घेतलात रॉय तुम्ही.

मी एका प्रोजेक्टवर काम चालू असतांना दुसरा घेत नाही.

वेरी वेल! प्रोफेशनल आहात तर!. कामाचं बोलूयात?

नक्कीच. त्याआधी तुम्ही काय घेणार? मी चहा-कॉफी पीत नाही त्यामुळे घरात....

विस्की चालेल, ऑन-टू-रॉक्स! ही मागे रचून ठेवलेली चित्रं कुणाची आहेत?

माझ्या जुन्या क्लायंट्सची.

मग ती ईथे का आहेत?

कारण ज्यांनी मला ती पोट्रेट्स काढायला सांगितली त्यांना ती आवडली नाहीत म्हणून त्यांनी नेली नाहीत.

म्हणजे मला कळलं नाही. तुमच्या सारख्या प्रसिद्ध चित्रकाराची पोट्रेट्स आवडली नाहीत म्हणजे?

माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे मिस्..मिसेस...?

नुसतं शिरिन चालेल.

ओके! माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे शिरिन. मला अपेक्षा होती की अपॉईंटमेंट घेण्याआधी तुम्हाला त्याची कल्पना असेल.

नाही! मला कल्पना नाही.

ठीक आहे! बोलू आपण त्याबद्दल. हा घ्या ग्लास.

थँक्स् ! पण ही चित्रं तर प्रचंड सुंदर आहेत. ह्या सगळ्या चित्रातल्या माणसांचे चेहरे आणि त्यांच्यावरचे भाव कित्ती खरेखुरे वाटतायेत. प्रत्येक चेहरा काही तरी बोलू पाहतोय, सांगू पाहतोय.
ह्या व्हायोलिन वाजवणार्या मुलाच्या चेहर्यावरचे भाव? ओह माय गॉड. अमेझिंग रॉय! कमाल आहे तुमच्या कलेची. तुमच्या 'लाईफ पोट्रेट्स' बद्दल आजवर फक्त निखिलकडून....

काय झालं?

नाही काही नाही. तुम्ही म्हणालात ही पोट्रेट्स ज्यांची आहेत त्यांना आवडली नाहीत.

नाही! मी म्हणालो ही पोट्रेट्स ज्यांनी मला काढायला सांगितली होती त्यांना ती आवडली नाहीत.

म्हणजे?

म्हणजे, हे सगळे चेहरे आणि ह्या चित्रांमधली माणसं आता जिवंत नाहीत शिरीन!

काय? म्हणजे तुम्ही मृत व्यक्तींची पण पोट्रेट्स बनवता.

मृत व्यक्तींची पण नाही शिरिन, मी फक्त मृत व्यक्तींचीच पोट्रेट्स बनवतो. ह्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या जवळच्या नातलगांनी त्यांची पोट्रेट्स बनवण्याचं काम मला दिलं पण काही कारणांनी त्यांना ती पोट्रेट्स आवडली नाहीत आणि म्हणून त्यांनी ती नेली नाहीत.

पण ही पोट्रेट्स न आवडणं कसं शक्य आहे?

हं!! का शक्य नाही? त्यांना त्या चित्रांमध्ये त्यांचा गेलेला माणूस दिसला नाही किंवा त्या गेलेल्या माणसाला ते जसे ओळखत होते तसा तो त्यांना सापडला नाही म्हणून कदाचित!
ते व्हायोलिन वाजवणार्या मुलाचं पोट्रेट पाहिलंत ना! त्याचं नाव 'आदि'. जिवंतपणी तो आपण 'ममाज बॉय' म्हणतो एकदम तसाच असावा. त्याच्या शिस्तप्रिय, महत्त्वाकांक्षी आणि श्रीमंत बाबांना नाही आवडलं पोट्रेट. बहूतेक त्यात त्यांना त्यांचा आदि सापडला नाही किंवा पोट्रेटमध्ये दिसणारा आदि त्यांना नको होता. आदिच्या आईला मात्र हे पोट्रेट नेण्याची प्रचंड ईच्छा होती पण नवर्यापुढे त्यांचं काही चाललं नाही. त्या येतात ईथे अधूनमधून आदिला भेटण्यासाठी. येतात तेव्हा तासनतास चित्रासमोर बसून राहतात.

पण एवढ्या लहान वयात आदि ?

गन अ‍ॅक्सिडेंट झाला म्हणे. पण मला खात्री आहे आदिने आत्महत्या केली.

आत्महत्या? का?

हं!! त्याच्या कलाकार मनावर सदोदित कुरघोडी करणारी त्याच्या वडिलांची अतिरेकी महत्त्वाकांक्षा.

हाऊ डू यू नो?

आय जस्ट नो !

बापरे भयंकर आहे!

असो. तुम्ही तुमच्या कामाबद्दल काही बोलला नाहीत.

मला आता त्याची जरूरी वाटत नाही.

असं का?

तुम्ही प्रोफेशनल आहात रॉय आणि मला वाटतं माझं काम तुमच्या नियमांत बसत नाही. पैश्यांसाठी नियम वाकवणार्‍यांपैकी तुम्ही वाटत नाहीत म्हणून मला शंका आहे की तुम्ही नाही म्हणाल.

मला कळलं नाही शिरिन.

रॉय! मलाही एक पोट्रेट बनवून घ्यायचं आहे, पण एका जिवंत माणसाचं. तुम्ही त्याला जिवंत म्हणायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे. कारण माझ्यासाठी तो जिवंत असूनही नसल्यासारखाच आहे.

मला तुमचं बोलणं खरं नीट कळत नाहीये, पण त्याआधी मला विचारायचं आहे, कोणाबद्दल बोलतोय आपण?

निखिल! निखिलबद्दल बोलतेय मी. म्हणाल तर माझा एकेकाळचा मित्र, सखा, सोलमेट सगळं काही. माझं प्रेम, माझं अस्तित्व, माझं हसणं, माझं रुसणं, माझ्या असण्या आणि नसण्यासाठीचं एकमेव कारण फक्त निखिल होता. कधीतरी माझं आयुष्यं निखिलपाशी येऊन थांबलं आणि त्याच्या सहवासात ते एवढं गुरफटलं की मला स्वतःचा असा प्रवाह ऊरला नाही. माझा हरेक दिवस आणि प्रत्येक रात्रं मी निखिलभोवती बांधून घेतली. वेलीसारखी मी त्याच्या आयुष्याशी लगडले होते की हक्काची सावली समजून त्याच्या प्रेमाच्या छायेत माझं स्वतःचं बहरणंही विसरून गेले होते ते आता प्रयत्न करूनही मला आठवायचं नाही. आणि कधीमधी आठवलं तरी त्या आठवणी अंगाला चिकटलेल्या जळवांना ओढून काढून पायाखाली चिरडावे तश्या चिरडून टाकाव्यात असे वाटत राहते.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरर्र्र हे चुकून प्रकाशित झाले, आता अपूर्ण लेखन अप्रकाशित करता येत नाही का?
सगळं टेक्स्ट काढून टाकणं एवढा एकंच पर्याय दिसतोय पण तरी धागा राहतोच का?

पुढे? ...

एक माधव आचवल यांची अशी एक कथा आहे माहित आहे का ?? अशी म्हणजे अश्शी नाही आहे पण मला आठवण झाली..पत्र या कथा संग्रहातली आहे .

हो दुस्तर गोष्टं अर्धवट राहिली त्याचे पापक्षालन म्हणूनच पूर्णच कथा टाकायची होती Happy . पूर्वी मायबोलीवर जसे लेखन अप्रकाशित ठेवता येत असे तसे आता येत नाही का? कथा सध्या अप्रकाशित ठेऊन, पूर्ण करून मगच टाकायची होती. पण आता ती प्रकाशित झालीच आहे तर काढून न टाकता नुसते क्रमशः लिहिले.

अमृतवल्ली,
नाही, मी माधव आचवलांचे साहित्य वाचलेले नाहीये.

प्रतिक्रियांसाठी धन्यवाद! पुढचा भाग लवकरच टाकायचा प्रयत्न करतो.

पराग नि र्मड ला अनुमोदन. पुढचा भाग वेळेत टाक. हवं तर काही दिवस इतर बाफांवर (उदा टेनिस) कमी बागड Happy

मस्तच झाली आहे सुरूवात .. आधी वाचणार नव्हते मग सगळ्यांनीं वाचायला सुरूवात केल्यावर मीही वाचली .. अर्धवट सोडू नकोस ..