अगाथाची गोष्ट

Submitted by Barcelona on 5 June, 2014 - 12:49

घरी आल्यावर अगाथाला मुलांनी घातलेला पसारा कधीच दिसायचा नाही. माशाचे पुडे टेबलवर ठेवून तिला बाथरूममध्ये शिरायची घाई असायची. प्लास्टिकच्या बकेटीतल पाणी मच्छीचा वास धुवून काढत पण अगाथाच्या काळ्याशार संगमरवरी अंगावरून ‘जाबोया’च्या सिगरेटचा वास जाता जात नसे. पण त्याने तिला जकम्बी म्हणून निवडल ह्यात तिचच भल होत हेही तिला पटत होत. जकम्बी म्हणजे जाबोयाची गिऱ्हाईक, मात्र केनयातील ह्या विक्टोरिया तळयाकाठी कोण ग्राहक आणि कोण राजा! जाबोयाकडून विकत घेतलेले मासे जकंबी बाजारात जाऊन विकते. माशांची किंमत पैशांनी चुकती होई. पण जाबोयानी तिला मच्छी नियमितपणे द्यावी ह्यासाठी वेगळी किंमत मोजावी लागे.. आणि त्या तशा अंगाला मुलांनी बिलगू नये म्हणून बाथरूम मध्ये शिरायची घाई. पाच वर्षापूर्वी कोरड्या डोळ्यांना जेव्हा प्रश्न पडला - आता मुलांना काय खाऊ घालावे - तेव्हा अगाथाने विक्टोरिया तळ्याचा रस्ता धरला. तिच्या मावशीने आयुष्यभर मासे विकले होते. मावशीच्या जाबोयाचा मावशीवर जीव जडला आणि त्यांनी लग्नही केलं. मावशीच्या शब्दाला तळ्याकाठी मान होता. ती आपलीही काही सोय लावेल ह्या आशेवर अगाथा इथे आली आणि मावशीने तिची सोय लावलीसुद्धा - कुठलाही रोग नसलेल्या एका तरुण जाबोयाबरोबर - सिम्बा बरोबर अगाथाची ओळख करून दिली. इथे व्यवसायाला जे भांडवल लागत ते तरूण अगाथाकडे पुरेपूर असल्याने आजवर अगाथाला मच्छीची कमी पडली नव्हती.

आता आताशा अगाथाला काळजी वाटे. रोग लागून तरुणपणीच मेलो तर ठीक नाहीतर पुढे कसं होणार. नव्या नव्या मुली तर तळ्याकाठी येतच होत्या. आपल्याला रोग लागला तर निदान मुलांना झोपड असाव ह्या विचाराने ती पै पै साठवत होती पण ‘कमाई - गरज’ ह्याचं प्रमाण नेहमी व्यस्त होत. एक दिवशी तिने सिम्बाला हिंमत करून विचारलंच “मला सैपाकीण म्हणून होडीवर नेशील? इथे चाळीस दिवसात जितके पैसे मिळत नाहीत तितके एका आठवड्यात होडीवर अन्न शिजवण्याचे मिळतात” तो दात विचकावून हसला “ते काय फक्त पोटाच्या भुकेला खायला घालून मिळतात होय ग? पाच-सहा लोक असतो आम्ही होडीवर.”. ओठावर उसने हसू आणून अगाथा म्हणाली “म्हणून तर फक्त तुझ्याच होडीवर यायचं आहे मला”. तसही सिम्बाला जेव्हा मच्छी मिळत नसे तेव्हा कुणी दुसरा जाबोया तिची जकंबी म्हणून निवड करत होताच की. हो-नाही करता करता अगाथा पुढच्या ४-५ वेळा होडीवर सैपाकीण म्हणून गेली. दर वेळी जाताना हे शेवटच म्हणायचं पण महागाई भत्त्याची गरज पडली की निमूटपणे दोन कपडे घेऊन होडीवर जायची. त्या दिवशी अशीच परत येउन मुलांना घ्यायला अगाथा मावशीकडे गेली. आता मात्र मावशी चिडली “तू होडीवर असताना तुझी पोर सांभाळायला ना नाही माझी, पण बाजाराच्या दिवशी नर्स येते तिच्याकडे जाऊन ये, नाहीतर पोर माझ्या गळ्यात टाकून तू मरशील”. मावशीसारख्या गरीब बाईला इतपतच माया परवडते. मावशीचा शब्द अगाथाला ऐकावा लागणार होता. खर तर अगाथानेही पाहिलं होत जिला रोग लागायचा ती जकंबी तडफडून मरायची. अगाथाला मरण हव होत पण तसल नको होत.

पोरांसाठी फिरत्या दवाखान्यात अगाथा कधीमधी गेली होती. पण त्या पोरांच्या नर्सपेक्षा नर्स अमिनाह जरा पोक्त आणि वेगळी होती. हळू आवाजात सगळ सांगायची आणि दर दोन मिनिटाला “घेशील न काळजी” म्हणत राहायची. अगाथाला तीव्रतेने जाणवलं काळजी घेण आपल्या हातात नाही कारण जाबोयांनी मच्छीचा पुरवठा बंद केला तर चूल कशी पेटणार. आधी अज्ञानात सुख होत पण आता आपल्या अगतिकतेची जाणीव झाली. अमिनाहने तिला फुकट व्हिटामिनच्या गोळ्या दिल्या. इतक्या मायेची सवय नसल्याने अगाथाचा बांध फुटला. रडत रडत अगाथा म्हणाली “सिस्टर, होडी माझी असती तर मीच मासे पकडले असते आणि मीच बाकीच्या पोरींना विकले असते. अस भीतीच जगण जगायची कुणाला हौस असते.” अमिनाह तिच्याकडे बघतच राहिली - एका जकंबीने मासेमारी करावी??!

पुढच्या महिन्यात बाजाराच्या दिवशी अमिनाह आणि एक दुसऱ्या बाई अगाथाच झोपड शोधत आल्या. अगाथासाठी संध्याकाळी ये म्हणून निरोप ठेवून गेल्या. तळ्यावरून आल्यावर अगाथा नर्सबाईकडे गेली. अमिनाहने तिला मार्गारेटची ओळख करून दिली. मार्गारेट एका सेवाभावी संस्थेच काम बघायची. मार्गारेट अगाथासारखीच काळ्या कांतीची पण तिचे केस सरळ होते आणि तिच्या अंगाला मच्छीचा वास नव्हता. अगाथाला बघताक्षणी ती आवडली. मार्गारेटने अगाथाला बरेच प्रश्न विचारले. अगाथा दुसरी पर्यंत शिकलेली होती. फार वाचता येत नसलं तरी आकडेमोड बरी जमत असे. त्यात भर अमिनाहने अगाथाला कुठलाही रोग नसल्याचे सांगितले. मग मार्गारेट म्हणाली “बघ माझी संस्था तुला होडी देऊ शकेल पण एक महिना तू आमच्या जाबोयाबरोबर जाऊन मासे पकड.” अगाथाला काहीच सुचेना. आपल्याला जमेल? मुलांना कसं वाटेल? सिम्बाला काय सांगाव? आणि महिन्यानंतर ह्यांनी होडी दिलीच नाही तर? पण त्या तडफडीच्या क्षणाला माशाप्रमाणे घट्ट मुठीत पकडून अगाथा मार्गारेटला म्हणाली “हो, जाईन मी.” मात्र तिने जेव्हा हे सांगितल तेव्हा सिम्बा काही न बोलता तिच्यावर थुंकून चालता झाला.

संस्थेचा जाबोया - वाचिरू- त्याच्या बरोबर अगाथा मासेमारी शिकू लागली. वाचिरू मध्यमवयाचा अनुभवी जाबोया, कामाशी काम ठेवणारा थोडासा अबोल पण राग आला की अगाथाच्या सात पिढ्यांचा उद्धार करणारा. आपल्या चारित्र्यावरच्या शिव्यासाठी अगाथाची कातडी गेंड्याची झाली होती पण असा आई-बापाला शिव्या देणारा जाबोया तिने पहिल्यांदा पाहिला होता. होडी, जाळे, टोपल्या त्यांची देखभाल अगाथाला जमत असे पण कधी वल्ह्वताना शक्ती कमी पडे तर कधी विक्रीचा हिशेब चुके. फक्त पोरांना मासे देणारी अगाथा हल्ली स्वतःसुद्धा भातावर एखादा मासा घेऊ लागली. लाज बाजूला ठेवून आपल्या गिचमिड अक्षरात मांडलेला हिशेब शाळेत जाणाऱ्या मुलाला दाखवू लागली. तळ्याकाठी अगाथा चेष्टेचा विषय बनली होती. पण भराभर महिना गेला आणि वाचिरूने तिला सांगितल “आज तू तुझी होडी घेऊन जा, आम्ही दुसऱ्या होडीत तुझ्या आसपास राहू”.

पकडलेले मासे विकायला जेव्हा अगाथा काठावर आली तेव्हा मुली तिची वाट बघतच होत्या. म्हणता म्हणता अगाथाची मच्छी विकली गेली. काही मुलींनी आता जाबोयाला नियमितपणाची किंमत नको म्हणून सुटकेचा निश्वास टाकला तर काही जुन्या जाणत्या बायांनी किती दिवस टिकतील हि थेर म्हणून लांब राहणे पसंत केल तर काही तिच्या माशाला नावे ठेवून निघून गेल्या. ह्यावेळी वाचिरू कधीनव्हे ते तिला म्हणाला “चांगल केलस, हळूहळू तुला बघून अजून मुली जाबोया होतील.” अगाथा आता रोगापासून आपण कोसो दूर गेलोय ह्या जाणीवेने हरखून गेली होती. हातातील पैशाचा तिला आज जास्तच अभिमान वाटत होता. घरी जाऊन आज मुलांना तडक जवळ घेऊ म्हणत अगाथा घरी गेली. टेबलावर ब्रेड मासे ठेवताना आज तिला पहिल्यांदा जाणवत होत फार पसारा घालतात पोर ह्या छोट्या घरात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव सुरेख लिहीली आहेस गोष्टं.
खूप भिडणारी आणि एका वेगळ्याच जगाची छोटीशी ओळख करुन देणारी.

सुंदर. भिडली!
अजून पुढे काय होईल असे वाटेपर्यंत संपली पण संपल्यावर हे ही वाटलं की कुठेही अ‍ॅब्रप्टली संपवली नाही.
पसार्‍याने सुरुवात आणि शेवट, ते एकदम समेवर आल्यासारखं वाटलं. >> +१

>> पसार्‍याने सुरुवात आणि शेवट, ते एकदम समेवर आल्यासारखं वाटलं.

+१

हा न्युआन्स् आधी पटकन नोटिस केला गेला नाही ..

सुरेख लिहिलंय!

कथाबीज, फुलवण्याची शैली, दोन्ही सुंदर आहे. कुठल्याही फापटपसार्‍याशिवाय आटोपशीर असल्यामुळे कथा जास्तच आवडली.

<<कथाबीज, फुलवण्याची शैली, दोन्ही सुंदर आहे. कुठल्याही फापटपसार्‍याशिवाय आटोपशीर असल्यामुळे कथा जास्तच आवडली.>> मृण्मयी हज्जार मोदक.
कसं सुबक लिहिलं आहे.

सुंदर लेखन, नेहेमीच्या परिचित, ज्ञात जगाआडही गुंतागुंतीचे निराळेच जग वसलेले असते आणि त्याचे व्यापार वेगळ्या पातळीवर सुरु असतात याची जाणीव करून देणारे !

Pages