पाहिले कुणी ना माझे काळिज हे भळभळताना.....

Submitted by profspd on 5 June, 2014 - 03:05

पाहिले कुणी ना माझे काळिज हे भळभळताना.....
दाखवू कशाला माझे मी काटे दरवळताना?

होतोच कुणीही भावुक घेताना निरोप वेड्या....
होतेच दु:ख हृदयाला वाटेवरती वळताना!

वाचतात कोणी गझला तर करतो कुणी टवाळी....
कोणीच पाहिले नाही पण, मजला तळमळताना!

माणसे अशी वावरती की, साप, नाग हिंडावे.....
चाहूल येत नाही पण, ती भवती सळसळताना!

मी हसलो, माझ्यावरुनी मस्करी जाहली म्हणुनी....
मी फक्त पाहिले मजला अंतरात कळवळताना!

मी कुठे मारतो हाका सखये तुज घडीघडीला?
दे हात जरासा मज तू, मी मधेच अडखळताना!

झोपलोच नव्हतो केव्हा जन्मात गाढ मी इतका.....
मी निवांत निजलो होतो सरणावरती जळताना!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होतोच कुणीही भावुक घेताना निरोप वेड्या....
होतेच दु:ख हृदयाला वाटेवरती वळताना!

>>

आवडला. पण दुसर्‍या ओळीची कल्पना पहिली ओळ वाचल्या वाचल्या आलेली.

वाचतात कोणी गझला तर करतो कुणी टवाळी....
कोणीच पाहिले नाही पण, मजला तळमळताना!

मी हसलो, माझ्यावरुनी मस्करी जाहली म्हणुनी....
मी फक्त पाहिले मजला अंतरात कळवळताना!

>>> पोहचला Happy पण दोन्हींचे शब्द वेगळे अर्थ एकच वाटतायेत. एकाच गझलेत सेम आशयाचे २ शेर चालतात का? (मला माहीत नाहीये म्हणून विचारतेय)

झोपलोच नव्हतो केव्हा जन्मात गाढ मी इतका.....
मी निवांत निजलो होतो सरणावरती जळताना!

>>> छान!