लेखनस्पर्धा २०१४ - विषय, स्वरूप, बक्षिसं व नियम

Submitted by Admin-team on 5 June, 2014 - 00:41

गेली तीन वर्षं आपण सातत्यानं मायबोलीवर लेखनस्पर्धा आयोजित करत आलो आहोत. या वर्षीही भरघोस बक्षिसांसह, तुम्हांला लिहितं करण्यासाठी घेऊन येत आहोत - मनोविकास प्रकाशन व मायबोली.कॉम आयोजित लेखनस्पर्धा - २०१४.

***

या स्पर्धेचा कालावधी आहे ५ जून - १४ जुलै, २०१४.

***

यंदाच्या लेखनस्पर्धेसाठी विषय आहेत -

१. मोदी जिंकले; पुढे काय...?

भारतात नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि देशाचे पंधरावे पंतप्रधान म्हणून श्री. नरेंद्र मोदी निवडून आले. काहींना आनंद झाला, तर काहींना ’या देशाचं आता काय होईल?’, अशी चिंता वाटू लागली. काहींच्या मते ’अच्छे दिन आ गये’, तर काहींना ’लोकशाही’, ’सर्वधर्मसमभाव’ ही तत्त्वं नाहीशी होण्याची भीती.. काहींना त्यांच्या ’विकासपुरुष’ या प्रतिमेचं आकर्षण, तर काहींना त्यांच्या २००२ सालच्या दंगलींमधल्या भूमिकेविषयी शंका. पंतप्रधानपदी मोदींनी विराजमान होणं म्हणजे अनेकांना अपेक्षित असलेला विकास, की एका हुकूमशहाच्या हाती आलेली सत्ता, भारताचा आर्थिक महासत्ता म्हणून उदय की महागाई, गरिबी यांच्यात वाढ, असे प्रश्न अनेकांच्या मनांत आहेत. अशा परिस्थितीत आता या देशाचं, इथल्या नागरिकांचं सारं लक्ष मोदींच्या प्रत्येक हालचालीकडे आहे. त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर, त्यांच्या प्रत्येक भाषणावर चर्चा झाली आहे, होत आहे.

यंदाच्या लेखनस्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही यापुढे श्री. नरेंद्र मोदी यांच्या व या देशाच्या राजकारणाची, समाजकारणाची दिशा काय असू शकेल, याचा विविध बाजूंनी विचार करायचा आहे.

२. व्यक्तिचित्रण - जागतिक वाङ्मयात ’व्यक्तिचित्रण’ या लेखनप्रकाराला महत्त्वाचं स्थान आहे. मराठीतही काही अप्रतिम व्यक्तिचित्रं लिहिली गेली आहेत. अत्रे, दुर्गाबाई, पुलं, शांताबाई शेळके, जयवंत दळवी ते रामदास भटकळ, सुरेश द्वादशीवारांपर्यंत अनेक दिग्गजांनी काही अतिशय हृद्य, कसदार व्यक्तिचित्रं रेखाटली आहेत. या वर्षीच्या लेखनस्पर्धेत तुम्हीही तुम्हांला भावलेल्या व्यक्तीचं शब्दचित्र रेखाटावं, अशी आमची इच्छा आहे. ही व्यक्ती कोण असावी, कशी असावी यांवर काहीएक बंधन नाही. तुम्ही केलेलं व्यक्तिचित्रण काल्पनिक असल्यास, किंवा तुम्ही त्या व्यक्तीला कधीही भेटले नसल्यास अजिबात हरकत नाही. तुमच्यातल्या ललितलेखकानं या स्पर्धेच्या निमित्तानं व्यक्तिचित्रण करावं, हाच या विषयामागचा एकमेव उद्देश आहे.

या स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्रीमती सुजाता देशमुख व श्री. संजय आवटे
.

***

लेखनस्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील मनोविकास प्रकाशन, पुणे यांनी प्रायोजित केलेली बक्षिसं.

प्रत्येक विषयासाठी चार बक्षिसं दिली जातील.

पहिलं बक्षीस - रु. २००० किमतीची पुस्तकं.

दुसरं बक्षीस - रु. १५०० किमतीची पुस्तकं.

तिसरं बक्षीस - रु. १००० किमतीची पुस्तकं.

उत्तेजनार्थ बक्षीस - रु. ५०० किमतीची पुस्तकं.

सर्व बक्षिसे मायबोली खरेदीच्या गिफ्ट सर्टिफिकेटांच्या स्वरूपात मिळतील. मायबोलीच्या खरेदीविभागातून विजेते त्यांच्या आवडीची पुस्तकं ही गिफ्ट सर्टिफिकेटं वापरून निवडू शकतील.

तसंच, स्पर्धेतील उत्तम लेखांचं एक छोटेखानी पुस्तक प्रकाशित करावं, किंवा दर्जेदार लेखांना मनोविकास प्रकाशनाच्या 'इत्यादी' या दिवाळी अंकात स्थान द्यावं, अशी प्रायोजकांची इच्छा आहे.

स्पर्धेचं स्वरूप -

१. या स्पर्धेसाठी 'लेखनस्पर्धा - २०१४ हा नवीन ग्रूप ५ जूनला उघडण्यात आला आहे. या ग्रुपाचं सभासदत्व घेतल्यावर तुम्हांला तिथे लेखन करता येईल. ५ जून ते १४ जुलै, २०१४, या कालावधीत तुम्ही या स्पर्धेच्या ग्रुपामध्ये नवीन लेखनाचा धागा उघडून तुमचे लेख प्रकाशित करू शकता.

तुमच्या प्रवेशिका सर्वांना वाचता याव्यात म्हणून तुमच्या लेखाचा धागा सार्वजनिक करण्यास कृपया विसरू नका.

२. धाग्याच्या शीर्षकात लेखाच्या नावाबरोबरच विषयाच्या क्रमांकाचा उल्लेख असावा. उदाहरणार्थ, विषय क्र. २ - ’लेखाचं नाव’- असं असावं.

३. स्पर्धेचा निकाल गणेशोत्सवाच्या सुमारास जाहीर केला जाईल.

***

नियम व अटी -

१. ही स्पर्धा फक्त मायबोली.कॉमच्या सभासदांसाठीच आहे. आपण मायबोलीचे सभासद नसाल तर इथे नवं खातं उघडून आपण मायबोली.कॉमचे सभासद होऊ शकता. हे सभासदत्व विनामूल्य आहे.

२. एक व्यक्ती (आणि एकच आयडी :)) लेखनस्पर्धेच्या पहिल्या विषयासाठी दोन व दुसर्‍या विषयासाठी जास्तीत जास्त तीन प्रवेशिका पाठवू शकते. मात्र, यांपैकी एकाच प्रवेशिकेचा बक्षिसासाठी विचार केला जाईल.

३. लेखनासाठी शब्दमर्यादा -

पहिल्या विषयासाठी - तीन हजार शब्द.
दुसर्‍या विषयासाठी - दोन हजार शब्द.

४. एकदा प्रवेशिका प्रकाशित केल्यानंतर तीत शक्यतो बदल करू नयेत. अगदीच गरज भासली आणि शुद्धलेखनाच्या काही चुका दुरुस्त करायच्या असतील, तर या चुका तुम्ही दुरुस्त करू शकता. मात्र हे बदल संयोजकांना संपर्कातून कळवावेत.

५. लेखन स्वतंत्र (म्हणजे तुम्हीच केलेलं) असावं व ते इतरत्र कुठेही पूर्वप्रकाशित नसावं. भाषांतरित लेख स्पर्धेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.

६. लेखाबरोबर वापरलेली छायाचित्रं प्रताधिकारमुक्त असावीत. प्रताधिकारमुक्त नसलेली चित्रं वापरली असतील, तर ती तशी वापरण्यासंबंधीच्या परवानगीचा व प्रताधिकाराचा लेखात स्पष्ट उल्लेख असावा.

७. लेखात अवतरणं, कवितांच्या ओळी इत्यादी देताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी.

८. लेखाबरोबर यूट्युब किंवा तत्सम संकेतस्थळांवरील व्हिडिओंचे व इतर कुठल्याही संकेतस्थळांचे दुवे कृपया देऊ नयेत.

मात्र लेखात वापरलेले संदर्भ व संदर्भांचे दुवे लेखाच्या शेवटी देऊ शकता. लेखाच्या शब्दमर्यादेत ही शब्दसंख्या मोजली जाणार नाही.

याबाबत कुठलीही शंका असल्यास, अथवा प्रताधिकारधारकाची परवानगी मागण्यात मदत हवी असल्यास कृपया मायबोली प्रशासनाशी संपर्क साधावा.

९. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. एखाद्या विषयात पारितोषिक देण्यायोग्य प्रवेशिका नसल्यास बक्षीस दिलं जाणार नाही.

१०. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसाची पुस्तकं मायबोली.कॉमच्या पुण्यातील कार्यालयातून घेण्याची व्यवस्था करावी लागेल.

११. स्पर्धेनंतर स्पर्धेतील लेखांचा एखाद्या पुस्तकात किंवा दिवाळी अंकात मनोविकास प्रकाशनातर्फे समावेश झाल्यास तो संपूर्ण व्यवहार प्रकाशक व लेखक यांच्यात असेल. मायबोली.कॉमचा त्याच्याशी संबंध नसेल.

***

मायबोली.कॉमनं यापूर्वी आयोजित केलेल्या लेखनस्पर्धांना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला होता. तसाच प्रतिसाद या स्पर्धेलाही मिळेल, याची खात्री आहे.

***

स्पर्धेच्या परीक्षकांविषयी व प्रायोजकांविषयी अधिक माहिती इथे मिळेल.

***

spardhaposter1.jpg

संयोजक - अमितव, इन्ना, चिनूक्स, जिप्सी, फारएण्ड, सशल

***
विषय: 

अनेक मायबोलीकरांनी विनंती केल्यामुळे स्पर्धेची मुदत आता वाढवण्यात आली आहे. स्पर्धेसाठी लेख देण्याची शेवटची तारीख १४ जुलै (भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजेपर्यंत) असेल. तेव्हा आता लेख पूर्ण करून मायबोलीवर लवकरात लवकर प्रकाशित करा. Happy

मुदतवाढ झाली आहे होय १४ पर्यंत ? हेडर मधे अपडेटेड नाहीये म्हणुन विचारत आहे. येथल्या प्रतिसादांवरून कळाले.

जमल अखेर !
स्वतःच्या लेखाची स्वतःच्याच फेबुवर लिन्क दिली तर चालेल का ? की थांबावे स्पर्धा पुर्ण होईपर्यंत ?

महेश,
फेसबूकवर तुम्ही तुमच्या लेखाची लिंक जरूर देऊ शकता. फक्त निकाल लागेपर्यंत तो इतरत्र कुठे प्रकाशित मात्र कृपया करू नका. Happy

नमस्कार,

स्पर्धेला दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आम्ही तुम्हां सर्वांचे आभारी आहोत.
स्पर्धेची मुदत आता संपली आहे, लेख एक-दोन दिवसांत परीक्षकांकडे पाठवले जातील. निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याचा आम्ही प्रयत्न करू.

धन्यवाद. Happy

या स्पर्धेच्या निमित्ताने लिहिणे झाले, त्याचप्रमाणे अनेक उत्तमोत्तम लेखांचा आस्वाद घेता आला.

याबद्दल मायबोली प्रशासनाचे व संयोजकांचे मनःपूर्वक आभार.

विशाल,
स्पर्धेचा निकाल परीक्षकांकडून गेल्या आठवड्यात आला आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता करून या किंवा पुढच्या आठवड्यात निकाल जाहीर केला जाईल.

Happy

Pages