मी उभा हा जन्म माझा काढला अंगावरी!

Submitted by profspd on 3 June, 2014 - 02:57

मी उभा हा जन्म माझा काढला अंगावरी!
मात्र मी केलीच माझी जिंदगानी साजरी!!

आज होऊ देत याचा फैसला जो काय तो.....
प्राक्तना तू तार किंवा मार मजला सत्वरी!

अमृताचा एक पाझर माझिया गझलांमधे.....
रोज प्याले मी विषाचे रिचवतो आहे जरी!

एक तू साक्षात निंदा, मी प्रसिद्धीसारखा.....
तू तरी येथे रहा किंवा रहातो मी तरी!

मी अता ये-जा कुठे करणार नाही यापुढे....
पाहिली दुनिया, बरा मी एकटा माझ्या घरी!

उंच डेरेदार झाडे, मात्र छाया ना कुठे....
ऊन्ह हे माझे बरे, अन् सावली माझी बरी!

हे कळत नाही मला माझेच आता वागणे.....
मीच ओढावून घेतो आळ का अंगावरी?

भोवती बहिरेच सारे, जाणतो आहे तरी....
का गझल मी गात सुटलो चौकडे वेड्यापरी?

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागे पडला होता हा धागा प्राचार्य, कोणी प्रतिक्रिया पण देत नव्हते म्हणुन वर काढतोय.

चौकडे म्हणजे चोहोबाजूस/चोहीकडे

चौकडी म्हणजे चार वस्तूंचा समुदाय/एकमताच्या चार माणसांचा समुदाय/चार युगांचा समुदाय/आठ लुगड्यांचा समुदाय/ कपड्यावरील चौकटी वीण

चौकडा म्हणजे पुरुषांचे एक कर्णभूषण/नथेतील किंवा डुलातील सारख्या चार मोत्यांचा समुदाय/घोड्याचे चारी पाय उचलून धावणे/ कापडांचा आठ नगांचा समुदाय