एव्हरेस्ट बेस कॅंप - भाग १ - वाटचाल स्वप्नपूर्तीच्या दिशेने

Submitted by आऊटडोअर्स on 30 May, 2014 - 03:01

गेल्या अनेक वर्षांपासून फिरण्याच्या विश लिस्टवर दोन ठिकाणं होती. एक एव्हरेस्ट बेस कँपचा ट्रेक व दुसरी कैलास-मानसरोवर यात्रा. पण दोन्हीचा खर्च बराच असल्याने नुसतेच मनातल्या मनातले मांडे होते. यावर्षी मायबोलीवर स्पार्टाकसची एव्हरेस्ट व के२ मोहिमांची लेखनमाला वाचली आणि एव्हरेस्ट बेस कँप ट्रेकच्या विचारांनी परत उचल खाल्ली. मात्र यावेळेस एव्हरेस्ट बेस कँप ट्रेकचा सिरियसली विचार सुरु केला. स्वतंत्र ट्रेकचा विचार अजिबात नव्हता आणि पुण्याच्या 'फोलिएज आऊटडोअर्स 'चं नाव ऐकून असल्याने सगळ्यात आधी त्यांच्याच वेबसाईटवर हा ट्रेक ते घेऊन जातात का ते बघितलं. त्यांच्या हिमालयातील अनेक ट्रेक्सच्या यादीत चक्क एव्हरेस्ट बेस कँपचं नाव बघितल्यावर मात्र प्रचंड आनंद झाला.

लगोलग त्यांना मेल टाकून चौकशी केली. फोलिएज दरवर्षी हा ट्रेक घेऊन जातात. एकदा जायचं नक्की झाल्यावर रीतसर त्यांचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरला व तयारीला लागले. या ट्रेकची तयारी करताना तुमचा स्टॅमिना चांगला असण्याची गरज आहे. ट्रेकच्या दृष्टीने फिटनेससाठी साधारण काय तयारी करायची हे फोलिएजकडून कळलं. म्हणजे उदाहरणार्थ दर विकांताला सिंहगडावर जाणे अर्थात गड चढण्याचा व्यायाम करणे, जिने चढायचा व्यायाम करणे. शेवटचा ट्रेक करून मला ३ वर्ष होत आली होती. आखाती देशात गड चढण्याचा व्यायाम शक्य नव्हता. जिने चढणं सहज शक्य होतं खरंतर, पण मी नाही केलं. Sad मग एकच उपाय दिसत होता तो म्हणजे जीम लावण्याचा. म्हणून मग जीम लावायचा निर्णय घेतला व पुढचे ३ महिने फिटनेससाठी दिले. पूर्वतयारी म्हणून गड चढण्याची किंवा एखादी टेकडी वगैरे जवळपास असेल तर ती चढण्याची प्रॅक्टीस करत राहाण्याचा फायदा बाकीच्या टीम मेंबर्सना झालेला बघितला मी. ट्रेकचे दिवस हळूहळू जवळ येत होते. यथावकाश मुंबई-काठमांडू व परतीचे बुकिंगही झाले. माझं ट्रेकिंगचं सगळंच सामान मुंबईत असल्याने आधी तिथे जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

ट्रेकचा कालावधी १ ते १५ मे असा असणार होता म्हणून मग एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत पोहोचले. तोवर ट्रेकमध्ये नक्की कोण-कोण सहभागी असणार आहेत वगैरे तपशील कळले नव्हते, फक्त एकूण ५ जण आहोत इतकंच कळलं होतं. मुंबईत गेल्यावर बाकीचे सगळे तपशील कळले. ट्रेकमध्ये मी एकटीच मुंबईची होते व ट्रेक लीडर धरून बाकीचे चार जण पुण्याहून येऊन मला दिल्ली एअरपोर्टवर भेटणार होते.

१ मे २०१४ रोजी सकाळची ९ ची मुंबई-दिल्ली फ्लाईट घेऊन दिल्लीला उतरले व टर्मिनल बदलून आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचले. तिथे ट्रेकमधल्या दोघांची भेट झाली. ह्यात पुण्याची अपर्णा होती, जी पुढचे १५ दिवस माझी पार्टनर असणार होती. मग एकत्रच चेक-इन केलं व लंच उरकून थोडावेळ भटकलो. तोपर्यंत काठमांडूला जाणार्‍या फ्लाईटची वेळ होत आलीच होती. मग तंगडतोड करत गेटजवळ जाऊन बसलो. फ्लाईट दुपारी ३.५० ची होती व ५ वाजून ५० मिनिटांनी आम्ही काठमांडूच्या वेळेप्रमाणे उतरणार होतो. विमान वेळेवर सुटलं मात्र उतरताना खराब हवामानामुळे तास ते सव्वा तास आम्ही काठमांडूवर घिरट्या घालत होतो. तिथेच मनात शंकेची पाल चुकचुकली. हवामान खराब राहिलं असतं तर उद्या 'लुकला' ला जाणारं विमानही नक्कीच अडकलं असतं. शेवटी संध्याकाळी ७ च्या सुमारास एकदाचे काठमांडूला उतरलो. उतरताना बघितलं तर काठमांडूला पावसाचा मागमुसही नव्हता. Uhoh सामान घेऊन बाहेर पडतो न पडतो तोच पावसाला सुरुवात झाली. आम्हांला घ्यायला आमचा ट्रेक लीडर व अजून ट्रेकमधलाच एक मुलगा आले होते. ते दोघे काठमांडूला दुपारीच पोचले होते. आधीच उशीर झाला होता त्यामुळे हॉटेलवर जाऊन सामान न टाकता आम्ही सरळ जेवायला एका नेपाळी रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथे लाईव्ह लोकल नाच-गाणी सुरु होती. जेवण उरकून आता केव्हा एकदा हॉटेलवर जातो असं झालं होतं आम्हांला कारण उद्या लुकला ला जायला लवकर निघायचं होतं व त्यासाठी बॅग्ज भरायच्या होत्या. १०-१०.१५ च्या सुमारास हॉटेलवर पोचलो असू. तिथे आम्हांला ट्रेकसाठी लागणार्‍या डफेल बॅग्ज व फेदर जॅकेट्स दिली. ह्या बॅग्ज आता ट्रेकच्या कालावधीत पोर्टर उचलणार होते. त्यांचं वजन जास्तीत जास्त १० किलोपर्यंतच असायला हवं होतं. मग आम्ही सामानाचं व्यवस्थित सॉर्टिंग केलं. आमच्याही पाठीवर जास्तीत जास्त ५ किलोपर्यंत वजन असलेल्या सॅक्स असणार होत्या. इतकं सगळं होईपर्यंत १२ वाजत आले होते. ट्रेक लीडरने येऊन वजनाचा अंदाज घेतला व ग्रीन सिग्नल दिला. उद्या लुकलाची फ्लाईट ६.३० वाजताची होती व ५ वाजता पॅक ब्रेकफास्ट घेऊन हॉटेल सोडायचं होतं. झोपायला फार वेळ नव्हताच. ३.१५ चा गजर लावून आडव्या झालो.

दिवस १ :- काठमांडू-लुकला ते फाकडिंग (लुकला ते फाकडिंग अंतर ७ कि.मी. अंदाजे)

वेळेच्या बदलामुळे गजराचा काहीतरी घोळ झालाच. जाग आली तेव्हा ४ वाजून गेले होते. पटापट आवरून ५ वाजता खाली उतरलो. पॅक ब्रेकफास्ट घेऊन काठमांडूच्या आंतरराज्यीय विमानतळाकडे निघालो. आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय विमानतळ दोन्ही अगदी बाजूबाजूलाच आहेत. सकाळपासूनच विजांच्या कडकटासह व ढगांच्या गडगडासह पाऊस पडतच होता. लुकलाला जाणारं विमान उडेल याची काहीही शाश्वती नव्हती तरीही विमानतळावर जाऊन सामान टाकलं व बोर्डिंग पास घेऊन बसलो. बॅग स्क्रिनींगच्या वेळेस लक्षात आलं, सॅकमधल्या मेडिकल कीटमध्ये चुकून माझा स्वीस नाईफ राहिला होता. डफेल बॅग्ज आधीच चेक-इन होऊन गेल्या होत्या. त्यामुळे स्वीस नाईफची आहुती दिल्यावर आता ट्रेक व्यवस्थित पार पडेल याची खात्री झाली. Wink

काठमांडूचं आंतरराज्यीय विमानतळ अगदीच छोटं होतं आणि वाट पाहणारी माणसं त्याहून जास्त. विमानतळावर आलो तेव्हा आम्हांला आमच्या ट्रेकचा गाईड 'आन्ग डेंडी शेर्पा' भेटला. पुढचे १४ दिवस हा आता आमच्याबरोबरच असणार होता. डेंडी वयाने लहान आणि अनुभवाने फारच मोठा होता. त्याने दोन वेळा एव्हरेस्टवर चढाई केली होती व अमा दबलम जो एव्हरेस्टपेक्षाही चढाईला कठीण आहे, त्यावर एकदा चढाई केली होती. भारीच वाटलं आम्हांला ऐकूनही. Happy त्यानेच फोन करून चौकशी केली तर 'लुकला' ला एकदम छान हवामान होतं. परंतू काठमांडू व अधलं मधलं हवामान ठीक झाल्याशिवाय आमची प्रतिक्षा संपणार नव्हती. इथे येऊन ३-४ तास होत आले होते. पावसाचं थांबायचं लक्षण नव्हतं पण २ वाजेपर्यंत वाट पहायची असं सांगितलं होतं. मध्ये मध्ये आम्ही तिथल्या तिथेच पाय मोकळे करायचे म्हणून २-३ फेर्‍या मारून येत होतो. बोर्डिंग पासवर आमच्या फ्लाईटचा नंबर लिहिला होता. पहिल्या लॉटमधलं दुसरं विमान असणार होतं आमचं. ११-११.३० च्या सुमारास पाऊस थांबला एकदाचा व आमच्या आशा पल्लवीत झाल्या. बसून बसून भूकही लागली होती केव्हाची म्हणून मग वरच्या मजल्यावर असलेल्या रेस्टॉरन्टमध्ये जाऊन जेवलो.

जेवण झाल्यावर डेंडीसरांनी थोड्याच वेळात लुकलाच्या फ्लाईट्स उडतील अशी गुड न्यूज आणली. लगबगीने आम्ही खाली आलो आणि नव्या उत्साहाने आमचा नंबर केव्हा येईल याची वाट पहायला लागलो. खरंच थोड्या वेळात आम्ही बोर्डिंगसाठी गेटपाशी गेलो. आम्हांला बसमध्ये बसायला सांगितल्यावर आता आपण नक्की उडणार याची खात्री पटली. विमानाजवळ गेल्यावर तिथे इंधन भरणे, सामान चढवणे सारखी कामं चालली होती त्यामुळे उन्हात परत अर्धा तास थांबावं लागलं. अखेर ९ १/२ तासांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर ३.३०-३.४५ च्या सुमारास आम्ही लुकलाच्या दिशेने उड्डाण केलं. हे विमान फक्त १२ सीटर होतं, त्यामुळे सामानाच्या वजनावरही निर्बंध होते. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर एकदाचे लुकलाच्या विमानतळावर उतरलो. सगळ्यांनी टाळ्या वाजवून वैमानिकांचं अभिनंदन केलं. उतरल्यावर आम्हांला आमच्याबरोबर असणारा अजून एक गाईड व दोन पोर्टर्स भेटले. एका ठरलेल्या टी-हाऊसमध्ये चहासाठी गेलो. इथे पोचेस्तोवर ४.३० वाजून गेले होते.

आम्हांला 'लुकला' ला घेऊन जाणारं विमान

लुकलाचं एअरपोर्ट (तेनझिंग-हिलरी एअरपोर्ट) हे अगदी छोटं आहे. एव्हरेस्ट बेस कँप ट्रेकला जाण्यासाठी इथूनच ट्रेक सुरु होतो म्हणून प्रसिद्ध. फक्त तारांनी बांधलेलं कंपाऊंड व आजूबाजूला घरं असं याचं स्वरूप. जगभरातील ट्रेकर्स इथे येतात म्हणून असेल पण 'स्टारबक्स कॉफी' आहे इथे.

लुकलाची धावपट्टी

लुकलाला पोचल्यापासून गरम पाण्याचे (पिण्याच्या, अंघोळीच्या) पैसे आपल्याच खिशातून जातात. पिण्याच्या पाण्यात काटकसर करून चालत नसल्याने त्याचाच खर्च या ट्रेकमध्ये जास्त होतो. साधारणपणे ७-८००० नेपाळी रूपये खर्च येऊ शकतो. त्यामुळे त्याचा विचार करून तेवढे पैसे जवळ ठेवावेत.

आज आम्हांला 'फाकडिंग' गावात पोहोचून मुक्काम करायचा होता. लुकला होतं ९२०० फुटांवर तर फाकडिंग ८७०० फुटांवर. त्यामुळे लुकला ते फाकडिंग २.३०-३ तास लागणार असले तरी उतरायचं होतं. चहापान झाल्यावर ताजेतवाने होऊन ट्रेकसाठी सज्ज झालो. रमत गमत फोटो काढत चाललो होतो. इथे नेपाळमधल्या प्रसिद्ध 'दुधकोशी' नदीचं पहिलं दर्शन झालं. नदीचं पाणी थोडं हिरवट, निळसर रंगाची झाक असलेलं होतं. ही नदी नंतर १३ दिवस सतत भेटत राहिली. या नदीचा उगम गोक्यो लेकच्या पूर्वेकडून होतो व दक्षिणेकडे वहात ती नामचे बझारकडे जाते. दुधकोशी नदीला तेंगबोचेजवळ 'इम्जा खोला' ही नदी येऊन मिळते. लुकला-फाकडिंगच्या वाटेवर पहिल्या झुलत्या पुलाशी गाठ पडली. नंतर पूर्ण ट्रेकमध्ये असे अनेक झुलते पूल पार करावे लागले. एका ठिकाणी परतणार्‍या ट्रेकर्समध्ये दोन मराठी मुली भेटल्या. रात्री ७.४५-८ च्या आसपास 'फाकडिंग' गावात पोहोचलो. इथे पोहोचल्यावर थंडी जाणवायला लागली. गरम पाणी पिऊन व जेवणाची ऑर्डर देऊन आम्ही आम्हांला दिलेल्या रुममध्ये सामान टाकून फ्रेश झालो. खोल्या म्हणजे फक्त प्लायवूडचं पार्टिशन टाकून केलेल्या होत्या व अगदी दोन बेड मावतील एवढीच जागा. डायनिंग रूममध्ये आलो व जेवणाची वाट पहायला लागलो. तोवर तिथे असलेल्यांनी फायर प्लेस लावून रूम उबदार करायचं काम सुरु केलं होतं. पहिलाच दिवस असल्याने आणि अंदाज नसल्याने भरपूर जेवण ऑर्डर करून कौतुकाने जेवलो. Proud उद्याचा दिवस हा ट्रेकचा कठीण टप्पा होता.नाही म्हटलं तरी टेन्शन आलं होतंच. सकाळी ६.३० ला ब्रेकफास्ट आणि ७ वाजता निघायचं अशी सूचना डेंडीसरांनी जेवणानंतर दिल्यावर आम्ही झोपायला रुममध्ये आलो. उद्याला लागणार्‍या गोष्टी हाताशी ठेवल्या व लवकरचा गजर लावून झोपून गेलो.

दिवस २ रा : फाकडिंग ते नामचे बझार (११,३१८ फूट) (अंतर अंदाजे १२ कि.मी.)

गजर झाल्यावर ठरल्याप्रमाणे उठलो. थंडगार पाण्याने तोंड धुवून फ्रेश झालो व सामान आवरून ब्रेकफास्टसाठी डायनिंग रूममध्ये आलो. ऑम्लेट-ब्रेड व लेमन टी पिऊन आजच्या दिवसासाठी सज्ज झालो. फाकडिंग ते नामचे हे अंतर ७-८ तासांचं व उंचीही गाठायची होती. बरोब्बर ७-७.१५ च्या आसपास फाकडिंगचा निरोप घेऊन नामचेच्या दिशेने कूच केले. मॉंजो गाव सोडल्यावर जोरसाले गाव येताना 'सगरमाथा नॅशनल पार्क'ची बिल्डिंग लागली. पूर्व नेपाळमधील हिमालयाचा मुख्यत्वे करून माऊंट एव्हरेस्टचा सगळा भाग हा 'सगरमाथा नॅशनल पार्क' च्या संरक्षित हद्दीत येतो. इथे सगरमाथा नॅशनल पार्कमध्ये शिरायची प्रवेश फी घेऊन ट्रेकर्सची परमिट्स बनवली जातात. तिथे फोटोसेशनचा ब्रेक घेऊन झाल्यावर परत चाल सुरु झाली. जोरसाले गावातच आमचा लंच ब्रेक असणार होता. आमचा आघाडीचा गाईड 'आन्ग गुम्बु' एका टी-हाऊसजवळ थांबला होता. आम्हीही त्याच्या मागोमाग आत शिरलो. आम्ही पोचल्यावर जेवणाची ऑर्डर दिल्याने लंचब्रेकमध्ये तासभर मोडणार होताच. या गावातून थोडं पुढे गेल्यावर 'हिलरी ब्रिज' येतो. तो ओलांडल्यावर नामचेची ३-४ तासांची चढण पार करायची होती.

जेवण, गप्पा-टप्पा झाल्यावर नामचेच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले. एक झुलता पूल ओलांडल्यावर जुना ब्रिज व नवीन 'हिलरी ब्रिज' दिसायला लागला. जुना ब्रिज बर्‍यापैकी खाली परंतू आता वापरात नव्हता, तर नवीन ब्रिज चांगलाच उंचीवर होता. जोरसाले नंतर बर्‍यापैकी चढण सुरु झाली होतीच. ब्रिज ओलांडत असताना खूप रक्त सांडलेलं दिसलं. एका घोड्याचा पाय घसरून तो जायबंदी झाला होता.

हिलरी ब्रिज

इथे पोचेस्तोवरच माझ्या गुडघ्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली होतीच, त्यामुळे पुढच्या चढाईचं टेन्शन होतं. चढाई चांगलीच दमछाक करणारी होती. परंतू अल्टिट्यूडचा त्रास कमीत कमी व्हावा म्हणून अगदी हळू चालायचा नियम आहे, त्यामुळे आम्हीही अगदी हळूहळूच चाललो होतो. दुपारी ३-३.३० दरम्यान केव्हातरी 'नामचे बझार' ला पोचलो. सगळेच जण चांगलेच दमले होते पण आता उद्याचा दिवस एक अ‍ॅक्लमटायझेशन वॉक सोडला तर आराम होता. नी कॅप असूनही दुखर्‍या गुडघ्याने माझी हवा काढली होती. Sad

आज ट्रेकच्या दुसर्‍याच दिवशी एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे हायड्रा पॅक खूपच गरजेचा आहे. माझ्याकडे होता तरी मी तो ट्रेकला बरोबर न घेण्याचा मूर्खपणा केला. हायड्रा पॅकमुळे तुम्हांला पाण्यासाठी वेगळे ब्रेक्स घ्यावे लागत नाही, त्यामुळे पाणीही भरपूर पोटात जाते. ट्रेकदरम्यान भरपूर पाणी पिणे व बाथरूमला जात रहाणं खूप महत्वाचं आहे.

'नामचे बझार' हे एव्हरेस्टच्या भागातलं सगळ्यात मोठं गाव, ट्रेकर्समध्ये ही एकदम प्रसिद्ध. माऊंटेनिअरींगचं सगळं साहित्य मिळतं इथे. नामचेला 'हॉटेल स्नोलँड' मध्ये आमची व्यवस्था केली होती. गेल्यावर आधी डायनिंग रूममध्ये जाऊन लेमन/जिंजर टी घेऊन फ्रेश झालो. रुममध्ये गेल्यावर स्वच्छ व प्रशस्त बाथरूम बघून आम्ही अंघोळ करून ताजेतवाने व्हायचा प्लॅन केला व लगेच गरम पाणी सांगितलं. इथे एक गरम पाण्याची बादली ३५०/- नेपाळी रुपयांना होती पण इलाज नव्हता. मस्त अंघोळ झाल्यावर खरंच चढायचा शीण गेल्यासारखं वाटलं. आज बाहेर जायचा प्लॅन नव्हताच त्यामुळे जेवणाची वेळ होईस्तोवर रूममध्येच बसून राहिलो. इथे संध्याकाळी ५ वाजताच जेवणाची ऑर्डर द्यावी लागायची.

जेवणात तशी बर्‍यापैकी व्हरायटी असायची. ४-५ प्रकारची सूप्स, डाळ-भात-भाजी, चाऊमेन, थुक्पा, मोमो वगैरे मिळायचं. नंतर नंतर तर त्याचाही कंटाळाच आला ते वेगळं. जेवण झाल्यावर उद्या ७.३० वाजता अ‍ॅक्लमटायझेशन वॉकला निघायचं असल्याची सूचना डेंडीसरांनी केली, म्हणजे ७ वाजता ब्रेकफास्टला डायनिंग रूममध्ये भेटायचं. नामचेच्या अजून डोक्यावर साधारण १.३०-२ तासांच्या अंतरावर एक 'एव्हरेस्ट व्ह्यू पॉईंट' नावाचं हॉटेल होतं. हवामान स्वच्छ असताना बरीच शिखरं तिथून दिसतात, एव्हरेस्टही. त्यामुळे तिथपर्यंत जायचा प्लॅन होता. अल्टिट्यूडमुळे आल्यापासून डोकं दुखत होतं म्हणून आम्ही दोघींनी अर्धी अर्धी डायमॉक्स घेतली. रात्री सुरुवातीला झोप लागली नंतर मात्र अजिबातच डोळ्याला डोळा लागला नाही. हेच सत्र पुढे पूर्ण ट्रेकभर सुरु राहिलं. गुडघ्यांमुळे मला आता पुढच्या ट्रेकचं फारच टेन्शन आलं होतं. उद्याच्या अ‍ॅक्लमटायझेशन वॉकला जायचाही मूड नव्हताच. उद्या अजून एक नी-कॅप विकत घ्यायची असं ठरवलं.

नामचे बझार

हॉर्स शू च्या आकाराचं नामचे बझार

दिवस ३ रा :- नामचे बझार

सकाळी ठरल्याप्रमाणे ब्रेकफास्ट करून निघालो. वातावरण पाऊस नसला तरी थोडंसं ढगाळ होतं. नामचे च्या वर एक 'स्यांगबोचे' नावाचं गाव लागलं. इथे कार्गोचा रनवे आहे. आरामात चालत चालत 'एव्हरेस्ट व्ह्यू पॉईंट' हॉटेलला पोचलो. आमचं नशीब काही जोरावर नव्हतं कारण एकही शिखर दिसत नव्हतं. Sad शेवटी कॉफीसाठी अव्वाच्या सव्वा पैसे मोजून निघालो. उतरताना बरीच ट्रेकर्स मंडळी अ‍ॅक्लमटायझेशन वॉकसाठी चढत असताना दिसली. ह्या पॉईंटपर्यंत वॉक फारच पॉप्युलर होता तर.

अ‍ॅक्लमटायझेशन वॉकनंतर खूपच मस्त वाटत होतं. येताना एका ठिकाणी मसाजची पाटी बघितली म्हणून चौकशी केली. दर जास्त वाटले म्हणून काही न बोलता हॉटेलवर परतलो. जेवणानंतर भटकायचा/खरेदीचा प्लॅन होता. म्हणून मग मसाजची चौकशी केली होती तिथेच गेलो. पण मगाशी काहीच कन्फर्म न सांगितल्याने त्याने आम्हांला बाहेरचा रस्ता दाखवला. Proud नामचेमध्ये अजून एका ठिकाणी मसाज करून मिळतो असं त्याने सांगितलं. म्हणून आम्ही शोधत निघालो. ५ मिनिटं चालल्यावर एका 'कॅफे दान्फे बार' असं लिहीलेल्या ठिकाणी मसाजची सोय दिसली म्हणून आत शिरलो. कॅफे दान्फेमधलं वातावरण एकदम जिवंत होतं. पूर्ण कॅफेमध्ये तिथे भेट दिलेल्या लोकांनी/ग्रूप्सनी म्हणजेच ट्रेकर्सनी टी-शर्ट्सवर त्यांची आठवण लिहून ते टी-शर्ट्स लावले होते. इंग्लिश गाणी सुरु होती. टिव्हीच्या मोठ्या पडद्यावर कुठची तरी सॉकरची मॅच सुरु होती. लोकं बीअर पीत होती, गप्पा मारत होती. बाजुलाच पूल टेबल होतं. आम्हांला मसाजकरिता ४० मिनीटं थांबावं लागणार होतं म्हणून मग एक कॉफी ऑर्डर केली. थोड्या वेळाने नंबर आल्यावर मी पायांना मसाज करून घेतला, एकदम रिलॅक्स वाटलं. दान्फे (हिमालयन मोनाल) हा नेपाळचा राष्ट्रीय पक्षी, त्यावरूनच या कॅफेचं नाव ठेवलं होतं. मसाजनंतर एका फार्मसीमध्ये नी-कॅप विकत घेतली. एक जर्मन बेकरी बघितली होती, ती शोधत निघालो. या जर्मन बेकरीमध्ये फारच टेम्प्टिंग खाद्यपदार्थ होते. मग परत एक कॉफी आणि खायला घेऊन तिथेच थोडा वेळ गप्पा मारत बसलो. आमच्या रात्रीच्या जेवणाची वेळ ठरलेली असल्याने फार वेळ न दवडता निघालो. उद्याचा दिवसही ६-७ तासांच्या वॉकचा होता. नवीन नी-कॅपमुळे गुडघ्यांना आराम मिळावा एवढीच इच्छा होती. रात्री परत एकदा अंघोळ करून घेतली कारण आता नामचेला परत येईंपर्यंत अंघोळीचं नाव काढायचं नव्हतं. सामान आवरून आडव्या झालो.

दिवस ४ था :- नामचे बझार ते देबोचे (अंतर अंदाजे १२ कि.मी.)

सकाळी बाहेर बघितलं तर पाऊस पडत होता. पावसातही ट्रेक सुरु करायचा की नाही ते कळत नव्हतं. आवरून डायनिंग रूममध्ये ब्रेकफास्टसाठी आलो. तोवर पाऊस थांबून आजूबाजूच्या पीक्सनी ओझरतं दर्शन दिलं. आम्ही 'तेंगबोचे' ऐवजी त्यापुढे २० मिनीटांवर असलेल्या 'देबोचे' गावात आज मुक्काम करणार होतो. तेंगबोचेच्या वाटेला लागण्याआधी आम्ही नामचे बझारमध्ये असलेलं शेर्पांच्या जीवनाची माहिती देणारं तसंच या भागात आढळणार्‍या फुलझाडांची माहिती देणारं म्युझियम बघणार होतो. मगाशी मोकळं झालेलं वातावरण आता परत पूर्ण ढगाळ झालं होतं. पाऊस पडू नये एवढीच इच्छा होती.

म्युझियम बघून तेंगबोचेच्या वाटेला लागलो. सुरुवातीचा बराच सरळच रस्ता होता. नामचेपासूनच एक कोरियन ग्रूप आमच्या पुढे-मागे होता. वाटेत आम्ही थांबलो असता त्यांची चौकशी केली. त्यांची ट्रेकिंग टीम 'अमा दबलम'च्या बेसकँपपर्यंत जाणार होती. मग त्यांच्यातल्या एकाने अपर्णाला ते लिहीलेला एक स्कार्फ भेट म्हणून दिला. अपर्णानेही त्यांना घरी बनवलेले एनर्जी बार्स दिले. रस्त्यात लागलेल्या २-३ गावांमध्ये सोवेनिअर्स, गळ्यातल्या माळा अश्या वस्तू विकायला ठेवलेल्या दिसल्या. मध्येच थोडा पावसाचा शिडकावा झाल्यावर कॅमेरा सॅकमध्ये जाऊन सॅकवर कव्हर चढलं. वाटेत एक मुंबईहून आलेली मुलगी दिसली. अल्टिट्यूड सिकनेसमुळे तेंगबोचेहून परत चालली होती. चेहरा अगदी उतरला होता तिचा. साहजिकच होतं म्हणा. माझ्यासारखंच तिनेही कदाचित या ट्रेकचं स्वप्नं किती वर्ष उराशी बाळगलं असेल...किती पैसा, वेळ आणि मन त्यात गुंतवलं असेल आणि त्यात असं ट्रेक अर्धवट टाकून माघारी फिरायचं म्हणजे....:अरेरे: या ट्रेकमध्ये काही त्रास झाल्यास तुमचं तुम्हांला एकटंच परत यावं लागतं. हेलिकॉप्टर (ते ही सगळीकडे नाहीच मिळत)/घोडे वगैरे खूपच महाग आहेत. आमच्यापैकी अजूनतरी सगळेच एकदम फीट व उत्साहात होते. एकावर एक अश्या दोन नी-कॅप्स लावल्याने माझाही गुडघा शांत वाटत होता.

जेवायला 'फुंकी थांगा' नावाच्या गावात थांबायचं होतं. या गावात पाण्यावर चालणारी प्रार्थना चक्र (प्रेअर व्हील्स) आहेत. फुंकी थांगा गाव जवळ यायच्या आधी खूप उतार होता कारण आता दुधकोशी नदीच्या पात्रापर्यंत खाली उतरायचं होतं. ह्या गावानंतर तेंगबोचेची अंगावर येणारी चढाई सुरु होते. इथून तेंगबोचेला पोचायला साधारण ३ तास लागतील असं कळलं. जेवल्यावर बाटल्यांमध्ये पाणी भरून तेंगबोचेला जायला निघालो. आमच्या आगे मागे बरेच हमाल की शेर्पा(?) पाठीवरून अवजड सामान घेऊन तेंगबोचेची चढण चढत होते. पुढच्या गावांमध्ये कोणतंही सामान पोचवायचा याक्/घोडे किंवा मग माणसांच्या पाठीवरून हाच मार्ग होता. चढताना डेंडीसरांच्या एक्स्पिडिशनच्या स्टोर्‍या तोंडी लावायला होत्या. इथेही आम्हांला मुंबईचा एक ग्रूप भेटला. त्यांच्याशी बोलताना कळलं की त्यांना गोरक शेपला हवामान फार स्वच्छ मिळालं नाही. साधारण ३ तासांच्या चढणीनंतर तेंगबोचेला पोचलो. कमानीतून आत शिरल्यावर लगेचच मॉनेस्ट्री होती. ही मॉनेस्ट्री या भागात सगळ्यात मोठी आहे. आम्ही पोचलो तेव्हा मॉनेस्ट्री बंद होती, परंतू उघडायची वेळ होतच आली होती त्यामुळे तिथेच थांबून राहिलो. पाचच मिनीटांत मॉनेस्ट्रीचं दार उघडलं व आमच्यासारखे बरेच ट्रेकर्स आत शिरले. आत बुद्धाचा खूप मोठा पुतळा होता. एक मुख्य धर्मगुरु व इतर दोन असं तिघांचं पठण चाललं होतं. मधून मधून बहुधा गरम पाणी पित होते. ५-१० मिनीटं तिथे थांबून आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी जायला निघालो. तेंगबोचे गाव तसं मोठं नाही वाटलं. आम्ही इथून २० एक मिनीटं अंतरावर असलेल्या 'देबोचे' गावात मुक्काम करणार होतो. देबोचेची उंची तेंगबोचे पेक्षा किंचित कमी असावी कारण तेंगबोचेनंतर २० एक मिनिटांचा रस्ता उताराचाच होता.

'तेंगबोचे' ची मॉनेस्ट्री

देबोचेही अगदी छोटेखानी गाव होतं. आम्ही थांबलो तो लॉजही १०-१२ खोल्यांचा व अगदी गावाच्या टोकाला होता. वर वर चढत होतो तसा खोल्यांचा साईझही छोटा होत होता. पण कदाचित या ट्रेकला फॉरेनर्स जास्त असतात म्हणून असेल टॉयलेट्सची परिस्थिती खूपच चांगली होती. संध्याकाळचा वेळ रिकामाच होता म्हणून मग डायनिंग रूममध्येच उनोचा डाव मांडला. जोडीला तोंड चाळवायला आम्ही आमच्याकडंचं खाणं काढलं. उद्या इथून 'डिंगबोचे' कडे प्रयाण करायचं होतं, जवळपास २००० फूट वर चढायचं होतं.

क्रमशः

पुढच्या भागासाठी इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहा मोजकेच पण काय फोटो आहेत..
माहितीही बरीच दिसतेय, सावकाशीने वाचतो.. वाचण्यास उत्सुक Happy

वा वा जबरी !!
मी तुला सांगणारच होतो की वर्णन लिही म्हणून.. Happy
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत..

सुपर्ब!!!
फोनवर मोजकं ट्रेकवर्णन कानावर पडलं... इथे तपशीलात वाचायला खूप मजा येतेय.

ऑस्समच की !

एक एव्हरेस्ट बेस कँपचा ट्रेक व दुसरी कैलास-मानसरोवर यात्रा >>>. माझ्या लिस्ट मध्ये हे दोन्ही आणि अन्नपूर्णा सर्किट आहे.

धन्यवाद सगळ्यांना Happy

केदार, अन्नपूर्णा सर्किट ऐकलंय मी पण नक्की कल्पना नाही मला. अन्नपूर्णा बेस कँपचा ट्रेक हाय अल्टिट्यूड ट्रेक नाहीये पण ह्या ट्रेकपेक्षा कठीण आहे असं ऐकलं.

खुप दिवस एव्हरेस्टला जायचं विचार करत होतो :-), चला आता निदान तुमच्या डोळ्यांनी आम्ही एव्हरेस्ट पाहतो.

आडो,
छान ओघवत्या भाषेत लिहिले आहेस. मागे एकदा अनया ने असाचं मानस सरोवरा चा लेख लिहिला होता तोहि मनाला फार भावला. खूप छान !

फारच छान, साधं, सरळ पण रसाळ लिखाण, आडो!

आजारी पडलात तर एकट्यानं परतावं लागतं हे वाचून कससंच झालं. एकतर आजारी, त्यातून ट्रेक पूर्ण करता येत नाही ही खंत आणि सोबत कोणीही नाही. Sad

Pages