सेकंड होम?

Submitted by सौमित्र साळुंके on 29 May, 2014 - 07:43

सह्याद्रीच्या सांदी कोपऱ्यात मोठमोठ्या वसाहती उभ्या राहतायत. निसर्गाने अंथरलेल्या हिरवाईचच मार्केटींग करून तिलाच छेदत, भेदत गुळगुळीत रस्ते बनतायत आणि टुमदार घरं वसतायत. सेकंड होम्स म्हणे...

मागे एक (उगाचच) इंग्रजाळलेली माझी मैत्रीण (?) मला कोण कौतुकाने सांगत होती. निसर्गाने नटलेल्या त्या परिसरात पूल साईडला त्यांचा ग्रुप कसा तर्र झाला होता, कसं चिल मारलं वगैरे वगैरे. मला याचंही विशेष वाटलं कि माझा स्पष्टवक्तेपणा (किंवा तुसडेपणा) माहित असूनही तिने मला हे सांगितलं. वर त्या बेहोशी का आलमचे फोटोही दाखवले. अपलोडहि केले असतील कदाचित. आणि करणाऱ्यांनी लाईक्स पण केले असतील...

मला ती ओळीने उभी असलेली घरं, ती हॉटेल्स अक्षरशः ओंगळवाणी वाटली. भडक रंगाच्या त्या इमारती, त्या कृत्रिम बागा. एखादया खानदानी शालीन सुंदरीवर अनावश्यक मेकअपची पुटं चढवून तिच्यावर लादलेल्या या कृत्रिम सौंदर्याचे प्रदर्शन मांडावे तशी...

अमुकच शांघाय करा, तमुकच व्हेनिस करा हि मनोवृत्तीच मला भिकारडी वाटते. उदाहरणार्थ मी मुळचा वाईकडला. वाई वाईच रहावी, मुळातच बारा महिने सौंदर्याने नटलेली ती विराटनगरी आणखी सुंदर व्हावी हे उत्तम, पण वाईचं झुरिच करू किंवा बर्न करू अशी कल्पना एखाद्या मेंढराच्या डोक्यात उद्या शिरली तर ती दरिद्रीच नव्हे का?

श्री सह्याद्री त्याची एखाद दुसरी भली थोरली सोंड एखाद्या जलाशयात सोडून बसला आहे.. त्यावर कैक प्रकारचे प्राणी पक्षी कवेत घेऊन गर्द वनराजी विसावली आहे.. आपण पहाटेला आणि सांजेला त्या जलाशयात तेजस्वी तपस्वी सह्याद्रीचे रूप पाहातो आहोत... पहाटेला खगांच्या कूजनानेच आपल्याला जाग येतेय.. जांभई नाही... आळस नाही... सारा थकवा कुठच्या कुठे नाहीसा झालेला... ज्या बसक्या घरात तुम्ही मुक्कामाला होतात त्या घरातली माऊली तुम्हाला भाजी भाकरी खाऊ घालते... कच्चा कांदा आणि जवसाची चटणी कदाचित.. रात्री एखादे तात्या, आण्णा किंवा भाऊसोबत बाजेवर डुकरा-सश्यांपासून ते मागच्या होळीला खालच्या रानातून आलेल्या डरकाळी बद्दल बोलत बसलाय.. ते भाऊ तात्या एक वाकळ काढून देतात आणि म्हणतात मी तीन म्हयण्याचा हुतो तवा माज्या पंजीनं शिवली व्हती.. तुम्ही निवांत पडलाय फेसाळलेलं निरभ्र आभाळ बघत.. शांत.. एकांत... नेमकं काय होतं ते तुम्हाला कळत नाही पण जडावलेले डोळे तुम्ही कसल्यातरी आंतरिक सुखाने झाकता आणि अलगद डोळ्यांच्या कडांमधून दोन थेंब ओघळून कानापाशी विसावतात.. उजाडल्यावर जडावलेल्या हृदयाने आणि पावलांनी तुम्ही निरोप घेता पुन्हा भेटू म्हणता...

... काही वर्षे जातात.. विद्युतवेगाने कसलीशी ओटू किंवा एचटूओ अश्या नावाची सिटी वसते... आणि ते घर, ते रान, ती होळी, ती डरकाळी, ती पायवाट, ते ताट, ती ‘वाकाळ’ आणि ती सकाळ... सारं सारं हरवून जातं... सह्याद्रीची ती भारदस्त सोंड हवी तशी कोरली जाते... चक्क पंचतारांकित रेस्तराँ उभे रहातात.. पूल.. क्लब... हॉटेल्स.. बंगले, व्हिलाज... कित्येक प्राणी पक्ष्यांना त्यांच्या फर्स्ट होम मधून बेघर करून सेकंड होम्स उभी राहतात.. सांगण्यात येतं कि अमुक गडावरची हि वाट बंद झाली आहे वळसा घालून जा.. हि अमुकची प्रॉपर्टी आहे... इथे पण प्रोजेक्ट येणार आहे... वगैरे वगैरे... याही वेळेला तुमची पावलं जड होतात.. कुठतरी तरी पूर्वीची एखादी खुण सापडेल का?...

... मी मैत्रिणीचं “कौतुक” करण्याऐवजी “डोंगर पोखरल्यागेल्याचं” दुख: झालं म्हणतो...

तिला विचारतो, “...कधी दिवाळीच्या सुट्टीत गावी घराबाहेर ओट्यावर चांदणं मोजता मोजता तुझा डोळा लागलाय?”
ती म्हणते “मला गाव नाही...”
मी वरमतो... तिला सॉरी म्हणतो...
ती “का” विचारते..
मी “काही नाही” म्हणतो...

आणि त्या रात्री कसल्याश्या अस्वस्थतेने गाडगीळांच्या आणि कस्तुरीरंगनांच्या अहवालाची तुलना करत बसतो...

@ सौमि - २९ मे २०१४

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सौमिजी, ज्यानी 'ओरिजिनल' अनुभवलंच नाही त्याना 'इमिटेशन'चंच अप्रूप !!! पण 'सेकंड होम' ही लोभस संकल्पना मात्र असल्या बेगडी निसर्गसानिध्याच्या रेट्यामुळे डागाळूं नये !!

म्हणूनच माझ्या त्या मैत्रिणीला "मनापासून" सॉरी म्हटलं.. तिने ते अनुभवलंच नव्हतं कधी.. सह्याद्री ज्या पद्धतीने पोखरला जातोय... काळजी वाटते.. मिपावर मला चक्क कोल्ह्याला द्राक्ष आंबट असा सुद्धा प्रतिसाद मिळाला.. म्हणजे या असल्या वसाहती म्हणजे द्राक्षाचे घड वाटणारे हि कमी नाहीत..

नक्की प्रोब्लेम काय आहे?
गावातल्या लोकांनी अनादी-अनंत काळ त्याच अवस्थेत रहावे आणि फ़क़्त जिथे आधीच निसर्गाची हानी झाली आहे किंवा जिकडे निसर्गसौंदर्य आधी होते हे तुम्हाला/ मला माहित नाही तिकडे आणखी हानी करा पण मी सह्याद्री पाहिलाय मग तो तसाच राहिला पाहिजे. असं म्हणायचं का तुम्हाला?
का नीट नियम करून / ते काटेकोर पाळून नवीन वसाहती/ शहरे वसवा. हे ठीक वाटत? शून्य हानी आणि पूर्ण विकास हे दिवास्वप्न नाही का वाटत?
शांघाय/ कॅलिफोर्निया मी विकासाचा समानार्थी शब्द म्हणून घेतलं. तुम्हाला काही वेगळे अभिप्रेत असेल तर माहित नाही.

सौमि - तुम्हाला अनुमोदन. सेकण्ड होमच्या नावाखाली न वापरल्या जाणार्‍या किंवा क्वचितच वापरल्या जाणार्‍या घरांसाठी निसर्गाचा जो नाश होतोय त्याला आवर घालायलाच हवा. माझ्या माहितीत असेही अनेक लोक आहेत हे शहरात सुद्धा एक राहायला दुसरं, तिसरं, चौथं घर इन्व्हेस्टमेंटसाठी घेतात. स्वतः त्यात राहात नाहीच पण त्यातले काही जण ते भाड्यानेही देत नाहीत. त्यातले काही जण त्या घरात कधीही राहणार नसतात. काही जण कायमसाठी देश सोडून बाहेर गेलेले असतात. खरच एवढ्या बांधलेल्या प्रॉपर्टीजची गरज एका कुटुंबाला असते का? तुमच्या पैशाचा तुमच्या स्वतःसाठीच अधिक सदुपयोग करू शकत नाही का?

अमितव+१

>> उजाडल्यावर जडावलेल्या हृदयाने आणि पावलांनी तुम्ही निरोप घेता पुन्हा भेटू म्हणता...
निरोप घेऊन जिथे जाता तिथेही हिरवाई छेदूनच घरं बांधलीत ना?

वेल, पोस्ट पटली नाही. रिअल इस्टेट इन्वेस्टमेंट हाच त्यांच्या पैशाचा सदुपयोग आहे असं त्यांना वाटत असेल तर?

बांधलेली घरे घेऊन ती रिकामे ठेऊन देण्यापेक्षा जमिनी विकत घेऊन त्यांचे अ‍ॅग्रो डेव्हलपमेण्ट हदेखील एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो.

मला लेखामागची भावना समजतेय पण घरं न बांधणं हा उपाय होउ शकत नाही असं वाटतय.
जितकी झाडं तोडली जातात त्या प्रमाणात ती जमिन घरांसाठी रिसॉर्ट्साठी डेव्हेलप करणार्‍यांनी नविन झाडं लावण्याबाबत नियम असावेत आणि त्यांची अंमलबजावणी व्हावी.

>>बांधलेली घरे घेऊन ती रिकामे ठेऊन देण्यापेक्षा जमिनी विकत घेऊन त्यांचे अ‍ॅग्रो डेव्हलपमेण्ट हदेखील एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो.>> असेल पण भारताबाहेर राहणार्‍यांना घरं विकत घेऊन त्यात पैसे गुंतवणं शक्य वाटत असल्यास तुम्ही, आम्ही काही करू शकत नाही ना?

गाडगीळांचा अहवाल इत्यादी संदर्भ इथे उगाच वाटतात. कारणे न पटण्यासार्खी. स्थानिकांना देशोधडीला लावून असे प्रकल्प होउ नयेत हे ठिक पण लेखाचा सूर तो दिसत नाही.
बाकी ज्याला गाव नाही त्याला सॉरी म्हणणे हे अंमळ विनोदी वाटले.

बाकी ज्याला गाव नाही त्याला सॉरी म्हणणे हे अंमळ विनोदी वाटले.
>>>>>>>>

मला याउलट नेमके हेच भिडलं.
आपली पोस्ट कोट केली ते विरोध करायला नाही तर मी माझा प्रतिसाद यावरच लिहिणार तेवढ्यात नेमके हे दिसले म्हणून उचलले.

आमचे गाव कोकणात, जिल्हा सिंधुदुर्ग. निसर्गाची पुरेपूर देणगी. दुर्दैवाने स्वताचे हक्काचे घर नाही. चुलतचुलत काकांचे आहे पण ते दोनचार वर्षांनी सणासुदीला (अर्थात गणपतीला) एखाद दिवस जावे इतकेच. मात्र त्याची भरपाई करायला कोकणातल्या कित्येक मित्रांची गावे भटकलोय. आजोळी (कणकवलीला) सुद्धा मुक्कामाला जाणे होते. तरीही गावाला आपले घर नाही हि सल आहेच. त्यामुळे मला कोणी गाव विचारल्यास आमच्या गावाबरोबर मुद्दामहून आईच्या गावाचे नावही सांगतो कारण तिथे जास्त वेळा जाणे झालेय. हेतू एवढाच की गावाशी नाळ अजून जोडली आहे हे कुठेतरी सुखावते आणि त्याचा अभिमानही वाटतो. (भले जन्मापासून मुंबईकर का असेना)
सध्या घर बांधायचे प्रयत्न चालू आहेत आणि काही अडचण नाही आली तर इन्शाल्ला माझ्या मुलांच्या मनात ती सल राहणार नाही. अर्थात त्यांची आवड कशी असेल ते आता सांगता येत नाही.

असो, तर मलाही जेव्हा कोणी गाव नसलेला भेटतो तेव्हा त्याच्याबद्दल सॉरी फील होते. समदुखी वाटतो. भले त्याला काही वाटत असेना नसेना.. Happy

मला वाटतं ह्या लेखामधे मांडलेल्या स्थितीला दोन बाजू आहेत; पहिली व्यक्तीनिष्ठ तर दुसरी सार्वजनिक / सामाजिक.

शहराच्या गर्दीपासून दूर , निसर्गाच्या सानिध्यात रहाण्याची खरी तळमळ सर्व सुखसोयीनी, मनोरंजनाच्या पंचतारांकित उपलब्धतेने युक्त अशा आलिशान वसाहतींत शांत होईल का , हा झाला व्यक्तीगत भाग. वर कुणी तरी म्हटल्याप्रमाणे तिथल्या निसर्गाशीं स्वाभाविक जवळीक असलेल्या स्थानिक वातावरणांत राहून, तिथल्या नैसर्गिक अडचणींशीं जुळवून घेत स्वच्छंदीपणे भटकत तुम्ही जो आनंद मिळवूं शकाल त्याची सर इतर कशालाच येणार नाही. मीं स्वतः हा आनंद अनुभवला आहे व म्हणून मीं या मताशीं सहमत आहे. इतरांचा अनुभव वेगळा असूं शकतो व त्यानुसार त्यानी आपल्या 'सेकंड होम'ची निवड करण्यात अर्थात कांहींच गैर नाही.

सामाजिक पैलूच्याबाबतींत माबोवर 'लवासा'च्या संदर्भात प्रदीर्घ चर्चा झालेली आहे. कांटेकोर नियम करून सुनियोजित, पर्यावरणाला पोषक व सुखसोयीनी युक्त अशा वसाहती 'सेकंड होम'साठी निर्माण करण्याबद्दल
कुणाचाच आक्षेप असायचं कारण नाही; पण असे कांटेकोर नियम केले जात नाहीत, केले तरी धनदांडगे व सत्ताधीश यांची युतिच ते धाब्यावर बसवते, ही खेदजनक वस्तुस्थिती आहे व इथंच तर खरी ग्यानबाची मेख आहे !!

आवडला लेख. दुर्मिळ होत जाणार्‍या अनुभवाचे वर्णन खूप छान आहे! सुरूवातीचे सह्याद्रीचे वर्णन बर्‍याच वेळा अनुभवलेले असल्याने खूप आवडले.

निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जाणार्‍यांनी, त्यांच्यासाठी सुविधा निर्माण करणार्‍यांनी मूळ ज्या गोष्टीसाठी-निसर्गासाठी-लोक येतात त्याचाच नाश करू नये, तेथे उपर्‍या दिसणार्‍या गोष्टी करू नयेत असे मत आहे असे मला वाटले, आणि ते पटले.

एखाद्या वस्तीच्या ठिकाणी विकास करायला- म्हणजे तेथे राहणार्‍या लोकांना जास्त सुविधा मिळवून द्यायला- जे करावे लागते ते अपरिहार्य असते, त्याला काहीच विरोध नाही.

मला स्वतःला एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाउन तेथील लोकांसारखेच राहणे आवडणार नाही. पण मला (म्हणजे माझ्यासारख्या शहरी ग्राहकाला) सोयीचे वाटेल म्हणून तेथे एक बेढब रंगीत हॉटेल कोणी बांधावे असेही मला वाटत नाही.

निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जाणार्‍यांनी, त्यांच्यासाठी सुविधा निर्माण करणार्‍यांनी मूळ ज्या गोष्टीसाठी-निसर्गासाठी-लोक येतात त्याचाच नाश करू नये, तेथे उपर्‍या दिसणार्‍या गोष्टी करू नयेत>> हे मला ही पटतंय.
पण मूळ लेखात,
>>मला ती ओळीने उभी असलेली घरं, ती हॉटेल्स अक्षरशः ओंगळवाणी वाटली. भडक रंगाच्या त्या इमारती, त्या कृत्रिम बागा. एखादया खानदानी शालीन सुंदरीवर अनावश्यक मेकअपची पुटं चढवून तिच्यावर लादलेल्या या कृत्रिम सौंदर्याचे प्रदर्शन मांडावे तशी...>>

हे आदर्श जगात पटतंय, पण मग कोकणी माणसाला आपलं राहत घर अपुरं पडत असेल, त्यात सोयी कमी पडत असतील आणि सिमेंटचा ठोकळा बांधणे हे सुबक घरापेक्षा स्वस्त पडत असेल आणि तो/ ती बजेट घर बांधू इच्छित असेल तर त्याने काय करावे? छान टुमदार/ बैठ// चोसोपी वाडे / ओटी- पडवी -माजघर मलाही आवडतीलच. पण मला असं वाटत की ते गरजाच्या उतरंडी मध्ये थोडं नंतर येईल. आता पारंपरिक कोकणी घरात एका खोलीतून दुसरीकडे जायला इतक्या पायऱ्या असतात, कोणाला सांधेदुखी असेल तर त्याला बराच त्रास सहन करावा लागतो. साधा walker घेऊन चालणे मुश्कील होते. त्याची/ तिची सोय नक्कीच जास्त महत्त्वाची. सुवर्णमध्य काढता आला तर सोन्याहून पिवळं.
जिथे कफ परेड/ नरीमन पोइन्ट च्या इमारतीची बाहेरून डागडुजी/ रंगरंगोटी वर्षानुवर्ष कोणी करत नाही तिकडे कोकणातल्या माणसावर अशा अपेक्षा थोड्या खटकतात.

अमेरिका इतके वर्ष नैसर्गिक साधनसंपत्तीचा अमाप वापर करून म्हणते आता भारताने प्रदूषण कमी करावे, असं वाटलं थोडसं. Happy

भाऊ आणि फारेंड, एकदम अचूक!
कोकणात ही गोष्ट मनाला सतत डाचते. शहरातल्या लोकांना हव्या तशा सोयी पुरवायचा अट्टाहास जोरात आहे. स्थानिक आर्किटेक्चरप्रमाणे बांधलेले घर असेल तिथल्या हवामानाचा त्रास होणारही नाही पण झाडे तोडून काँक्रिट्चे रिसॉर्ट बांधायचे आणि मग शहरातल्यांना गैरसोय नको म्हणून त्यात एसी लावायचा, सगळा घोळ आहे!

गावातल्या लोकांनी अनादी-अनंत काळ त्याच अवस्थेत रहावे आणि फ़क़्त जिथे आधीच निसर्गाची हानी झाली आहे किंवा जिकडे निसर्गसौंदर्य आधी होते हे तुम्हाला/ मला माहित नाही तिकडे आणखी हानी करा पण मी सह्याद्री पाहिलाय मग तो तसाच राहिला पाहिजे. असं म्हणायचं का तुम्हाला?...............................अनुमोदन!

पण येथे तर 'सेकण्ड होम्स' बद्दल लिहीले आहे ना? गावाकडच्या लोकांनी तसेच राहावे ई कोठून आले?

<< गावातल्या लोकांनी अनादी-अनंत काळ त्याच अवस्थेत रहावे आणि फ़क़्त ....आणखी हानी करा पण मी सह्याद्री पाहिलाय मग तो तसाच राहिला पाहिजे. असं म्हणायचं का तुम्हाला? >> इथं वाद सुरूं करायचा नाही पण मूळ मुद्याचं हें उत्तर नाही ,हें सांगितल्याशिवाय रहावतही नाही. कोकणात व इतरत्र अनेक ठीकाणीं आपल्या पारंपारिक घरांतील गैरसोयी दूर करणं, त्यांत नविन मूलभूत सोयींची तरतूद करणं ह्या गोष्टी शैक्षणिक व आर्थिक प्रगतिनुसार लोकानी सुरूं केल्याच आहेत आणि त्या स्वागतार्ह व अनुकरणीयही ठरताहेत.
अत्यंत महागड्या पंचतारांकीत वसाहती निर्माण करून गांवातल्या लोकांच्या अवस्थेत फरक पडणार आहे, हें मात्र पचनीं पडणं कठीण आहे. [ औद्योगिक वसाहतींचेही अनेक गैरफायदे असले तरी त्यांमुळे निदान स्थानिक सर्वसामान्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची शक्यता तरी असते !]

गावातल्या लोकांसारखे जगणे म्हणजे काय्?गावात सुविधा कमी असणे म्हणजे काय?गावात जाऊन गावातल्या लोकांसारखे राहता न येणे म्हणजे काय?

गावं ही ऑलरेडी विकसीत असतात/होती.ते शहरातलं बघायचं आणि काहीतरी बटबटीत,हस्यास्पद बदल करायचे हे गावाकडली मंडळी आजकाल सर्रास करत असतात.

पण तिथल्या माणसांचं शहाणपण हे तात्विक असतं.घराचे दरवाजे उघडे असतात.ओसरीवरच्या बैठकीत कृत्रिमता नसते.आजही मला ते लहानपणीचं गांव आठवते जेव्हा सगळी भावंडं उन्हाळ्या-दिवाळीच्या सुट्टीत जमायचो.ती एकच वाकळ घेऊन सगळे त्याखाली झोपायचो.सकाळी ते घागरी/रहाटाचे आवाज.स्वच्छ चुलीचा धूरसुद्धा धूपासारखा वाटायचा.कौलारातून बाहेर पडणार्‍या त्या धुरांच्या रेषा.उघड्यावर दंगा घालत रेडकासोबत केलेल्या आंघोळी...घरातल्या बायकांनी एकत्र केलेला स्वयंपाक आणि ती उबदार पंगत.सगळं कुठतरी हरवलं हो...कुठतरी खोल बुडालं.जर मला तिथेच वर्षभर राहायची संधी मिळाली असती तर नक्कीच तसं केलं असतं.

खेड्यांची जपणूक ही झालीच पाहीजे.तिथे विकास नाही ही फक्त रड दिसते.खेड्यातल्या प्रत्येक उणीवेतच विकासाची संधी आहे.केवळ शहरं कॉपी करण्याची टूम थांबली पाहिजे.खेड्याने त्याचं अस्थित्व जपलंच पाहीजे.मी जरा जास्तच मागतोय का? की जे आमच्याकडे होतं,ते आम्ही हरवलं आणि तेच आता आम्ही परत मागतोय?

सेकंड होमच्या कन्सेप्टमध्ये आणता येईल हे? तसं झालं तरच काही...
ध.

फारेण्ड +१
अमितव यांच्या पोस्टच्या संदर्भाने : लेख 'निसर्गाच्या कुशीत' बांधल्या जाणार्‍या सेकण्ड होम्सबद्दल आहे. मूळच्या कोकणात राहणार्‍यांच्या फर्स्ट & ओन्ली होमबद्दल नाही. त्यांनी आपल्या घरांत हवे तसे बदल करण्याबद्दल या लेखात काही लिहिलेले नाही. त्याबद्दल कोणाचा आक्षेप असायचे कारणही नाही. नाहीतर तांबड्या मातीच्या वळणावळणाच्या वाटा छान दिसतात म्हणून डांबरी रस्ते नको असे कोणी म्हणत नाही.

सेकण्ड होम्सच्या स्वतंत्र वसाहती निसर्गाच्या कुशीत घेऊन जातात की निसर्गाची कूस पोखरतात?

Pages