जाहली दुनिये तुझ्यासाठी क्षणाची मस्करी!

Submitted by profspd on 29 May, 2014 - 04:53

जाहली दुनिये तुझ्यासाठी क्षणाची मस्करी!
मात्र ती थट्टाच माझ्या बेतली प्राणावरी!!

जिंदगी जगलो जुगारासारखी मी नेहमी....
लागले खेळायला, नव्हतो जुगारी मी जरी!

कामधंद्याच्याच रे, शोधात गेला जन्म हा.....
शेवटी कळले मला नशिबात नव्हती भाकरी!

एकदा चुकलो परंतू हेच शिकलो त्यातुनी.....
ओळखावी आपली आपण स्वत:ची पायरी!

उंबरा बघ, काय माझा सारखा पुसतो मला....
वाट तूही वाकडी करशील का केव्हातरी?

क्षेम तू पुसतोस माझे, हे न थोडे थोडके....
बिघडली मध्यंतरी तब्येत पण, आता बरी!

खूप मी बोलायचे ते घोकतो पण, विसरतो.....
एकदा मुद्दाम तू डोकाव माझ्या अंतरी!

हे बरे झाले गरीबीने मला त्या जाळले....
वाटले दुनियेस की, केली दिवाळी साजरी!

का मला सत्कारती ते शेवटी कळले मला....
मिळवती ते कैक गोष्टी माझिया नावावरी!

शायराचे दु:ख कळण्या शायराचा जन्म घे....
जीव खाते कैकदा माझाच, माझी शायरी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users