एक सुगंधीत जखम…. "ती"…!

Submitted by चेतन.. on 28 May, 2014 - 03:44

विधात्यानं दिलेलं हे जगणं जगताना प्राक्तनाशी भातुकलीचा खेळ खेळण्याचा खूपदा प्रसंग येतो. प्राक्तनाशी खेळला जाणारा हा खेळ भातुकलीचा म्हणायचा तो एव्हढ्यासाठीच कि तो कधी न कधी संपणारा असतो म्हणून आणि भातुकलीचा खेळ जरी संपला तरी तो तात्पुरताच संपतो... तो कधीच कायमचा संपत नाही. दिवस बदलत जातात. आपण बदलत जातो. ह्या भातुकलीच्या खेळाचं स्वरूपसुद्धा बदलत जातं. पण हा खेळ खेळण्याचं आपण टाळू कधीच शकत नाही. मग हा खेळ खेळताना आपण ठेचकाळतो, पडतो. जखम होते…. जखमाही होतात. काही बर्या होतात. काही बर्या होतायेत असं वाटतं पण नंतर डोकं वर काढतात. आणि ज्या कधीच बर्या होत नाहीत त्यावर आपण काळ नावाचं औषध शोधतो आणि त्याच्या परिणामाची वाट बघत बसतो. मुळात काळ असतो तरी काय?? एक कोरा कागद असतो.... कोरा कागद… त्यावर आपणच काहीतरी लिहित असतो... प्रत्येक क्षणी.. प्रत्येक वेळी...! प्रत्येकाने डायरी लिहायला हवी असं का म्हणतात?? तर आज आपण केलेली कृती, झालेली जखम…. काही काळानं खरंच योग्य होती..का.. नव्हती.... हे पडताळण्यासाठी. आज आपण १००% बरोबर असू... पण उद्या??... काहीकाळानं आपल्यालाच त्यातला फोलपणा जाणवू लागतो कारण आपण त्याच आपल्या गोष्टीकडे त्रयस्थवृत्तीने बघू लागतो आणि ज्यातला फोलपणा कधीच जाणवत नाही आणि जिच्याकडे आपण त्रयस्थवृत्तीने कधीच बघू शकत नाही.... ती आणि तीच जखम सुगंधीत होते.... प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखाददुसरी सुगंधीत जखम असते कि नाही हे मला माहित नाही.... पण माझ्या आयुष्यात आहे अशीच एक सुगंधीत जखम …… "ती"…… !

एके दिवशी ऑफिस मध्ये माझ्या पी सी ची विंडो अनलॉक करताना मित्र मला म्हणाला.
"काय करतोयेस?"
"जेवण"
"पण इथेतर काहीच नाही दिसत…"
"नाही. तरीही करतोय… काही अडचण...? दिसतंय ना काय करतोय ते... उगाच विचारायचं … काय करतोय न काय करतोय.."
"कॅफेत चल.."
"नको … आत्ताच आलोय तिकडून.."
"चल… कोणीतरी तुझ्यासाठी थांबलंय तिथे.."
"कोण?"
"चल तर..."
मग आम्ही दोघं कॅफेत गेलो. तर एका टेबलावर "ती" बसली होती. जवळ जाताच आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो.. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एका अनोळखी मुलीकडे पाहून मी हसलो असेन आणि तेही पहिल्याच भेटीत.. मित्र म्हणाला कि तुम्ही दोघं बोलत बसा मी निघतो. मला कळायला मार्ग नव्हता कि मला इथे थांबवून हा कुठे निघालाय म्हणून. मी त्याला काही विचारणार एवढ्यात ती मला म्हणाली…
"तू चांगल्या कविता करतोस म्हणे"
"हम्म" तिचा 'चांगल्या कविता' वरचा टोन मला आवडला.
"तुझाच मित्र म्हणत होता..."
"बरं..."
"ऐकवशील?"
मी खूप सुंदर कविता लिहित नसेन. पण माझ्याघरी असलेल्या काही ट्रॉफ्या मला नेहमी सांगतात कि मी काही वाईट लिहित नाही. कोणा एक व्यक्तीला असं काही ऐकवायच्या बाबतीत मी अत्यंत उदासीन असतो कारण मनासारख्या प्रतिसादाची हमी नसते. म्हणून उगाच हिरमोड करून घेण्यापेक्षा मौन राखणं कधीही चांगलं म्हणून मी फारसं कोणाला ऐकवत नाही. आणि आपण होउन तर कधीच नाही. हां.... आता एक मुलगी.. स्वतः होऊन.. जर काही म्हणायला सांगत असेल... तर नाही म्हणायला मी काही अगदीच "हा" नाही.
"कशाप्रकारच्या कविता तुला आवडतात?"
"तसा प्रकार वगैरे मला नाही कळत पण ऐकायला जे काही चांगलं वाटतं ते सारं आवडतं... तुला जे काही ऐकवावं वाटतं ते ऐकव.."
"प्रेम वगैरे??"
"चालेल.."
"नाही… नको… घरंच ऐकवतो.. "
"अ‍ॅज यु विश.." ती किंचतसं हसून म्हणाली.
"ठीके मग घरंच ऐकवतो..."
मग मी तिला घर ऐकवायला सुरुवात केली...
"ऐक हं … ही आधीच्या आणि आत्ताच्या घराची तुलना आहे बरं.. "
"बंर..." आठ्या उंचावून ती म्हणाली.
.
.
ते दिवस केंव्हाच गेले जेंव्हा घरं आस्तित्वात होती…

आधी घरं खूप साधी होती…. सारवलेली जमीन सुद्धा मऊ गादी होती…
बघणार्यालाच दृष्ट लागावी… तश्शी अगदी होती…
स्वयंपाकाचा वास दरवळताच अंगणात पाखरं यायची…
चोचीत दोन चारच दाणे घेऊन पोटभर आशीर्वाद देऊन जायची…
अंगणामधली तुळस सुद्धा नं चुकता जपली जात होती…
ते दिवस केंव्हाच गेले जेंव्हा घरं आस्तित्वात होती… !!

घरं तेंव्हा कसं भरलेल्या गोकुळासारखं वाटायचं…
घरात एक कोणी नसलं तरी घर खायला उठायचं...
भिंतीसोबत लगतची ही नातीसुद्धा पातळ झाली…
आंतरिक तळमळ नंतर तोंडदेखली वळवळ झाली…
आजची हातातली नाती… तेंव्हा काळजात होती…
ते दिवस केंव्हाच गेले जेंव्हा घरं आस्तित्वात होती… !!

आईबाबांनी हात उगारताच जवळ घ्यायला आजोबा होते…
आज्जीच्या गोष्टीतून हळूच डोकावणारे चांदोबा होते…
खूप छान झोप लागायची आज्जी-आजोबांच्या त्या मांडीवर…
प्रत्येक घरात फुलं फुलायची अशी पिकलेल्या फांदीवर…
आजच्या सारखी तेंव्हा बेसुमार वृक्षतोड नव्हती…
ते दिवस केंव्हाच गेले जेंव्हा घरं आस्तित्वात होती… !!

कडाडणार्या उन्हात सावली देणारं ते छत होतं…
त्या छताखाली प्रत्येकाला स्वतःचं असं मत होतं…
तरीही थोरांचे बोल ऐकणारे लहानांना तेंव्हा कान होते…
आणि दाराजवळच्या उंबरठ्याचे प्रत्येकाला भान होते…
देवघराच्या सांजदिव्यात संस्काराची वात होती…
ते दिवस केंव्हाच गेले जेंव्हा घरं आस्तित्वात होती… !!

सार्या नात्यांना एकत्र बांधणारं प्रेमाचं ते सूत्र होतं…
सारे दिवे जरी विझले तरी अखंड जळणारं जनित्र होतं…
एकाच्या दुःखाचा प्रवास … सार्यांच्या डोळ्यातुन व्हायचा…
एखाद्यावर प्रेमाचा वर्षाव … सार्यांच्या झोळ्यातून व्हायचा…
सार्यांचीच तळी प्रेमानं भरलेली काठोकाठ होती…
ते दिवस केंव्हाच गेले जेंव्हा घरं आस्तित्वात होती… !!

आणि शेवटचं कडवं…

हां… अधूनमधून कधी... जुनी घरं भेटतातही…
नको नको … म्हणत असतानाही गात्र पेटतातही…
घर सुंदर आधीचं … प्रेम भरल्या नदीचं…
पापण्यांनाही वाटावं … मिटू नये गं कधीचं…
पण अश्या ठिकाणी गेलेली… माझी एखाददुसरीच रात होती…. .
कारण….
ते दिवस केंव्हाच गेले … जेंव्हा अशी घरं …. जागोजागी आस्तित्वात होती...

…… आणि एकदाची कविता संपली

साधारण अपेक्षेने कर्णधाराने एका नवख्या फलंदाजाकडे बॅट द्यावी आणि पहिल्याच मॅच मध्ये त्याने शतक झळकवावं आणि त्यांनंतर त्या कर्णधाराच्या चेहर्यावर जे काही भाव असतील तसे काही भाव मला तिच्या चेहर्यावर दिसले.

ह्या कवितेनं मला आत्तापर्यंत स्पर्धांमधून थोडीफार बक्षिसं दिली आहेत. पण तिच्या नात्याच्या रुपानं एक चालतं - बोलतं बक्षीस मिळालं…

खरंतर आम्ही तोपर्यंत फारसं म्हणजे काहीच बोललो नव्हतो … पण ह्या निमित्तानं निदान एकमेकांकडं बघणं … हसणं … तोंडदेखले हाय - बाय सुरु झाले…

ती दिसते कशी? ती राहते कशी? ती बोलते कशी? ती वावरते कशी? ह्याचा विचार फारसा माझ्याकडुन झालाच नाही. मुळात एव्हढा विचार करायला काहीतरी "शक्यता" असायला हव्यात. पहिल्यापासूनच पेटत असलेल्या रेड सिग्नल ची जाणीव होती म्हणूनही असेल ते कदाचित. पण अगदी आतुरतेने तिची वाट बघणं… आपण होऊन काहीतरी काम काढून तिला भेटणं... असं कधी माझ्याकडून झालं नाही… पण अधूनमधून तिच्याकडून सुगंध शिंपडला जायचाच….!

तिला अधूनमधून बोर होऊ लागलं कि ती चहाला बोलवायची आणि काहीतरी ऐकव म्हणायची (असं फार वेळा नाही पण दोन तीन वेळाच झालं). मला आवडायचं तिला ऐकवणं… दाद देण्याचे दोन प्रकार असतात… एक अगदी खुली दाद असते… व्वा व्वा म्हणून किंवा टाळ्या वाजवून वगैरे… आणि दुसरी दाद ही खूप संयमित असते… तिची दाद दुसर्या प्रकारात मोडायची… तिला काही आवडलं कि तिच्या डोळ्यात एका प्रकारची चमक उतरायची… आणि तीच्या डोळ्यातली चमक मला खूप उत्साहित करायची…

काय लिहू तिच्याबद्दल???.... एखाद्या चित्रपटाचा रिव्ह्यू जर लिहायचा असेल तर निदान तो तीन तासाचा चित्रपट बघावा लागतो… आमच्या मधलं एकूणच संभाषण त्यापेक्षाही खूप कमी होतं… तरी म्हणतात ना....

एक क्षण भाळण्याचा …. आणि बाकीचा सारा काळ स्वतःला सांभाळण्याचा… तसंच काहीसं माझ्याबाबतीत झालं..

मी खूपदा प्रयत्न केला तिला जाणून घ्यायचा… पण कधी तसं बोलणं झालंच नाही. कधी कधी तिचे डोळे भरून आलेले दिसायचे… पण विचारावं नाही वाटलं काय झालंय ते… कदाचित उत्तर मिळणार नाही ह्याची खात्री असेल... म्हणूनही असेल…

तिच्याकडून मला काही सिग्नल्स मिळाले आणि मी वहावत गेलो असं कधीच झालं नाही… पण मलाच नंतर नंतर आवडू लागलं तिच्यासोबत असणं… कसंय … चंद्र उगवतो आणि मावळतो…. चांदणं कोणावर किती बरसवायचं त्याचं कुठलंही गणित त्याच्या डोक्यात नसतं… तो आपलं सर्वांवर सारखं चांदणं पसरवून देतो. घेणारेच त्याचा अर्थ काढत बसतात… आता त्याचा कोणी काय अर्थ काढतंय ह्याचं त्याला काहीही देणं वा घेणं नसतं…. तसंच तिचं होतं. ती यायची आणि जायची… पण माझ्यासाठी ती फक्त यायचीच…

पारदर्शकतेला जर पाणी आणि काच सोडून कुठे दुसरीकडे जन्म घ्यावा वाटला तर तिचे डोळे हा अगदी उत्तम पर्याय आहे असं मला नेहमी वाटतं…

मला बर्याचदा प्रश्न पडतो … आम्ही एकमेकांचे चांगले दोस्त तरी होतो का? कधी खूप बोललो, भेटलो, फिरलो असं कधीच झालं नाही. माझ्या मोबाइलमध्ये तिचे हार्डली चार पाच मेसेजेस असतील. तेही अगदीच फॉर्मल… आधी काहीच नं वाटणं ते नंतर सर्वस्व वाटणं हा प्रवास खुद्द माझ्यासाठीच अगदी अनाकलनीय होता .. अर्थात अजूनही आहे. तिच्यामध्ये माझं सर्वस्व शोधण्याचा प्रवास सुरु झाल्या झाल्याच जो काही मोठ्ठा स्पीड-ब्रेकर आडवा आला. त्यामुळे माझी गाडी काही पुढे जाऊच शकली नाही. अर्थात माझं डेस्टीनेशनही वेगळं होतं. पण… आता ह्या "पण" लाही फारसा अर्थ नाही….

वस्तुस्थितीला शक्यतेचं जेव्हढं जास्त पाठबळ असतं तेव्हढ्याच प्रमाणात आयुष्यामध्ये आशा आणि अपेक्षा जिवंत राहतात. इथेतर शक्यतेला कुठलंच पाठबळ नव्हतं आणि मला त्याची जाणीव नव्हती असं नाही. मला माझं घर केव्हढंय हे माहित होतं… त्याची खिडकी केव्हढी आहे हेही माहित होतं … आणि त्या खिडकीतून केव्हढं आभाळ दिसतं हेही माहित होतं. मला त्या आभाळावर सत्ता गाजवायची नव्हती. मला फक्त माझ्या खिडकीतून, त्या आभाळाला, ते आभाळ कसं दिसतं एव्हढंच सांगायचं होतं… पण आता ते आभाळच जर रुसलेलं असेल तर मलाच माझी खिडकी बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता… आणि मी ती केली…

मी पद्यात लिहायला लागलो तेंव्हा जर मला कोणी सांगीतलं असतं कि काही काळानंतर मी गद्यात लिहायला लागेन, तर मी कितपत विश्वास ठेवला असता मला माहित नाही. मला तिच्याशी खूप बोलायचं होतं. आणि जे कधीच बोलता आलं नाही त्याचं जे काही तडफडणं होतं… त्यावर उपाय म्हणून मी गद्यात लिहायला सुरुवात केली. आणि जरा बरं वाटु लागलं. मला खूप छान जमत नसेल … माझा तसा दावाही नाही. पण मला जरा बरं वाटतं हे मात्र १००% खरं….

जेंव्हा तिचं फटकारणं अनुभवाला आलं… तेंव्हाच ठरवलं कि नाही … आता तिच्या वाटेत नाही जायचं … तिच्या वाटेचा लांबून जरी अंदाज आला तरी मी माझी वाट वळवायला लागलो. सुरुवातीला त्रास व्हायचा जरा पण नंतर तेही अंगवळणी पडलं.… तरी तिच्या असण्याचा अंदाज घेणं काही चुकायचं नाही. म्हणजे ती आलीये एव्हढंच माझ्यासाठी पुरं असायचं. काही महिन्यांआधी ती बरेच दिवस दिसली नाही, इकडे आमच्या मनात आंदोलनं सुरु झाली. मनात नाही नाही ते विचार सुरु झाले. नाही नाही ते म्हणजे काय तर तिचं जमलं असेल.... साखरपुडाच उरकून येईल वगैरे वगैरे… खूप अस्वस्थ झालो. पित्त उसळलं. कोणाला विचारायची पण पंचाईतच होती. तसेच ते दिवस काढले. काही दिवसांनी ती दिसली. मी दुसरीकडे कुठेच पाहिलं नाही.. सगळ्यात आधी तिच्या हातांकडे पाहिलं… आणि सुटकेचा निःश्वास टाकला. तिचे हात मेहंदीने रंगलेले नव्हते. नंतर मात्र मी अधाशासारखा पोटभर नाश्ता केला. इतक्या दिवसाचा बॅकलॉग भरून काढायचा होता ना….!
च्यायला.... माणसाचं मन कसलं विचित्र असतं ना… आता माहिते सगळं तरी… अजून ती कोणाची झालेली नाहीये ही भावनाच आपल्याला फार मोठ्या कम्फर्ट झोन मध्ये ठेवते.. मग भले ही तो झोन हा आपल्या आभासी मनोवस्थेचं प्रतीबिंब असेल... ती एक दोन दिवस जरी दिसली नाही तरी भूक बंद घोषित करायची… झोप संप पुकारायची…. मधूनच श्वासोच्छ्वासाचा वेग वाढायचा… म्हणजे नॉर्मल जसं होतं तसं व्हायचं बाकी काही नाही. आणि सगळ्यात म्हणजे…

"इवल्याश्या देही, किती उलाढाल, तिच्या लेखी झालं, काही नाही..!"

ह्याचाच कदाचित जास्त त्रास व्हायचा…

जगणं म्हणजे काय?? प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या असते….असायलाच हवी… नाहीतर समाज अगदीच मोनोटोनस होईल. माझ्यातरी दृष्टीकोनातून, आपलं आयुष्य काळाच्या पदराआडून आपल्याला काही मागण्या मागत असतं… त्या मागण्या पूर्ण करणं म्हणजे जगणं… आणि ज्या प्रमाणात आणि ज्या प्रकारे आपण त्या मागण्या पूर्ण करतो त्याच प्रमाणात आपलं आयुष्य समृद्ध होतं असं मला वाटतं… मला ती आवडावी ही माझ्या आयुष्याकडून आलेली मागणी होती आणि ती मी माझ्यापरीने पूर्ण केली… करतोय. पण…… हा पण आता विचारायचा नाही…
.
.
काही दिवसांपूर्वी पुन्हा ती काही दिवस दिसली नाही… पुन्हा सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती झाली. नंतर काही दिवसांनी ती दिसली... पुन्हा ती चुकार नजर अधाशीपणाने तिच्या हातावर गेली… आणि डोळ्यातून अश्रू भरून आले.…. आगंतुक पाहुण्यांसारखे.…. ह्यावेळी तिचे हात नकोश्या अपेक्षेप्रमाणे मेहेंदीने रंगलेले दिसलेच… आणि त्यावेळी…. अगदी त्यावेळी मनात आलं….
.
.
.
.
तिच्या मेहेंदीच्या सुगंधामध्ये जरी माझं नाव असणं अशक्य असलं.... तरी माझ्या आयुष्याच्या पुस्तकातली काही पानं तिच्या सुगंधानं नक्कीच भरलेली राहतील….!!!
.
.
(प्रस्तुत लेख विस्कळीत वाटण्याचीच शक्यता जास्त आहे…)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चेतन, फार फार सुरेख उतरलाय हा लेख. वाचताना एक विलक्षण हुरहुर लागुन राहिली आणि शेवटी च्च.. झालच.
अत्यंत साध्या, सहज भाषेत सुरेख सांगून गेलास.
एखाद्या सुरेख मैफिलीच्या शेवटी ठुमरी ऐकताना मला असं होतं... मैफिल कोणती माहीत नाही पण आजच्या दिवसाची ठुमरी म्हणजे हा लेख.
च्च

>>>मी पद्यात लिहायला लागलो तेंव्हा जर मला कोणी सांगीतलं असतं कि काही काळानंतर मी गद्यात लिहायला लागेन, तर मी कितपत विश्वास ठेवला असता मला माहित नाही. मला तिच्याशी खूप बोलायचं होतं. आणि जे कधीच बोलता आलं नाही त्याचं जे काही तडफडणं होतं… त्यावर उपाय म्हणून मी गद्यात लिहायला सुरुवात केली. आणि जरा बरं वाटु लागलं. मला खूप छान जमत नसेल … माझा तसा दावाही नाही. पण मला जरा बरं वाटतं हे मात्र १००% खरं….<<<<<<

पटलच !

घालमेल छान उतरलीय शब्दातून.

खूप छान...अगदी आवडलं..:)

पारदर्शकतेला जर पाणी आणि काच सोडून कुठे दुसरीकडे जन्म घ्यावा वाटला तर तिचे डोळे हा अगदी उत्तम पर्याय आहे असं मला नेहमी वाटतं…>>>+१

शीर्षकावरून काही ओळी आठवल्या कुठे तरी वाचलेल्या...

जखमा कश्या सुगंधी झाल्या काळजाला.....
ज्याने वार केला तो मोगरा असावा....
ज्याने वार केला तो मोगरा असावा....

हिम्सकूल, Prasann Harankhedkar, जाई, सुप्रिया जाधव, लतांकुर, वेल…. सर्वांचेच खूप खूप आभार…
दाद... असा अभिप्राय.... तोही तुमच्याकडून … कृतकृत्य वाटणं म्हणजे काय?? अनुभवतोय… धन्यवाद…

"इवल्याश्या देही, किती उलाढाल, तिच्या लेखी झालं, काही नाही..!"

तुमची ओळ आहे का ही? पूर्ण कविता कुठे वाचायला मिळेल?
लेख आजिबात विस्कळीत वाटत नाहीये.
दाद, +१, 'च्च' झालं शेवटी!

मनाची उलाघाल अलगद उतरलीय Happy

चेतन, तुमच्या वरच्या पोस्टमध्ये दिलेली कवितेची लिंक मायबोलीच्या मुखपृष्ठावर नेतेय.

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी जखम असतेच, फक्त ती सुगंधीत ठेवणे हे आपल्या हातात असते, नाही का !!!! तुझ्या भावना लेखनात अलगद उतरल्यात. मस्तच चेतन....

पारदर्शकतेला जर पाणी आणि काच सोडून कुठे दुसरीकडे जन्म घ्यावा वाटला तर तिचे डोळे हा अगदी उत्तम पर्याय आहे असं मला नेहमी वाटतं…>>> जबरीच वाक्य. पुलेशु Happy

एक क्षण भाळण्याचा …. आणि बाकीचा सारा काळ स्वतःला सांभाळण्याचा…>>>
खतरा...!
निवडक १० त सामील.

माणसाचं मन कसलं विचित्र असतं ना… आता माहिते सगळं तरी… अजून ती कोणाची झालेली नाहीये ही भावनाच आपल्याला फार मोठ्या कम्फर्ट झोन मध्ये ठेवते.. >>
माझ्या 'य' मित्रांच्या व्यथा … या व्याक्याला खूपच जवळून रिलेट करता आल … खरंच ती भावना भयंकर असते .

प्रत्येक घरात फुलं फुलायची अशी पिकलेल्या फांदीवर…
आजच्या सारखी तेंव्हा बेसुमार वृक्षतोड नव्हती…>>
या ओळी विशेष आवडल्या … आजूबाजूला नातेवाईकांमध्ये अस नेहमी बघत आल्यांमुळे असावं कदाचित .

"इवल्याश्या देही, किती उलाढाल, तिच्या लेखी झालं, काही नाही..!" >> class...

छान लिहिता...

वाचल्यानंतर खुप वेळ शांत होते.
शांत की अस्वस्थ? माहीत नाही.
का वाचलं मी असं वाटून गेलं.....

तुमच्या मनात उसळलीये तितकीच वेदनेची लाट माझ्याही मनात उमटलीये हे वाचल्यानंतर!

काय बोलू? टेक केअर...

छानच उतरलय. अगदी जाणवल्या भावना. लेखाच्या नावातून, कवितेतून अगदी शेवटच्या ओळीपर्यंत शब्दांनी कमाल केली आहे. अशी जखम काही काळाने कधी आठवण होते कधी शिकवण होते आणि कधी विस्मॄतीतही जाते.

पण का नाही जमू शकलं... खूप हूरहूर लावलीत तुम्ही Sad

मला शेवट आवडला पण आणि नाही पण.. म्हणजे काय ते नाही माहित...

गन्धा ७, टीना, रीया, आर्च, प्रज्ञासा, दुर्योधन, रान्चो, वेका…. प्रतिसादाबद्दल खूप खूप आभारी आहे…

Pages