ऊठ म्हटलेले मला खपणार नाही!

Submitted by profspd on 27 May, 2014 - 11:43

ऊठ म्हटलेले मला खपणार नाही!
मी नको तेथे मुळी बसणार नाही!!

बोलतो भाषा मुळी मी काळजाची.......
पत्थरांना बोलणे कळणार नाही!

झापडे डोळ्यांस ज्यांच्या आढ्यतेची.......
त्यांस सोनेरी गझल दिसणार नाही!

बिनकण्यांच्या माणसांना शक्य नाही.......
मी अरे, मोडेन पण, झुकणार नाही!

चिंतनाने सिंचल्याखेरीज वेड्या........
कोणती कविता कधी फुलणार नाही!

मागुनी मिळते कुठे काही कुणाला?
खटपटी केल्याविना मिळणार नाही!

मी कशाला तोंड माझे चालवू रे?
त्यांस माझे बोलणे रुचणार नाही!

रक्त आटवतो नि डोकेफोड करतो.......
माहिती असते जरी पटणार नाही!

वाट मी बघतो तुझी सखये कधीची.......
मैफिलीला रंग या चढणार नाही!

फार रडलो, खूप मी आकांत केला......
यापुढे केव्हाच मी झुरणार नाही!

बोलबाला आणि बभ्रा क्षणिक असतो.......
दम न ज्या गझलेत ती टिकणार नाही!

हालल्याखेरीज हे काळीज माझे........
मी उगा टाळ्या कधी पिटणार नाही!

पावसावर खूप ते लिहितील कविता........
पावसामध्ये कुणी भिजणार नाही!

मज रडू दे आज रे, मनसोक्त अगदी.......
आग हृदयातील ही शमणार नाही!

ही जमिन खडकाळ, अगदी शुष्क आहे........
या ठिकाणी तू कधी रुजणार नाही!

लावती पटकन किती ते नजर मजला......
मी पुन्हा त्यांच्यापुढे हसणार नाही!

पाडण्या फडशा पहा सरसावले ते.......
त्यांस माझी शायरी पचणार नाही!

जिंदगीला शब्द मी आहे दिलेला.......
थेंब अश्रूंचा अता ढळणार नाही!

स्वप्न साकारेन मी निश्चीत माझे.......
प्राण हा माझा तसा उडणार नाही!

शायरी ओठांवरी येईल माझी......
मी जरी येथे उद्या असणार नाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users