"वेल"

Submitted by अमेय२८०८०७ on 26 May, 2014 - 08:15

नाजूक तनू, मनमोहकशी
हिरव्या वर्खाने शोभतसे
अवखळ चंचल रूपमतीच्या
स्वप्न उद्याचे अंतरी वसे

वेल बहरती तरुणाईची
सोनपावले किती साजरी
बागेभवती फिरता करते
जन्मसख्याचा शोध लाजरी

"मला हवे फुलझाड जयाला
सुंदर गंधित येती सुमने,
जोडी शोभुन अशी दिसावी,
रतिमदनाचे व्हावे जगणे!"

अनेक झाडे मोहक दिसती
जाता जवळी सत्य आकळे
गर्व कुणाला सौंदर्याचा
काटे कोणी उरी लपवले

सूर्यप्रकाशीं उजळुन जाण्या
तगमग वाढे, होत घाबरी
अखेर पाहुन वृक्ष हासरा
चढून जाते उंच बावरी

राकट-कणखर खोड सहज ते
तिला लपेटुन गगनी नेते
चारुतेसवे सामर्थ्याचे
मोल नांदती वेल उमजते

-- अमेय पंडित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! वेल कुठेही उगवणारा, कुणाच्यातरी अधाराने वाढणारा.
त्याच्याकडे इतक्या बारकाईने लक्ष देऊन कविता करणं म्हणजे हटके आहे.

बाकी ही कविता दोन वेळा वाचली त्यामुळे समजली. (शब्द बंबाळ आहे थोडक्यात) Proud

अनेक झाडे मोहक दिसती
जाता जवळी सत्य आकळे
गर्व कुणाला सौंदर्याचा
काटे कोणी उरी लपवले

क्या बात है अमेयराव, चार ओळीत अगदी शाश्वत सत्य सांगीतलेत Happy