महाराष्ट्र पॉलीटीकल लीग अर्थात एमपीएल २०१४

Submitted by स्पार्टाकस on 25 May, 2014 - 05:44

सध्या देशात सालबादाप्रमाणे आयपीएलचा हंगाम सुरु आहे. नुकत्याच संपलेल्या दुसर्‍या आयपीएल (इंडीयन पॉलीटीकल लीग हो!) मध्ये नरेंद्र मोदींनी निर्वीवाद जेतेपद मिळवून पंतप्रधानपदाची ट्रॉफी पटकावली आहे. ही मॅच खेळताना बॉयकॉटला रनआऊट करणार्‍या बोथमप्रमाणेच मोदींनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींपासून आपल्याच टीममधील अनेकांना रनआऊट केलंच, पण राहुल गांधींपासून ते लालूप्रसाद, मुलायमसिंग, नितीशकुमार यांच्याही मलिंगाप्रमाणेच यॉर्करवर दांड्या गुल केल्या. मायावतींचा तर त्यांनी यावर्षी पार अजित आगरकर करुन टाकला! जयललिता, ममता आणि नवीन पटनाईक यांनी आपापल्या होमपीच वर बर्‍यापैकी स्कोअर केला असला तरी त्यांच्यापैकी कोणालाही मोदींच्या टीममध्ये जागा मिळणार नाही हे उघड आहे.

या आयपीएल नंतर आता चार महिन्यातच एमपीएल सुरू होणार आहे (एमपीएल माहीत नाही? अहो महाराष्ट्र पोलीटीकल लीग!). त्या निमीत्ताने या एमपीएल मधील मुख्य टीम्स आणि प्लेयर्सचा लेखाजोखा मांडणारा हा खास वृत्तांत आमच्या प्रतिनीधीकडून :-

किंग्ज इलेव्हन नागपूर

खरंतर या टीमचं नाव किंग्ज इलेव्हन बीड-नागपूर असावं असं अनेकांचं मत आहे (या टीमला बीडचा आणि नागपूरचा असे दोन सिलेक्टर्स आहेत ना!). परंतु यांचे मूळ मालक हे नागपूरचे असल्याने अखेर किंग्ज इलेव्हन नागपूर हेच नाव फिक्स! या वर्षीच्या आयपीएल प्रमाणेच एमपीएल जिंकण्याचा यांचा ठाम निर्धार आहे.

मातोश्री इंडीयन्स

मातोश्री इंडीयन्सचं होमपीच अर्थातच मुंबई! दीड वर्षांपूर्वी त्यांचे मालक स्वर्गवासी झाल्यावर या टीमला उतरती कळा लागली होती, परंतु आयपीएल मध्ये मोदीं विजयाच्या संजीवनीमुळे हे पुन्हा जोशात आलेले आहेत. त्यातच या टीममधून बाहेर पडलेले सर्वच माजी खेळाडू आयपीएलमध्ये झिरोवर आऊट झाल्यामुळे त्यांना आणखीनच चेव आला आहे. एमपीएल जिंकल्यावर आपलाच कॅप्टन असला पाहीजे असा यांचा ठाम निश्चय आहे.

गेली अनेक वर्षे किंग्ज इलेव्हन नागपूर आणि मातोश्री इंडीयन्स वेस्ट इंडीज प्रमाणे एकच टीम बनवून मैदानात उतरत आहेत. त्यांच्या १७१-११७ या बॅट्समन्सच्या फॉर्म्युल्यावर मात्रं यावर्षी बदलाचं सावट आहे. आयपीएल जिंकल्यामुळे आपल्या जास्तीतजास्तं बॅट्समनना बॅटींग मिळाली पाहीजे अशी किंग्ज इलेव्हनची आग्रही मागणी आहे.

सररायझर्स टिळक भवन

सगळा देशच आपलं होमपीच असल्यागत वावरणार्‍या या टीमला आयपीएलमध्ये जेमतेम भोपळा फोडता आल्यामुळे त्यांची इज्जत वाचली आहे. अर्थात दोन भोपळ्यांपैकी एकावर 'पेड' तलवार लटकते आहेच! नुकताच त्यांच्या दिल्लीतील मालकांनी स्वतःच स्वतःला राजीनामा देऊन स्वतःलाच स्वतःचा राजीनामा न स्वीकारण्याचा स्वतःच सल्ला देण्याचा हातखंडा प्रयोग केला. अनेक अनुभवी प्लेयर्स या टीममध्ये असले तरी प्रत्येकालाच कॅप्टन होण्याची घाई असल्याने टीमची अवस्था पाकीस्तानच्या टीमसारखी झालेली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बारामती

बारामतीची मालकी असलेल्या या टीमचं होम ग्राऊंड अर्थातच बारामती आणि पुणे! अनेक वर्षे पश्चिम महाराष्ट्रातून या टीमचे बॅट्समन यशस्वी खेळी करताना दिसत. मात्रं आयपीएलमध्ये मोदींच्या झंझावातापुढे यांचाही साफ बोर्‍या वाजला आहे. एमपीएलमधील सर्वात अनुभवी खेळाडू या टीमचे मालक, कोच आणि मॅनेजर आहेत. या वर्षीच्या आयपीएलमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर टीमला पुन्हा विजयाच्या मार्गावर नेण्याचं कठीण काम त्यांच्यावर आहे. या टीममधील बहुतेक सर्व बॅट्समन - कोच कम् मॅनेजर सकट - सनरायझर्स टिळकभवनमध्ये होते.

किंग्ज इलेव्हन आणि मातोश्री इंडीयन्सप्रमाणेच सनरायझर्स आणि रॉयल चॅलेंजर्स एकाच टीममधून खेळताना दिसतात. चॅलेंजर्सचे मालक कम् कोच कम् मॅनेजर मधून मधून आपली टीम स्वतंत्रपणे उतरवण्याची गुगली टाकत असतात, परंतु शेवटी सनरायझर्सशीच पाट लावतात. या वर्षी तर हडळीला नाही नवरा आणि वेताळाला नाही बायको अशी अवस्था असल्याने एकच टीम उतरणार हे निश्चीत! हे गेल्यावेळचे जॉईंट विनर्स आणि डिफेंडींग चॅम्पीयन्स आहेत!

कृष्णकुंज नाईट रायडर्स

या टीममधील कोचसकट अनेकजण पूर्वी मातोश्री इंडीयन्समध्ये होते. गेल्या आयपीएलमध्ये मुंबई एरियात 'जायंट किलर्स' ठरलेल्या या टीमची यावर्षीच्या आयपीएलमध्ये सर्वात वाईट अवस्था झाली. त्यांच्या एकाही बॅट्समनला एकही रन काढता आली नाहीच, वर मॅच फी गमावण्याचीही पाळी आली. सनरायझर्ससाठी मॅचफिक्सींग केल्याचा यांच्यावर नेहमीच आरोप केला जातो. आयपीएलमध्ये धूळधाण उडाल्यावर एमपीएलमध्ये समाधानकारक कामगिरी करणं त्यांना कितपत जमू शकेल?

झाडू डेअर डेव्हील्स

मूळची दिल्लीची असलेली ही टीम आयपीएलमध्ये जोरात आपटूनही एमपीएलच्या मैदानात उतरणार असल्याचं सूत्रांकडून समजतं. मात्रं यांच्या मालकांचा आणि बहुतांश बॅट्समनचा खेळण्यापेक्षा आंदोलनांवर भर असल्यामुळे अंपायरच्या निर्णयाविरुध भर मैदानात ते धरणं धरुन बसतील अशी शक्यता जास्तं वाटते. काही वर्षांपूर्वीच्या काळात भारत म्हणजे सचिनचा वन मॅन शो होता, तसाच यांचा शोमॅन सध्या तुरुंग-तुरूंग खेळत असल्याने ते एमपीएल मध्ये कितपत खेळतील ही देखील शंकाच आहे. पंजाबमध्ये त्यांच्या चार बॅट्समननी रन्स काढल्यावर त्यावर सरदारजींवर सर्वात जास्तं विनोद का होतात असं स्लेजींगही करण्यात आलं.

राळेगणसिध्दी रॉयल्स

ही खर्‍या अर्थाने वन मॅन टीम! झाडूवाल्यांची मूळची टीम हीच. परंतु झाडूवाल्यांना बॅटींगची सुरसुरी आल्याने त्यांनी आपली वेगळी टीम उभारली.

या मुख्य टीम्सव्यतिरीक्त इतरही अनेक लहानमोठ्या टीम्स एमपीएल मध्ये आहेत. मात्रं यापैकी जवळपास प्रत्येकजण कोणत्या तरी मोठ्या टीमच्या आधारानेच बॅटींगच्या प्रयत्नात असतो. शिट्टीवाल्यांचा यात खास उल्लेख करावा लागेल. सध्या ते किंग्ज इलेव्हन आणि मातोश्री इंडीयन्सबरोबर असले तरी पूर्वी सनरायझर्स आणि चॅलेंजर्सबरोबरही खेळलेले आहेत! यावर्षी त्यांच्याबरोबर 'उसदर वीर'ही आहेत. त्याव्यतिरीक्त सायकलवाले, हत्तीवाले असे आयपीएलमध्ये तोंड दाखवून अवलक्षण केलेल्या टीम्सही असतीलच.

आता या टीममधील प्रमुख प्लेयर्सकडे एक दृष्टीक्षेप :-

किंग्ज इलेव्हन नागपूरच्या दोन सिलेक्टर्सपैकी एक म्हणजे बीडचे काका! हे पूर्वी एकदा एमपीएलच्या विजेत्या संघाचे व्हाईसकॅप्टन होते. खरंतर कॅप्टन बनण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती, परंतु मातोश्री इंडीयन्सच्या मालकांपुढे त्यांचं काही चाललं नाही, त्यामुळे त्यांना 'सर'फरोशी दाखवावी लागली. आयपीएलमध्ये त्यांना शून्यावर आऊट करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स वाल्यांनी जंगजंग पछाडले, पण ते सर्वांना पुरुन उरले. या वर्षी काहीही झालं तरी एमपीएल जि़ंकून एकदा हुकलेली कॅप्टनसी मिळवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

काकाबरोबर बोका हवाच! तसे बीडबरोबर नागपूरकर सिलेक्टर हवेतच! हे देखील पूर्वी एक यशस्वी बॅट्समन होते. राहुल द्रविड आणि रिकी पाँटींगप्रमाणे 'पूल्' करण्यात यांचा हात कोणी धरु शकत नाही असं म्हटलं जातं. गुटगुटीत असूनही त्यांचं 'रनिंग बिटवीन द विकेट्स' हे रणतुंगाप्रमाणेच निर्दोश आहे. हे किंग्ज एलेव्हनचे नॅशनल सिलेक्टरही होते. दुसर्‍यांदा सिलेक्टर होण्याचा त्यांचा चान्स कर्तव्य'पूर्ती' मुळे हुकला असं म्हटलं जातं! (अनेकांच्या मते ती दमानियाकाकूंची चाल होती). मात्रं नॅशनल टीममध्ये मोठी इनिंग खेळायची असल्याने ते एमपीएल मध्ये परतण्याची शक्यता फारच कमी आहे.

मातोश्री इंडीयन्सचे कोच हे प्लेयर कमी आणि फोटोग्राफर जास्तं असल्याचा त्यांच्यावर शिक्का मारला जातो. कुंबळेवर लेगस्पीनर असल्याचा आरोप केला जायचा तसाच! मात्रं या वेळच्या आयपीएलमध्ये हा शिक्का पुसण्यात ते बर्‍यापैकी यशस्वी झाले आहेत. अर्थात यात नरेंद्रभाईंच्या पार्टनरशीपचा मोठा वाटा असला तरी त्यांच्या टीमच्या मालकांवर श्रध्दा असलेल्यांनी त्यांना कॅप्टन म्हणून स्वीकारलेलं आहे. कितीही जुनेजाणते 'सर' असले, तरी आपण 'हेडमास्तर' आहोत हे त्यांनी नुकतंच दाखवून दिलं आहे. मात्रं एमपीएल जिंकायची असेल तर पाय जमिनीवर ठेवणं आवश्यक आहे हे त्यांना कोणीतरी समजावण्याची गरज आहे.

मातोश्री इंडीयन्सच्या कोचच्या बरोबर उलट परिस्थीती कृष्णकुंज नाईट रायडर्सच्या कोचची आहे. हे आधी मातोश्री इंडीयन्समध्येच होते. परंतु आपल्याला कॅप्टन किंवा कोच केलं जाणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी आपली स्वतंत्र टीम काढली. गेल्या आयपीएल आणि एमपीएल मध्ये यांनी मुख्यतः किंग्ज इलेव्हन आणि मातोश्री इंडीयन्सच्या अनेकांची विकेट काढली होती, मात्रं यावेळी बाजी त्यांच्यावरच उलटली आहे. इंडीयन्सच्या स्वर्गीय मालकांप्रमाणेच ते बेधडक स्लेजींगसाठी प्रसिध्द आहेत. मात्रं आतापर्यंत स्वत: ते कधीच बॅटींगला उतरलेले नाहीत. सध्या ते तेलकट बटाटेवडे आणि चिकन सूप यावर संशोधनात मग्नं आहेत असे समजते.

एमपीएलमधील सर्वात अनुभवी प्लेयर म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बारामतीचे मालक, कोच आणि कॅप्टन असलेले वन मॅन शो अर्थात बारामतीचे काका! जुन्या जमान्यातील प्रख्यात लेगस्पीनर सदू शिंदे यांचे सासरे असल्याने क्रिकेटशी यांचा संबंध बराच जुना. अर्थात सदूभाऊ अवघ्या ३३व्या वर्षी गेल्याने त्यांना काकांचा सहवास मिळाला नाही हे त्यांचं दुर्दैवं. अन्यथा काकांनी त्यांना गुगलीबद्दल दोन-चार टीप्स नक्कीच दिल्या असत्या! मॅचची सिच्युएशन पाहून स्ट्रॅटेजी ठरवण्यात बॉडीलाईनचा प्रणेता डग्लस जार्डीन पासून इयन चॅपेल, टोनी ग्रेग ते पार शेन वॉर्नपर्यंत सर्वजण काकांना गुरु मानतात! प्रतिस्पर्ध्यालाच काय पण आपल्या टीममधील प्लेयर्सनाही गोंधळून टाकण्यात तो माहीर आहेत! या वर्षीच्या आयपीएल मध्ये बॅटींग करण्याऐवजी त्यांनी सीनीयर क्लबची मेंबरशीप स्वीकारली असली तरी एमपीएलमध्ये मात्रं ते मास्टर स्ट्रॅटेजीस्ट म्हणून काम पाहणार असल्याचं त्यांनी स्पष्टं केलं आहे.

रॉयल चॅलेंजर्सचा मुख्यं आधारस्तंभ म्हणजे त्यांचे आक्रमक ऑलराऊंडर टगेश्वर! हे अत्यंत जहाल आक्रमक रसायन आहे. काहीही झालं तरी एमपीएलचा विजयी कॅप्टन बनण्याचं त्यांचं स्वप्नं आहे! गेल्या खेपेलाच त्यांना संधी होती, पण काकांनी ऐनवेळी घोळ घातला. 'उर्जा' आणि 'जलसंपदा' याचा भरपूर अनुभव असल्याने बॅटींगबरोबर आपल्याला ग्राउंड्समन म्हणूनही घेतलं जावं असा त्यांचा दावा आहे! स्लेजींगमध्येही हे प्रसिध्द आहेत. मात्रं अनेकदा यांचं स्लेजींग स्टेडीयममधील प्रेक्षकांना उद्देशून केलेलं असतं (आठवा धरणातील पाणी!). स्लेजींगबद्द्ल आत्मक्लेशाची शिक्षा भोगूनही त्यांच्यात फार काही सुधारणा झालेली दिसत नाही (शोएब अख्तर कधी सुधारेल काय?). नुकताच आयपीएलमध्ये मतांसाठी पाणी पुरवण्यावरुन त्यांनी पुन्हा प्रेक्षकांशी पंगा घेतला होता. यावर्षी प्रेक्षक आपलं धरण करतील काय याची त्यांना मनातून धास्ती वाटत आहे असं ऐकीवात आहे.

रॉयल चॅलेंजर्सचे आणखीन एक वीर म्हणजे नाशीकवाले! आयपीएलमध्ये त्यांची दांडी उडाली असली तरी ते काकांच्या मर्जीतील भरवशाचे बॅट्समन आहेत. हे पूर्वी मातोश्री इंडीयन्समध्ये होते, परंतु काकांनी त्यांना आपल्या टीममध्ये खेचलं. चाणाक्षपणाने इनिंग्ज बिल्ड करण्यात त्यांचा हात धरणं कठीण आहे. 'सार्वजनिक बांधकाम खा'त्याचा अनुभव असा उपयोगी पडतो. नाशीकमध्ये त्यांची विकेट गेली असली, तरी एमपीएलमध्ये ते नक्की चांगली कामगिरी करतील असा त्यांना स्वतःला विश्वास आहे!

रॉयल चॅलेंजर्सचे विकेट कीपर म्हणजे आबासाहेब तासगावकर! 'गृह'खात्याचा चांगला अनुभव असल्याने सुरक्षेत माहीर म्हणून त्यांना यष्टीरक्षणाचं काम देण्यात आलं आहे असं म्हटलं जातं. भारतीय परंपरेचा जाज्वल्य (पुणेकरांना असतोना तसाच!) अभिमान असल्याने च्युईंगगम न खाता ते तंबाखू खातात. पिचकार्‍या कुठे मारतात हे मात्रं अनेकांना अद्यापही कळलेलं नाही. मात्रं काहीही झालं तरी यांना मॅचनंतर प्रेस कॉन्फरन्सला पाठवायचं नाही यावर सर्वांचं एकमत आहे. अनेक गोष्टी त्यांना बडी बडी शहरोंमे घटनेवाले छोटे छोटे हादसे वाटतात. यांनी मैदानावर आणि सांस्कृतीक उपहारगृहात चीअरलीडर्सवर बंदी आणली होती.

रॉयल चॅलेंजर्सच्या काकांच्या कन्या हे एक निराळंच प्रकरण. महिला बचत गटाच्या क्लबच्या माध्यमांतून त्यांनी आपली बॅटींग प्रॅक्टीस केलेली असली, तरी आयपीएलमध्ये त्यांच्या नाकीनऊ आले होते. अखेरीस त्यांनी आवश्यक त्या रन्स केल्या असल्या तरी त्यांची परिस्थीती बिकट झाली होती. टगेश्वरांनी पाणीपुरवठ्यावरुन प्रेक्षकांना स्लेजींग केलं होतं ते यांच्यासाठीच! मला कॅप्टन बनायचं नाही असं त्यांनी ठामपणे सांगीतलं असलं, तरी बोलल्याच्या बरोबर उलट वागण्याचा अनुवांशीक गुण त्यांच्यात उतरला आहे की नाही हे भविष्यातच कळेल. तोपर्यंत झाकली मूठ!

सनरायझर्स टिळकभवनचे कॅप्टन बाबामहाराज कराडकर हे यावर्षी प्रथमच एमपीएल मध्ये सहभागी होत आहेत. बरीच वर्ष दिल्लीत काढल्याने आणि मौनमोहनांचा सहवास लाभल्याने राहुल द्रविडप्रमाणेच आरामात बॅटींग करण्यावर यांचा ठाम विश्वास आहे. आपल्या निर्णयांचा चुकीचा अर्थ काढला जाण्याच्या भीतीने अनेकदा ते ना बाऊंड्री मारतात ना सिंगल काढतात असा त्यांच्यावर आरोप केला जातो. आयपीएल मधील दारूण पराभवानंतर यांना काढणार असल्याची वदंता होती, परंतु नॅशनल कॅप्टनच्या मर्जीतील असल्याने त्यांचं स्थान अबाधीत आहे (धोणीने कुठे रैनाला वन डे मधून काढलंय?).

सनरायझर्सचे एक प्रमुख बॅट्समन म्हणजे सोलापूरवाले! हे खरेतर नॅशनल टीमचे सिक्युरीटी ऑफीसर होते. त्याआधी ते सनरायझर्सचे कॅप्टनही होते. मात्रं या वर्षीच्या आयपीएलमध्ये त्यांची विकेट उडाली! हे बॅटींगपेक्षा त्यांच्या वन लायनर्ससाठी नवजोत सिंग सिद्धूपेक्षाही प्रसिध्द आहेत! (आठवा - भगवे दहशतवादी, लोक बोफोर्स विसरले तसेच कोलगेटही विसरतील, मिडीयाला ठेचून टाकू, बलात्कार फक्त दिल्लीत नाही देशभरात होतात वगैरे). आयपीएल मध्ये मार खाल्ल्यावर सध्या हे सोलापुरी चादरी पुरवण्याचा - अर्थात मशीदींना - धंदा सुरु करणार आहेत असे सूत्रांकडून समजते.

आणखीन एक भरवशाचे बॅट्समन म्हणजे माजी कॅप्टन आदर्शराव नांदेडकर! आयपीएलच्या पडझडीतही महाराष्ट्रातून सनरायझर्सच्या ज्या बॅट्समननी स्कोर केला त्यापैकी एक म्हणजे हे नांदेडकर. त्यांनी आपला स्कोर केलाच पण हिंगोलीच्या बॅट्समनलाही मदत केली असं ऐकीवात आहे. २००८ मधील मुंबई हल्ल्यांचा परिपाक म्हणून ध्यानीमनी नसताना यांना कॅप्टनशीपची लॉटरी लागली. अर्थात त्याचा पुरेपूर फायदा उठवत त्यांनी अगदी 'आदर्श' पणे टीमची धुरा सांभाळली. मात्रं याच आदर्शपणामुळे त्यांना कॅप्टनशीपवरुन हाकलण्यात आलं. इंग्लंडने केवीन पीटरसनला कॅप्टन म्हणून हाकललं तसंच! अर्थात पीटरसनप्रमाणेच त्यांना बॅट्समन म्हणून संधी देण्यात आली आणि त्यांनी त्याचं चीज केलं असलं, तरीही 'पेड'गावची तलवार त्यांच्या डोक्यावर लटकत आहे!

सनरायझर्सचे सर्वात आक्रमक बॅट्समन म्हणजे शेर-ए-को़कण उर्फ कोंबडीचोर! हे पूर्वी मातोश्री इंडीयन्समध्ये होते. त्यांना वर्षभर कॅप्टनही करण्यात आलं होतं. मात्रं त्यांना तहहयात कॅप्टन होण्याची आणि मातोश्री इंडीयन्स हायजॅक करण्याची इच्छा महागात पडली आणि त्यांची हकालपट्टी झाली. (रविंद्र जाडेजाला दुसर्‍या वर्षी निलंबीत केलं होतं ना तसंच!). त्यानंतर ते सनरायझर्समध्ये आले. मी म्हणजेच को़कण अशी त्यांची ठाम समजूत असल्याने त्यांनी को़कणात अनेक ग्राऊंड्स उभारण्याचा दावा केला. नांदेडकरांना कॅप्टन केलं गेलं तेव्हाचा त्यांचा थयथयाट पाहून साक्षात रजनीकांतने तोंडात बोट घातलं होतं असं म्हणतात! आयपीएल मध्ये चिरंजीवांची विकेट गेल्याने तर यापुढे मी को़कणात कोणतंही ग्राऊंड उभारणार नाही असं त्यांनी जाहीर केलं. त्यांच्या दुसर्‍या चिरंजीवांची सांस्कृतीक संघटना अत्यंत कार्यक्षम आहे असं समजतं. सध्या हे पुन्हा कॅप्टन बनण्याच्या प्रयत्नात आहेत असं समजतं!

उगवत्या सूर्याबद्दल तर म्या पामराने काय बोलावं? त्यांना बॅटींग करताना, मॅच स्ट्रॅटेजी ठरवताना कविता करण्याचा 'सहन होत नाही आणि सांगताही येत नाही' अशा प्रकारचा आजार आहे. आशीश नेहरा आणि रॉबीन उथप्पा, गेला बाजार रॉस टेलर यांची टीम जशी दरवेळी बदलते, तसाच यांचा प्रकार आहे. हे सध्या किंग्ज इलेव्हन आणि मातोश्री इंडीयन्स या टीमबरोबर खेळत असले, पूर्वी रॉयल चॅलेंजर्स आणि सनरायझर्स बरोबर खेळण्याचाही त्यांना अनुभव आहे. मागे एकदा आपल्यासारख्याच गणंगाना जमा करुन टीम उभारण्याचाही त्यांनी प्रयोग केला होता. तो अपेक्षेप्रमाणे सपशेल फसला. काहीही झालं तरी मला बॅटींगला चांगला चान्स हवा ही त्यांची एकमेव मागणी असते. केवळ आपल्यामुळे दलित प्रेक्षक मॅचला येतात अशी रमाबाई आंबेडकर नगरात फटके खावूनही त्यांची ठाम समजूत आहे!

झाडूवाल्यांच्या महाराष्ट्रातील एक बॅट्समन म्हणजे 'नर्मदा'ताई सरोवरवाले! यांना कोणतीही नवीन गोष्ट सुखासुखी झालेली पाहवत नाही अशी बर्‍याच जणांना दाट शंका आहे. कोणतंही नवीन ग्राऊंड उभारायचं ठरलं की या तिथे आंदोलनाला पोहोचल्याच! झाडूवाल्यांच्या टीममधून आयपीएलमध्ये त्यांची विकेट पडली असली तरी मुळात त्या या भानगडीतच कशाला पडल्या हेच कळत नाही.

इतक्या सगळ्या प्लेयर्सवर लक्ष्यं ठेवण्यासाठी कोणीतरी मॅच रेफरी हवाच ना! या जॉबसाठी राळेगणसिध्दी रॉयल्सचे मालक आणि जंतर-मंतर फेम उपोषणरत्नं यांच्याशिवाय योग्य माणूस शोधूनही सापडणार नाही! उपोषण हे यांचं राखीव कुरण! महाराष्ट्रात अनेकदा आणि एकदा दिल्लीत याचा यशस्वी प्रयोग त्यांनी करुन दाखवला आहे. आपले निर्णय अंमलात आणले गेले नाहीत तर उपोषण करणं ही त्यांची मोडस ऑपरेंडी गेल्या वेळी महाराष्ट्रात मात्र एकदम गळपटली. सध्या हे झाडूवाले आपले शिष्य नाहीत हे सर्वांना सांगत असतात!

या व्यतिरिक्त इतर फुटकळ प्लेयर्सतर पैशापासरी आहेत. या सर्वांच्या बॅट्समधून किती रन्स निघतात ही जबाबदारी मायबाप प्रेक्षकहो, तुमच्या-आमच्यावर आहे! कोणाची टीम जिंकवायची आणि कोणाची विकेट काढायची हे ठरवण्यास आपण सुज्ञ आहातच !

( कोणालाही - कोणत्याही जातीधर्माला दुखावण्याचा हेतू नाही. नाईलाजाने काही उल्लेख करावे लागले आहेत. हलकेच घ्या).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही पार्ट्या लै लवकर पाडल्या. अजुन टीमांनी प्लेअर्सना आणि प्लेअर्सनी टीमांना निवडायच आहे. लय उलथापालत हुनार अजुन. आणि इंजिनाचा रोल बी लय महत्वाचा असणार. बाणान लय कचकच केली तर कमळ बसवुन इंजिन सुस्साट पळवतील. बाणानं तर आतापासुनच कचकच करायला सुरवात केलीय. आणि कमळा बरोबर शिटी पण वाजणार २-४ ठिकाणी. (शिट्टी म्हणजे राजु शेट्टी, तुमचा संदर्भ बहुतेक दुसराच आलाय). आणि सगळ्यांत महत्वाचं अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. आणि जुन्या खोंडाना आताच ताजाताजा अनुभव आलाय. ते पण शिकणार अनुभवातुन जे शाणे असतील ते.

बाकि काय, आप्ण बघत बसायचं....

मस्त लिहिलंय. पण निपा म्हणतायत तसं बरीच उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

शिट्टी म्हणजे राजु शेट्टी, तुमचा संदर्भ बहुतेक दुसराच आलाय >> त्यांनी आठवलेंना शिट्टी मारली आहे Happy

झकास...

यंदा कोणाकोणाच्या विकेट निघतात ते बघणे अत्यंत रोमहर्षक ठरणात आहे.. विशेषतः आयपीएलच्या निकाला नंतर..

बारामतीकर योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता राखून आहेत... आयत्यावेळी राखीव खेळाडू उतरवतील ते बरोबर...