अन्या - १९

Submitted by बेफ़िकीर on 21 May, 2014 - 04:37

तिन्मुर्ती दत्ताला जे गेल्या आठ दहा वर्षांत साधलेले नव्हते ते अन्याच्या आईला एका झटक्यात साध्य झाले. शेवटी तिच्या पोटचे पोर होते ते! भले ते साध्य करण्यात तिचा जीव गेलेला असो, पण तिच्या त्या निर्हेतुकपणे आणि नकळतच स्वतःची आहुती देऊन दिलेल्या सणसणीत चपराकीमुळे अन्याने आजवर कमावलेल्या महतीच्या चिंधड्या उडायची वेळ आली. जणू भूकंप झाला.

अन्याला खर्‍या अर्थाने 'आई आठवली'.

बारा वर्षाचा मोकाट हिंडणारा अशिक्षित, असंस्कृत, चोरटा आणि सर्वार्थाने नालायक मुलगा! बघता बघता बुळ्या आणि भाबड्या समाजाला दैवी चमत्कार दाखवत दाखवत आज इतका वर पोचला होता की आपण कोण, कुठले, आपला वकूब काय हेही विसरून गेलेला होता. पैश्यात लोळत होता. शब्दाला वजन होते. लोकांच्या झुंडी पायावर लोळण घ्यायला उडत होत्या. गावोगावी नांव दुमदुमत होते. त्याच्या नुसत्या स्पर्शाने, कृपाकटाक्षाने आपले भले होईल ह्या विश्वासाने लोक त्याला पूजत होते. घरोघरी, वाहनांवर तस्वीरी लावल्या गेलेल्या होत्या. श्रद्धेने केव्हाच व्यापाराचे हीन स्वरूप आत्मसात केलेले होते. एक जादूई अंमल होता सगळ्या घटनांवर, सगळ्या दिवसांवर! विस्मरण झालेले होते आपल्या मूळ रुपाचे, आपल्या एकेकाळच्या दिशाहीन व प्रयोजनशून्य अस्तित्वाचे!

आणि त्या विस्मरणावर तिन्मुर्ती दत्ताने नव्हे, कोणा राजकारण्याने नव्हे, कोणा अंधश्रद्धा निर्मूलनवाल्याने नव्हे तर साक्षात अन्याच्या आईने वास्तवाचे कोरडे ओढले होते. तेही अतिशय जळजळीतपणे! आणि मुख्य म्हणजे तेही तिच्या स्वतःच्याच नकळत! मरताना तिला जाणीवही नव्हती की आपण काय करून मरत आहोत.

डाव्या तळहातात दाबून धरलेली दोन मेलेली झुरळे ही तिच्याकडे त्याक्षणी असलेली शेवटची पूंजी होती. ती संपल्यानंतर पोटाचा खळगा भरण्यासाठी भीक मागण्यावाचून पर्याय नव्हता. सकाळचे ऊन कोवळे असले तरी तिच्यासाठी ते दाहकच होते. नवर्‍याने हाकलून दिलेले, मुलगा कित्येक वर्षांपूर्वी पळून गेलेला! रानावनात हिंडून पाला नाहीतर किडे खाऊन कशीबशी जगलेली अन्याची आई शहर दिसताच बेभानपणे शहरात घुसली होती. येथे भरपूर माणसे असल्याने माणूसकीही भरपूर असेल अशी भाबडी आशा तिच्या मनात पल्लवीत झाली होती. प्रत्यक्षात मात्र तिच्याकडे कोणी ढुंकून पाहात नव्हते. ती हात पुढे करून काही मागायला आली तर लोक तिरस्काराची भावना डोळ्यांत आणून पटकन् बाजूला सरकून पुढे जात होते. अन्याच्या आईला दोन दिवस उपास घडलेला होता सातार्‍यात! इतकेच नव्हे तर तिच्यासारखेच अनेक भिकारी जेथे पसारी पसरत तेथे ती आशाळभूतपणे उभी राहिली तेव्हा त्या भिकार्‍यांनीही तिला हाकलून लावले होते. कोणाला हवा असणार अन्नात वाटेकरी? डोळ्यांमधून अश्रूही येईनासे झालेल्या अवस्थेत भकास चेहरा करून अन्याची आई रस्त्यावरून रखडत होती. मिळेल तेथे पाणी पीत होती. एखादे ओळखीचे झाड दिसले आणि त्याची पाने खाण्याचा तिला अनुभव असला तर एक दोन पाने खाऊन थुंकत होती. जीव द्यायची हिम्मत नव्हती असे नाही, पण जीव द्यायचा म्हणजे कुठे जायचे आणि काय करायचे हेही समजत नव्हते. ते समजले असते तरी ते करण्याचे त्राण शरीरात नव्हते.

मनात कुठेतरी येत होते की आपले, अगदी आपले हक्काचे असे एक तरी माणूस आवश्यक असते आयुष्यात! आपण नवर्‍याला कधी धड खायला करून घातले नाही की कधी स्वतः चार ठिकाणी कामे करून पैसे मिळवले नाहीत. वेड लागल्यासारख्या सगळीकडे फिरत बसलो. मिळेल ते खात बसलो. नवर्‍याला नशेची चटक लागली. मुलाच्या जन्मानंतर नवर्‍याची आपल्याला असलेली साथ पूर्णच संपली. मुलालाही आपण कधी धड वाढवले नाही. पण त्याला आपण दूध पाजले होते. स्वतःच्या पायावर पळून चोर्‍या करण्याइतका मोठा होईस्तोवर आपण त्याला आपल्याला जे मिळेल त्यातले काही ना काही देत होतो. आपण आपल्याच मुलासाठी केलेले ते सगळे काही कुठे गेले? तो मोठा झाल्यानंतर गावात चोर्‍या करायचा तेव्हा त्याला गावातल्यांनी पकडून मारल्यानंतर रात्री आपण त्याच्या अंगावरून हात फिरवत बसायचो. निदान तसे करण्यात तरी आपला काही स्वार्थ नव्हता. मग ते जे काही मुलासाठी केले ते सगळे कुठे गेले? त्याचा हिशोब काय? कुठे आहे आपला मुलगा?

निव्वळ अन्नाचा शोध घेण्यासाठी डोळ्यातील बुबुळे फिरत असताना अचानक कसलातरी घमघमाट जाणवला. त्या दिशेने मान फिरवली तर देवळासारखे काहीतरी असलेल्या वास्तूच्या दारातून आतले दृष्य दिसले. जणू प्रसादासाठी लाडू वळले जात असावेत. स्वत्व विसरण्यासारखी ती बाब होती. पोटात केव्हापासूनची भुकेची आग होती. जिवंत राहण्यासाठी अन्न खायला हवे आहे ह्यापलीकडे काहीही सुचू शकत नव्हते. नियंत्रण सुटल्याप्रमाणे अन्याची आई विजेच्या वेगाने धावली आणि त्या दारात उभी राहिली. कोणा एकदोघांनी तिच्याकडे बघून न बघितल्यासारखे केले आणि कोणीतरी म्हणाले की 'ए, ज्जा, दुपारच्याला ये, आत्ता दर्शन नस्तंय हितं'. अन्याच्या आईला ते वाक्य आपल्यासाठी आहे हेसुद्धा जाणवले नाही. तशीच थिजून त्या लाडवांकडे ती क्षणभर बघत बसली आणि पुढच्याच क्षणी आत धावली. ती काय करत आहे हे समजायच्या आतच तिचा उजवा हात लाडवांमध्ये गेलाही! हातात मावेल तितका प्रसाद घेऊन तिचा हात तोंडापाशी जाणार त्या आधीच्याच क्षणी मागून केस ओढले गेले. त्यातच एक अर्वाच्य शिवी ऐकू आली आणि त्या शिवीचे पडसाद विरायच्या आतच पाठीत दोन जीवघेण्या लाथा बसल्या. शिव्यांची बरसात चालू झाली तेव्हा अर्धवट शुद्धीत असणार्‍या अन्याच्या आईला इतकेच समजले होते की कोणा मोठ्या महाराजांच्या दर्शनानंतर वाटल्या जाणार्‍या प्रसादाला स्पर्श करून तिने तो प्रसाद विटाळलेला आहे. एक दुखरा हात अजूनही हाताला चिकटलेला प्रसाद तोंडापाशी नेऊ पाहात होता पण त्याचक्षणी त्यावर एक अजस्त्र पाय पडला आणि हात दाबला गेला. डोळे फिरायची वेळ आली त्या दाबाने. अचानकच धावपळ झाली आणि कोणीतरी आत जाऊन पुन्हा पळत बाहेर आल्यासारखे वाटले. अन्याची आई आता केविलवाणेपणाने आणि जिवाच्या आकांताने विनवू पाहणार होती की 'उपाशी आहे, काहीतरी तरी खायला द्या'! असे म्हणण्यासाठी तिने डोळे पूर्ण उघडले आणि त्याचक्षणी हवेतून एक मोठी काठी तिच्या डोक्याच्या दिशेने आली आणि झालेला आघात आणि वेदना सहन न होऊन आपसूकच तोंडातून 'अन्यारं' ही आर्त हाक बाहेर पडणे ही तिची शेवटची जाणीव होती. त्यानंतरही एक आघात झाला होता......

...... पण तो तिच्या प्रेतावर झालेला होता. नंतर ते प्रेत लाथेने उलथण्यातही आलेले होते, तिच्याच मुलाकडून!

डोळे फाडून अन्या पाहात होता. पिंजारलेल्या जटा घाणेरड्या रंगाच्या झाल्या होत्या. चेहर्‍यावर जिवंतपणीही मेल्यासारखेच भाव असणार हे नक्की जाणवत होतं. एका हातात लपवलेली मृत झुरळं अंगावर शहारा आणत होती. पण बाकीचे सगळे? बाकीचे सगळे तस्सेच! अन्याला वाटत होते की एक कुर्‍हाड घ्यावी आणि स्वतःचा उजवा पाय मांडीपासून तोडून टाकावा. काय केले आपण? काय हवं होतं तिला? हे सगळे साम्राज्य आपले आणि पर्यायाने तिचेही आहे हे तरी तिला समजले होते का?

कितीतरी क्षण अन्या प्रेताकडे प्रेतासारख्याच थिजलेल्या नजरेने पाहात होता. मग त्याला जाणीव झाली. मेलेली व्यक्ती मेलेलीच आहे, आपण जिवंत आहोत आणि आपण ह्या समाजाच्या मते कोणीतरी आहोत.

मग त्याची नजर आजूबाजूला वळली. आश्रमातील सर्व सेवकवर्ग, रतन, एडामट्टी मणी, शकुंतला, कोला, सगळेच थिजून त्या प्रेताकडे पाहात होते. एवढेच नाही तर दारात नुकतेच आलेले काही भाविकही हादरून तिथेच पाहात होते. अन्याच्या आईच्या डोक्याखाली रक्ताचे थारोळे होते. ती निश्चल अवस्थेत पडलेली होती. दिसणार्‍या दृष्याचा अर्थ समजायला फार काही लागत नव्हते. एक व्यक्ती मेलेली आहे, ती अवलियाबाबांच्या आश्रमात मेलेली आहे आणि तो मृत्यू नैसर्गीक नाही तर शंभर टक्के मारहाणीमुळे झालेला मृत्यू असावा हे दिसत आहे, हे कोणालाही जाणवू शकत होते.

धावपळ सुरू झाली तशी गर्दीही वाढू लागली. अन्याच्या आईचे प्रेत आतमध्ये हालवण्यात आले. जागा धुवून पुसून घेतली गेली. डॉक्टरांना बोलावण्याचे काहीही गरज राहिलेली नव्हती आणि डॉक्टरांना बोलावणे हा मूर्खपणा ठरेल हे अन्या आणि रतनला लक्षात आलेले होते. भाविकांची गर्दी वाढू लागली तसा मग सेवक वर्ग दारात उभा राहून भाविकांना रोखू लागला.

प्रेताची वासलात लावणे अशक्य होते. आश्रमाला एक मागच्या बाजूचे दारही होते. पण तेही गुप्त वगैरे नव्हते. झालेला प्रकार किमान पंचवीसजणांनी पाहिलेला होता. सगळ्यांना गप्प बसवणे शक्यच नव्हते. गप्प बसवण्यासाठी पैसे मोजले असते तरी ते सगळेजण किती दिवस गप्प राहिले असते ह्याचा भरवसा नव्हता. मुख्य म्हणजे असा एखादा माणूस आहे का, की ज्याने हे पाहिलेले आहे पण त्याने ते पाहिलेले आहे हे आपल्यालाच माहीत नाही आहे, हेच कोणाला माहीत नव्हते.

भयानक प्रकार झाला होता आश्रमात! रतनने प्रसंगावधान राखून डायरेक्ट नाईकांना फोन फिरवला. त्यापाठोपाठ तिने अन्याला समजावले की आपण स्वतःहून पोलिसांना खबर देणे अत्यावश्यक आहे. त्यानुसार मग तिनेच पोलिसांना खबर दिली. विसाव्या मिनिटाला एक व्हॅन आश्रमासमोर थांबली व त्यातून पोलिसांचे एक लहानसे दल बाहेर आले. ते पाहताच बघ्यांची संख्या फारच वाढू लागली. ते समजल्यानंतर पोलिसदलाच्या प्रमुख्याने सूज्ञपणे आणखी कुमक ताबडतोब मागवली.

सकाळचे अकरा वाजेपर्यंत बातमी कर्णोपकर्णी झाली होती. आश्रमात काहीतरी भयंकर प्रकार घडला आहे इतकेच फुटले होते. खून झाला आहे, एका अज्ञात म्हातारीचा खून झाला आहे वगैरे गोष्टी कमी लोकांना माहीत होत्या. पण बाकीच्यांना इतकेच माहीत झाले होते की आश्रमात मर्डर झालेला असून आता अवलियाबाबांचा अवतार संपुष्टात आला.

ताबडतोब समाजात दोन तट पडू लागले. श्रद्धेमध्ये जे अतोनात बुडलेले होते त्यांनि शासकीय कारवाई होऊ न देण्यासाठी आटापिटा चालू केला. ज्यांना अवलिया बाबांच्या अवतारकार्याशी काहीही देणेघेणे नव्हते त्यांनी विरुद्ध बाजूने जोर लावायला सुरुवात केली. बागवान त्यात आघाडीवर राहिला. प्रेत पोलिसांच्या ताब्यात दिले गेले आणि ते पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले. हबकलेला अन्या आता आतल्या कक्षात पोलिसांच्या भयानक चौकशीला सामोरा जाऊ लागला. पोलिसांच्या या तडाख्यातून रतन, मणी आणि इतर सेवकवर्गही सुटला नाही.

सहा तासांच्या अविरत चौकशीनंतर आणि नाईकसाहेबांनी केलेल्या अखंड फोनाफोनीमुळे ठरलेल्या सेटलमेंटनंतर असा निष्कर्ष जाहीर करण्यात आला की आश्रमात आलेली एक अज्ञात स्त्री चोरी करू पाहात असताना 'कोला' नावाच्या सेवकाने तिला अडवले. तरीही ती ऐकेना तेव्हा कोलाने तिला दिलेल्या दोन तडाख्यांमुळे तिचा अचानक मृत्यू झाला. अनवधानाने घडलेल्या ह्या प्रकाराबद्दल कोलाला पोलिस कोठडीत घेण्यात येत असून ह्या प्रकारात आश्रमातील इतर कोणाचाही कसलाही हात नाही.

हा निष्कर्ष काढण्यापूर्वी जगात एकटेच असलेल्या कोलाला जबरदस्त पढवण्यात आले. कमीतकमी शिक्षेच्या बदल्यात लक्षावधी होण्याची संधी मिळालेला कोला जीवावर उदार होऊन आरोप स्वतःच्या माथी घ्यायला तयारही झाला. वर्तमानपत्रांनी काय छापावे ह्यासाठी पुरेपुर सेटिंग करण्यात आले. भाविकांच्या मनातील समज गैरसमज नष्ट व्हावेत ह्यासाठी आश्रमातून पत्रक काढण्यात आले. त्या पत्रकाचे सातारा शहरात चौकाचौकात वाटप झाले. आश्रमाच्या भिंतीवरही हे पत्रक चिकटवण्यात आले. त्यात लिहिलेले होते की एका अज्ञात महिलेचा आश्रमात मृत्यू होणे ही अत्यंत दु:खद बाब असून संबंधित आश्रम-सेवकाला अधिकाधिक शिक्षा व्हावी ह्यासाठी खुद्द अवलियाबाबा प्रयत्न करणार आहेत. आश्रमाच्या पवित्र वातावरणाला लागलेले हे गालबोट पुसून टाकण्यासाठी अवलियाबाबा त्या स्त्रीच्या पार्थिवावर स्वतः अंतिम संस्कार करणार असून स्वतःच अग्नि देणार आहेत. तसेच आश्रमातर्फे गोरगरीबांना पुढील तेरा दिवस मोफत अन्नवाटप होईल व ते अवलियाबाबांच्या स्वतःच्या हस्तेच होईल.

कोलाला ऑफर केलेले सहा लाख, पोलिसांना देऊ केलेले अकरा लाख आणि सेवकवर्गापैकी प्रत्येकाला पन्नास पन्नास हजार रुपये असे एकुण सहा लाख, असे मिळून तेवीस लाखाचा फटका बसला अन्याला! नाईकांच्या शब्दाखातर हे प्रकरण दाबले गेलेले असल्याने अन्या नाईकांचा मिंधा तर झालाच पण नाईकांकडून आर्थिक सहाय्य मिळेल ही अपेक्षाच खुंटली कारण त्यांनी त्याला जीवावरच्या संकटातून तारलेले होते.

आजवर कमावलेली पतप्रतिष्ठा, माया ह्या सगळ्यालाच एक प्रचंड मोठे खिंडार पडले. आईच्या पार्थिवाला अग्नी देताना अन्याच्या डोळ्यात आलेले अश्रू आई गेल्यामुळे होते, आपल्या आज्ञेमुळे मारहाण झाल्यामुळे आई गेल्यामुळे होते की आईने जाताजाता आपल्या साम्राज्याला सुरुंग लावल्याच्या दु:खामुळे होते हे खुद्द अन्यालाही सांगता आले नसते.

मात्र एक नक्की, की अवलियाबाबांचा आश्रम हा पूर्णपणे पवित्रस्थान आहे ही प्रतिमा आता कायमची धुळीस मिळालेली होती. वर्तमानपत्रांनी जसे सांगितले होते तसेच छापून उपकार करण्याआधी स्वतःचा वाटाही उचलला होताच. आईचा हा मृत्यू अजून कोणकोणती खिंडारे पाडणार ह्या भीतीत अन्या भकास चेहरा करून स्वतःच्या कक्षात रतनसोबत बसलेला असतानाच एडामट्टी मणी दारात आली. एडामट्टी मणीने दारातूनच तीक्ष्णपणे आणि जळजळीतपणे ते शब्द उच्चारले.

"जो मार्ग सोपान उदयच्या मार्गापेक्षा अधिक प्रभावी आणि अधिक समाजोपयोगी आहे असे वाटून मी येथे आले होते, तो मार्ग काही निष्पापांच्या प्रेतांवरून आखलेला आहे हे मला आज समजले. असा मार्ग मला कधीच नको होता. मी परत चाललेले आहे. माझा शोध घ्यायचा प्रयत्न करू नका. अवलियाबाबा, केलेली हजार चांगली कामे ही हातून घडलेल्या एका पातकाने निरर्थक ठरतात हे नेहमी लक्षात ठेवा"

एडामट्टी मणीला आश्रमातून बाहेर जाऊ द्यायला नको आहे हेसुद्धा अन्याला सुचले नाही. दिवसच फिरलेले असून आपल्याला फक्त पळून जावे लागत नाही आहे हेच त्यातल्यात्यात चांगले आहे असे मानून तो पाठमोर्‍या एडामट्टी मणीकडे थिजून पाहात राहिला. मेलेली स्त्री अन्याचीच आई होती हे अजूनही अन्याशिवाय कोणाला ज्ञात झालेले नव्हते. पण रतन? रतनच्या डोक्यात वादळी वेगाने विचार सुरू होते. एक अनोळखी म्हातारी प्रसाद खायला म्हणून आश्रमात घुसते. तिला प्रसाद विटाळण्यापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच हा अन्या सांगतो की दोन काठीचे तडाखे ठेवून द्या. त्याची आज्ञा शिरसावंद्य मानून त्या म्हातारीला तडाखे दिले जातात आणि त्यात ती मरते. ती मेल्यावर निर्माण झालेली सगळीच्या सगळी संकटे निव्वळ अन्याच्या पाठीशी कोणी नाईक आहेत म्हणून मोडून काढली जाऊ शकतात. काल नाईकांच्या जागी सुकन्याताई होत्या. त्याआधी तावडे पाटील होते. उद्या कोणी पुण्याचा खासदार असेल! जी म्हातारी मेली तिचा वाली कोणीच नाही, कोणीही नाही. आणि मग आपण? आपण काय आहोत? एडामट्टी मणी ताडताड निघून जाऊ शकते. हा अन्या तिला थांब असे म्हणूसुद्धा शकत नाही. आणि आपण इतके मांडलिकासारखे का? आपण का जात नाही आहोत? आपल्याला काय करायचे आहे? ही फुकटची माया, श्रद्धा हे सगळे आपल्या स्वतःच्या जोरावरही आपण कमवू शकू की? कोणत्यातरी दूरच्या गावी जाऊन एखाद्या अश्याच भोंदूच्या आश्रमात राहून आपण बस्तान बसवू शकू की? उद्या ह्या अन्याचे डोके फिरले आणि त्याने आपला खून केला तर? तेव्हाही त्याचे भक्त, पोलिस, पेपरवाले आणि नाईककांसारखे कोणी त्याला सांभाळून घेतीलच!

ह्या क्षणी अन्याला रतनच्या सोबतीची नितांत आवश्यकता होती. त्याला रतनला खूप काही सांगायचे होते. त्याला सांगायचे होते की जे झाले ते निव्वळ चुकून झालेले होते. तो स्वतः मनाने इतका कठोर मुळीच नव्हता. अजिबात शहानिशा न करता एखाद्या म्हातारीला मारायची आज्ञा देणे हा त्याचा स्वभाव नव्हता. ते निव्वळ क्षणिक दुर्लक्ष झाल्यामुळे घडलेले होते. आणि त्याला रतनला हेही सांगायचे होते......की मेलेली स्त्री त्याची आई होती. तिच्या आठवणींनी ओ आत्ता व्याकुळ झालेला होता. आत्ता त्याला जिवाभावाच्या माणसाच्या सोबतीची अतिशय गरज होती.

पण अन्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. नेमके अन्याचे हेच मौन रतनला सावध करत होते. तिला सुचवत होते की हा मौनात गेलेला अन्या एक भयानक राक्षस आहे. स्वार्थासाठी तो कोणत्याही पातळीला जाईल. उद्या मशालकराच्या खूनाच्या खटल्यात आपल्याला एकटीलाच अडकवेलही. सगळ्या यंत्रणा त्यालाच साथ देतील. आत्ता, ह्या क्षणी, ह्या क्षणी इथून निघून गेले तरच आपण सुरक्षित राहू. ह्याचे कारण आत्ता तो हादरलेला आहे, त्याच्या बुद्धीवर भीतीचे आवरण आहे. आत्ता तो सांगोपांग विचार करू शकत नाही आहे. आत्ता तो बेसावध आहे. आत्ता त्याला फक्त त्याची साथ देणारेच आजूबाजूला हवे आहेत. अश्या अवस्थेत त्याला आपण सोडून गेलो तर तो आत्तातरी काहीही करू शकणार नाही. आणि मग त्याला भान यायच्या आत आपण पार कुठल्याकुठे पोचलेले असायला हवे आहे.

रतन अलगद उठली. तिच्या कक्षात गेली. तिच्या कक्षात गेल्यावर मात्र तिच्या हालचालींना प्रचंड वेग आला. फटाफट मौल्यवान वस्तू, दागदागिने आणि हाताला लागतील तितके पैसे घेऊन ते बॅगेत भरून ती दारात आली. हबकून बसलेला अन्या तिच्याकडे पाहातच राहिला.

रतनने अत्यंत निष्ठूरपणे त्याला सांगितले.

"मीबी चाल्लीय! माझी वाट पाहू नग! आता नाई यायची मी कवाच! तू आन् तुझा हा आश्रम, आई घाला!"

हातापायतले बळ गेलेला अन्या जेमतेम इतकेच विचारू शकला......

"रत्ने... तू बी चाल्लीस व्हय मणीमागं?"

"मणीची बात निराळीय अन्या, मला दिस ग्येलेले न्हाईत मणीसारखे"

आश्रमाच्या दारातून बाहेर पडून कितीतरी लांब पोचलेल्या रतनला पाहताना अन्याच्या डोक्यात त्या वाक्याचा अर्थ नीट घुसला. काय म्हणाली ही? मणीला दिवस गेलेले आहेत?

आयुष्यात प्रथमच अन्या नावाच्या कर्तृत्वशून्य इसमाला आयुष्याला काही अर्थसुद्धा असतो हे समजले होते, फक्त...... तो अर्थ नष्ट झाल्यावर त्याला ते समजले होते इतकेच!

भल्या मोठ्या आश्रमात, शकुंतला जांभळेशिवाय एकही जुना साथीदार नसल्याने पूर्ण एकटा झालेला अन्या, आज प्रथमच खर्‍याखुर्‍या गरजेने तिन्मुर्ती दत्तापुढे वाकला......

========================================

विधानसभेच्या निवडणूका जवळ आल्या आणि आश्रमाला जणू छावणीचे स्वरूप आले. नाईकांचा मिंधा झालेला अन्या आता येतील त्या भाविकांना सन्मार्गाला लागण्याचे मार्गदर्शन करत मिळेल त्या देणगीवर आश्रम चालवत होता. पण निवडणूका जवळ आल्या आणि अन्याला प्रथमच एक प्रकार खर्‍या अर्थाने पाहायला मिळाला. पैसा! काळा पैसा! नोटा असतात तश्याच दिसतात. काळ्या वगैरे नसतात. फक्त त्या असूच नयेत असे अनेकांचे मत असल्याने त्या काळ्या ठरतात. इतके साधे असते ते!

पण देश चालतो तो ह्या 'असायलाच नकोत'वाल्या नोटांनीच! असायला हव्यात किंवा असल्या तरी चालतील अश्या नोटांनी फार तर घर चालेल एखादे!

आश्रम आहे का बँकेची तिजोरी असे वाटावे असे प्रकार घडू लागले. रात्रीबेरात्री ट्रंका येऊ लागल्या. लपवल्या जाऊ लागल्या. सूर्य उगवायच्या आत झोपडपट्टीत वाटल्या जाऊ लागल्या. कार्यकर्त्यांचे खिसे टम्म भरू लागले. सामान्य माणसे, पोरेटोरे, आयाबाया, आता कोणाच्याही हातात पैसा खुळखुळू लागला. हा पैसा नाईकांच्या बंगल्यावरून जात नसून अंधाराच्या राज्यात बाबांच्या आश्रमातून जात आहे हे सामान्य माणसाला समजत नव्हते. आजवर नाईकांनी निवडणूका अश्याच रीतीने जिंकल्यामुळे लोकांना आधीच माहीत होते की आता कॅश, दारू आणि मटन ह्यांचा रतीब सुरू होणार! सकाळी तालमीत घुमणारी पोरे संध्याकाळ झाली की हायवेवरच्या ढाब्यावर जाऊन तर्र अवस्थेत वेटरला सांगू लागली...... 'रस्सा एकदम कोल्हापूरी हां? आनि सुक्क आनून ठीव आदी हित्तं, चक्ना म्हनून'!

पहाटे अडीच वाजता झोपडपट्ट्यांमधील झोपड्यांची खिळखिळी दारे वाजू लागली. अंधारात घाबरून दार उघडणार्‍याच्या हातात एक उबदार पाकीट सारले जाऊ लागले. 'लक्षात ठेवा, आपले चिन्ह काळी माती'! माना डोलावल्या जाऊ लागल्या. सकाळी पाण्याच्या नळावर बायका कुजबुजू लागल्या.

निवडणूका अगदी जवळ आल्या तशी परिस्थिती फारच तापली. लहानसहान पोरे वेगवेगळ्या पक्षांच्या चिन्हांचे बॅच छातीवर लावून फिरू लागली. बायका पदराने तोंड लपवून 'आमचं मत तर अश्याश्यांनाच' असे कुजबुजू लागल्या. समस्त पुरुषवर्ग धुंद अवस्थेत मटनाच्या नळ्या फोडून शिवीगाळ करत रात्री जागवू लागला.

आणि प्रचाराचा शेवटचा आठवडा राहिला तसा अन्याने नाईकांना निरोप धाडला. आश्रमका सेवकवर्ग हररोजका ये खर्चा देखकर नाराज होता जा रहा है! उनके लिये कुछ कर सकते है? नाईकांनी होकारार्थी मान डोलावली. नाईकांची सर्व काळी ट्रँझॅक्शन्स आश्रमावरून होण्यात सहाय्यभूत ठरलेल्या अन्याला एक घसघशीत हिस्सा मिळाला. त्याशिवाय सेवकवर्गही कधी नव्हे इतका खुष होईल इतका हिस्सा प्रत्येक्ल सेवकालाही मिळाला. शेवटचा आठवडा राहिल्यामुळे आता नाईकांचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन प्रचारात बुडले. आता आश्रमाकडे फिरकणेही त्यांना शक्य होईना! जेमतेम दोन कार्यकर्ते शेवटचे कॅशवाटप करण्यासाठी नेमण्यात आले. आणि नाईकांच्या नकळतच शेवटच्या आठवड्यातील कॅशवाटप अन्याच्या सेवकवर्गाकडे आले. अन्याने सेवकवर्गाला बसवून पट्टी पढवली. ती पट्टी पढवणे म्हणजे अन्याच्या चमत्कारीक, विकृत आणि तरीही सुपीक डोक्याचा अजब नमुना ठरला. सेवकवर्ग एकदिलाने जान कुर्बान करून अन्याच्या शब्दांवर निष्ठा ठेवून राहिला.

आता अंधारात पाकीटे अन्याचा सेवकवर्ग वाटत होता. तितपत विश्वास अन्याने मिळवलेला होता नाईकांकडून! त्या पाकीटांमधील रकमेच्या एक चतुर्थांश रक्कम अन्या आधी सेवकांनाच वाटत होता. फक्त एक सूक्ष्म बदल केला होता अन्याने.

पण तो सूक्ष्म बदल महाभयानक होता.

'काळी माती' या चिन्हाऐवजी 'साखरेचे पोते' ह्या चिन्हाला मत द्यायचे आहे असा बदल केला होता अन्याने!

नाईक! अन्याला वीर गावातून सातार्‍याला आणणारे नाईक! बागवानला पेट्रोल पंप मिळू नये म्हणून अन्याला धमकावणारे नाईक! अन्याच्या आईच्या हत्येच्या आरोपातून अन्याला सहीसलामत बाहेर काढून त्याच्यावर आयुष्यभराचे उपकार करणारे नाईक! अन्याला पूर्णपणे मिंधा बनवून स्वतःच्या पापकृत्यांमध्ये सहभागी व्हायला अन्याला मजबूर करणारे नाईक!

नाईक!...... नाईक चक्क हारले!

अपमानास्पदपणे हारले. तोंड दाखवायची संधी राहिली नाही त्यांना! बागवानांचा पक्ष निवडून आला. आणि बागवानांना त्यांच्या खबर्‍यांकडून अतिशय नीट समजले की त्यांचा पक्ष का निवडून आला होता! बागवानांसाठी आता अवलियाबाबा हे अल्लाहचा अवतार होते. जी स्वप्ने बागवान पूर्ण झोपतेही चुकून पाहात नसत ती आता त्यांना दिवसाढवळ्या पडू शकत होती.

एका नाईकाने एका महाराजाला देवपद देऊन स्वतःचे मिंधे बनवले! त्या महाराजाने त्याच नाईकाला जमीनदोस्त करून स्वतःचे पद अधिकच भक्कम केले.

नाईकामुळे अन्या देव ठरला होता. आता अन्यामुळे बागवान पुढारी झाला होता. दोन्ही परिस्थितींमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. अन्याचे अस्तित्व नाईकांच्या इशार्‍यावर अवलंबून होते. आता नाईकांचे राजकीय भवितव्य अंधारात लोटले गेलेले होते आणि बागवानाच्या राजकीय स्वप्नांना आधार होता अन्याच्या महाराजगिरीचा!

आता नाईक जुने मुडदे खणून काढायला गेले तर तो त्यांचा मत्सरातून निर्माण झालेला राजकीय सूडाचा प्लॅन ठरणार होता.

आधी सत्ता महाराजांच्या बाजूने होती, आता महाराजांमुळेच कोणालातरी सत्ता मिळाली होती.

आश्रमाला केवळ तीनच महिन्यांत गतवैभव परत मिळाले. आता आश्रमाला रोज रोषणाई होत असे! उघड होते, बागवानांच्या राजकीय कारकीर्दीला मिळालेला पाचवा गिअर ज्या महाराजांमुळे मिळाला होता त्यांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक गरजा भागवणे हे आता बागवानांचे प्रथम कर्तव्य होते. अन्या आणि त्याचा आश्रम गब्बर होऊ लागला होता. भल्याभल्यांची तोंडे गप्प करता येतील असा पैसा आता आश्रमाकडे वळू लागला होता.

ह्या तीन महिन्यांमध्ये रतन आणि मणीची आठवण झाली नाही असा एकही दिवस नव्हता. पण अन्या त्यांची माहिती काढण्याची इच्छाही मनात येऊ देत नव्हता. आता त्याला एकट्याला खूप सामर्थ्यवान व्हायचे होते. इतके, की त्याच्या हातून अनवधानाने घडलेल्याच काय पण त्याने मुद्दाम ठरवून केलेल्या गुन्ह्यातही त्याला कधी कोणीही अडकवू शकणार नाही.

मात्र ह्या तीन महिन्यांमध्ये पूजा उपलेंचवारच्या अनेक वार्‍या झाल्या होत्या आश्रमात! आजही ती आली होती. रतन आणि मणी गेल्यापासून रात्रीचे आश्रमात राहणे तिला शक्य नव्हते कारण आधी तिच्या बहिणीला असे सांगण्यात यायचे की रात्री ती मणीबरोबर राहून काही अध्यात्मिक विधी करते. आता काय सांगणार? त्यामुळे आता बहिणीबरोबर ती दिवसाच येत असे. मात्र ह्या तीन महिन्यांत पूजा उपलेंचवारला इतके नक्की समजले होते की तिचे, तिच्या नवर्‍याचे, सासरचे आणि माहेरचे भाग्य पालटणे ही एखादी ग्रहदशा बदलल्यामुळे झालेले नव्हते, तर तिने जो काही सर्वस्वाचा त्याग ह्या आश्रमात केलेला होता त्याची ती किंमत मिळालेली होती तिला! पण कोणत्यातरी वैचारीक अवस्थेत तिने ते स्वतःशीच मान्य करून टाकलेले होते.

आणि आज नाईक पराभूत होऊन आठवडा झाल्यानंतर अशीच पूजा दुपारची आश्रमात आलेली होती आणि अन्याबरोबर त्याच्याच कक्षात त्याची सोबत करत होती.

त्यावेळी तिने स्वतःहूनच अन्याला विचारले......

"मेरे पडोसमे एक सहेली है मेरी......अंजना नाम है उसका"

"तो?"

"वो भी.... आना चाहती है..."

"जैसे तुम आती हो?"

पूजाने होकारार्थी मान डोलावली.

मनातून अपार सुखावलेला अन्या वरवर शांत भासत म्हणाला......

"अगले हफ्तेसे पहले मत लाना उसे यहाँ!"

"जी"

पैश्यापाठोपाठ आता शरीरसुखाचीही बरसात होणार हे अन्याला समजले. किंबहुना, पूजा उपलेंचवारच आपली ह्या आघाडीवरची दूत म्हणून कार्यरत होईल हेही त्याच्या लक्षात आले. अर्थातच त्या अंजना नावाच्या मैत्रिणीला आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी पूजा उपलेंचवारच्या काही मागण्या पूर्ण कराव्या लागणार हे न समजायला अन्या दुधखुळा नव्हता.

आईच्या मृत्यूनंतर उठलेल्या राक्षसी लाटा पचवून, त्या बदल्यात रतन आणि मणीसारख्या सहकारी घालवून, नाईकांना तोंडघशी पाडून, पैश्याचा आणि स्त्रियांचा ओघ पुन्हा एकदा जबरदस्तपणे आश्रमाकडे वळवून...... सुखी स्वप्ने बघणार्‍या अन्याला हे माहीत नव्हते ...... की पूजा उपलेंचवारशी मैत्री करून महाराजांकडे जायची इच्छा स्वतःहून व्यक्त करणारी तिची नवीन मैत्रीण अंजना......

ही सोपान उदयसाठी लोणंदमधून काम करणारी आशा पाटील आहे!!!!!!

==============

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाही भाग छान आहे..
मणि आल्यानंतर वाटले होते की अन्या चांगला माणूस बनतो आहे पण बेन पार वाया गेल आता ...
आता तिन्मुखी दत्तचं वाचवु त्याला यातुन (किंवा मग बेफिजी वाचवू शकतील)........

मलाही वाटले होते की अन्या सुधरला आहे. पण बेफिंच्या मनात वेगळच दिसतय.

हा भाग छान झालाय आता पुढचा येउद्यात लवकर

उत्तम भाग. मनुष्य स्वभावाप्रमाणे अन्याच्या मनाची चंचलता आणि आंतरविरोध खुप सुरेख चितारला आहे.

पुढचा भाग खूप दिवसांत आला नाही. लवकर येऊ द्या प्लीज...

मला तुमच्या कथा कादंबर्‍या खूप खूप आवड्तात.

मानवी भावभावनांचं शब्दांमध्ये प्रकटीकरण तुम्ही खूप छान प्रकारे करता.

असं वाटतं तुम्हाला भ्रमंतीमध्ये जी माणसं भेटली त्यांना तुम्ही अगदी अंतर्बाह्य वाचत गेलात.

पुढेही अशाच छान छान कथा कादंबर्‍या तुम्ही लिहाव्यात अशा जरा स्वार्थि अपेक्षेत.