फळ

Submitted by फूल on 15 May, 2014 - 19:11

शांता मावशी खिडकीत उभं राहून समोरच्या आंब्याच्या झाडाकडे बघत होत्या. त्यांनीच लावलेलं हे आंब्याचं झाड, अक्षय तेव्हा १३ वर्षांचा होता आणि आपण... आपण २९ वर्षांची नवी नवरी... की घोडनवरी...? सासूबाई असंच म्हणायच्या. त्यांचा मुलगा मात्र तरणा बांड हिरो. ४० वर्षांचा, बिजवर माणूस आणि पहिल्या बायकोपासून झालेला १३ वर्षांचा अक्षय, तरीही तो तरूणच. रूपाने अगदी कळकट, बोलण्याचा पोच तर आज्जिबातच नाही. औषधाच्या दुकानात कामाला. तेही स्वत:चं नाहीच. पण मिजास मात्र केवढी? शिवाय तपकीरीचं व्यसन. पुरुषी अहंकार कायमच बळावलेला.

माझं मात्र हे पहिलं लग्न असून सुध्दा मी घोडनवरी! तसं तर तसं.. अप्पांची तरी कुठे परिस्थिती होती? हुंडा देण्याची ऐपत नाही. डोक्यावर अजून तीन मुलींचं ओझं आणि घरची गरिबी. मुलींनी शिकूनही नोकरी करायची नाही हा आप्पांचा आग्रह, आम्हाला तरी कुठे पोच होती आजकालच्या मुलींसारखी? आता वाटतं तेव्हा बाहेर पडले असते तर बरंच काही वेगळं घडलं असतं. पण ते आपल्या हातात थोडीच? आजचा दिवस सोन्याचा करणं हेच आपल्या हातात. तेच करत आलो आपण. याच आशेवर की कधीतरी हे पेरलेलं सुख उगवेल. पण आता साठी झाली वयाची. सुख उगवणं तर दूरच पण क्षितीजावर सुखाची लकेरही दिसत नाही. अगदी या समोरच्या आंब्याच्या झाडासारखंच. आजवर एकाही वर्षी हे झाडं मोहरलं नाही.

हेच आहे कदाचित आपल्या नशीबात आपण घडवत राहिलो. फळाची अपेक्षा केली नाही. पण म्हणून देवाने फळच दिलं नाही. लग्न हॊऊन आले तेव्हा सासूबाईंचा जाच होताच. पण तोही एकवेळ सुसह्य झाला असता जर हे पाठीशी उभे असते. पण तेही झालं नाही.

लग्नाआधीपासूनच ठरवलं होतं मी, कितीही झालं तरी अक्षयला सावत्रपणाची झळ पोचू द्यायची नाही आणि तो निश्चय मी प्रामाणिकपणे पाळलाही. तरीही स्वत:चं, हक्काचं, आपलं लेकरू असावं असं वाटत होतंच की. दोनदा त्या सौख्याची चाहूलही लागली. पण सुख सतत हुलकावणीच देत राहिलं. पुन्हा तेच... फळलं नाही.

मग ठरवलं अक्षयच आपलं लेकरू. त्याच्यात आपली स्वप्न शोधायची. त्याला इतकं आपलं करायचं की सख्ख्या मायलेकांचंही तसं प्रेम नसेल. पण टाळी दोन हातांनी वाजते. माझ्या मनाला फुटलेला पाझर त्याच्या मनाला नाही फुटला. तो कायमच अलिप्त राहिला. आई म्हणायचा, माझ्या हातचं चापून जेवायचा, प्रसंगी माझा आदरही करायचा पण आम्ही नाळेने कधीच जोडलेलो नव्हतो हे त्यालाही कुठेतरी सलत असावं.

अक्षयचं मोठं होणं मात्र मानवलं आपल्याला. बरे गेले ते दिवस. ह्यांचा तुटपूंजाच पगार पण संसार निगुतीनं केला आपण. अक्षय एम. एस. सी झाला आणि अतिशय देखणा. अर्थात रूप त्याच्या आईचंच. मी आपली सावळी, ठेंगणी, नाकी डोळी नीटस पण सुंदर नाही. त्याचंही कधी आपल्याला काही वाटलं नाही. तो मोठा, शहाणा, देखणा होतोय यातच मला अपार सुख होतं. कुणालाच दिसला नसेल का हा चांगुलपणा माझा?

खरंच कुणालाच नाही. ह्यांनाही नाही. कुठल्याही क्षुल्लक कारणावरून करवादणं, चारचौघातले असंख्य अपमान, संशय, प्रसंगी मार यापलिकडे काहीच मिळालं नाही मला यांच्याकडून. अक्षयकडे बघून सगळे घाव विसरून जायचे मी. काहीतरी चांगलं घडतंय, घडेल हा विश्वास होता.

अक्षय शहाणा, सुशिक्षित झाला, खोऱ्याने कमवायला लागला. लग्न झालं. श्रीमंत घरातली मुलगी सून म्हणून आली... अतिशय देखणी, मधू. अगदी अक्षयला साजेशी. आपणही अपरिमित खूष होतो. आता पुन्हा ठरवलं, जे आपण भोगलं ते आता संपलं. मधूला आपल्या लेकीसारखंच सुखात ठेवायचं.

सगळं बरं चालू होतं की. पण दुधात खडा पडलाच. ह्यांचं माझ्यावर करवादणं, अपमानास्पद बोलणं, सावत्र सावत्र म्हणून डिवचणं मधूही बघत होती. आणि कालांतराने तीही बोलायला लागली. अक्षयला सावत्रपणाची जी जाणीव मी करून दिली नाही ती मधूने अगदी चातुर्याने करून दिली. वाटून गेलं आपल्याला सासूबाईंबद्दल ह्यांना सांगण्यासारखं किती होतं? आपल्याला नाहीच जमलं हे कधीच.

दोघंजणं घरात असली की त्यांच्या खोलीत दरवाजा बंद करून बसायची आणि नाहीतर रात्री उशीरा पर्यंत पार्टीज, मित्र-मैत्रिणी आणि नुसता धिंगाणा. घरात संवाद नाहीच. घडलाच तर विसंवादच.

एकाच छपराखाली राहून मी आणि अक्षय एकमेकांपासून काही कोस लांब गेलो होतो. हे याधीही कशात नसायचेच, आताही तेच. मुलगा दूरावतोय हे सांगायला गेले तर माझ्यावरच करवादले. "तुला कशाला बघवेल त्याचं चांगलं झालेलं? कितीही म्हटलं तरी तू...." पुढलं सगळं माहितच होतं.

आता खटकलं तरी सांगणार कुणाला? राहतं घर अक्षयच्या नावावर. त्यानेच स्वकष्टाने उभारलेलं. त्यात मधूच्या माहेरचीही आर्थिक भर होतीच त्यामुळे तीचही घरात वर्चस्व. ह्यांची आतापर्यंतची सगळीच कमाई अक्षयच्याच शिक्षणात गेली. ती तो कधीच विसरूनही गेला. माझ्या हातंचं काहीच त्याला आवडेनासं झालं. घरात वरकामाला असलेल्या बाईगत माझी अवस्था. मी मात्र निष्काम कर्मयोग आचरला... कायमच. घडतंय ते उघड्या डोळ्याने बघण्यापलिकडे काय होतं माझ्या हातात? माझा मान नका ठेवू, मी सावत्र तर सावत्र पण हे तरी सख्खेच वडिल आहेत ना. मग त्यांचा तरी मान ठेवा. जेव्हा ठेचायला हवं होतं तेव्हा बोलले नाहीत. आता मधू पार डोक्यावर चढून बसली. ती कुणालाच बधेना. अक्षयलाही नाही.

पण तरीही वर कुणीतरी आहे, बसलाय, तो हे सगळं पाहतोय आणि याच गोष्टीची तो जाणीवही करून देत असतो. पुन्हा एकदा सुखाची चाहूल. पूर्वी अक्षय कडे बघून सगळं सहन केलं. आता जाई कडे. अक्षयचं गुणी पिल्लू. माझी नात. तिला माझा कोण लळा लागलाय. तिला डोळ्यासमोर वाढताना बघणं हेही सुखंच. पण ती निरागस पोर लहानपणापासूनच समजंस. कित्येकदा रात्रीत उठून माझ्याजवळ येऊन झोपते. आज्जू म्हणते मला. बुडत्याला काठीचा आधार देतच असतो देव.

मधूने मला मान देणं, अहो-जाहो करणं केव्हाच सोडून दिलं. आज बरोब्बर एक महिना झाला त्या गोष्टीला. "तू, तुझं तूच काय ते समज. काय चूक झाली तुझी? तू साठीला आलीस आता. अजून स्वत:च्या चुका कळत नाहीत. तुला कितीदा सांगितलं तुझ्या माहेरच्यांना आमच्याबद्दल भलतं काही सांगू नकोस. तू का सांगितलंस त्यांना हे असं? बहिणी आल्या की मोकाट सुटते ही. ती जया, हो तुझीच बहिण, मला कशी बोलून गेली? घरातल्या गोष्टी गावभर करायच्यात का तुला? नाहीतर सांगून टाक एकदा सगळ्यांना, सून आणि मुलगा सैतान आहेत. छळतात मला. म्हणजे तूही सुटलीस. आम्हीही सुटलो." मधू तावातावाने बोलत होती. मी गप्प उभी राहून ऐकत होते. हे आमच्याच खोलीत पेपर वाचत बसले होते. हे अशावेळी कधीच काहीच बोलत नाहीत. खरंतर अश्यावेळीस कुणीच बोलत नाही. अक्षय सुध्दा. कोपऱ्यात उभं राहून पंचनामा ऐकण्याचा प्रसंग फक्त माझ्यावरच येतो असं नाही, ह्यांनाही हल्ली अश्या पंचनाम्यांना सामोरं जावं लागतं.

न जाणो मधू माझ्या अंगावर धावूनही यायची. मी आपली कोपऱ्यात उभी होते खाली मान घालून. जाईही डोळे विस्फारून आईचं करवादलेलं रूप बघत होती. त्या लेकराला सगळंच नवीन होतं. एरव्ही या गोष्टी तिच्यासमोर होत नसंत. तरीहि आज्जू आणि माम चं काहीतरी सतत बिनसंत असतं हे ठाऊक होतं तिला. आता लेकरू १० वर्षाचं झालं होतं. अक्षय तिला आत घेऊन गेला. फरशी पुसायला आलेल्या बाईंसमोर माझा पंचनामा चालू होता. "सांग ना, बोल ना, का अशी वागतेस तू?" मधू पुन्हा चिरक्या आवाजात करवादली. अक्षय आतमधून बाहेर आला. तो मधूला म्हणाला,"तू शांत हो." " अरे काय शांत हो. ही बाई बी. पी. वाढवणार आहे माझं." अक्षय माझ्याकडे वळून म्हणाला, "तू माफी माग तिची आणि सांग जया मावशीला की तसं काही नाहीये. माझ्या डोक्याला ताप देऊ नका."

जया, माझ्याकडे अनेक वर्षांनी रहायला आली. माझी धाकटी बहिण. तिने मला होणारा त्रास स्वत:च्या डोळ्यानेच बघितला. तिला रहावलं नाही म्हणून बोलली. काय बोलली ते अजून मला कळलेलं नाही. पण फार काही बोलली नसेल. चार समजूतीच्या गोष्टी सांगितल्या असतील, इतुकंच. त्यावरनं हा सगळा सावळा गोंधळ. मी आपली तिची माफी मागितली. जयालाही समजावलं. आपली बाजू कायमच पडकी होती जया, सासूबाईंसमोरही आणि सूनेसमोरही. जया ती जी निघून गेली ती परत आली नाही. आणि का यावं? जाऊ दे.

पण त्यानंतर माझ्या चुकीचं प्रायश्चित म्हणून आता महिना झाला घरात कुणीच माझ्याशी बोलत नाहीत. नाही म्हणायला माझं पाखरू, जाई तेव्हढी येते अधून मधून. तिला ओढ आहे आज्जूची. आईला घाबरून तिच्या नकळत येते. आई बाहेर गेली की येऊन बसते. हे आमचं गुपित ह्यांना माहितीये. पण आता नातीने सुधरवलंय. मधूला ते यातलं काहीच सांगत नाहीत. पुन्हा तेच... बुडत्याला काठीचा आधार.

असे कित्येक सल आहेत मनात. कुठे कुठे ठिगळं जोडायची? आता ठिगळालाच ठिगळ जोडावं लागेल. मूळ कपडा तर पार फाटून, विरून गेलाय. आपला जन्मच सहन करण्यासाठी झाला.
इतक्यात जाईची शाळेची रिक्षा खाली आली. जाईने खालूनच शांतामावशींना हाक मारली. "आज्जू.... ए... आज्जू.... अगं किती हाका मारल्या तुला, लक्ष कुठेय?" जाई खालून तोंडभरून हसत त्यांच्याकडे बघून हात हलवत होती. तिने खालूनच त्यांना एक फ्लाईंग किस दिली... शांता मावशींनी एक दिर्घ श्वास घेतला आणि स्वत:शीच म्हणाल्या, "काय बाई किती वेळ झाला अशी उभी आहे मी इथे देव जाणे. नादिष्ट पणा दुसरं काय..." जाईचा हसरा चेहरा बघून त्यांनाही उभारी आली. फळेल फळेल काहीतरी फळेल.

____________________________________________________________________________

पुस्तकाची पानं उलटावीत तशी वर्ष सरली. जाई मोठी झाली. तिनं बंगलोरला एका मोठ्या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी साठी अर्ज केला.

शांतामावशी दिवस ढकलत होत्या. मधूचं लहान सहान गोष्टींवरून करवादणं, वाटेल ते लागट, कुचकट बोलणं सगळं चालूच होतं. मधू नसली की आजोबा बोलायचे. पण शांतामावशींना आता सवय झाली होती. काळीज आता रबराचं झालं होतं. कधी नशीबाचे भोग म्हणायचे, कधी प्रारब्ध, कधी अजून काही. पण हल्ली एक सुखाची झुळूक अधून मधून त्यांना शिवून जायची. जाई. ती आज्जूची बाजू घेऊन आईला समजावायचा प्रयत्न करायची. पण लेकरू अजूनही तसं कोवळंच होतं. अवघ्या २१ वर्षाचं. मधूच्या थैमानापुढे तिलाही कधी कधी कापरं भरायचं. एकदा अक्षयला म्हणाली होती... "डॅड, डू यू थिंक मॉम नीड्स सिकायाट्रिस्ट? शीज बिहेवींग स्ट्रेंज." अक्षय काहीच बोलला नव्हता.

कधी मधू शांत असली तर अधून मधून अजोबाही शांतामावशींवर तोंड सोडायचे. त्यांचाही कोंडमारा होतच होता मग ते मोकळे कुठे होणार? एकदा जाई शांतामावशींच्या खोलीत असतानाच हा प्रकार झाला. जाई काहीच न बोलता खोलीतून निघून गेली. पण त्यानंतर आजोबांशीही जवळिक राहिली नाही. तशी मुळात जवळिक कधी फारशी निर्माणच झाली नाही... आजोबा काही फार लावून घेणारे नव्हते... त्यांनंतर बोलायची आजोबांशी... पण जेव्हढ्यास तेव्हढं. अजोबांच्या मनाला त्यापेक्षा अहंकाराला थोडंफार लागलंच ते... पण पुन्हा त्याचं खापर शांतामावशींच्याच माथी फुटलं. एकंदरीत घरातल्या कुठल्याहि वाईट घटनेला शांतामावशीच जबाबदार असायच्या. अगदी सर्वानुमते... जाई वगळता...

आता जाई बंगलोरला जाणार म्हणजे काठीचा आधारही गेलाच. शेवटच्या दिवसाची वाट बघत बसायची तर. जाईला नोकरी मिळणार हे तर जवळ जवळ नक्कीच होतं.

दरम्यान एकदा आज्जूकडून डोक्याला तेल लावून घेताना जाईच्या गप्पा चालू होत्या. ही सुद्धा शांतामावशींचीच हौस. मधूला जाईचे केस कापून टाकायचे होते. पण जाईचा हट्ट्मला लांब केस हवेत. आज्जू घेईल काळजी माझ्या केसांची. असं म्हणत बाईंनी एकदिवशी रडून गोंधळ घातला. तेव्हा मधू कशी बशी तयार झाली. पण यांचा तेल लावण्याचा कार्यक्रम सुरू असला की हमखास म्हणायची, "नसत्या सवयी लावून ठेवल्यात हीने माझ्या मुलीला. त्यापेक्षा जाईला सांभाळायला एक बाई ठेवणं परवडलं असतं." मग जाई, मधू घरात नसतानाच तेल लावून घ्यायची.

"आज्जे ए आज्जू, मी बंगलोरला असताना माझ्या केसाला तेल कोण गं लावून देणार? मला सांगून ठेव कशी काळजी घ्यायची केसांची. आणि शिककाई कशी उकळायची? किती आवळे घालायचे उकळताना? सगळंच? आज्जू सांगशील ना..." शांतामावशींच्या डोळ्यात टिचकन पाणी आलं. पण कढ दाबत त्या म्हणाल्या, "हो सांगेन गं बाळा... सगळं सांगेन." "आणि आज्जू मला सर्दी झाली की तू तो काढा करून देतेस ना तोही दे बरोबर, आणि माझं पोट दुखतं तेव्हा चाटण देतेस ते... आणि तळव्याला चोळायला तुझ्याजवळंचं गाईचं तूप... आणि हो ५०० बेसनाचे लाडू करून दे. एकदा गेले की सहा महिने तरी परत नाही गं येता यायचं." शांतामावशींना सारखे कढ येत होते. कश्यातरी आवाजात सहजपणा आणत त्या म्हणाल्या, "सरळ बस बघू, किती हलते आहेस? आणि एवढ्या ५०० लाडवांचं काय करणार?" जाई नेहमीसारखी खुद्कन हसली. "अगं म्हणजे भरपूर दे गं. आता तुझ्या हातची आमटी खायला नाही मिळायची रोज. तुझ्या हातचं काहीच नाही. मग सकाळ संध्याकाळ जेवताना एक एक लाडू खात जाईन. आज्जू ए आज्जू मी तुला रोज पत्र पाठवेन किंवा फोन करेन. पण फोनवर तुला... जाऊदे पत्रच पाठवेन. चालेल नं?" शांतामावशी कसंबसं स्वत:ला सावरत म्हणाल्या, "तुला जमेल ते कर पिल्ल्या." जाई पुन्हा बोलायला लागली, "आज्जे ए आज्जू ऐक नं, बघ नं आता मला तुमच्या सगळ्यांबरोबर भरपूर वेळ घालवायचाय गं पण आईला वेळंच नाहीये. बघतेयस नं... मला माहितीये तिची कामं महत्त्वाची असतात पण आता निदान संध्याकाळचा जरा वेळ तरी घरी थांबायला काय प्रॉब्लेम आहे तिला?" इथे दोघीही शांत झाल्या.

त्याच संध्याकाळी बाईसाहेब उत्साहाने उड्या मारत सांगायला आल्या, "आज्जू, आय गॉट द जॉब..... येस्स्स्स्स...." शांतामावशीही भरल्या डोळ्यांनी समोरून ओसंडणारं सुख बघत होत्या. जाईने आज्जूला गच्च मिठी मारली. शांतामावशींनीही तिच्या कपाळाला ओठ लावले.

"आईला सांग बाळा, जा." मधूचे शब्द त्यांना आठवले. "जाईला काही बाही सांगून तिचे कान भरू नकोस आता आमच्याविरूध्द. तेव्हढी एक कृपा कर." पण ही वेडी पोर आज्जूच्याच खोलीत पडून असायची. तिथेच अभ्यास, तिथेच जेवण, गोष्टी ऐकणं, श्लोक , स्तोत्र म्हणणं आणि तिथेच पेंगूळत झोपणं.

"माम बाहेर गेलीये. आली की सांगते. आज्जू.... पुढल्या आठवड्यात निघायचंय." जाईने शांतामावशींचे हात हातात घेतले आणि गच्च दाबत सांगितलं. शांतामावशींना पायाखालची जमीन सरकल्यासारखं झालं. आपलं एकलं इवलं सुख... तेही जाणार आता. काय नव्हेच ते. दोघींनी एकमेकिंना गच्च मिठी मारली. चालायचंच. कालाय तस्मै नम:।

शांतामावशी पुन्हा विचार चक्रात अडकणार तोच दारावरची बेल वाजली. आणि जाईचा आवाज आला... "माम, गेस व्हॉट? आय गॉट द जॉब?" "शाबास रे मेरे चिते" अक्षय चा आवाज. "चला आता पॅकिंग करायला हवं. बच्चू, मी येते तुझ्याबरोबर. आपण दोघी राहू तिकडे. कंपनीच्या क्वार्टर्स आहेत ना?" मधूचा आवाज. शांतामावशींच्या आत कुठेतरी गलबललं... मन विचारचक्रात धावायला लागणार... स्थळकाळाचं भान नाहीसं व्हायला लागणार इतक्यात त्यांना जाईचा आवाज आला.

"हो, पण माम... म्हणजे... तू रागावू नको. खरंतर मी तुला बऱ्याच दिवसांपासून सांगणार होते. पण धीर होत नव्हता. मला... म्हणजे... मी... मी आज्जूला घेऊन जाईन बरोबर... तू इथे डॅड बरोबर थांब. आजोबाही आहेत. त्यांनाही गरज आहे इथे." मधूच्या चेहऱ्यावरचे भाव पटापट बदलत होते. आधी आश्चर्य, मग दु:ख आणि मग राग, पुन्हा ती सणक जाणार अशी चिन्ह दिसायला लागली. मधू पुन्हा करवादायला लागली, "अगं तू कुणाची मुलगी आहेस. माझी की तिची. माझीच ना? मग एव्हडी का चिकटतेस तिला. तुला कित्येकदा सांगितलं की ती तुझ्या डॅडची सावत्र आई आहे. तिने खूप त्रास दिलाय तुझ्या डॅडला. तुला माहितीये का सावत्रपणाचं दु:ख काय असतं. अक्षय समजाव हिला. ही मलाच अपराध्याच्या पिंजऱ्यात उभी करायला निघालीये. प्लीज अक्षय समजाव हीला. या दोघी मिळून बी. पी. वाढवणार आहेत माझं." शांतामावशी पडद्याआडून बघत होत्या. जाई त्राग्याने आईकडे पहात होती. तिला आता तो गोंगाट, ते आईचं नेहमीचं करवादणं सगळं असह्य व्हायला लागलं. काहीही मनाविरूध्द झालं की आई हेच करते हे तिला कळून चुकलं. तिचाही श्वास फुलला आणि जाई मधूपेक्षाही वरच्या स्वरात किंचाळली... "इनफ इज इनफ माम... आता बास्स... खूप ऐकलं तुझं आजपर्यंत... म्हणे सावत्र.. माम आज्जूने कधीच सावत्रपणा आणला नाही गं... मला तिच्या कुठल्याच वागण्यात तो कधीच दिसला नाही... तो तू आणालास... ती सख्खीच आहे माम... तू सावत्र केलंस तिला. ती घडवत राहीली, सांधत राहीली... तू तोडत राहीलीस, बिघडवत राहिलीस... तिने खूप सहन केलं माम... पण आता आय कान्ट टॉलरेट धिस नॉनसेन्स एनी मोर. मी आणि आज्जू पुढल्या आठवड्यात बंगलोरला जातोय. अँड धिस इज फायनल. मला तुम्हा दोघांबद्दलही आदर आहेच, प्रेमही आहे. पण माम मला दिसतंय की तुझं चुकतंय आणि मी ते नाही सहन करू शकत."

थोडं सावरून जाई पुन्हा म्हणाली, "माम, रागाऊ नकोस मला तू पण हवीयेस गं... पण आज्जू बद्दलचा जिव्हाळा वेगळाच आहे. मी नाही सांगू शकत. तू आणि मी फक्त कधी काळी एका नाळेने जोडलेलो होतो पण त्यानंतर तू कधी माझी नव्हतीसच. तुझ्या पार्टीज, मैत्रिणी, सोशल वर्क, यातच तू आणि डॅड बिझी होता. माझ्या वाढत्या वयात, माझ्या सगळ्या हळव्या क्षणांना अज्जू माझ्या बरोबर होती. आज्जूशी नातं खूप आतलं आणि ओलं आहे गं. माम, तुला कळतंय का माम? मी सांगू नाही शकत आहे. कदाचित तुला ते कळणारही नाही. फक्त एव्हढंच सांगते मला कळायला लागल्यापासून सावत्रपणा मला तुझ्यात दिसायचा, तू मला परकी वाटायचीस, मला तुझी भिती वाटायची माम आणि आज्जू आपली वाटायची."

मधू दिग्मूढ हॊऊन जाईकडे बघत राहिली. हातातली वाळू बोटांच्या फटीतून कधी निसटली कळलंच नाही आपल्याला. जाई बोलत होती, "माम तू नाळ नाळ करत राहिलीस. फक्त आपल्या पोटी जन्माला आलं म्हणून आपलं होत नाही. त्याला आपलं करावं लागतं. आज्जूने मला आपलंसं केलं. आठवतं माम, मला दुखलं खुपलं तरी तू सरळ आज्जूकडे पाठवून द्यायचीस. तू कधी आपलं म्हणून बघितलंसच नाहीस गं." जाई आता रडत होती. इतके दिवस आत साचलेलं सगळंच वाहतं झालं. मधू, आजोबा, अक्षय सगळेच फक्त ऐकत राहिले, बघत राहिले. ते निशब्द झाले होते.

शांता मावशींच्या पायातली शक्तीच निघून गेली. त्या मटकन खाली बसल्या. या वेड्या पाखराला इतकं सगळं कळत होतं का? तिच्या मनावर हे संस्कार इतके खोलवर होत होते का? इतका विचार चालू होता का या एवढ्याश्या टाळक्यात? हे असे लहान तोंडातले मोठाले घास हे लेकरू कुठे घ्यायला शिकलं? आज खऱ्या अर्थाने फळलं म्हणायचं का? या वर्षी दारच्या आंब्याला नक्की मोहोर येईल. हो येईलच. फळलं म्हणायचं फळलंच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली. छानच लिहिली आहे....

आज्जींचे नशीब जरा तरी बरे आहे... पण सगळ्याच आज्ज्या तशा नशिबाच्या नसतात Sad

आवडली कथा, सावत्र असुन जिव्हाळा लावणारी बाई असते तशीच सख्खी असुन सावत्रपणा करणारी आई असते याचाही अनुभव घेतला आहे.

स्स्स्स्स्स्स्स्स्स्स !!!!!

फारच सुंदर !!
"फुला" नी लिहिलेली ही फळाची कथा खुप हलवुन गेली आतुन.
तुमची लेखन शैली छान आहे.

शैली आहे .जवळपास चाळीस वर्षांचा काळ आणि पाच पात्रे यांना एवढ्या कमी जागेत मांडायचं जरा कठीण आहे .अगोदरचं लिखाण कोरोला मात्र जबरदस्त .प्रेमचंद अथवा रविंद्रबाबूंच्या लेखनासारखं .कादंबरी मात्र गुंडाळू नका वाटल्यास क्रमश: करावे .लेखकाला नवा ,जुना ,मुरलेला असा प्रकार नसतो .तो समाजासमोर कधिही येतो .

शेवट काय होत असेल त्याचा अंदाज खूप आधीच येतो पण तरीही वाचत रहावंसं वाटणारी कथा आहे. आवडली.

KHUPCH SUNDER Happy

Pages