आडनाव रिटायर करावे काय?

Submitted by मार्क.ट्वेन on 15 May, 2014 - 09:19

'जात नाही ती जात' हे वाक्य क्लिशे होण्याइतकं वापरलं गेलं आहे तरी त्यातलं सत्य कमी होत नाही. किंबहुना अशी वाक्यं क्लिशे होण्यामागे ती नको तितकी खरी असतात, हेच खरं कारण असतं.
याचा अर्थ आपण जातिनिर्मूलन करण्याचा प्रयत्नच सोडून द्यावा असा नाही, पण जातीपाती आपल्या समाजात एवढ्या घट्ट चिकटून राहण्यासाठी जे कॅटॅलिस्ट आहेत, त्यांच्यापैकी जमतील तेवढे हळूहळू बाजूला काढणं करता येऊ शकतं.
आपल्या समाजाची एक खासियत सांगता येईल की, आडनावावरून जात ओळखण्यात आपण सर्व तरबेज असतो. कुणीही नवी व्यक्ती भेटली की, तिच्या आडनावावरून, आपल्या डोक्यात तयार असलेल्या आडनावांच्या एन्सायक्लोपीडियातून आपण पटकन त्याची जात हुडकतो आणि काही गुणवैशिष्ट्यं त्या व्यक्तिला बहाल करून टाकतो. मग ते स्टिरिओटाईप्स घालवण्याची जबाबदारी त्या व्यक्तिची.

आडनाव ही संकल्पना आपल्याकडे केव्हा आली, हे मला माहीत नाही. कदाचित परकीय आक्रमणांनंतर आली असावी. पौराणिक वाङ्मयातल्या कुठल्याही व्यक्तिरेखेला आडनाव असलेलं पाहिलं नाही. प्रि-इस्लामिक भारतातल्या कुठल्या ऐतिहासिक व्यक्तिचं आडनाव ऐकलेलं आठवत नाही. शिवकालात प्रत्येक व्यक्तिचा उल्लेख व्यवस्थित आडनावासहित केलेला आढळतो. अर्थात माझं इतिहासाचं ज्ञान अति तोकडं असल्यामुळे याविषयी फारसं काही ज्ञान मला पाजळता येणार नाही, जाणकार अधिक प्रकाश पाडू शकतील.

एखाद्या व्यक्तिची किंमत जेव्हा 'तो' कोण आहे, यापेक्षा 'तो कोणत्या कुळातला आहे' यावर अवलंबून होती, त्या काळात आडनाव ही संकल्पना महत्वाची होती हे खरं. आजच्या काळात 'आडनाव' या संकल्पनेपासून फायद्यांपेक्षा तोटेच जास्त होत असावेत का?

भारतात सर्वत्र आडनाव ही संकल्पना वापरली जात नाही, याची मला जाणीव आहे. दक्षिण भारतात आडनाव वापरत नाहीत. भारताबाहेर पाहिलं तर काही समाजात आडनाव हे व्यक्तिच्या नावाच्याही आधी येतं. (उदा. कोरिया, चीन इत्यादि आशियायी देश) तर कुठे नुसती तीन नावं पुरत नाहीत म्हणून महंमद अमुक बिन् तमुक बिन् फलाणुद्दिन असं आज्या-पणज्याचंही नाव येतं. एकंदरीत नाव, मधलं नाव, आणि आडनाव हे केवळ व्यक्तिला आयडेंटिफाय करणारे प्लेसहोल्डर्स आहेत आणि ते कसेही वापरलेले चालतात.

आपण आपल्या समाजापुरता विचार करू. समजा आडनाव ही कन्सेप्टच बाद करून टाकली तर? किंवा त्याऐवजी काही दुसरा पर्याय वापरला तर? दुसरा कुठला पर्याय, याचा विचार करण्याआधी 'हे सगळं कशासाठी? आडनावात इतकं वाईट काय आहे?' हा प्रश्न सर्वात आधी येईलच.

आडनावांचा सर्वात मोठा तोटा म्हणजे वर दिल्याप्रमाणे, आडनावावरून होणारं डिस्क्रिमिनेशन, हा आहे. आता वैयक्तिक पातळीवर कदाचित हा काही मोठासा विषय नाही, पण सामाजिक दृष्ट्या याचे तोटे अनेक आहेत. निवडणूकीत कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं, हे बरेच लोक त्याच्या आडनावावरून ठरवतात. एखाद्या कंपनीत एखाद्या पदासाठी पन्नास-साठ अर्ज आले, तर त्यातले कोणते शॉर्ट-लिस्ट करायचे हे ठरवणार्‍याचं लक्ष अर्जदाराच्या आडनावाकडे जात नसेलच, असं आपण म्हणू शकत नाही. अर्थात आडनाव गेल्याने एका दिवसात जातीभेद गायब होतील, असं समजणं मूर्खपणा ठरेल, पण जातीपाती प्रपोगेट करायला आडनाव या संकल्पनेची मदत होते, हे निर्विवाद आहे. जातिनिर्मूलनाकडे हळूहळू का होईना, आपण सरकत जात आहोत. त्याच्या आड येणारं हे आडनाव बादच का करून टाकू नये?

काही लोक म्हणतील, आमचं आडनाव आम्हाला प्रिय आहे, ते बाद करणारे तुम्ही कोण टिक्कोजीराव? आणि, या मुद्द्यात तथ्य आहे. बर्‍याच लोकांना आपलं आडनाव आणि त्याच्याबरोबर मोफत येणारी ग्लोरी प्रिय असते. 'निंबाळकरांचं रक्त आहे म्हणावं!'... 'महाराजांच्या वेळपासूनची हिस्ट्री आहे'...'पुरंदरच्या लढाईत...' वगैरे वाक्यं म्हणत पूजेत ठेवलेली गंजकी तलवार आणून दाखवली जाते. हे करताना आपण सांगली नगरपालिकेच्या मूषकनिर्मूलन विभागात चतुर्थश्रेणी कर्मचारी आहोत हे आठवायची गरज नसते. अग्निहोत्री असल्याचा अभिमान बाळगणार्‍याच्या घरात चारमिनारखेरीज कुठला अग्नि पेटत नसेल, आणि 'धर्माधिकारी' म्हणवून घेणारा धर्माचरण करत असेलच, असं नाही. पण तरीही आपलं आडनाव टाकून द्यायची कोणावर जबरदस्ती नाही, म्हणून वरच्या प्रस्तावात थोडासा बदल करतो. *सरकारी पातळीवर* आडनाव बाद करून टाकावे. आडनाव ही गोष्ट धर्म, कुलाचार, कुलदैवत, गोत्र, प्रवर यांप्रमाणे वैयक्तिक असावी. अधिकृत सरकारी कामकाजात कुठेही आडनावाची गरज पडू नये.

बरं मग आडनावाला पर्याय काय?

एक म्हणजे काही पर्याय असण्याचीच गरज नाही. वर म्हटल्याप्रमाणे फक्त आपलं नाव आणि वडिलांचं नाव वापरता येईल (दाक्षिणात्यांसारखं)

किंवा, आणि माझ्या मते आडनाव गाळण्याचा सर्वात चांगला फायदा, म्हणजे आडनावाऐवजी आईचे (प्रथम) नाव वापरता येईल. पासपोर्ट, रेशनकार्डवर आडनावाऐवजी आईचं नाव आलं तर काय बिघडेल? सध्या आईच्या नावाला कुठे काही स्थान नसतं. स्त्री नवर्‍याकडे जाते तीच आपलं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव टाकून. म्हणजेच जणू आपलं पूर्वीचं सर्व अस्तित्व पुसून टाकून. ज्या काळात स्त्री ही 'मालमत्ता' होती त्या काळासाठी हे सुसंगतच आहे, पण आता?...
पेपरात कधी बातमी येते 'दिपक बाबुराव पारधी याचे दैदिप्यमान यश. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आपल्या समाजातील पहिला डॉक्टर' वगैरे. दिपकबरोबर पिताश्रींचंही नाव झळकतं. मग भले बाबुरावसाहेब अक्खा टायम दारू टाकून पडत असतील आणि संसाराचा सगळा गाडा पार्वतीबाईने चार ठिकाणी घरकाम करून ओढला असेल. पण तिच्या नावाची, तिच्या अस्तित्वाची कुठेही नोंद नाही. मग? आडनावाऐवजी आईचं नाव वापरणं सध्याच्या काळाशी जास्त सुसंगत ठरेल काय?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाव आडनाव ऐवजी प्रत्येकाला एक संपूर्ण रँडम नंबर द्यावा.
नंबर देण्यात कुठलाहि नियम वापरला तर त्या नंबरवरून पुनः जात पात बिहारी का मद्रासी असले खेळ सुरु होतील!

अगदीच नंबर आवडत नसेल तर रँडम नावे द्यावीत.
नाहीतरी जन्माला आलो तेंव्हा मला कुठे नाव आडनाव माहीत होते? कुणि तरी पुढे सांगितले की तुझे नाव हे नि आडनाव हे वगैरे मग त्या शब्दांचाच अभिमान. तसाच अभिमान जे नाव मिळेल त्याचा उत्पन्न होऊ शकतो.

एक फायदा - गांधी आडनाव आहे तर मला निवडून द्यायलाच पाहिजे, किंवा मी राजकपूरचा मुलगा म्हणून सिनेमात आपोआप हिरोची भूमिका असले काही विचार मनात येणार नाहीत.

माझा अभिमान, गर्व सर्व काही मी स्वतः काय केले त्याबद्दल, माझ्या आडनावाबद्दल नव्हे हेच उत्तम.

Happy
झक्कि, मग माझा रँडम नं. XXXXXXXXX आणि मी ZZZZZZZZ यांचा मुलगा आणि ..... कपुर माझे आजोबा.... Wink असं सुरु होइल.

नंतर, xxxxxxxx च्या कुळातला हाय म्हटल.... असं सुरु होइल. आणि ते १००- १२५ कोटी लोकांना नं द्यायचे म्हणजे कमीत कमी १२ आकडी तर द्यावे लागतील. तेवढ लक्षात ठेवायच म्हणजे बापरे बाप.

बाकि लेखाबद्दल,: सगळ अगदी मनातल बोल्लात. पण हि सिस्टीम आहे ना ही 'इव्हॉल्व' झालेली आहे. कुणी एकट्या दुकट्याने नाही तयार केली. जस जस समाज प्रगत होत जाइल तस तसे बदल घडत जातील. आता मी लहान असताना जी जात पात मानली जायची त्याच्या फक्त ४०-५० टक्केच आज बघितली जाते. माझ्या म्हातार्पणी काअचित ४-५ टक्केच बघितली जाइल (तुम्ही ज्या इंटेन्शन ने म्हणताय तशी).

अगोदर नाव सांगितले कि आडनाव काय आपल? अशी विचारणा व्हायची. अगदी कुणापैकी ? इथपर्यंत सहज विचारणा व्हायची. पण सध्या फक्त नाव सांगितल तरी ९० % लोक आडनाव नाही विचारत.

तर सिस्टीम अजुन 'इव्हॉल्व' व्हायची वाट पाहुया आणि त्या इव्हॉल्युशन्ला आपल्या पुढच्या पिढीच्या सहायाने मदत करुया.

नुसता 'निवांत' Happy

लेख मनापासुन पटला. उत्तम लेखाबद्दल आभार.
आडनाव बाद केले तर काय काय अडचणी येऊ शकतील किंवा खरच तुम्ही लिहिलेला हेतू साध्य होईल का हे इथले जाणकार सांगतिलच. पण तुमची कळकळ पोचली.
पुन्हा एकदा धन्यवाद.