द्विपदावली

Submitted by UlhasBhide on 14 May, 2014 - 00:01

टीप : गझल आकृतीबंधातल्या या रचनेतील द्विपदींचा मूड
एकमेकापेक्षा खूपच वेगळा असल्याने ’द्विपदावली’ हे शीर्षक योजले आहे.

द्विपदावली

प्रत्येक दिवस व्हावा दीपावलीप्रमाणे
रंगात रंगलेल्या रंगावलीप्रमाणे

अपुल्यामधील अंतर कित्येक योजनांचे
प्रेमात लंघले मी शतपावलीप्रमाणे

चुकला फ़कीर येतो मशिदीमधे फिरूनी
’आहेच गोल दुनिया’ नियमावलीप्रमाणे

रुपया तुझा म्हणूनी शेखी नकोस मिरवू
उंचीवरून दिसतो तो पावलीप्रमाणे

बेसूर कावळ्याची जी कावकाव चाले
वाटे प्रियेस त्याच्या ‘केकावली’प्रमाणे

पर्वा नसे कुणाची ठेवोत लोक नावे
मी मिरवितो तयांना बिरुदावलीप्रमाणे

हाकून काफियांचा तांडा गुरांप्रमाणे
रचणे गझल नसावे द्विपदावलीप्रमाणे

.... उल्हास भिडे (१४-५-२०१४)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व शेर छान आहेत...

शतपावली,पावली ....मस्तच

रुपया तुझा म्हणूनी शेखी नकोस मिरवू
उंचीवरून दिसतो तो पावलीप्रमाणे >> हा शेर अगदी झटकन भावून गेला.

बाकीचे ही छान आहेत.

रुपया तुझा म्हणूनी शेखी नकोस मिरवू
उंचीवरून दिसतो तो पावलीप्रमाणे<<<<<<<सुंदर शेर

गझल आकृतीबंधातल्या या रचनेतील द्विपदींचा मूड
एकमेकापेक्षा खूपच वेगळा असल्याने ’द्विपदावली’ हे शीर्षक योजले आहे.

हिला गैरमुसलसल गझल म्ह्णतात, अशाच गझला जास्त प्रमाणात लिहिल्या जातात!

प्रत्येक दिवस व्हावा दीपावलीप्रमाणे
रंगात रंगलेल्या रंगावलीप्रमाणे

अपुल्यामधील अंतर कित्येक योजनांचे
प्रेमात लंघले मी शतपावलीप्रमाणे

चुकला फ़कीर येतो मशिदीमधे फिरूनी
’आहेच गोल दुनिया’ नियमावलीप्रमाणे

रुपया तुझा म्हणूनी शेखी नकोस मिरवू
उंचीवरून दिसतो तो पावलीप्रमाणे

अप्रतिम.