अन्या - १८

Submitted by बेफ़िकीर on 13 May, 2014 - 04:59

सातारा!

माणसामधील स्पष्टवक्तेपणा वर आणणारी हवा, दिलदारता बहाल करणारी हिरवाई, कोल्हापूरच्या रांगडेपणाला आणि पुण्याच्या आखडूपणाला पूर्णपणे बाजूला सारून स्वतःचा, मनमिळावू आणि हासरा स्वभाव निर्माण करणारे शहर! येथे ना कधी कंपन्या धड चालल्या ना कधी जोमाने विकास झाला. अजिंक्यताराच्या सावलीत आणि सह्याद्रीच्या पावसात शेती आणि राने मात्र अमाप झाली. राजकारण झाले पण जातीधर्मावरून क्वचितच! महागाई वाढली पण त्यात दु:खेही महागच झाली. समर्थांच्या सज्जनगडाने पावित्र्याचा वर्षाव केला तर यमाईने जिल्ह्यातील कोणीही पोरके राहणार नाही ह्याची जबाबदारी घेतली. वाहतूक वाढली पण अपघात घटले. साखर कारखाने निघाले पण हवा रोज कालपेक्षा अधिकच शुद्ध होत राहिली. मटनाच्या खानावळी वाढल्या पण खवैय्यांना चरबी चढली नाही. महाबळेश्वरसारखे महागडे पर्यटन स्थळ सामावले गेले तिथेच कर्‍हाडसारखे रुक्ष शहरही! एक उडी मारली तर रत्नागिरीत, एक पाऊल टाकले तर पुण्यात आणि एक झेप घेतली तर कोल्हापूरात अशी परिस्थिती आहे येथे!

भल्याभल्यांच्या संगतीत राहूनही स्वतःवर कोणताही शिक्का मारून न घेणारे, स्वतःचे निष्पाप वेगळेपण जपण्यात धन्यता मानणारे शहर! सातारा!

यशाची धुंदी चढणे हे आत्मविश्वासाच्या वाढीसाठी आवश्यक असते. मात्र ही धुंदी जेव्हा मनुष्याला अंध बनवते, 'मी सर्वदा यशस्वीच ठरेन' असा 'अंधविश्वास' निर्माण करते तेव्हा घातक असते.

वाढत्या वयाबरोबर येणारे अनुभव मनुष्याला समृद्ध, परिपक्व आणि संयमी बनवण्यास सहाय्यभूत ठरतात. मात्र अल्पवयात मिळालेले यश पचवण्याची कुवत अतिशय दुर्मीळ असते. बहुतेकांच्या ठायी ती नसतेच.

आणि 'अन्या' ह्याला अपवाद नव्हता.

वयाच्या बाविसाव्या वर्षी जर एका सामान्य गावातून सातारा शहरात एखाद्या उत्सवमूर्तीसारखे आगमन झालेले असेल, भोळेभाबडे लोक सारासार विचार न करता जर पायांवर लोळण घेण्यास झुंबड उडवत असतील आणि एवढे करून त्या त्या वयानुसार मनात येणार्‍या सर्व इच्छा जर विनासायास पूर्ण होत असतील तर माणूस शुद्धीत राहील कसा?

ही ती पातळी असते जेथे माणूस स्वतःला सर्वकाही समजू लागतो. दुराभिमान, हेकेखोरपणा आणि मदोन्मत्तपणा हे दुर्गुण मनाचा ताबा घेतात. आपल्याकडून दुखावले गेलेल्यांच्या चेहर्‍यावरील सूक्ष्म वेदना ह्या धुंदीमुळे डोळ्यांना दिसत नाहीत. कानांना फक्त जल्लोषच ऐकायची सवय झाल्याने आर्त विनंत्या आणि तळतळाटातून आलेले शिव्याशाप ऐकू येत नाहीत.

लाहिरींनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे कित्येक चंगल्या गोष्टी अन्याच्या व्यक्तिमत्वात एकवटलेल्या होत्या. हिंदी भाषेतील का असेनात पण वक्तृत्वकला, व्यायामाने बळकट झालेले शरीर, सततच्या जयघोषामुळे व्यक्तिमत्वात आपोआपच आलेली एक तेजस्वी व प्रभावशाली झळाळी, 'आपण स्वतः बरेच काही करतो' हे सिद्ध करत राहण्याच्या गरजेचे महत्व समजल्यामुळे सुरू केलेले अनेक समाजोपयोगी व वादातीत चांगले उपक्रम वगैरे! संस्कार वर्ग, महिला केंद्र, स्वच्छता अभियान, कीर्तन, व्यसनमुक्ती केंद्र असे सर्व उपक्रम व त्यात अन्याने जातीने घेतलेला सहभाग अन्याला एक निर्विवाद समाजसुधारक बनवत होता. दैनिकांमध्ये माहिती आणि छायाचित्रे येणे आता रोजचे झालेले होते. फोटो विकले जाणे, विविध जत्रा आणि पालख्या निघत राहणे हेही आम झालेले होते. आता चमत्कारांची आवश्यकता उरलेली नव्हती. आता फक्त निष्कलंक राहणे व सत्कार्यात गुंतून राहिल्याचे भासवणे हे पुरेसे होते.

ह्याचबरोबर आता अनेक इतरही पैलू पडत होते ह्या व्यक्तिमत्वाला! राजकारण्यांचा मुबलक वावर होऊ लागल्याने शब्दाचे वजन वाढले होते. ह्या प्लॉटमध्ये बांधकाम करण्याऐवजी त्या प्लॉटमध्ये केल्यास भले होईल असे जर अवलिया बाबा म्हणाले तर त्याचा अर्थ आधीच्या प्लॉटमध्ये बांधकाम केल्यास आपली नामोनिशाणी नष्ट होईल हा आहे व ही एक सुप्त स्वरुपातील धमकी आहे हे बांधकाम व्यावसायिकांना समजू लागलेले होते. अवलिया बाबांच्या सहाय्यिकेने फोन फिरवला तर लोकांना नोकर्‍या मिळत होत्या. अनेक लहानसहान व्यवसाय सुरू करणार्‍यांनी आपल्या दुकानांना, उपहारगृहांना अवलियाबाबांचे नांव देणे ही निव्वळ श्रद्धा नव्हती तर तो व्यवसाय उभा राहण्यामागे अवलियाबाबांनी टाकलेला शब्द होता. अनेक किरकोळ प्रकरणे कोर्टात जाण्याआधी आश्रमात येत होती व एडामट्टी मणी ह्या सुशिक्षित व सुसंस्कृत सहाय्यिकेच्या सूचनेबरहुकूम बाहेरच सेटलही होत होती. मार्केटिंग हे डिपार्टमेंट अन्याने स्वतःकडेच राखलेले होते. रोज उठून अवलिया बाबा काही ना काही घोषणा करत असत. आज काय तर बसस्थानकाची स्वच्छता, उद्या काय तर एखाद्या लहानश्या गावात जाऊन संस्कार वर्गाची स्थापना, परवा काय तर एखाद्या शाळेला छोटीशी देणगी! रोज सकाळी दहाच्या सुमाराला बाबा आश्रमातून बाहेर पडत व कोठे ना कोठे जाऊन आपले अस्तित्वप्रदर्शन व शक्तीप्रदर्शन करून एखादे समाजकार्य करत. आपसूकच जनतेचा एक लोंढा त्यांच्यामागे जयजयकार करत फिरत असे. बाबा जे करत होते त्यात बोट दाखवण्यासारखे काहीही नव्हते. उघड होते, की बाबांची ही प्रचंड लोकप्रियता आपल्यामागे असावी ह्या उद्देशाने स्थानिक नेते कोंडाळे करून बाबांवर आपल्या भक्तीची बरसात करू लागले होते. ह्या त्यांच्या स्पर्धात्मक भक्तीवर्षावात अंतर्गत कलह व हेवेदाव्यांना स्थानही मिळू लागलेले होते. बाबांची खरी कृपा कोणावर हा 'इगो-इश्यू' बनू लागला होता. आमदार नाईक बहुतेकदा मुंबापुरीत असल्याने स्थानिक नेत्यांवर अंकुश जरा कमीच राहात होता. मात्र ह्या सगळ्यात अवलिया बाबा मात्र यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करत होते.

ही ती पातळी होती जेथे हे समजणे आवश्यक होते की आपण चांगले आहोत म्हणून लोकप्रिय आहोत आणि लोकप्रिय आहोत म्हणून उपयोगाचे आहोत. आपल्या शब्दाला सरकारदरबारी आणि प्रत्येकच ठिकाणी असलेली किंमत ही आपली प्रतिमा अतिशय शुद्ध व चांगली असल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती आहे. आपली मुळे आपल्या सत्कार्यात, समाजसेवेत आणि वरवर का होईनात पण शुद्ध आचरणात आहेत. मुळे उपटली गेली तर आपण कोसळू!

आणि हेच आत्ता एडामट्टी मणी अन्याला परोपरीने समजावून सांगत होती. रतनने तिच्यापरीने समजावून सांगण्याची शर्थ केलेली होती, पण अन्या बधला नव्हता. आता रतन मणीचे वाक्चातुर्य ऐकत बसली होती.

स्थानिक पुढारी बागवान हा नाईकांचा राजकीय शत्रू होता. त्याला मुस्लिम समाजाचा पाठिंबा भरपूर होता. पण त्याचा वकूब नाईकांएवढा कधीच नव्हता. तो नाईकांच्या तुलनेत फारच लहान होता. पण स्वप्ने त्यालाही पडत होती पुढारीगिरीची! त्याने काल दोन चार मुसलमान जाणती माणसे साथीला घेऊन अन्याची भेट घेतली होती. हायवेवर एम आय डी सी च्या लगत निघणार्‍या पेट्रोल पंपाचे कंत्राट मला मिळाल्यास भुईजजवळचा चार एकरचा प्लॉट आश्रमाला देणगी म्हणून देण्याची ऑफर त्याने दिलेली होती. तो प्लॉट मिळताच लगेच विकला तरी अन्या श्रीमंतांच्या पंक्तीत जाऊन बसणार होता. घोडे अडत होते त्या ह्या गोष्टीशी की टेंडर नाईकांचा राजकीय अनुयायी सातभाई ह्यानेही भरलेले होते आणि नाईकांचे पारडे जड होते. अवलिया बाबांनी शब्द टाकला तर कदाचित ते पारडे झुकले असते पण हा शब्द टाकणे म्हणजे नाईकांच्या विरुद्ध जाणे होते. मीटिंग संपवून उठताना बागवानने दोन नवीन फोन अवलियाबाबांना भेट दिलेले होते व म्हणाला होता की बाजारात आता मोबाईल फोन आलेले आहेत. तुम्ही असाल तिथून कोणाशीही कधीही बोलू शकाल. ह्या दोन फोनचे सगळे बिल अर्थातच आम्ही भरू, तुम्ही फक्त फोनवरून आपल्या भक्तांना मार्गदर्शन करत राहा. अन्याने मोठ्या कौतुकाने एक फोन रतन आणि मणी ह्या दोघींना वापरायला दिला होता. एक स्वतःकडे ठेवला होता. पण फोन करायचा कोणाला? मग उगाच फोन आहे म्हणून नाही नाही त्यांचे नंबर्स शोधून दहा पाच फोन केले गेले. त्यावर हेही सांगितले गेले की फार महत्वाचे बोलायचे असल्याने आम्ही मोबाईलवरून फोन केलेला आहे. ज्यांना ते फोन आले ते त्या संदेशाने दबून गेले. त्यातील दोघे तिघे तर जणू बाबांनी आपल्याला त्वरीत बोलावलेच आहे की काय असे वाटून आश्रमावरही येऊन गेले.

ते चकचकीत फोन पाहून अन्या भारावलेला होता. पण मणीला त्याचे काही वाटत नव्हते. सोपान उदयच्या मालुसरेंकडे गेल्या सहा महिन्यांपासून असा एक फोन आहे हे तिला माहीत होते. पण अन्या भारावून जाण्याचे कारण फक्त 'फोन' हे नव्हते. भुईंजपाशी असलेला चार एकराचा प्लॉट अन्याला खुणावत होता. रतनने तर अन्याला उलटाच प्रस्ताव ऐकवला होता. म्हणे आमदार नाईकांनाच सांग की ह्या कंत्राटावर त्यांच्या विरोधकांचेही डोळे आहेत तर हे कंत्राट त्यांनाच मिळावे ह्यासाठी ते आपल्याला काय देतील. मणीने रतनला गप्प बसवले होते. हे असे काही नाईकांना विचारणे म्हणजे पार्श्वभागात लाथ खाऊन पुन्हा वीर गावात भेलकांडत जाण्यासारखे आहे हे मणीला सहज समजलेले होते. मणीचा तो मुद्दा ऐकून रतन गप्प बसली असली तरी आपल्यापेक्षा मणीला जास्त कळते हे तिला सहन झालेले नव्हते. तशीही मणी नुसतीच रतनपेक्षा वयाने थोडी मोठी नव्हती तर अनेक बुके शिकलेली, शहरात राहिलेली, अनेक अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रकार केलेली आणि मोठी तयारीची बाई होती. त्यामुळे तिचा विरोध उघडपणे करणे रतनला मानवणारे नव्हतेच.

अन्याने अनेक आठवड्यात दाढीच न केल्याने त्याची दाढी एखाद्या गोसाव्यासारखी वाढली होती. पण ते त्याला खरे तर शोभतच होते. आरश्यात स्वतःची छबी न्याहाळत आणि दाढी कुरवाळत तो दोघींचे बोलणे ऐकत होता. दोघींपेक्षाही तो वयाने लहान होता, पण गेल्या काही वर्षात जे अमाप अनुभव त्याच्या पदरी आलेले होते त्या अनुभवांमुळे तोही धोरणी बनलेला होता. नाईकांना दुखावणे ही मोठी चूक ठरेल हे त्याला पटलेले होते, पण भुईंजचा प्लॉट घालवणे हीदेखील एक चूकच आहे हे तो मणीला पढवत होता.

अचानक वर्दी आली. सातभाई आलेले आहेत. सातभाई हे नाईकांचे समर्थक! कालच बागवान येऊन गेल्यानंतर आणि स्वतःची मागणी सांगून गेल्यानंतर आज लगेच सातभाईंचे येणे फारच सूचक होते. क्षणार्धात अन्या, मणी आणि रतनच्या मेंदूत अनेक चक्रे हालली. सातभाईंनी थेट आश्रमाच्या दारात येणे ह्याचा अर्थ सरळ होता. त्यांना बागवानांनी काल अन्याची भेट का घेतली, त्या भेटीदरम्यान काय झाले आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो ह्याची खबर मिळाल्याचे ते निदर्शक होते. आता सातभाईंना हा विश्वास देणे आवश्यक होते की आपण बागवानांच्या बाजूने काहीही करत नाही आहोत. ह्याचे कारण आत्ता जर सातभाईंना उडवून लावले तर ते नाईकांच्या कानावर जाणार आणि तिसरीच चक्रे फिरणार हे उघड होते. थोडक्यात काय, तर आपण नाईकांच्या हातातले कायमस्वरुपी बाहुले आहोत हे सिद्ध करावेच लागणार अशी परिस्थिती उद्भवलेली होती. आणि तेच तिघांनाही नको होते. हे ठीक आहे की आपण नाईकांच्या पाठीशी असावे, पण ह्याचा अर्थ असा नव्हे की आपल्याला काहीच निर्णयस्वातंत्र्य नसावे. आज आपली लोकप्रियता अमाप आहे ह्याचा नाईकांनाही उपयोग होतोच आहे. पुढेमागे निवडणूकीत आपल्या मदतीने ते एकगठ्ठा मते मिळवणार ह्यात वाद नाहीच आहे. मग ह्या लहानसहान बाबींंमध्ये त्यांचा हस्तक्षेप का असावा? आपण आत्ता काय भूमिका घ्यावी?

सातभाई हे नाईकांचे समर्थक असले तरी ते काही नाईक नव्हते. सातभाई आले म्हणून धावत बाहेर जाण्याचे काहीही कारण नव्हते. अन्याने मणी आणि रतन दोघींना शांत बसायला सांगितले आणि वर्दी आणणार्‍याला सातभाईंसाठी निरोप दिला की ध्यानसमय असून भेट घ्यायला पाऊण तास लागेल. एक प्रकारे ही एक बुद्धिबळाची मूव्ह होती. सातभाईसारख्याने अन्यासाठी इतका वेळ तिष्ठावे की तिष्ठू नये ह्यावर अनेक गोष्टी ठरणार होत्या. जर सातभाई बसून राहिला तर तो अन्याला वचकला असे मानता येणार होते आणि निघून गेला किंवा थेट ह्या कक्षात आला तर त्यालाच अन्याने वचकावे असा त्याचा इरादा आहे हेही कळले असते. पण झाले तिसरेच!

वर्दी घेऊन येणारा पुन्हा आत आला आणि त्याने मणी आणि रतनसमोरच थेट सांगून टाकले.

"सातभाईसायब म्हन्तात की ईर गावच्या सुकन्याताई मशालकर वडलांच्या मृत्यूची कंप्लेन कर्नारेत, म्हाराजांना यळ व्हईल तवा फोन कराया सांगितलाय. आन् त्ये गेले बी निघून"

बुद्धिबळाची मूव्ह घुसली होती. रतनची अर्धी दातखीळ बसायची वेळ आली होती. सातार्‍यात येऊन जेमतेम चार महिने होत आले होते. ह्या चार महिन्यांत बागवानला भेट घेऊ देणे ही अन्याने नाईकांची केलेली पहिलीवहिली आणि एकमेव चूक होती. त्याचा असा परिणाम त्वरीत, केवळ चोवीस तासाच्या आत होणे हे भयंकर होते. मणीला तर तो वर्दी देणारा काय बोलला ह्याचा गंधही नव्हता. पण अन्याचे मात्र बूड हबकल्यासारखे झालेले होते. आपण आहोत सातार्‍यात आणी तेही सातार्‍याच्या सर्वात मोठ्या पुढार्‍याच्या नियंत्रणात! इथे जर मशालकर खून खटल्याला जाग आणण्यात आली तर आपले हाल कुत्रे खाणार नाही. धड पोबाराही करता येणार नाही आणि धड सामोरेही जाता येणार नाही. ज्याच्या हातात सत्ता तो काय वाटेल ते सिद्ध करू शकेल. भीतीने अन्याची मान खाली गेली होती. सर्द झालेली रतन नजर दारावर खिळवून निश्चलपणे बसलेली होती. मणी नुसतीच दोघांकडे पाहात होती.

सर्वप्रथम शुद्धीत आलेल्या रतनने कोला नावाच्या सेवकाला हाक मारली. हा कोला आश्रमात रुजू होण्यापूर्वी शाळेसमोर पेप्सीकोला विकत असे. त्याला त्यामुळे कोला हे नांव पडलेले होते. अतिशय सांगकाम्या असलेला हा मध्यमवयीन इसम धावपळ बरीच करू शकत असे. कोला विकण्याचे काम केल्यामुळे त्याचा आवाज घोगरा आणि कर्कश्शही झालेला होता. त्या आश्रमातही सगळे कोला अशीच हाक मारायचे. कोला धावत दारात आला. रतनने दोन्ही मोबाईल त्याच्या हातात कोंबत त्याला सांगितले......

"बाग्वान सायब आलावता का न्हाई काल?"

"हा हा"

"त्यान्ला जाऊन सांग म्हनाव तिन्मुर्ती दत्तानं कौल न्हाय दिलान् कामाला!"

"व्हय?"

"हा! आन् त्यान्ला म्हनाव फुडं पाहू पुना कधी जम्लं तं. क्काय?"

"चाल्तंय"

"ह्ये फोन द्यून टाक त्यान्चे त्यान्ला"

"चाल्तंय"

"जा पळ पैला"

कोला पाय लावून पळत सुटला आश्रमाबाहेर! तो गेलेला पाहून दाराला टेकून रतन उभी राहिली. तिचे फुललेले श्वास आणि घरंगळल्यासारखे दारातच उंबर्‍यावर बसणे पाहून मणी गप्प राहिली. आपल्याला माहीत नसलेला काही प्रकार आहे आणि आत्ता त्याची चौकशी करणे अनुचित आहे हे तिला समजले. आजची रात्र तिचीच होती. अन्या आळीपाळीने एकेकीबरोबर रात्र व्यतीत करायचा. आज रात्री अन्याला खुलवून मग विचारता आलेच असते मणीला सगळे काही! पण तिच्या मनात एका गोष्टीची मात्र सूक्ष्मपणे नोंद झाली, ती म्हणजे आपण अन्याच्या आयुष्यात येण्यापूर्वी त्याचा आणि रतनचा जो काही इतिहास आहे, तो काही खास स्वच्छ इतिहास नाही. तो गढूळ आहे आणि त्यात असे काहीतरी घडलेले आहे ज्याचा उल्लेख ह्या दोघांच्या चेहर्‍याचा नूर पालटवू शकतो.

एडामट्टी मणी काही कमी धोरणी नव्हती. कोणत्या माहितीचा कधी कसा उपयोग करून घ्यायचा हे एखाद्या स्त्रीला उपजतच समजते तसेही, त्यात मणी म्हणजे असल्या गोष्टींमध्ये चांगली तरबेज झालेली होती. पण मधूनच आपल्यात 'सोपान उदयचे' संस्कार का जागे होतात हे तिला समजत नव्हते.

आणि तासाभरानंतर शांतपणे नाईकांचा फोन आला. हसतमुखाने बोलले. म्हणाले की सुकन्या मशालकरचे कोणीतरी उगीच कान भरवून दिलेले होते. तिला आता आम्ही शांत केलेले आहे. काळजी नसावी. तसेच, मोबाईल फोन हवे असल्यास तिघांसाठी तीन सेट्स पाठवून देऊ. वर असेही म्हणाले की कृपा असावी. ह्या सगळ्याचा अर्थ अन्या आणि रतनला व्यवस्थित समजलेला होता. आश्रमात चाललेल्या प्रत्येक गोष्टीवर नाईकांचे बारीक लक्ष असून आपल्या लोकप्रियतेचा त्यांच्याशिवाय कोणालाही तसूभरही फायदा होणार नाही ह्याची ते दक्षता घेत आहेत. आपण त्यांच्या इच्छेबाहेर काही वर्तन करायला गेलो तर आपल्यावर अनेक संकटे कोसळू शकतात हेही दोघांना नीट समजले. गंमत म्हणजे...... बागवानकडून फोन आणि निरोप मिळाल्याचा एकही फोन वा निरोप आला नाही. ह्यातच काय ते दोघे समजून चुकले.

======================

बरेच दिवस उलटून गेले. नाईकांच्या छायाछत्राखाली महाराजांचा दबदबा वाढतच होता. आता एक नवीनच प्रकार सुरू झाला होता. कोणा कुडमुड्याकडून अन्याने किरकोळ पातळीचे भविष्य सांगणे शिकून घेतले होते. आगा ना पीछा आणि अभ्यास ना काही! समोर आलेल्याचे निरिक्षण, त्याचा हात तपासणे आणि त्याला काहीतरी किरकोळ धार्मिक उपचार करायचा सल्ला देऊन म्हणणे की असे असे केलेस की स्वप्न पुरे होईल. ह्या नव्याच उपक्रमाला जो तुडुंब प्रतिसाद मिळाला की विचारायची सोय नाही. आता मणी आणि रतनने तयार केलेली विश्वासातील सहा सात जणांची टीम पद्धतशीरपणे मार्केटिंग करू लागली होती. आडगावातील एखाद्या गरीब स्त्रीला आधीच हजार दोन हजार देऊन पोपटासारखे बोलण्यात प्रशिक्षित करायचे. एक दिवस अचानक ती सर्वांदेखत आश्रमात येणार आणि जोराने म्हणणार की महाराजांनी सांगितलेली पूजा केल्यामुळे मला माझी अडकलेली जमीन परत मिळाली आणि माझे दिवस पालटले. आता त्या बाईचे तोंड पुन्हा कधी उघडू नये म्हणून कोणतातरी एक निरुपयोगी व चतकोर जमीनीचा तुकडा तिला बहाल करून टाकला की झाले. असा एक माणूस येऊन सर्वांदेखत ओरडून गेला तर बाकीच्यांनी ओतलेल्या धनाच्या राशी तसले कित्येक तुकडे घेण्यास पुरेश्या असू शकायच्या. माया जमवणे हे काम बायकांपेक्षा अधिक कोणाला समजणार? मणी आणी रतनमध्ये जणू चुरसच लागली ह्या मार्केटिंगची! नाईकांनी दिलेले तीनही फोन न वापरता ह्या दोघींनी स्वतंत्र तीन फोन घेतले आणि आता बराचसा वेळ फोनवर बोलून टीमला सूचना देण्यात जाऊ लागला. आश्रमात उडणारी झुंबड पाहून भक्तांच्या संकट निवारणाच्या उपक्रमासाठी वार आणि वेळा ठरवल्या गेल्या. त्यासाठी नवीन पावतीपुस्तक छापून प्रवेश फी आकारण्यात आली. त्याशिवाय ज्याच्या मनातील इच्छा पूर्ण होईल त्याने मनानेच काही देणगी द्यावी असे जाहीर करण्यात आले. परिणाम असा झाला की ज्यांना आपले मनोरथ पूर्ण व्हावे असे वाटायचे ते ते मनोरथ पूर्ण होण्याआधीच देणग्या देऊन जाऊ लागले.

दाढी वाढवून आणि व्यक्तिमत्वात भारदस्तपणा आणून अवलिया बाबा तोंडाला येईल ते बकू लागले. कोणी रोगी समोर आला तर त्याला दर गुरुवारी म्हसोबासमोर पिंपळावर वात लावून आणि थोडा भात व दही घालून प्रार्थना करायला सांगायचे. कोणाला नोकरी हवी असल्यास ग्रामदेवतेला आठवड्यातून तीन वेळा एकवीस प्रदक्षिणा घालायला सांगायचे. कोणी निपुत्रिक जोडपे आले तर सलग सहा महिने कोणत्यातरी तीर्थक्षेत्राची वारी करायला सांगायचे. कोणी कोर्टात केस असलेले आले तर तुळजाभवानीला अकरा हजाराची देणगी द्यायला सांगायचे. आता जो माणूस तुळजाभवानीला अकरा हजार देणगी देईल तो ह्या आश्रमातही हजार दिड हजार ठेवून जाणारच की?

भविष्याचे एक मस्त असते. सांगितलेले होते की होत नाही. होते तेव्हा 'का झाले' ह्याला एकच कारण असते. ज्योतिषाने सांगितले होते म्हणून! नाही झाले तर 'का नाही झाले'ला मात्र अनंत कारणे असतात.

आपोआपच अवलिया बाबांचा हात आपल्या मस्तकाला लागावा, त्यांच्या आशीर्वादाने आपले कल्याण व्हावे ह्यासाठी आश्रमाबाहेर रीघ लागू लागली. आश्रमाचे एक संस्थान व्हायची वेळ आली.

आणि अन्या? यशाच्या धुंदीत अन्या बेभान होऊ लागला होता. ही प्रक्रिया अतिशय नकळत व संथगतीने होत असल्याने सतत कार्यरत असणार्‍या मणी आणि रतनच्याही लक्षात येईनासे झाले होते की अन्याचे ताळतंत्र सुटू लागलेले आहे. खरे तर मिळणार्‍या यशाने, पैश्यांनी आणि महत्वामुळे त्या दोघी स्वतःही काहीश्या बेभानपणेच वागू लागल्या होत्या. सेवकांशी, मार्केटिंग करणार्‍यांशी आणि मुख्य म्हणजे मायबाप भक्तांशी त्यांचे असलेले वर्तन हे अत्यंत गुर्मीचे होते. अवलिया बाबांसोबतच रतन स्वत:चीही भक्ती करून घेत असे. मणी मात्र त्या भानगडीत पडत नव्हती. आश्रमात पाऊल टाकल्यापासून एकुण वातावरणामुळे भारावून गेलेल्या भक्तांसाठी अवलिया बाबांइतकीच मायादेवी रतनही महत्वाचीच ठरत असे. त्यामुळे हात जोडून आणि मान तुकवूनच जो तो आत येत असे.

एखाद्या भक्ताला प्रसाद म्हणून लाडू मिळत असे. एखाद्याला प्रसाद म्हणून भंडारा! काहींना प्रसाद म्हणून काठीचा तडाखाही! तोही मोठ्या भक्तीभावाने व अभिमानाने सोसला जात असे. तीही एक अद्भुत लीलाच ठरे महाराजांची! महाराजांसोबत स्वतःचा फोटो काढून घ्यायला जबरदस्त आकार भरावा लागत असे. त्यात पुन्हा स्त्रियांची वेगळी झुंबड उडत असे. आजूबाजूला जणू गोकूळ असून आपण कृष्ण आहोत अश्या थाटात अवलियाबाबा स्त्रीभक्तांना अगदी जवळ घेऊन फोटोची पोझ देत असत. हरखलेल्या श्रीमंत स्त्रिया मग बाबांच्या पायावर लोळण घेऊन अभिमानाने आश्रमाबाहेर पडत.

व्यावसायिकीकरणाने विकृतीचा कळस गाठलेला होता. पावलापावलाला पैसा द्यावा लागत होता. बदल्यात काहीही मिळत होते. कोणाला प्रसाद, कोणाला तडाखा, कोणाला चुंबन तर कोणाला दत्ताच्या मूर्तीवर वाहिलेला नारळ!

एका रात्री रतनच्या शरीरावर तुटून पडताना अन्याच्या मनात विचार रतनचे नव्हते. आज दुपारी आश्रमात आलेल्या एका स्त्रीच्या पायाला झालेल्या स्पर्शाने तो हुळहुळला होता. त्या स्त्रीची नोंद आश्रमातील पावतीपुस्तकात पूजा उपलेंचवार अशी झालेली होती हे अन्याने त्वरीत पाहून ठेवलेले होते. पोस्टाने प्रसाद पाठवायचा असल्याने पावतीवर तपशीलवार पत्ता व फोन नंबरही होता. पूजा उपलेंचवारचे भरगच्च शरीर इतक्या निकटपणे न्याहाळताना अन्याचे मन जणू आश्रमापासून दूर गेलेले होते. ही स्त्री आपल्याला प्राप्त व्हायलाच हवी अशी हाक त्याच्या रक्तातून येऊ लागली होती. आज प्रथमच रतनशी एक शब्दही न बोलता तो नुसताच तिच्यावर तुटून पडला होता. अन्याचा हा राक्षसी आवेग रतनला नवीन असल्याने तीही अबोल होऊन नुसतीच श्रांत होऊन पडलेली होती. बर्‍याचे वेळाने अन्याने रतनच्या कानात स्वतःची इच्छा निर्लज्जपणे बोलून दाखवली. रतन आता कशाचाही राग येणे किंवा लाज वाटणे ह्याच्या जणू पलीकडेच गेलेली होती. ह्याचे कारण तिची ध्येयेच आता निराळी होती. अन्याच्या वलयाचा फायदा घेऊन स्वतः गब्बर व्हायचे व कधीतरी ह्या सर्व वातावरणापासून खूप लांब कुठेतरी अज्ञातवासात निघून जायचे अशी तिची योजना होती. ही तिची योजना त्या रात्री ठरली होती ज्या रात्री अन्या आणि मणी परस्पर संमतीने आणि रतनची संमती गृहीत धरून पहिल्यांदाच एका खोलीत झोपायला गेलेले होते. अन्या आपला कोणीही नाही हे रतनने स्वतःच्या मनावर बिंबवलेले होते ते त्याच रात्रीपासून! त्यानंतर अन्याला रात्री भेटणे ही दोघांची निव्वळ शारीरिक गरज राहिलेली होती. आणि आत्ताची अन्याची मागणी त्यामुळेच रतनला अजिबात विकृत किंवा आश्चर्यजनक वाटत नव्हती. किंबहुना, इतक्या स्त्रियांच्या सहवासात सातत्याने येऊनही ह्या माणसाचा आजवर पाय कसा घसरला नाही ह्याचेच तिला नवल वाटत होते. पण अन्याची ही मागणी पूर्ण करण्याचे सत्कृत्य रतन फुकटाफाकट कधीच करणार नव्हती.

तिने लाडालाडात अन्याच्या छातीवर डोके ठेवून त्याला विचारले......

"ती बाई तुमच्या पायाशी आन्लीन् तर बक्षीस काय मिळंन् मला?"

अन्याला हा प्रश्न अतिशय सोयीचा वाटला. ह्याचे कारण फार महत्वाचे होते. केवळ अन्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ह्यात रतनला काहीही करावे लागणार नव्हते तर तिची स्वत:चीही एक इच्छा ह्यातून पूर्ण होत असल्याने तिची स्वतःची जबाबदारीही तितकीच असणार होती. शिवाय, तिची इच्छा पूर्ण व्हावी ह्यासाठी ती स्वतःहून मनापासून प्रयत्न करणार हेही नक्की होती. पण हा प्रश्न सोयीचा भासला आहे असे फारसे दाखवू न देता अन्याने विचारले......

"क्या चाहती हो तुम?"

"म्हाईरच्यांनी मला गळ्यात्लं क्येलं व्हतं, त्ये सासूनं वरबाडलं, आता गळ्यातलं न्हाई मला"

"तो पैसा क्या कम कमाते है हम?"

"तसं न्हाई! तुमीहून दिल्यालं लय आव्डेन्"

"ठीक है! जैसेही वो यहां आयेगी, दुसरे दिन तुम्हारी ये इच्छा पूरी होजायेगी"

पूजा उपलेंचवारच्या घरच्यांनी दुसर्‍या दिवशी तोंडात बोटे घातली जेव्हा त्यांना फोनवर निरोप मिळाला की पूजाचे नशीब फार वेगळे आणि चांगले असून त्यासाठी जी खास पूजा करावी लागेल त्यासाठी तिने सलग तीन दिवस आश्रमात राहावे. नवर्‍याला सोबत घेऊन येण्यास हरकत नाही.

तिच्या नवर्‍याला कामामुळे तीन दिवस राहणे तर शक्य नव्हते, पण पहिल्या दिवसापुरता तो आला. पूजा उपलेंचवारच्या आगमनानंतर रतनदेवीने एक एक असे काही प्रकार आपल्या टीमकडून करवून घेतले जणू त्या पूजाला वाटावे की हे सगळे आपल्यासाठीच चाललेले आहे. एकुण प्रकार पाहून आणि विश्वास बसल्यावर नवरा दुसर्‍या दिवशी निघून गेला. फक्त तो निघण्याआधी पूजाची बहिण तिच्या सोबतीला आश्रमात आली. आणि त्या दिवशी संध्याकाळी आठ वाजता रतनदेवीने पूजाला एकटीला कक्षात बोलावून सांगितले.

"म्हाराजांची किरपा होनेवाली है आज रातको तुझ्यावर! कल्याण करून घे! क्काय?"

जमीनीला पावले खिळलेली होती पूजाची! कक्षाच्या बाहेरचे वातावरण तर असे होते जणू पूजा उपलेंचवार ह्या आश्रमात येणे हे आश्रमासाठीच फार महत्वाचे आहे. बहिणही तल्लीन होऊन नामःस्मरण करत होती. येथून पळून गेलो तर आपल्यावर कोण आणि कसा विश्वास ठेवणार हेच पूजाला समजत नव्हते. आपण पळालो तरी बहिण ह्या लोकांच्या ताब्यातच राहील हाही प्रश्न होता. तो जमानाही असा नव्हता की सर्वांकडे मोबाईल फोन असावा. आणि अचानक तिला कोणीतरी येऊन निरोप दिला. तुझ्या नवर्‍याचे खूप मोठे काम झालेले आहे, आता तुमचा भाग्योदय झाल्यातच जमा आहे. ज्याने हा निरोप दिला त्याने त्या कामाचे सर्व संदर्भ अचूकपणे सांगितल्याने पूजाच्या मनावरील अशुभ मळभ काहीसे दूर झाले. ज्या महाराजांच्या चरणी श्रद्धा ओतण्यासाठी हजारोजण जीव टाकतात त्यांची प्रत्यक्ष थेट कृपा आपल्यावर होणार असेल आणि आपल्या घरच्यांपैकी कोणालाच काहीच कळणार नसेल तर ...... तर आपण ह्या प्रस्तावाला विरोध न करताच....... जगू शकू का?

मनात विचारांचे तांडव, नाट्य आणि महाभयानक द्वंद्व सुरू असतानाच रतनने पूजा उपलेंचवारला एका सजवलेल्या कक्षात स्वतःच्या हातांनी धरून नेले. अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्वाचे महाराज तेथे बसलेले होते. एकुण वातावरण आणि ज्या विभुतीसाठी ह्या सगळ्या आश्रमाचा एवढा मोठा कारभार चाललेला आहे ती विभुतीच अचानक समोर आल्याने पूजाच्या मनावर अतोनात दडपण आले. कुठेतरी आतून तिला संदेश येत होता. पळत सूट, बेंबिच्या देठापासून ओरड! हे जे चाललेले आहे ते तुला अजिबात नको आहे. पण हातपाय गळून गेलेले होते. इथून नुसते बाहेर पडलो तरी बाहेर आपल्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, इतकेच नाही तर येथील तमाम सेवकवर्ग आपल्याला कदाचित पुन्हा आतच ढकलेल. गलितगात्र होऊन तिने आतल्या आवाजाला आतल्याआतच मूकपणे उत्तर दिले. की माझी चूक झाली मी इथे आले आणि भुलले. मला जे अजिबात नको होते त्याला आता सामोरे जावे लागणार आहे. पण आता माझ्याकडे पर्याय उरलेला नाही. माझे अशक्त असणे हेच माझ्या मुळावर उठलेले आहे. तेव्हा हे माझ्यातील चांगुलपणा, मला माफ कर! कोणत्यातरी क्षणी पूजा उपलेंचवार मनाने हारली आणि अवलियाबाबांनी आपल्या दोन्ही हातांमध्ये तिला उचलून घेतले व ते आतल्या बाजूने निघून गेले. प्रथमच हा प्रकार पाहून संतापाने तीळपापड झालेली मायदेवी रतन खिळून उभी होती. पण तिने ठरवलेले होते, ह्या अन्याकडून जास्तीतजास्त पापे करवून घ्यायची, भरपूर फायदा उपटायचा आणि त्याला आपली सर्वाधिक गरज असेल तेव्हा त्याला लाथाडून निघून जायचे.

रतनच्या मनात हे विचार चालू असतानाच आतल्य कक्षाचे दार अन्याने आतून बंद करून घेतले आणि रतन आपल्या कक्षाकडे जायला वळली.

पूजा उपलेंचवारच्या बहिणीला द्यायची ती सर्व स्पष्टीकरणे मगाशीच देऊन झालेली होती व ती तिला पटलेलीही होती. तिच्यामते तिची ताई आज एडामट्टी मणी ह्या साध्वीच्या सहवासात ज्ञानार्जन करणार आहे. प्रत्यक्षात पूजा उपलेंचवार हतबलपणे स्वतःलाच लुटले जाताना पाहात होती.

केव्हातरी सकाळ झाली. अन्याला जाग आली तेव्हा त्याचे डोके दुखत होते. पुरेसे धाडस व्हावे म्हणून त्याने भरपूर मद्यपान करून पूजाचा उपभोग घेतलेला होता. आत्ता पाहिले तर शेजारी पूजा तर नव्हतीच पण रात्री कोणी आपल्यासोबत असल्याच्या खाणाखुणाही नव्हत्या. मात्र शरीरावर एक जादूई अंमल पसरलेला होता.

रतन आत आली. तिने सांगितले की भल्या पहाटे पूजा बहिणीला घेऊन गावी गेली. जाताना तिने समाधानाने दत्ताच्या मूर्तीला व आम्हा दोघींना नमस्कार केला. इतकेच नाही तर हसून असेही म्हणाली की पुन्हा अशी पूजा असल्यास अवश्य बोलावून घ्यावेत. तुमच्यासाठी तिने निरोप ठेवला आहे की तिने केलेली पूजा तुम्हाला भावली असेल अशी तिला आशा आहे.

अन्याचा कानांवर विश्वास बसेना! तिकडे घरी पोचलेल्या पूजाला घरात जाताक्षणीच सर्वांच्या अभिनंदनाला सामोरे जावे लागले. तिच्या नवर्‍याचे एका कंपनीत अडकलेले सगळे पैसे अचानक रिलीज झालेले होते. इतकेच नाही तर तिच्या दिराला मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेशही मिळणे जवळपास निश्चित झालेले होते. ह्यातले किती सुदैवाने झाले, किती बाबांची सेवा केल्याने झाले आणि किती रतनदेवींनी फोन फिरवल्यामुळे झाले हे कोणालाच माहीत नव्हते. डोळ्यात तुडुंब समाधान घेऊन पूजा उपलेंचवार काहीच झाले नसल्याप्रमाणे सासरी मिसळून गेली.

तिने अन्यासाठी ठेवलेल्या निरोपामुळे अन्या खराखुरा बेभान होण्याची प्रक्रिया वेगात आली. स्त्रियांना हे असे आवडते ही भावना ठाम होऊ लागली. पूजा उपलेंचवारवर थांबण्याचे काहीच कारण नाही असा निर्वाळ अन्याच्या मनाने त्याला दिला.

तेवढ्यात बाहेरून गलका ऐकू आला. दोन सेवक घाईघाईने आत आले. एकाने अन्याला सांगितले.

"म्हाराज, यक म्हातारी आश्रमात घुसली आन् प्रसाद चोरू लागली. पकडले तर म्हन्ली लय भूक लागल्यालीय. कुटली हाय काय हाय काय बोलंना! काय करावं?"

"काठीचं तडाखं द्या दोन! आन् मंग द्या हाकून रांडंला!"

बेदरकार अन्याने आज्ञा सोडली आणि मिनिटभरातच दोन सपासप झालेले तडाखे ऐकू आले. एक विचित्र घुसमटलेला आवाज आला तसा मात्र अन्या दचकला आणि उठून बाहेर आला.

"काय रं यडझव्यांनो, मारलीन् बिरलीत का काय तिला?"

"काय की म्हाराज! उटंना बगा आता अज्याबात"

अन्याने लाथेने त्या पालथ्या पडलेल्या म्हातारीला उताणे केले तश्या तिच्या दोन्ही हातातील वस्तू अन्याला दिसल्या. एका हातात प्रसादाचा शिरा होता आणि एका हातात दोन मेलेली झुरळं!

...... अनेक वर्षांनी बेदरकार अन्याला त्याची आई भेटलेली होती...... मृतावस्थेत!!!!!!

================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डेली सोप वाल्यांनी शिकण्यासारखे आहे. >>>>> ते लोक हा भाग आठवडाभर चालवतील... आणि शनिवारच्या एपिला शेवटी अन्याच्या आईला दाखवतील. मध्ये आठवडाभर अन्याची मेलेली आई दाखवुन दाखवुन छळतील

<<ते लोक हा भाग आठवडाभर चालवतील... आणि शनिवारच्या एपिला शेवटी अन्याच्या आईला दाखवतील. मध्ये आठवडाभर अन्याची मेलेली आई दाखवुन दाखवुन छळतील>> १०००००००++++अनुमोदन
बाकी हा पण भाग छान ...

अरेरे!:अरेरे: अन्याला साडेसाती असावी. सत्तेच्या धुन्दीने चढलेला अन्या आईला पाहील्या वर कसा रीअ‍ॅक्ट होईल?

अरे... लगोलग १८ वा भागही? धन्यवाद, बेफिकीर.
अजूनही उत्सुकता ताणून धरणारं सातत्यानं लिहिताय. कौतुक आहे.. खरच कौतुक आहे.

बेफिकिर जि तुमचि लेखनि जबरदस्त आहे....

अजूनही उत्सुकता ताणून धरणारं सातत्यानं लिहिताय आनि तुमचे लेखन वाचताना मन्त्रमुग्ध होऊन जायला होत..
नेहमीप्रमाणे हा पण भाग मस्त झाला आहे. पुढील लेखनास खुप खुप शुभेछा...