९० डिग्री साऊथ - १२

Submitted by स्पार्टाकस on 12 May, 2014 - 04:29

३० मार्चला अ‍ॅटकिन्सन आणि कोहेन कॉर्नर कँपवर पोहोचले होते. वाटेत टेडी इव्हान्सची स्लेज त्यांना आढळून आली होती. वा-याचा जोर वाढतच होता. तापमान घसरत चाललं होतं. हिवाळा तोंडावर आला होता. सर्व परिस्थितीचा विचार करुन अ‍ॅटकिन्सनने परत फिरण्याचा निर्णय घेतला. तो म्हणतो,

" एखाद्या डेपोवर अथवा कँपवर ते असतील तरच त्या परिस्थितीत त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्यं होतं, अन्यथा त्यांना शोधणं अशक्यंच होतं. आम्ही सात दिवसाची सामग्री कॉर्नर कँपवर ठेवली होती. जर ते इथवर पोहोचलेच तर हट पॉईंटला पोहोचण्यासाठी त्यांना ती सामग्री पुरेशी होती, परंतु त्यांना मृत्यूने गाठलं असावं अशी माझ्या अंतर्मनाला खात्री पटली होती !"

१ एप्रिलला अ‍ॅटकिन्सन आणि कोहेन हट पॉईंट्ला परतले.

" दुर्दैवाने पोलर पार्टी आता परतून येणार नाही हे सत्य आम्हाला पचवावं लागेल !" चेरी-गॅराडने आपल्या डायरीत नोंद केली, " आमच्यापरिने आम्ही सर्व प्रयत्न केले. आणखीन काही करणं आमच्या हातात नाही. आता लवकरात लवकर केप इव्हान्स गाठणं हेच मुख्य उद्दीष्टं असेल."

टेरा नोव्हा न्यूझीलंडला पोहोचलं !

न्यूझीलंडमध्ये स्कॉट कडून आलेला शेवटचा संदेश बिअर्डमूर ग्लेशीयरवरून टेडी इव्हान्सबरोबर आला होता. स्वतः इव्हान्स, सिम्प्सन, टेलर, पॉन्टींग, डे, मेयर्स, क्लिसॉल्ड अंटार्क्टीकाहून परतले होते.

स्कॉटकडून आलेल्या शेवटच्या बातमीपर्यंत त्याने सतत प्रतिकूल हवामानाची आणि पृष्ठभाग वाटचालीस कठीण असल्याची तक्रार केली होती. तुलनेने अ‍ॅमंडसेनला सर्व गोष्टी अनुकूल होत्या असा ब्रिटीश वृत्तपत्रांचा दावा होता. नॉर्वेजियन वृत्तपत्रांच्या मते मात्रं अशी तुलना निरर्थक होती. अ‍ॅमंडसेनलाही चार दिवस हिमवादळामुळे अडकून पडावं लागलं होतं. डेव्हील्स गार्डन ग्लेशीयर आणि डेव्हील्स बॉलरूम इथे त्यालाही अत्यंत खडतर प्रदेशातून वाटचाल करावी लागली होती. दक्षिण धृवासारख्या मोहीमेत हे सर्व गृहीत धरुनच चालायला हवं आणि त्याविषयी तक्रार करू नये असं नॉर्वेजियन वृत्तपत्रांचं मत होतं.

ब्रिटीश वृत्तपत्रांचा अ‍ॅमंडसेनविषयीचा तिटकारा कायम होता. स्कॉटने इव्हान्स बरोबर पाठवलेल्या संदेशात त्याने आणखीन एक वर्ष शास्त्रीय संशोधनासाठी अंटार्क्टीकामध्ये राहणार असल्याचं नमूद केलं होतं. ब्रिटीश वृत्तपत्रांनी ते लगेच उचलून धरलं ! त्यांच्या मतानुसार दक्षिण धृवावर पोहोचणं यात शर्यतीचा प्रश्नंच नव्हता ! स्कॉट अंटार्क्टीकामध्ये करत असलेलं शास्त्रीय संशोधनाचं कार्य हे दक्षिण धृव पादाक्रांत करण्यापेक्षाही जास्तं महत्वाचं होतं !

चेरी-गॅराडने बिअर्डमूर ग्लेशीयरवरुन परत फिरलेल्या दिवसाच्या स्मृती आपल्या डायरीत पुन्हा नोंदवल्या,

" अ‍ॅटकिन्सन आणि विल्सनने पुढे जाणा-या पार्टीत कोणाचा समावेश असावा यावर सविस्तर चर्चा केल्याचं अ‍ॅटकिन्सनने मला सांगितलं. ओएट्सची दमछाक झाली आहे. स्कॉटला त्याला पुढे नेण्यात रस आहे, परंतु स्वतः ओएट्स मात्रं फारसा उत्सुक दिसत नाही. अर्थात तो नकारही देत नाही ! बॉवर्स आणि एडगर इव्हान्सचीही तीच अवस्था आहे असं दोघांचं एकमत आहे ! लॅशीचंही बॉवर्स आणि इव्हान्सबद्दल असंच मत आहे. क्रेनही थकल्याचं विल्सनचं मत आहे, परंतु अ‍ॅटकिन्सनला तसं वाटत नाही !"

कँपबेलची तुकडी उत्तरेला इव्हान्स कोव्हच्या परिसरात अडकली होती ! त्यांच्याजवळ अतिशय प्रमाणात अन्नपदार्थ शिल्लक होते. मात्रं सील आणि पेंग्वीन तसेच इतर माशांची मुबलक शिकार उपलब्ध होती ! त्या प्रदेशाला त्यांनी इनएक्सप्रेसिबल आयलंड असं नाव दिलं होतं !

१७ एप्रिलला अ‍ॅटकिन्सन, राईट, कोहेन आणि विल्यमसन केप इव्हान्सहून कँपबेलच्या तुकडीला गाठण्याच्या कामगिरीवर निघाले. २० एप्रिलला ते बटर पॉईंटला पोहोचले. परंतु बर्फात पडलेल्या भेगेमुळे त्यांचा पुढे जाण्याचा मार्ग खुंटला होता. सहा दिवसांची सामग्री बटर पॉईंटला ठेवून २३ एप्रिलला ते हट पॉईंटला परतले.

१ मे ला अ‍ॅटकिन्सन, चेरी-गॅराड आणि डिमीट्री केप इव्हान्सला जाण्यासाठी निघाले. हवामान अत्यंत प्रतिकूल होतं. पोलर नाईटला काही दिवसांपूर्वीच सुरवात झाली होती. केप इव्हान्सला पोहचत असतानाच अ‍ॅटकिन्सनने चेरी-गॅराडला प्रश्न केला,

" हिवाळ्यानंतर तू कँपबेलच्या शोधात जाशील का स्कॉटच्या ?"
" अर्थात कँपबेलच्या !" चेरी-गॅराड उत्तरला, " जिवंत माणसांचा शोध घेऊन त्यांना वाचवणं जास्तं महत्वाचं आहे !"

३१ मे ला अ‍ॅमंडसेन ब्युनॉस आयर्सला पोहोचला. दक्षिण धृवाच्या मोहीमेला अमूल्य मदत करणा-या डॉन पेड्रो क्रिस्तोफर्सनशी अ‍ॅमंडसेनची प्रथमच भेट झाली ! दक्षिण धृवाच्या वाटेवर असताना त्याने ज्या पर्वताला डॉन पेड्रोचं नाव दिलं होतं, त्याचं मोठं छायाचित्रं अ‍ॅमंडसेनने त्याला दिलं !

डॉन पेड्रोच्या एका बंगल्यावर अ‍ॅमंडसेनने मुक्काम ठोकला आणि दक्षिण धृवाच्या आपल्या मोहीमेवर पुस्तक लिहीण्याच्या कामात तो गढून गेला ! पैशाच्या कमतरतेअभावी उत्तरेची मोहीम लांबणीवर टाकत असल्याचं त्याने नॅन्सनला कळवलं. आपल्या मोहीमेतील साथीदारांना देण्यासाठीही अ‍ॅमंडसेनकडे पैसे शिल्लक नव्हते ! स्वखर्चाने सर्वजण नॉर्वेला परतले. जालांड म्हणतो,

" मोहीमेत भाग घेतल्याबद्दल आम्हाला एक पैसाही मिळाला नाही ! पुढे कधी मिळेल असं वाटत नाही !"

कँपबेलच्या तुकडीने हिवाळ्यातही आपलं संशोधन कार्य सुरुच ठेवलं होतं. आपल्यापाशी असलेले अन्नपदार्थ पुरवून खाण्यावर त्यांनी भर दिला होता. त्यांच्यापैकी काहीजणांना फ्रॉस्टबाईटने ग्रासलं, परंतु सुदैवाने गंभीर परिस्थिती उद्भवली नव्हती. अन्नातील अनियमिततेमुळे जवळपास सगळ्यांनाच अपचनाचा त्रास होत होता ! सुदैवाने सीलच्या मांसाचा आहारात नियमीत समावेश असल्याने स्कर्व्हीपासून मात्रं संरक्षण मिळालं होतं. तापमान -६० अंश सेल्सीयसपर्यंत खाली उतरलं होतं !

केप इव्हान्सला अद्याप तेरा माणसं शिल्लक होती. अ‍ॅटकिन्सन सर्वात वरिष्ठ अधिकारी होता. त्याच्यासह चेरी-गॅराड, राईट, डिमीट्री, डेबेनहॅम, ग्रान, नेल्सन, लॅशी, क्रेन, कोहेन, हूपर, विल्यमसन आणि आर्चर यांचा तिथे मुक्काम होता.

अ‍ॅटकिन्सनने सर्वांचं मनोधैर्य टिकवून धरलं होतं. तो उत्कृष्ट संघटक होता. त्याच्यात नेतृत्वगुण पुरेपूर भरलेले होते. सर्वांना त्याने वेगवेगळ्या कामांत गुंतवलं होतं.

डिमीट्रीच्या जोडीने स्वतः अ‍ॅटकिन्सनने कुत्र्यांच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारली होती. खेचरांचा ताबा लॅशीकडे होता. नेल्सनवर सागरीजीवनाचा अभ्यास करण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. राईटचं हवामानविषयक संशोधन सुरुच होतं. डेबनहॅमवर फोटोग्राफी आणि भूगर्भशास्त्राची जबाबदारी होती. अन्नसामग्रीची तजवीज आणि योग्य ते रेशनिंग करण्याचं काम ग्रानकडे होतं. स्लेजची दुरुस्ती करुन त्यांना तयार करण्याची जबाबदारी क्रेनवर होती. हूपर, कोहेन आणि विल्यमसन इतरांना सर्व कामात मदत करत होते. साऊथ पोलर टाईम्सचं पुनरुज्जीवन करण्यात आलं होतं. आदल्या वर्षीप्रमाणेच चेरी-गॅराडकडे त्याचं संपादकपद होतं. त्याखेरीज मोहीमेतील रोजच्या घटनांची नोंद ठेवण्याचं कामही त्याच्यावर होतं.

" एकट्या अ‍ॅटकिन्सनने आम्हाला सर्वांना सावरलं होतं !" ग्रान म्हणतो, " त्याने कधीही कोणालाही कोणताही आदेश दिला नाही. तो फक्त विचार मांडत असे ! सर्वांना तेवढंच पुरेसं होतं !"

आपल्या गमावलेल्या साथीदारांचा विचार मनात न येणं मात्रं निव्वळ अशक्यं होतं. राईट म्हणतो,

" चेरी नेहमी आनंदी आणि हसतमुख असे. मात्रं विल्सन आणि बॉवर्स या आपल्या दोन जिवलग मित्रांची आठवण आली की तो खिन्न होत असे !"

२ जुलैला जालांड आणि फ्रामवरील इतर सर्वजण नॉर्वेला परतले. पत्रकारांनी त्यांच्यावर टेरा नोव्हा मोहीम आणि स्कॉट या विषयांवरील प्रश्नांचा भडीमार केला, मात्रं बहुतेक प्रश्नांवर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. स्कॉट दक्षिण धृवावर पोहोचला याबद्दल मात्रं कोणालाच शंका नव्हती, परंतु परतीच्या वाटेवर तो आपल्या मुख्य बेसवर पोहोचला नसल्याची बहुतेकांना भीती वाटत होती ! सर्वात मोठा धोका होता तो स्कर्व्हीचा ! स्कॉट सुखरुप परत यावा अशीच सर्वांची इच्छा होती.

स्कॉटच्या पोलर पार्टीने मार्चमध्येच या जगाचा निरोप घेतल्याची कोणालाही कल्पना नव्हती.

१९१२ च्या सप्टेंबरमध्ये अ‍ॅमंडसेनने फ्रामवरील मोहीमेबद्दल आपलं पुस्तक प्रकाशित केलं. ब्रिटीश वृत्तपत्रांनी अ‍ॅमंडसेनवर केलेला टिकेचा भडीमार आणि अ‍ॅमंडसेन केवळ नशिबवान असल्याचं वारंवार केलेला पुनरुच्चार याने नॅन्सन चांगलाच भडकला होता. अ‍ॅमंडसेनच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्याने लिहीलं,

" नशिब आणि सुदैव याबद्दल कोणीही उगाच दावे न करणं हे अधिक श्रेयस्कर ! दक्षिण धृवाच्या बावतीत अ‍ॅमंडसेनच्या नशिबाचा भाग असलाच तर तो एका साहसी पुरुषाने आपलं लक्ष्यं गाठण्यात केलेल्या प्रयत्नाचा भाग होता !"

३० सप्टेंबरला कँपबेलच्या तुकडीने इनएक्स्प्रेसिबल आयलंड सोडलं आणि केप इव्हान्सची वाट धरली. एक आठवड्यापूर्वीच निघण्याची कँपबेलची योजना होती, परंतु लेव्हीक आणि प्रिस्टली यांनी एक आठवडा वाट पाहण्याची सूचना केली. हवामान अद्यापही अनुकूल नव्हतं. अपु-या अन्नामुळे आणि पचनसंस्था बिघडल्याने सर्वजण हैराण झाले होते. विशेषतः ब्राऊनिंग.

पहिल्या आठवड्यात त्यांनी जेमतेम ३२ मैलाची मजल मारली. दुस-या आठवड्यात त्यांनी ६८ मैल अंतर पार केलं होतं. भर हिमवादळात अंदाजाने त्यांची वाटचाल सुरू होती ! केप इव्हान्स इथे आपल्या स्वागतासाठी कोणी राहीलं असेल किंवा नाही याची त्यांना काहीही कल्पना नव्हती. त्यातच मॅकमुर्डो साउंडच्या उत्तरेला असलेलं ड्रायग्लास्की ग्लेशीयर पार करण्याचं त्यांच्यासमोर आव्हान होतं !

स्कॉटकडून अद्यापही कोणतीही बातमी न आल्याने काहीशा द्विधा मनस्थितीत असलेल्या कॅथलीनने त्याला एका पाठोपाठ एक पत्रं पाठवण्याचा सपाटा लावला होता.

८ ऑक्टोबर १९१२ च्या पत्रात ती म्हणते,

" अंटार्क्टीकावरील पाँटींगने काढलेल्या फोटोंचा मी एक छोटेखानी शो ठेवला होता. लॉर्ड कर्झनपासून अनेकांनी त्याला हजेरी लावली होती. तुझ्या मोहीमेचे फोटो पाहून सर्वांना खूप आनंद झाला.

अ‍ॅमंडसेन दक्षिण धृवावर पोहोचल्याची बातमी एव्हाना तुला न्यूझीलंडमधून किंवा कदाचित धृवावरच मिळाली असेल. तुला काय वाटलं असेल याची मी कल्पनाही करु शकत नाही ! सुरवातीला त्याचा फार मोठा गाजावाजा झाला, परंतु आता मात्रं लोक त्याला फारसं महत्वं देईनासे झाले आहेत. विशेषतः तुझ्या मोहीमेत तू शास्त्रीय संशोधनाचं जे कार्य करत आहेस, ते लोकांच्या दृष्टीने अधिक महत्वाचं आहे !

त्याने तुला फसवून चकवलं असं बहुतेकांचं मत आहे. मी याकडे थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते. त्याने त्याचा मार्ग पत्करला होता आणि त्याचं लक्ष्यं निवडलं होतं. सर्वप्रथम धृवावर पोहोचल्यावर त्याच प्रयत्नात असलेल्या इतरांचा त्याने एका शब्दानेही उल्लेख केलेला नाही, परंतु त्याने तुझ्या मार्गात आडकाठी न करता आपला वेगळा मार्ग निवडला होता हे मान्यं करावंच लागेल.

इंग्लंडमध्ये सर्वांना तुझ्याबद्दल किती अभिमान आहे याचा मला खूप आनंद आहे ! लवकर घरी परत ये ! मी आणि पीटर तुझी आतुरतेने वाट पाहत आहोत !"

बिचारी कॅथलीन !

आपल्या पतीने सहा महिन्यांपूर्वीच रॉस आईस शेल्फवर शेवटचा श्वास घेतल्याची तिला काहीही कल्पना नव्हती !

Kathelene and Peter Scott.jpgकॅथलीन आणि पीटर स्कॉट

केप इव्हान्सला असताना अ‍ॅटकिन्सनने आपल्या सहका-यांसमोर दोन पर्याय ठेवले होते. दक्षिणेला स्कॉटचा शोध अथवा कँपबेलच्या तुकडीपर्यंत पोहोचणे. परंतु कँपबेलच्या तुकडीच्या शोधात जाण्यात एक मोठी अडचण होती ती म्हणजे पृष्ठभागावरील बर्फ अद्यापही पुरेसा टणक नव्हता. तसंच त्यांच्या शोधात केप आद्रेला गेलेल्या टेरा नोव्हाने त्यांना गाठल्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती. सर्वानुमते पोलर पार्टीचा शोध घेण्याची योजना आखण्यात आली.

२९ ऑक्टोबरला अ‍ॅटकिन्सनच्या तुकडीने कुत्रे आणि सात खेचरांसह केप इव्हान्सहून दक्षिणेची वाट पकडली. जुन्या मार्गानेच एक टन डेपो गाठून पुढे तपास करण्याचा त्यांचा बेत होता.

७ नोव्हेंबरला कँपबेलची तुकडी केप इव्हान्सला पोहोचली ! वाटेत हट पॉईंटला त्यांना अ‍ॅटकिन्सनचा पेनेलसाठी ठेवलेला संदेश मिळाला. खेचरं आणि कुत्र्यांसह पोलर पार्टीच्या शोधात दक्षिणेला जात असल्याचा त्यात उल्लेख होता. कॅंपबेल केप इव्हान्सला पोहोचला तेव्हा तिथे फक्त डेबनहॅम आणि आर्चर हे दोघेजणच हजर होते.

तब्बल दहा महिन्यांनी ते सर्वजण केप इव्हान्सला परतले होते !

Campbells party.jpgअ‍ॅबॉट, कँपबेल, डिकसन, प्रिस्टली, लेव्हीक आणि ब्राउनिंग - केप इव्हान्स, ७ नोव्हेंबर १९१२

स्कॉट, विल्सन आणि बॉवर्सच्या शोधात असलेल्या अ‍ॅटकिन्सनच्या तुकडीने एक टन डेपो गाठला, परंतु स्कॉट तिथे पोहोचल्याचं दर्शवणारा एकही पुरावा तिथे आढळला नाही. डेपोच्या परिसरात बारकाईने शोध घेऊनही त्यांची कोणतीही खूण न आढळल्यावर अ‍ॅटकिन्सनने आणखीन दक्षिणेला त्यांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.

१२ नोव्हेंबरला अ‍ॅटकिन्सनची तुकडी दक्षिणेच्या मार्गावर होती. एक टन डेपोपासून सुमारे दहा मैलांवर आघाडीवर असलेल्या राईटला बर्फाचा एक लहानसा ढिगारा दिसला. त्या बर्फातून बाहेर डोकावणा-या एका वस्तूने राईटची उत्सुकता चाळवली. सुरवातीला ते काय असावं याचा त्याला अंदाज येईना, परंतु जवळ जाऊन पाहिल्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसला.

तो तंबूच्या वरच्या टोकाचा भाग होता !

हिमवादळाने तंबूवर बर्फाचा थर जमा झालेला होता. तंबूचं दार कोणत्या दिशेला असावं याची राईटला कल्पना येत नव्हती. आपल्या सहका-यांचं लक्ष्यं वेधण्यासाठी राईटने त्यांना खुणा करण्यास सुरवात केली, परंतु त्याच्या खुणांचा त्याच्या सहका-यांना अर्थ लागत नव्हता.

" त्यांना मोठ्याने हाक मारुन तिथल्या शांत आणि पवित्रं वातावरणाचा भंग करण्याची माझं धैर्य झालं नाही !" राईट म्हणतो.

अ‍ॅटकिन्सन आणि चेरी-गॅराडला गाठून राईटने त्याला तंबूची माहीती दिली. चेरी-गॅराड म्हणतो,

" राईटने आम्हाला त्याला आढळलेल्या तंबूची माहीती दिली. गेल्या वर्षीच्या आमच्या एका मार्करच्या शेजारी आम्हाला केवळ बर्फाचा एक ढिगारा दिसत होता. राईटला तो तंबू असल्याची खात्री नक्की कोणत्या गोष्टीमुळे पटली होती हे मला कळेना ! आम्ही जवळ जाऊन पाहीलं तरीही बर्फाशिवाय आम्हाला काही दिसेना. आमच्यापैकी कोणीतरी ढिगा-या वरच्या भागात असलेला बर्फ बाजूला केला आणि तंबूच्या वरच्या भागात असलेली खिडकी आमच्या नजरेस पडली !"

" प्रत्येकाचा डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या !" विल्यमसन म्हणतो, " गेल्या आठ महिन्यांपासून या प्रसंगाला सामोरं जावं लागेल याचा अंदाज असूनही स्वतःवर नियंत्रण ठेवणं अशक्यं झालं होतं ! आमच्यासमोर असलेल्या तंबूत नक्की काय पाहण्यास मिळेल या कल्पनेनेच माझी छाती दडपली होती !"

अ‍ॅटकिन्सनने प्रत्येकाला आळीपाळीने तंबूच्या आत शिरुन पाहणी करण्याची सूचना केली.
" मी कितीतरी वेळ आत जाण्याचं टाळत होतो !" विल्यमसन म्हणतो, " आतलं दृष्यं मी पाहू शकणार नाही याची मला भीती वाटत होती. अखेर हिम्मत करुन मी आत गेलो आणि समोर जे दिसलं ते पाहून काही क्षणांत बाहेर आलो ! स्लिपींग बॅगमध्ये गोठलेल्या अवस्थेतील मृतदेहांपैकी एक कॅप्टन स्कॉट आहे हे माझ्या ध्यानात आलं. इतरांचे चेहरे पाहण्याची माझी हिम्मत झाली नाही !"

कॅप्टन स्कॉट मध्ये होता. त्याच्या एका बाजूला बॉवर्स आणि दुस-या बाजूला विल्सन होता. विल्सनचं डोकं आणि छाती तंबूला आधार देणा-या खांबाला विळखा घातलेल्या अवस्थेत होती. विल्सन आणि बॉवर्स दोघंही पूर्णपणे स्लिपींग बॅगमध्ये बंदिस्त होते. रात्री झोपेतच मृत्यूने त्यांना गाठलं असावं ! स्कॉटच्या कमरेच्या वरचा भाग स्लिपींग बॅगच्या बाहेर होता. त्याच्या चेहरा वेदनेने पिळवटलेला होता. अखेरच्या क्षणी त्याला ब-याच यातना झाल्या असाव्यात ! अत्यंत कमी तापमानामुळे त्यांची त्वचा पिवळसर पडली होती आणि काचेप्रमाणे चकाकत होती. प्रचंड प्रमाणात फ्रॉस्टबाईटच्या खुणा त्यांच्या मृतदेहांवर दिसून येत होत्या.

अ‍ॅटकिन्सनने तंबूत आढळलेली सर्व कागदपत्रं ताब्यात घेतली. स्कॉट, विल्सन, बॉवर्स - तिघांच्याही डाय-या, स्कॉटने लिहीलेली पत्रं. बॉवर्स आणि विल्सनने केलेल्या शास्त्रीय निरिक्षणांच्या नोंदी यांचा त्यात समावेश होता. विल्सनच्या सूचनेवरुन जमा करण्यात आलेले शास्त्रीय नमुने अ‍ॅटकिन्सनने आपल्या कँपमध्ये नेले. हे काम आटपल्यावर स्कॉट, विल्सन आणि बॉवर्स यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली. स्कॉटच्या स्लेजच्या अवशेषांमध्ये ग्रान आणि विल्यमसनला योगायोगानेच नॉर्वेचा राजा ७ वा हकून याच्या नावाने अ‍ॅमंडसेनने लिहीलेलं पत्रं आणि स्कॉटच्या नावाने लिहीलेली चिठ्ठी सापडली होती !

" त्यांच्या चिरविश्रांतीत आम्ही कोणताही व्यत्यय आणला नाही !" चेरी-गॅराड म्हणतो, " त्यांच्या मृतदेहांना आम्ही स्पर्शही केला नाही. सर्वजण बाहेर आल्यावर तंबूला आधार देणारे बांबू आम्ही काढून घेतले. आपसूकच तंबूच्या कापडाने त्यांचे मृतदेह झाकले गेले !"

तंबूच्या कापडावर बर्फाचा मोठा ढिगारा रचण्यात आला. त्यावर ग्रानच्या स्कीईंगच्या फळ्यांपासून बनवलेला मोठा क्रॉस उभारण्यात आला. स्कॉट, विल्सन आणि बॉवर्सला अखेरची मानवंदना देऊन सर्वांनी काही अंतरावर असलेला कँप गाठला.

Cairn Mabo.jpgस्कॉट, विल्सन आणि बॉवर्स यांची अंतिम चिरनिद्रा - रॉस आईस शेल्फ - १२ नोव्हेंबर १९१२

आपल्या तंबूत बसून अ‍ॅटकिन्सन स्कॉटची डायरी वाचत होता. ज्याला कोणाला डायरी मिळेल त्याने ती पूर्ण वाचावी आणि परत आणावी अशी स्कॉटने कव्हरवर सूचना लिहीली होती ! आपल्या सहका-यांना एकत्र करुन अ‍ॅटकिन्सनने स्कॉटने ब्रिटीश जनतेच्या नावाने लिहीलेलं पत्रं वाचून दाखवलं. ओएट्सच्या मृत्यूची आणि त्याच्या असामान्य त्यागाची हकीकत सर्वांसमोर यावी अशीही स्कॉटने इच्छा व्यक्त केली होती.

ओएट्सच्या मृतदेहाचा शोध घेण्याचाही त्यांनी बराच प्रयत्न केला. दक्षिणेला काही मैलांवर त्यांना ओएट्सची स्लिपींग बॅग आढळली, परंतु त्याच्या मृतदेह मात्रं आढळला नाही. स्लिपींग बॅग मिळालेल्या ठिकाणी ओएट्सच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी बर्फावर दुसरं स्मारक उभारलं.

१५ नोव्हेंबरला अ‍ॅमंडसेनने लंडनच्या क्वीन्स हॉलमध्ये दक्षिण धृवावरील आपल्या मोहीमेची सविस्तर काहणी सांगणारं व्याख्यान दिलं. कॅथलिन स्कॉट प्रेक्षकांमध्ये उपस्थीत होती ! आपल्या मोहीमेचे अनेक फोटोही अ‍ॅमंडसेनेने सर्वांना दाखवले. कॅथलिनच्या मते त्यातील बहुतांश फोटो हे अगदीच हलक्या दर्जाचे आणि बनावट होते ! व्याख्यानानंतर कोणीतरी अ‍ॅमंडसेनला विचारलं,

" दक्षिण धृवावर पोहोचून तू काय मिळवलंस ? "

अ‍ॅमंडसेनने प्रश्नकर्त्याकडे रोखून पाहीलं.
" सामान्यं माणसं फक्तं दोन वेळचं जेवण मिळवण्याचाच विचार करू शकतात !" अ‍ॅमंडसेन तीक्ष्णपणे उत्तरला, " मी तो विचार कधीच करत नाही !"

रॉयल जॉऑग्राफीक सोसायटीसमोर अ‍ॅमंसेनने केलेल्या भाषणाच्या वेळी तर लॉर्ड कर्झनने दक्षिण धृवीय मोहीमेचं श्रेयं हे अ‍ॅमंडसेनचं नसून स्लेजच्या कुत्र्यांच्या तुकडीचं आहे हेच जणू सूचित केलं.

" थ्री चिअर्स फॉर द डॉग्ज !"

लॉर्ड कर्झन उद्गारला !

कर्झनचे हे उद्गार अ‍ॅमंडसेनला अर्थातच रुचले नाहीत, परंतु त्याने त्यावेळेस वाद घालणं हे श्रेयस्कर नव्हतं असा अ‍ॅमंडसेनचा विचार होता.

अ‍ॅमंडसेनला भाषणाला बोलावल्याच्या निषेधार्थ क्लेमंट्स मार्कहॅमने आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता ! रॉयल सोसायटी आणि ब्रिटीश जनता अ‍ॅमंडसेनची धोकेबाज म्हणूनच संभावना करत होती.

रॉस आईस शेल्फवरुन हट पॉईंटकडे परतीच्या वाटेवर असताना ग्रानने स्कॉटच्या स्कीईंगच्या फळ्या चढवल्या.

" स्कॉट नाही पण निदान त्याच्या स्कीईंगच्या फळ्यांचा तरी प्रवास पूर्ण होईल !" ग्रान म्हणाला.

व्हिक्टर कँपबेलच्या तुकडीबद्दल अद्यापही अ‍ॅटकिन्सनला काहीच कल्पना नव्हती. घाईघाईतच त्याने हट पॉईंटची वाट धरली. २७ नोव्हेंबरला ते हट पॉईंटला येऊन पोहोचले. कँपबेलची तुकडी केप इव्हान्सला पोहोचल्याचा संदेश मिळाल्यावर अ‍ॅटकिन्सनने सुटकेचा नि:श्वास टाकला !

" स्कॉट, विल्सन आणि बॉवर्स एक टन डेपोपासून फक्त ११ मैलांवर असताना मरण पावले !" चेरी-गॅराडने विषादाने आपल्या डायरीत नोंद केली, " ते ११ मैलांवर येऊन पोहोचलेले असताना आम्ही एक टन डेपोवरुन परत फिरलो असतो, तर मी स्वतःला कधीच क्षमा करु शकलो नसतो ! पण आम्ही परत फिरल्यावर दहा दिवसांनी ते त्यांच्या अंतिम मुक्कामाला पोहोचले होते. अर्थात आम्ही परत निघालो तेव्हा आमच्यापासून ते अवघ्या ६० मैलांवर असतील याची मला अजिबात कल्पना नव्हती. आम्हांला मिळालेल्या आदेशाचं आम्ही पालन केलं, परंतु इतक्या जवळ असूनही आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही हा सल मला आयुष्यभर राहील !"

ग्रानचा दृष्टीकोन मात्रं थोडा वेगळा होता. तो म्हणतो,
" चेरी-गॅराडला नॅव्हीगेशनची थोडीजरी कल्पना असती तर स्कॉटला वाचवणं शक्यं होतं असं मला राहून राहून वाटतं ! आमच्या तुकडीतील जवळपास प्रत्येकजण जरुरीपेक्षा जास्त सहनशील आणि संयमी आहे ! कधीकधी मदतीसाठी रान उठवणं हे फार उपयोगी पडतं ! मात्रं स्वत:चा जीव वाचवण्यासाठी आपल्या सहका-यांचा जीव धोक्यात घालणं हे स्कॉटला कधीही मंजूर झालं नसतं ! त्याच्यासाठी हा प्रतिष्ठेचाही असण्याची शक्यता होती ! शॅकल्टन कोणत्याही मदतीविना ८८ अंश अक्षवृत्तापार पोहोचून परत आला होता, तर आपण कोणत्याही मदतीविना धृवावर पोहोचून परत येऊ शकतो हे सिध्द करण्याचा स्कॉटने विचार केला असावा ! अ‍ॅटकिन्सनमध्ये उत्कृष्ट नेतृत्वगुण असले, तरी तो वेगळा विचार करताना दिसत नाही. पोलर पार्टीचा शोध घेण्यास त्याने काही दिवस लवकर हालचाल केली असती तर... अर्थात जे झालं ते खूप दुर्दैवी आहे !"

होबार्ट येथे अ‍ॅमंडसेनने हकालपट्टी केलेला योहान्सन नॉर्वेला परतला. अ‍ॅमंडसेनने त्याचा पिच्छा सोडला नव्हता. मोहीमेशी संबंधीत असलेल्या कोणत्याही समारंभात योहान्सनला सहभागी करून घेऊ नये अशी तार त्याने नॉर्वेजियन जॉग्रॉफीक सोसायटीला आधीच पाठवली होती. आपल्या पुस्तकातही त्याने योहान्सनने प्रेस्टर्डचा जीव वाचवण्याच्या घटनेचा कोणताही उल्लेख केला नाही ! दक्षिण धृवावरील नॉर्वेजियन मोहीमेच्या यशाच्या स्मरणार्थ नॉर्वेचा राजा ७ वा हकून याने जाहीर केलेलं ' मेडल ऑफ द साऊथ पोल ' योहान्सनला देण्यासही अ‍ॅमंडसेनने विरोध दर्शवला होता, मात्रं राजापुढे त्याची डाळ शिजली नाही !

अ‍ॅमंडसेनने चालवलेल्या या उपेक्षेमुळे योहान्सनला नैराश्याने ग्रासलं. त्याचं दारू पिणं प्रमाणाबाहेर वाढत गेलं. तो डिप्रेशनची शिकार झाला !

४ जानेवारी १९१३ ला जॅल्मर योहान्सनने नॉर्वेत आत्महत्या केली !

योहान्सनच्या या शोकांतिकेला अ‍ॅमंडसेन ब-याच अंशी जबाबदार होता.

Johansen.jpgफ्रेड्रीक जॅल्मर योहान्सन

१८ जानेवारीला केप इव्हान्स इथे असलेल्या ग्रानला त्यांच्या दिशेने येणारं जहाज दृष्टीस पडलं !

टेरा नोव्हा !

स्कर्व्हीने ग्रस्त झालेल्या टेडी इव्हान्सची ऑस्ट्रेलियामध्ये अ‍ॅमंडसेनची भेट झाली होती. लंडनला परतल्याव योग्य ते उपचार घेतल्यावर इव्हान्सची प्रकृती सुधारली. त्याला कमांडरची बढती देण्यात आली आणि स्कॉटच्या मोहीमेला अंटार्क्टीकाहून परत आणण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवण्यात आली !

" तुम्ही सर्व जण ठीक आहात ना ?" इव्हान्सने टेरा नोव्हाच्या मेगाफोनवरुन विचारणा केली !
" पोलर पार्टीतील सर्वजण मरण पावले !" कँपबेल उत्तरला, " आमच्यापाशी त्यांचे सर्व दस्तावेज सुरक्षित आहेत !"

१९ जानेवारी १९१३ - टेरा नोव्हाने केप इव्हान्स सोडलं !

" अखेर आम्ही केप इव्हान्सची आमची जुनी झोपडी कायमची सोडली !" चेरी-गॅराडने आपल्या डायरीत नोंद केली, " बोटीवरुन मार्गक्रमणा ही कल्पना किती सुखद आहे ! ताजे अन्नपदार्थ आणि संगीत, घरुन आलेली खुशालीची पत्रं... केप इव्हान्स सोडताना मी आनंदात आहे. गमावलेल्या सहका-यांच्या वियोगाचं दु:ख शब्दात वर्णन न करण्यासारखं असलं, तरी त्याला आमचाअ इलाज नाही !"

टेरा नोव्हा परत येण्यापूर्वीच स्कॉट आणि इतरांच्या स्मरणार्थ हट पॉईंटवरील 'ऑब्झर्वेशन हिल' येथे लाकडाचा क्रॉस उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. टेरा नोव्हावरील सुताराने लाकडाचा भव्य क्रॉस दोन दिवसात तयार केला ! २० जानेवारीला हट पॉईंटच्या किना-यावर टेरा नोव्हा आल्यावर अ‍ॅटकिन्सन, चेरी-गॅराड, राईट, लॅशी, क्रेन, डेबनहॅम, कोहेन आणि सुतार विल्यम्स यांनी हा क्रॉस उभारला.

Observation Hill Cross Mabo.jpgस्कॉट मेमोरीयल क्रॉस - ऑब्झर्वेशन हिल, हट पॉईंट - २० जानेवारी १९१३

२० जानेवारी १९१३ - टेरा नोव्हाने हट पॉईंटहून न्यूझीलंडची वाट पकडली !

पहाटेचे २.३० वाजले होते. न्यूझीलंडमधील ओमारु या लहानशा बंदरात एक भलंमोठं जहाज शिरलं होतं !

काळोखातच जहाजावरुन एक लहानशी बोट पाण्यात सोडण्यात आली. त्या बोटीतून दोन माणसं बंदरावर गेली. बंदरावरील दिपस्तंभाकडून त्या जहाजाला सतत विचारणा करणारे संदेश पाठवले जात होते, परंतु जहाजाकडून उत्तर येत नव्हतं.

१० फेब्रुवारी १९१३ - टेरा नोव्हा ओमारू बंदरात पोहोचलं होतं !

बोटीतून किना-यावर गेलेले दोघंजण अ‍ॅटकिन्सन आणि पेनेल होते. त्यांनी इंग्लंडला तार पाठवली. तार पाठवल्यावर चोवीस तास कोणाशीही संपर्क न साधण्याचं त्यांच्यावर बंधन होतं !

१२ फेब्रुवारीला टेरा नोव्हा लिटल्टन बंदरात पोहोचलं. बंदरातील सर्व जहाजांची शिडं आणि ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले होते !

अमेरीकेतील विस्कॉन्सीन राज्यातील मेडीसन इथे एका हॉटेलमधील आपल्या रुममध्ये एक माणूस अस्वस्थपणे येरझा-या घालत होता. स्कॉट आणि त्याचे चार सहकारी १७ जानेवारी १९१२ रोजी दक्षिण धृवावर पोहोचल्याचं आणि परतीच्या वाटेवर २९ मार्च १९१२ च्या सुमाराला मरण पावल्याची बातमी नुकतीच त्याच्या कानावर आली होती !

रोनाल्ड अ‍ॅमंडसेन !

" हॉरीबल ! हॉरीबल !" अ‍ॅमंडसेन उद्गारला. त्याचे डोळे भरून आले होते, " कॅप्टन स्कॉटचा तो शेवटचा संदेश वाचताना मी स्वतःला आवरू शकत नाही ! मी त्याला प्रत्यक्षात कधीही भेटलेलो नसलो, तरीही तो एक अत्यंत शूर पुरुष होता. जा तीन गुणांनी माणसाचं व्यक्तीमत्वं झळाळून उठतं ते प्रामाणिकपणा, शौर्य आणि संस्कार हे तिन्ही गुण त्याच्यात होते ! मृत्यूला सामोरं कसं जावं हे त्याने जगाला दाखवून दिलं !"

क्रमश :

९० डिग्री साऊथ - ११                                                                                               ९० डिग्री साऊथ - १३ (अंतिम)
( पुढील भाग अंतिम )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

७ नोव्हेंबरला कँपबेलची तुकडी केप इव्हान्सला पोहोचली ! वाटेत हट पॉईंटला त्यांना अ‍ॅमंडसेनचा पेनेलसाठी ठेवलेला संदेश मिळाला. खेचरं आणि कुत्र्यांसह पोलर पार्टीच्या शोधात दक्षिणेला जात असल्याचा त्यात उल्लेख होता.>>>> अ‍ॅमंडसेनचा कि अ‍ॅटकिन्सनचा?
स्कॉट मेमोरीयल क्रॉस - ऑब्झर्वेशन हिल, हट पॉईंट - २० जानेवारी १९१२ >>> मला वाटते २० जानेवारी १९१३ असाव.
हि सुंदर लेखमालिका लिहील्याबद्दल आपले आभार. शेवटच्या भागाची प्रतिक्षा आहे.

मला वाटते २० जानेवारी १९१३ असाव >>>>> २० जानेवारी १९१३ च आहे. तारखेत बदल केला आहे. तसेच पेनेलसाठी संदेश अ‍ॅटकिन्सनने ठेवला होता.