बळ तनूत झुकल्या कुठुनी माती उकराया येते?

Submitted by profspd on 12 May, 2014 - 01:01

गझल
वृत्त: समजाती-पद्मावर्तनी-लवंगलता-मात्रावृत्त
मात्रा: ८+८+८+४=२८मात्रा
लय/यती: १४+१४=२८मात्रा
**************************************

बळ तनूत झुकल्या कुठुनी माती उकराया येते?
ऐकतो....खुद्द मृत्यूची चाहूल पुराया येते!

एकटा भडाडे ना मी सरणावर आयुष्याच्या.......
एकेक स्वप्न जपलेले जोहार कराया येते!

एकांत भटकतो माझा गेलेल्या काळासंगे........
स्मरणांची झुळूक सुद्धा दररोज फिराया येते!

लटपटते मधेच माझे वय उतार हे झालेले........
पण, तुझी आठवण तेव्हा हे हात धराया येते!

भरताच धरण डोळ्यांचे बरसातीने अश्रूंच्या........
तू नकळत डोळ्यांमधुनी हृदयात झराया येते!

संकल्प उभ्या जन्माचे वाटेवर पूर्णत्वाच्या.........
इतक्यात कळेना कैसे आयुष्य सराया येते!

भोव-यांमधे दु:खांच्या, वादळांमधे जगण्याच्या........
मी बुडू लागता काडी अदृश्य तराया येते!

मी आवडलो ना केव्हा कुठल्याच सुखांना बहुधा.......
दररोज नवी एखादी वेदना वराया येते!

का दूर उभा तू रसिका? का बसतो असा उपाशी?
गझलांचे कुरण खुले हे, दुनियाच चराया येते!

जायची वेळ आलेली, पुण्याचा किती पसारा..........
मग मरण स्वत: जातीने पोतडी भराया येते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लटपटते मधेच माझे वय उतार हे झालेले........
पण, तुझी आठवण तेव्हा हे हात धराया येते!

भोव-यांमधे दु:खांच्या, वादळांमधे जगण्याच्या........
मी बुडू लागता काडी अदृश्य तराया येते!

व्वा. शेर फार छान आलेत.

जायची वेळ आलेली, पुण्याचा किती पसारा..........
मग मरण स्वत: जातीने पोतडी भराया येते!

शेर छान आहे.
संपादित.

पुण्याचा पाच मात्रा होतात.<<<

समीर, सहा मात्रा होतात, ते पुण्य आहे, पाप-पुण्य पैकी. Happy

हा हा
मी पुण्याचा घेतला (म्हटलं की प्रोफेसर पुणे सोडून तर जात नाही ना!).

पुण्य अगदी फिट आहे शेरात. उत्तम शेर.
मी लिहिला असता तर पुण्य लिहिताना संकोचलो असतो.
असो,
धन्यवाद.

समीर, भूषणराव पुण्यावरून
(पुणे शहरावरून नव्हे)

एक माझी जुनी रुबाई देतो.....

आयुष्य जगायास हवी पुण्याई!
मातीत रुजायास हवी पुण्याई!
सत्संग मिळो वा न मिळो कोणाचा....
नि:संग बनायास हवी पुण्याई!!

..............प्रोफेसर