पैंंजण

Submitted by anjali maideo on 10 May, 2014 - 07:57

पैंजण

दिवस पावसाचे नसले तरी पावसाळ्यात जुलै-आॅगस्ट महिन्यात संध्याकाळी काळोख झाल्यावर गावामधे येणारा एक नित्याचा अनुभव आठवला. आठवला म्हणजे पूर्ण अनुभवावा इतकी त्याची आठवण झाली. खूप पावसाच्या दिवसात काळोख पडल्यावर ठराविक बोळातून (छोटा रस्ता) चालताना वाटणारी भीती........

गावात मी रहायचे त्या भागात पुर्वी एक तळे होते त्यामुळे खूप चढ व उतरणींवर घरे बांधलेली आहेत. मिट्ट काळोखात,पडणारया पावसात, रस्त्यावरच्या एखाद्या दिव्याच्या प्रकाशात हे उतार खूप गूढ वाटत. तेव्हा वाटणारी भीती पूर्ण जशीच्या तशीच आठवल्यावर एक गोष्ट सुचली ती लिहिण्याचा हा प्रयत्न .

नववीपर्यंत कुठल्याही क्लासला जात नसली तरी दहावीत तिला देशपांडे सरांच्याच क्लासला जायच होतं. पण तिच्या घराजवळ रहाणारी एकही मैत्रिण या क्लासला येणार नव्हती. एक तर तिथेच जवळ दुसरा क्लास होता आणि महत्वाचे कारण म्हणजे देशपांडे सरांच्या क्लासबाहेर मुख्य रस्त्यापर्यंत असणारा लांबलचक,सुनसान, अंधारा बोळ. तिथून रात्री यायची भीती बरयाच जणींना होती.

शेवटी हो-नाही करत जूनमध्ये क्लास सुरू झाला.क्लास रोज नव्हता़ आठवड्यातून तीनदाच असणार होता. हीचे क्लासला जाणे सुरु झाले. क्लास संपवून घरी आली की रोजचं धावत बाथरूम गाठणं सुरूझालं. शेवटी अाई ओरडली-"अगं,एक टाॅर्च ठेवणही लक्षात रहात नाही का ?" पण पुस्तकांबरोबर ती टाॅर्चही घेणं फारसं डोक्यात रहातच नव्हतं. आठवड्याभरानंतर काळोखातल्या भीतीची शरीराला सवय झाली. घाईघाईने जीव मुठीत धरून येणं चालूच होतं फक्त बाथरूम प्रकरण पुढच्या आठवड्यात थांबलं. आता हळूहळू तिथला क्लासच्या मैत्रिणींचा ग्रुप झाला मग थोड़े अंतर खिदळायला मैत्रिणी होत्या पुन्हा पुढचा बोळ एकटीचाच.

एके दिवशी मैत्रिणींना टाटा-बाय बाय केल्यावर बोळ चालायला तिने सुरवात केली आणि समोर काही अंतरावर एक टाॅर्चचा प्रकाश पुढे पुढे सरकत होता. त्या मिट्ट अंधारात तेवढा तो प्रकाश तिला खूप आधार देऊन गेला. मग पुढे पुढे रोजंच काही ठराविक अंतर ठेऊन टाॅर्चचा झोत पुढे चालत राही. टाॅर्चवाल्याचा पाठमोरा आक्रुतीबंध फक्त दिसे. त्यावरुन तो मुलगा होता एवढच कळत होतं़ नंतर काही दिवस तो- 'तो' असल्याने घाबरत, सावधपणे त्याच्यामागून म्हणजे टाॅर्चच्या आधाराने बोळाचा प्रवास चालूच राहीला.

हळूहळू लक्षात आलं, टाॅर्चवाला उपद्रवी नाहीये. मग तो रोज कसा असतो 'बाॅडीगार्ड'सारखा वगैरे ! यावरून मैत्रिणींत एक थट्टेचा विषय सुरू झाला़़़़ मग पुढे पुढे सांकेतिक भाषेत मैत्रिणीच तिला सांगू लागल्या "अगं, जा लवकर, टाॅर्च जाईल निघून नाहीतर." आता टाॅर्चबद्दल भीती वाटेनाशी झाली आणि फाजिल कल्पना मनात येऊ लागल्या. मुळात तो कोण आहे याविषयी हिला सुरवातीपासूनच उत्सुकता नव्हती. पण तो रोज असतो या भाननेने तिचा अहंकार मात्र रोज फुलत होता.

एक दिवस ही थोड अंतर चालल्यावर हातातील पिशवी किंवा छत्री नीट करायला म्हणून थांबली. तिचे पायातले पैंजण वाजायचे थांबले त्याबरोबर ठराविक अंतरावरची टाॅर्चही थांबली. झालंं.......ही गोष्ट हिच्या लक्षात यायला वेळच लागला नाही. पुढे दोनदा तिनदा चहाटळपणे हा प्रयोग बाईंनी मुद्दाम करून पाहिला. पुन्हा तेच .......पैंजण थांबले की टाॅर्चही थांबू लागली. मैत्रिणींमधे चघळायला हा विषय भलताच प्रिय झाला. मग हिला त्या "ए, पैंजण काढ़ू नको हं किंवा अरे , वाजतायत ना बरोबर सगळे घुंगरू ? वैगरे चिडवू लागल्या. एकूण या प्रकारावरून किस्से रंगू लागले.दहावीच्या अभ्यासाला एक तोंडी लावायला विषय मिळाला.

असं हे वर्षभर चालंल. आज क्लासचा शेवटचा दिवस होता. आज त्या माणसाला गाठून हसून त्याचे आभार मानावेत असा विचार हिच्या मनात होता . रोजच्या सारखाच क्लास झाल्यावर हिने बोळ गाठला. पैंजण वाजत होते आणि ठराविक अंतर राखून टाॅर्चचा झोतही पुढे पुढे जात होता. इतक्यात.........इतक्यात मागून कुणीतरी हिला एका बाजूला ओढलं. ती घाबरून गप्पगार थांबली आणि तितक्यात पुढून मोठी किंकाळी ऐकू आली. तिच्या मागून गावातील कुणाचा उधळलेला वळू धावत आला. नशिबाने त्या दिवशी तिच्या मागूनही कुणी चालत होतं त्या माणसाने तिला बाजूला केलं. ती घाबरून रस्त्याच्या कडेला थांबली त्याबरोबर तिचे पैंजण वाजायचे थांबले. मग टाॅर्च थांबली आणि त्या वळूने मुसंडी मारून टाॅर्चवाल्या माणसाला उडवले. सर्व एक दोन क्षणात घडलं. त्यानंतर हिला त्या मागच्या माणसाने घरी सोडले. ही रात्रभर त्या धक्क्यातच होती. दुसरया दिवशी दिवसा उजेडी काही कामाचे निमित्त काढून ती त्या बोळातून जाऊन आली कुतुहल हेच होतं की कालच्या प्रकाराबद्दल काही कळते का ते पहाणं. पण तसं काही कळलं नाही तो माणुस इथला नव्हता इतकच तिला कळलं . त्यापेक्षा जास्त माहिती ती काढ़ू शकली नाही. पण तिच्या नजरेला रस्त्यालगत झुडुपात पडलेली 'ती' टाॅर्च मात्र दिसली.

एक-दोन वर्ष उलटून गेल्यावर तिची एक नुकतीच दहावीत गेलेली मैत्रिण तिला भेटली. हिने तिची अभ्यासाची वैगरे चौकशी केली आणि कुठल्या क्लासला जातेस विचारल्यावर ती मुलगी म्हणाली देशपांडे सरांच्या. हिने विचारले "बरोबर असते का कुणी मैत्रिण ?" ती म्हणाली नाही माझ्या बाजूची मी एकटीच आहे.

"मग तुला काळोखातून त्या बोळातून यायला भीती नाही वाटंत?" मैत्रिण म्हणाली अगं सुरवातीला खूप वाटायची पण आता सवय झाली आहे आणि एक टाॅर्चवाला माणूस नेमका त्याचवेळी त्या बोळातून जात असतो. मला आपोआप त्याच्या टाॅर्चच्या प्रकाशात जाता येतं.
ही मनातल्या मनात उडालीच आणि हिचे लक्ष तिच्या पाऊलांकडे गेले.................पायात पैंजण नव्हते.

अंजली मायदेव

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users