दोन खोल्यांत असलेल्या तीन व्यक्तिमत्वांचा इतिहास, वर्तन, विचार आणि उद्दिष्टे सर्वथा भिन्न होती. बाहेरच्या खोलीत पिटाळल्या गेलेल्या रतन उर्फ मायादेवीचा जळफळाट होत होता. आजवर अन्यावर सर्वस्व उधळले होते तिने! पण लाहिरीच्या नादी लागण्याची भयंकर शिक्षा मिळाली होती अन्याकडून! अन्याही प्राप्त होत नव्हता आणि अन्यामुळे मिळणारे देवीपणाचे वलयही! अचानक ग्रहतारे बदलून जणू आज सकाळी नशीब उघडलेच. महिला केंद्राची घोषणा आणि पाठोपाठ ते केंद्र रतनदेवी चालवतील ही घोषणा कानावर आली. तिसरी बातमी तर अवाकच करणारी मिळाली. अवलियाबाबांनी मायादेवीचा पुनःश्च स्वीकार केलेला असल्याची! रतनला गतवैभव परत मिळाले होते. आज गावातल्यांचे मनापासून आलेले मुजरे स्वीकारताना तिचे मन भरून आले होते. हे सगळे ज्याच्यामुळे शक्य झाले त्या अन्यावर आजपासून प्रेमाचा वर्षाव करायचा हे तिने ठरवलेले होते. पुन्हा आयुष्यात अन्याला तक्रारीला जागा ठेवायची नाही हा तिचा इरादा होता. पण झाले होते भलतेच! सकाळी पळून गेलेल्या आणि परत मिळालेल्या आणि मध्यरात्री शुद्धीत आलेल्या एडामट्टी मणीचे तारुण्य पाहून अन्या ऐनवेळी लाळ गाळत तिच्याकडे आकृष्ट झाला होता. आकृष्ट होणे एका बाजूला, अन्याने तर चक्क रतनलाच बाहेरच्या खोलीत झोपायला जायला सांगून एडामट्टी मणीच्या सहवासात रात्र घालवण्याचा निश्चय स्पष्टपणे व्यक्त केला होता. काहीच बोलणे शक्य नसल्याने, इतकेच काय तर राग व्यक्त करणेही शक्य नसल्याने रतन चेहरा कृत्रिमपणे समाधानी ठेवून बाहेरच्या खोलीत निघून गेली होती. तिला आता स्वतःचे कान बंद करून घ्यावेसे वाटत होते. आतल्या खोलीतून येणारे आवाज आपल्याला सहन होणार नाहीत हे तिला माहीत होते. आत्ताच्या आत्ता बागघरातून तडक चालत बाहेर पडावे आणि सगळे काही सोडून पुन्हा माहेरी बापाकडे जावे असे तिला वाटत होते. पण त्यात धोका होता. चुकून अन्याला तिचा सुगावा लागला तर अन्याने तिला माणसे पाठवून खलास केले असते. इतके करण्याइतपत क्रूर धोरणीपणा अन्याच्या मनात निर्माण झाल्याचे रतनला अन्याच्या मगाचच्याच भाषणावरून अतिशय व्यवस्थित समजलेले होते. त्यामुळे, असहाय्य होऊन आणि कोंडमारा सहन करून ती बाहेरच्या खोलीतील अंधारात टक्क जागी राहून बसलेली होती. आडवेही व्हावेसे वाटत नव्हते तिला!
आणि आतल्या खोलीत? आतल्या खोलीत दिवसभर चालचालून आणि काट्याकुट्यांनी रक्ताळलेले अंग घेऊन अतिशय थकलेली एडामट्टी मणी डोळ्यात समर्पणाचे भाव घेऊन अन्यासमोर उभी होती. शारीरिक आणि मानसिक अश्या दोन्ही प्रकारचा थकवा प्रचंड असला तरी आत्ताची घटका अत्यंत महत्वाची होती तिच्यासाठी! अन्यापासून इज्जतीचा बचाव करणे आपल्याला शक्य नाही हे तिला समजून चुकलेले होते. फक्त इतकेच, की कोणत्यातरी क्षणी अन्या पूर्ण बेसावध असेल तेव्हा तो कोपर्यातला विळा हातात घेऊन त्याच्यावर सपासप वार करायचे आणि त्याला खलास करून आणि रतनला जखमी करून पुन्हा पळून जायचे एवढे मात्र तिने ठरवलेले होते. सोपान उदय संस्थेत रुजू होताना जीवाशी खेळ करावा लागेल हा संचालकांनी दिलेला संदेश तिला थ्रिलिंग वाटला होता. कोणतीच मुलगी कदाचित कधीच स्वतःहून स्वीकारणार नाही असला भयानक मार्ग स्वीकारून ती समाज प्रबोधनासाठी स्वतःची आहुती देण्यास तयार होऊनच जॉईन झालेली होती. नुकतेच भामाबाईदेखत एका लहान मुलाचा बळी देण्याचे कृत्य मणी आणि तिची सहाय्यिका युगी ह्यांच्यामुळे टळलेले होते आणि त्याहीवेळी आपण किती भयंकर घाबरलेलो होतो हे मणीला आठवत होते. ह्या क्षेत्रात आल्यापासून रोज वेगळीच आव्हाने उभी ठाकत होती आणि प्रत्येक आव्हान आधीच्या आव्हानापेक्षा अधिक भयंकर होते. स्वतःचा जीव वाचवणे, होऊ घातलेले दुष्कृत्य टाळण्यासाठी आगीत उडी घेणे, अब्रू वाचवणे, कोणत्याही मदतीशिवाय एकट्याने वाट्टेल त्या परिस्थितीला सामोरे जाणे, शेकडोंच्या मते श्रद्धेस पात्र असलेल्यांचे बुरखे टराटरा फाडणे! हे क्षेत्र असे होते की यश मिळाले तर इतका उदो उदो होत होता की मनात तो आनंद मावत नसे. पण यश नाही मिळाले तर त्याला असलेली सजा इतकी भयंकर असे की माणसाचा पशू कसा होतो त्याची ज्वलंत उदाहरणे क्षणोक्षणी दिसत असत. आणि ते पशूत्व उभे ठाकलेले असे एडामट्टी मणीविरुद्ध! हे सगळे कश्यासाठी? ह्या अडाणी, मूर्ख समाजाला अंधश्रद्धेपासून वैचारीक फारकत घेण्यास प्रवृत्त करण्याची कडवे आव्हान आपण का स्वीकारलेले आहे? झक मारली आणि ह्यात पडलो आपण! मणीचे विचार प्रत्येक क्षणाला तिला रडवेले बनवत होते, बनवत असत. आत्ताची घटका तर फारच भयंकर होती. आजच पहाटे ह्या बलदंड देहाच्या अन्याने अंधारात आपल्यावर हात टाकला होता. वास्तविकपणे त्याच्या व्यक्तिमत्वातील हाच खोटेपणा जगासमोर सिद्ध करण्यासाठी आपण येथे आलेलो होतो. ऐनवेळी आपल्याला भान आले आणि अब्रू वाचवण्यासाठी आपण आपल्या बांगडीने त्याची पाठ अक्षरशः फाडली आणि पळत सुटलो. रानावनातून अन्नपाण्याशिवाय भटकत भटकत आणि जखमी होत आपण शेवटी पोचलो कुठे तर पुन्हा ह्याच गावात! आणि येथील मूर्ख लोकांना ही अवलियाबाबांचीच कृपा वाटली की आपण बोलायला लागलो. आणि आत्ता सगळ्या गावाने आपल्याला एखाद्या नैवेद्याप्रमाणे ह्या नालायक माणसाच्या जागेत त्याच्यासमोर आणून सोडलेले आहे. बाहेर अंगणात एक भयानक कुत्रे, बाहेरच्या खोलीत ह्या माणसाला त्याच्या सर्व कृष्णकृत्यांमध्ये साथ देणारी रतन आणि आत्ता आपल्यासमोर हा राक्षस! त्याच्या अंगातील ताकद त्याच्याकडे नुसते बघूनच समजू शकत आहे. आपण पूर्णपणे असहाय्य! आपली अब्रू जाणार ह्यात शंका नाही. खरेतर कोणतीही इतर मुलगी ह्या विचारांनी आत्ताच बेशुद्ध पडलेली असती. आपल्यात कुठले रक्त आहे जे आपल्याला ह्याही अवस्थेत विचार करायला प्रवृत्त करत आहे? अब्रू गेली तर जाऊदेत, पण अब्रू घेणार्याचा जीव जाईल इतके मात्र नक्की! एडामट्टी मणी समोर बसलेल्या अन्याच्या डोळ्यांमध्ये डोळे मिसळून त्याला ते कृत्य एकदाचे पटकन करायला प्रवृत्त करत होती. आपण आपल्या अंगावरील कुर्ता स्वतःच काढून अन्याच्या अंगावर फेकलेला आहे हे जाणवून तिचे हृदय थाडथाड उडत होते, पण नाटकाचा परिणाम मात्र होताना दिसत होता. अन्याची बुभुक्षित नजर मणीच्या बेंबीवर स्थिरावलेली दिसत होती. मणीने महत्प्रयासाने आपले दोन्ही हात तसेच सुट्टे राहू दिले होते. लाज झाकण्यासाठी हातांचा वापर करणे म्हणजे नाटकाला सुरुंग लावणे आहे हे तिला माहीत होते. शक्य झाले तर अन्याने पहिली झडप घालतानाच्या क्षणीच कोयता हातात घेण्याचा तिचा इरादा होता. अन्याचे विस्फारलेले डोळे मणीच्या कंबरेवर खिळलेले होते. जणू ते आरपार पाहात असावेत. मणीच्या मनात आत्ता क्रोधाचा लाव्हा उसळत होता. स्वतःच्या अवस्थेची लाज वाटण्याच्या पलीकडे पोहोचलेली होती ती!
आणि अन्या?
अन्या उठून उभा राहिला. उभा राहिल्यावर त्याच्या आणि मणीच्या देहयष्टीतील फरक प्रकर्षाने जाणवू लागला. तिच्यापुढे तो एखाद्या पहाडासारखा दिसत होता. त्याचा तो भक्कम देह पाहून एडामट्टी मणीच्या काळजाचे पाणी पाणी झाले. मनातील आत्तापर्यंतचे सर्व विचार फेकून देऊन पुन्हा दार उघडून येथून धावत सुटावेसे वाटू लागले. रतनला हाक मारून आपल्याला मदत करण्याची विनंती करावी असे वाटू लागले. अन्या ठामपणे दोन पावले पुढे आला. आता मणीला मान वरून त्याच्याकडे बघवेना! केवळ दोन फुटांवर तो राक्षस उभा होता. कोणत्याही क्षणी तो झेपावला असता. मणी आता दगडासारखी निश्चल होऊन स्वतःच्याच पावलांकडे बघत उभी होती. अन्या अलगद तिच्यासमोर स्वतःच्या गुडघ्यांवर बसला. आता त्याचे मस्तक एडामट्टी मणीच्या पोटासमोर आलेले होते. आता मात्र मणीला तो ताण सहन होईना! नैसर्गीकपणे तिचे दोन्ही लुळावलेले हात स्वतःच्या सलवारवर येऊन स्थिरावले. खाडकन् अन्याने वर पाहिले. मणी घाबरल्याचे त्याला स्पष्टपणे समजले. आणि अचानक पुढच्याच क्षणी......
...... पुढच्याच क्षणी अन्याने स्वतःचे मस्तक मणीच्या दोन्ही पावलांवर ठेवले. एखाद्या निर्जीव शिळेप्रमाणे खिळलेली मणी घडत असलेला प्रकार बघत होती. तिच्या दोन्ही घोट्यांवर अन्याचे दोन्ही मजबूत हात होते आणि त्याचे कपाळ तिच्या दोन्ही पावलांवर दाबले गेलेले होते. हे काय चाललेले आहे हे मणीच्या आकलनापलीकडले होते. धड हालताही येत नव्हते इतकी बळकट पकड होती अन्याची आणि अन्या काही वावगे करत असावा ही तर शक्यताच वाटत नव्हती आता! आणि ध्यानीमनी नसताना अन्याने ते शब्द उच्चारले.
"आज सुबह हमसे बडी गलती होने जा रही थी! तुमने हमे जख्मी करके सिर्फ खुदकोही नही, तो हमेभी बचालिया! आजसे तुम हमपर निगरानी रख्खोगी! आजसे हम तीनो एकसाथ रहेंगे! तुम्हारा काम होगा ये देखना के हमसे कहीं कुछ गलती तो नही हो रही है! हम अच्छे है और अच्छेही रहना चाहते है! हम सीधेसाधे लोगोंकी सहायता करना चाहते है! हम अच्छा काम करना चाहते है! लेकिन इन्सान है, गलतीभी हो सकती है! आजसे तुम हमे सिखाओगी के हम कहा गलत है! भरोसा रख्खो, जबतक तुम नही चाहोगी, यहाँ कोई तुम्हे छुएगाभी नहीं! अपने कपडे पहनकर बाहर आजाओ!"
ताडकन् उठून मणीकडे न बघता अन्या दार उघडून बाहेरच्या खोलीत गेला. बसूनच राहिलेली रतन अवाक होऊन उभी राहून अन्याकडे बघतच बसली. महत्प्रयासाने एडामट्टी मणीचा मोह टाळल्याने मनात निर्माण झालेल्या वादळांवर तोडगा म्हणून अन्याने दुपारपासून एक लपवून ठेवलेली बिडी पेटवली व झुरके मारू लागला. अंधारात मागून आलेल्या रतनने त्याच्या खांद्यावर अलगद हात ठेवला आणि म्हणाली......
"काय झालं? न्हाई म्हन्ते का ती?"
"हमने ना की!"
रतनच्या मनात आत्ता समाधानाचे धबधबे कोसळत होते. आणि आतमध्ये एडामट्टी मणी?
एडामट्टी मणीच्या मनात विचारांचे प्रचंड द्वंद्व माजलेले होते. सोपान उदय संस्थेचे ध्येय, त्या ध्येयाला आपले ध्येय बनवून आपण आजवर केलेले कार्य, त्याचा झालेला किंवा न झालेला गवगवा, आपल्यामुळे वाचलेली अनेक आयुष्ये, त्या बदल्यात आपल्याला मिळत असलेले महत्व आणि हा एक तरुण मुलगा 'अन्या'!
काय आहे ह्या मुलात? आत्ता ह्याने आपल्याला का सोडले? कोणी ह्याच्यावर संस्कार केलेले असतील? भामाबईच्या दर्शनाला लोटलेल्या गर्दीतसुद्धा भाविक म्हणून आलेल्या पुरुषांनी संधी मिळताच आपल्याला आणि युगिला केलेले ओंगळवाणे, सिद्ध न करता येण्यासारखे स्पर्श कुठे! आणि पूर्ण गाव पाठीशी असताना, एक असहाय्य मुलगी स्वतःहून समर्पण करत आहे असे दाखवत असताना, त्यातही तिच्याच प्राप्तीसाठी पहाटे जखमी झाल्यामुळे मनात सूडाची भावना असताना ह्या माणसाने ही स्वच्छ भूमिका ऐनवेळी का निवडावी?
पहिल्यांदाच, पहिल्यांदाच असे तर होत नाही आहे ना की सोपान उदयने ठरवलेले टारगेट हे टारगेटच नाही आहे? प्रत्यक्षात तो आहे एक ध्येयवेडा तरुण आणि पहाटे चुकून मोहाला बळी पडला, असे तर नाही ना? मग आठवडाभर स्वतःच्या स्नानासाठी गावातल्या सुवासिनींना आणि कुमारिकांना बोलावण्याचा फतवा का काढून बसला होता? पण ती एक गोष्ट सोडली तर आज गाव ह्या तरुणामागे आहे ते कशामुळे आहे? व्यसनाधीनता कमी होत आहे गावातली, मुले संस्कार वर्गांना येत आहेत, महिला केंद्रामध्ये अनेक चांगले उपक्रम होणार आहेत, गावातील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता हा एक मोठाच मुद्दा झालेला आहे, त्यासाठी हा तरुण स्वतः झाडू घेऊन मैदानात उतरत आहे. मग सोपान उदय आणि हा तरुण ह्या दोघांचेही कार्य चांगलेच म्हंटले पाहिजे की?
आत्ता आपण काय करू शकलो असतो? तेही जाऊदेत, समजा त्याला हवे ते मिळाले असते तर त्यानंतर तरी तो विळा प्रत्यक्षात हातात घेऊन त्याच्यावर वार करण्याचे मानसिक बळ आपल्यात खरंच आहे का? नंतर आपण काय केले असते? कसे पळालो असतो? आणि खुनाच्या आरोपातून सोपान उदयने सोडवले असते का? आज सोपान उदयने आपल्याला जे काम दिलेले आहे ते आपल्यावर सोपवून संचालक स्वतः पुण्यात निवांत घोरत पडलेले असतील. आज पहाटेपासून आपण कोणत्या दिव्यातून जात आहोत ह्याची सुतरामही कल्पना त्यांना नसेल. काही वाईट झालेच तर वैयक्तीकरीत्या आपले वाईट होणार आहे, संस्थेचे काय बिघडणार आहे? एक ध्येयवादी, वेडी तरुणी असे आपले वर्णन होणे ह्याला महान मानून आपण ह्या नाही नाही त्या प्रकारात पडायचे आणि नंतर सगळे काही बरबाद झाल्यानंतर संस्थाचालकांकडून अपेक्षा ठेवायच्या की त्यांनी काही प्रमाणात तरी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यावा, काही प्रमाणात तरी आपल्याला न्याय मिळवून द्यावा! का? कशाला? आत्ता आपल्याजागी युगि असती तर मुक्या मुलीचे रुप घेऊन ह्या गावात आठवडाभर एकटी राहिली असती का? पहाटेच्या अंधारात ह्या अन्याने स्नानासाठी बोलावले असते तर आली असती का? आपण का आलो? कारण आपण मूर्ख आहोत. आपल्या झोकून देण्याची भले संस्थाचालकांना मनोमन किंमत असेलही, पण त्यांचे प्रत्यक्ष नुकसान काय होणार होते? ते तर फक्त आपलेच होणार होते. मग त्यापेक्षा दोन तीन गावातील मिळून पाच सात हजार माणसे ज्याला गौरवतात, जो उघड उघड चांगली कामे करत असतो आणि परिस्थिती हातात असूनही जो आपल्या पायावर डोके ठेवून उलट पहाटेच्याच प्रकाराची माफी मागतो, तो हा अन्या, हा अवलिया बाबा त्या सोपान उदयच्या संचालकांपेक्षा मोठा म्हणायला पाहिजे! आणि सगळ्यात मुख्य म्हणजे, ह्या वलयांकित व्यक्तीच्या अत्यंत आतल्या वर्तुळातील एक जर आपण होऊ शकलो तर......
......तर आपला वैयक्तीक फायदा किती अमाप होईल! तेवढा फायदा......सोपान उदय स्वप्नात तरी करून देईला का आपला?
एडामट्टी मणी संथपणे चालत बाहेरच्या खोलीत आली. कोनाड्यात पडलेले कुलूप आणि किल्ली तिने हातात घेतली. खोलीचे दार, जे आतून बंद होतेच, त्या दाराच्या कडीला तिने आतून कुलूप लावले. किल्ली रतनच्या हातात दिली. रतन जेथे पहुडणार होती त्या अंथरुणावर एडामट्टी मणी बसली. आणि शून्यात बघत दोघांना उद्देशून म्हणाली.
"तुम्ही दोघे आत जाऊन निजा! मी पळून जाईन की काय असे वाटू नये म्हणून किल्ली रतनकडे दिली आहे. बाकीचे उद्या सकाळी बोलू. फक्त, मला काहीतरी खायला आणि भरपूर पाणी तेवढे द्या"
प्रसादातले काही पदार्थ आणि एक मोठा पाण्याचा तांब्या मणीपाशी ठेवून रतन आतल्या खोलीत गेली. आतमध्ये पहुडलेला अन्या विचारांत गर्क होता. त्याच्यापाशी जात रतनने विचारले......
"तुमी तिला न्हाई का म्हन्लात म्हाराज? सांगा ना?"
रतनला अपेक्षा होती की रतनवर प्रेम असल्याने अन्या मणीला नाही म्हणालेला असणार. ऐनवेळी अन्याला त्याच्या रतनवर असलेल्या निस्सीम प्रेमाची आठवण आलेली असणार!
मात्र आढ्याकडे बघत अन्या हळू आवाजात म्हणाला......
"हम वहांकी सोच रहे है जहा तुम्हारी सोच नही पहुचेगी"
अन्याला वश करण्याचे निष्फळ प्रयत्न करून रतन झोपून गेली तेव्हा अन्याच्या टक्क उघड्या डोळ्यात एक भलेमोठे स्वप्न नाचत होते.
सातारा शहरात आश्रम उभारण्याचे स्वप्न!
===============================
सैमा नावाच्या विशीच्या तरुणीला भूतबाधा झालेली असून महाराजांना भूत काढण्यासाठी नम्र पाचारण करण्यात आलेले आहे ही बातमी गावात पसरली. एडामट्टी मणीला गावकर्यांनी 'म्हाराजांची सल्लागार' म्हणून स्वीकारून जेमतेम एक आठवडा झालेला होता. ह्या आठवडाभरात सोपान उदयहून मणीच्या चौकशीसाठी काहीही प्रयत्न झालेले नसल्याने मणीचा अन्याबरोबर राहण्याचा निश्चय तर दृढ झालेलाच होता, पण तिच्या शहरी भाषाशैलीने व मुळातच समाजकार्याची आवड असलेल्या स्वभावाने गावकर्यांची मनेही जिंकून घेतलेली होती.
सैमा मुस्लीम होती. तिला बाधा करणारे भूत हिंदू कसे काय असेल हा प्रश्न कोणालाही पडत नव्हता. मणीला गावकर्यांची कीव येत होती. बागघरातून निघायच्यावेळीच मणीने अन्या आणि रतनला नि:संदिग्धपणे सांगितलेले होते.
"भूतबाधा ही अफवा आहे. एक तर त्या मुलीला काही आजार असेल, किंवा ती नाटक करत असेल किंवा तिच्याकडून नाटक 'करवून' घेतले जात असेल"
'नाटक करवून घेतले जात असेल' ह्या चार शब्दांचे अन्याला भारीच महत्व वाटले होते. अजूनही मणी बाहेरच्या खोलीत झोपताना आतून कुलूप लावून किल्ली रतनकडे देत होती. अन्या अजून काही दिवस तिची परीक्षा घेणारच होता.
सैमाकडून जर नाटक करवून घेतले जात असेल तर आपण काय करायचे हे अन्याने आधीच ठरवून ठेवलेले होते. पण जगात भुते असतात असे त्यालाही वाटायचे. त्याचे ना शिक्षण ना काही! गाव तर घाबरलेलाच होता. एका बैलगाडीतून तिघे सैमाच्या घराकडे निघाले. आधी सैमालाच बागघरात आणण्याचे आदेश सोडून पाहण्यात आले होते. पण सैमाची तशी अवस्था नाही असे समजल्यावर हे तिघे तिकडे निघाले होते.
पंधरा एक मिनिटांनी तीन थोर विभुती सैमाच्या दाराच्या उंबर्यात उभ्या राहिल्या त्या क्षणी गलितगात्र होऊन फरशीवर 'सांडलेल्या' सैमाच्या अंगात जणू हत्तीचे बळ आले. टुणकन् उडी मारून ती अक्राळविक्राळ ओरडू लागली. भयाण चेहरा करून ती आजूबाजूच्यांना विचारू लागली की ह्या नालायक माणसाला येथे कोणी बोलावले आहे? गावकरी आणि सैमाच्या घरचे हादरलेले होते. महाराज भडकले तर काय करतील हे सांगता येत नव्हते. एडामट्टी मणीने असली भुते आधी पाहिलेली होती. काठीच्या चार तडाख्यात ही भुते गपगार होतात हे तिला माहीत होते. पण काठीने मारणे हे महाराजांना शोभणारे नव्हते. पूजा वगैरे करून, कोंबड देऊ असे आश्वासन वगैरे देऊनच अशी भुते काढलेली गावाला मान्य होतात हे मणी जाणून होती. रतन मात्र सैमाचा अवतार पाहून दचकलेली होती. सैमा साधीसुधी मुलगी नव्हती. विशीची असली तरी तिशीची भासेल असे तिचे शरीर होते. उंचीपुरी होती. एकवेळी गावातल्या चार चार तरुणांना आवरत नव्हती. स्वतःलाच बडवून घेत होती. भिंत चढू पाहात होती. स्वतःचे केस क्रूरपणे ओढत होती. डोक्यातून एक दोन ठिकाणाहून रक्ताचे थेंबही आलेले होते त्यामुळे! हा नक्की प्रकार काय असावा हे कोणाच्या लक्षात येत नव्हते.
महाराजांना पाहून काही जाणते गावकरी पुढे झाले. एका म्हातार्याने माहिती पुरवली. काल सायंकाळी पावणे सातच्या सुमाराला सैमा नेहमीच्या लांबच्या वाटेहून घरी यायच्या ऐवजी शॉर्टकट घेऊन आली होती. ह्या जवळच्या रस्त्यावर नेमका एक पिंपळ होता ज्याखालून कातरवेळी येणार्यांना जबरदस्त बाधा होऊ शकते व ह्यापूर्वीही असे अनेक प्रकार झालेले आहेत हे त्याने सांगितले. ते ऐकून काही अडाणी पागोटी होकारार्थी हालली होती आणि काही डोक्यांवरचे पदर ओठांवर भीतीने दाबले गेले होते. अन्या खरे तर बधीर झालेला होता. असा प्रकार कधी हाताळावा लागेल ह्याची त्याला कल्पना नव्हती असे नाही, पण त्यावर त्याची काही खास अशी योजना अस्तित्वातच नव्हती. आता नाटक तरी काय करायचे हे त्याला समजत नव्हते. पण महाराज असल्याने आपण काहीतरी फार चांगले नक्कीच करू शकू असे दाखवणे आवश्यक आहे इतके तो जाणून होता.
सैमाचा जोर वाढतच होता. तिच्या तोंडातून आता अत्यंत अर्वाच्य शिवीगाळ बाहेर येत होती. आजूबाजूला असलेले पुरुषासारखे पुरुषही घाबरलेले होते.
त्या अवधीत एडामट्टी मणी मात्र सावधपणे स्वयंपाक घरात गेली. सैमाच्या अम्मीला अनेक बायका धीर देत होत्या. मणीने त्यांना बाहेर जायला सांगितले व सैमाच्या अम्मीशी मणी बोलू लागली. दोन तीन मिनिटांतच तिने सैमाची हकीगत समजून घेतली. सैमाला गावातल्या कात्या नवले नावाच्या एका हिंदू मुलाबरोबर लग्न करायचे होते. मुलाच्या घरून विरोध होत असल्यामुळे तो विरोध मोडून काढण्यासाठी हा असला अवतार घेऊन गावकर्यांना घाबरवण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. ह्याचे कारण ती आणि तो मुलगा दोघेही अडाणीच होते. पळून गेले असते तरीही स्वतःच्या पायावर उभे राहायला त्यांना अनेक वर्षे लागली असती. त्यामुळे अडाणी मनाला योग्य वाटणारा उपाय सैमाने अवलंबलेला होता. 'आपल्याला बाधा झाली आहे' असे भासवून आपल्याला हवे ते करून घ्यायचा तिने घाट घातलेला असावा असे मणीला वाटले. मणीने अलगदच बाहेर येऊन चार सहा वाक्यात सगळा प्रकार अन्याच्या कानात कुजबुजत सांगितला.
मणीला अन्याच्या कानात कुजबुजताना पाहून सैमाच्या रागाचा भडकाच उडाला. आपल्याविरुद्ध काहीतरी भयंकर शिजत असल्याचा तिला संशय आला. तिने एका उडीतच मणीची मानगूट धरली आणि तिचे डोके मागच्या भिंतीवर ताडकन् आपटले. मणीला भोवळ यायची तेवढी राहिलेली होती. हबकलेली मणी मटकन् खालीच बसली. पण अन्या मात्र शांत राहिला. वीस वर्षाच्या सैमाच्या अंगात ही असली भयानक ताकद असेल असे मणीला वाटलेच नव्हते. अजून डोके गरगरत होते, मोठाच हबका बसलेला होता. रतन मणीजवळ बसून तिला धीर देत होती. गावकरी आता भुतावर चिडलेले होते, पण ते भूतच असल्याने त्याच्याविरुद्ध काही म्हणायला धजावतही नव्हते.
अचानक अन्याने भेदक स्वरात प्रश्न केला.
"कोण आहेस तू?"
आवेशात हालचाली करणार्या भुताने अन्यालाच प्रतिप्रश्न केला......
"तू कौन है भ्येंचोद? जो हमे नही पहचानता??"
"मै अवलिया बाबा हूं! जो हिंदूओंके लिये हूं वही मै मुसलमानोंकेलियेभी हूं"
क्षणभरच! क्षणभरच ते उत्तर ऐकून सैमाच्या डोळ्यात आशेचे भाव तरळले. पण ते आवरते घेत भुताच्या आवेशात ती थुंकली आणि म्हणाली......
"हम नही जानते किसी अवलिया को!"
आता मात्र घावच घालायला हवा होता. गावकर्यांसमोर एक यकःश्चित मुलगी जर भुताचे सोंग घेऊन आज असे बोलू लागली तर उद्या कोणीही काहीही करेल हे अन्याला समजले.
अन्याने पुढे होऊन आपल्या उजव्या हाताची पाच बोटे भुताच्या डाव्या गालावर उठवली. भूत हेलकांडत मागच्या भिंतीवर जाऊन आदळले. गावकर्यांची आता बोबडी वळल्याने अनेकजण अंगणात पळाले. बायका आत पळाल्या. आता खोलीत फक्त भूत, अन्या, मणी आणि रतन राहिले. बाकी बाहेरच्या आणि आतल्या दारांना फक्त मुंडकी लटकलेली होती बघ्यांची!
"अब होगयी पहचान?"
भूत वेदनांनी तळमळत जमीनीवरच पडलेले होते. त्याला एकाच हाताने धरून पुन्हा उभे करत अन्याने उजवा हात पालथा करून डाव्या गालावर भडकावली. भूत उभ्याउभ्याच खाली कोसळले व भीषण आवाजात ओरडू लागले.
सैमाचे ते विव्हळणे तिच्या आई बापांना पाहवेना! ते पुढे झाले तसे अन्याने त्यांना हात करून रोखले. अन्याने मग भुताचे मुटकुळे उचलले आणि बाहेर अंगणात आणून आदळले. सगळ्यांकडे बघत अन्या म्हणाला......
"तुममेसे कितने लोग ऐसे है जिन्हे जनम होनेसे पहले भगवानने पूछा था के हिंदू बनना चाहते हो या मुसलमान?"
गाव गप्प राहिले. अडाणी चेहरे एकमेकांकडे पाहू लागले.
"कितने लोग ऐसे है? है कोई ऐसा?"
दोन चार जुनी पागोटी नकारार्थी हालली.
"तो जो हिंदू है वो मुसलमानोंसे और मुसलमान हिंदूओंसे गुस्सा क्यूं होते है? खफा क्यूं रहते है? ये सब क्या है?"
हे असलेच प्रश्न, असलीच वाक्ये आजवर वीर गावाने अनेक नेत्यांनी, पुढार्यांनी बोलताना ऐकलेली होती. पण आज गावाचे श्रद्धास्थान अवलिया बाबाच संतप्त होऊन हे प्रश्न विचारत होते.
"इस लडकीका निकाह कात्या नवलेसे करो, वीर गावमे ऐसा होना पूरे जिल्हेकेलिये एक मिसाल होगी! समझरहे हो?"
पुन्हा काही पागोटी, थोडीशी रिलक्टंटली, पण होकारार्थी हालली.
"और इस निकाहका खर्चा आश्रमसे होगा!"
सैमाच्या चेहर्यावर आता पश्चात्ताप, श्रद्धा आणि रडवेलेपणा ह्या भावना एकत्र झालेल्या दिसत होत्या.
अन्याने काढता पाय घेण्याआधी आणखी एक वाक्य फेकले.
"जहां हम है वहां कोई भूतखेत नही होता है, ध्यान रहे"
सैमाच्या अवतारातील हवाच निघून गेली ह्या वाक्यामुळे! जमीनीतच तोंड खुपसून सैमा आक्रंदत राहिली. तिचे आई वडील तिला थोपटत राहिले. आणि गर्दीतच कुठेतरी मिसळलेला कात्या नवले पाठमोर्या अवलियाबाबांना पाहून हात जोडत राहिला.
सुकन्या, रतनदेवी, एडामट्टी मणी आणि आता वीर गावातले मुस्लिम बांधव!
अवलिया बाबा एक एक घटक आपल्या बाजूला वळवत घोडदौड करत होते. आता वीर गाव ओळखलेच जाऊ लागले होते ते मुळी अवलियाबाबांमुळे! मशालकरचे नांव आता अस्पष्ट झालेले होते. इतकेच नाही तर काही कारणाने खूप लांबून तालुक्याच्या ठिकाणी येऊन जाणारे प्रवासीही वेळात वेळ काढून वीर गावात येऊन दर्शन घेऊ जाऊ लागले होते.
माया साठत होती. श्रद्धा साठत होती. नाव दुमदुमत होते. अवलिया बाबा अधिकाधिक मोठे होत चाललेले होते. एडामट्टी मणी स्वतःचे शुद्ध विचार घेऊन एका नव्याच मार्गाने समाजकार्य करण्यात धन्यता मानू लागली होती. तिच्या उपस्थितीत अवलिया बाबांकडूनही कोणताही गैरप्रकार होत नव्हता.
चमत्काराशिवाय नमस्कार नसतो ही म्हण आता अनावश्यक वाटू लागली होती. अवलिया बाबा गावाचा कायापालट करू लागले होते. स्वतः स्वच्छता अभियानात सहभागी होत होते. लोक गावोगावी जाऊन वीर गावाचा होत असलेला कायापालट स्वतः भरभरून इतरांना सांगत होते. स्थानिक वर्तमानपत्रांमधून लेख आणि छायाचित्रे सातत्याने छापून येऊ लागली होती. गावोगावी बाबांचे फोटो पाच पाच, दहा दहा रुपयांना विकले जाऊ लागले होते. रिक्षांवर मागे 'अवलिया बाबा की कृपा' असे शिक्के दिसत होते. काही बसेसमध्ये बाबांचा एखादा फोटो आढळून येत होता. तालुक्याहून 'तीन तासात वीरच्या बाबांचे दर्शन घेऊन परत' असे हाकारत कमीतकमी पंधरा वीस जीपगाड्या 'लायनीत' उभ्या राहात होत्या. तावडे पाटील भेटले काय आणि नाहीत काय, वीरला जाऊन बाबांचे दर्शन व्हायलाच पाहिजे अशी परिस्थिती येऊ लागली होती.
आणि शेवटी......प्रशासनाला अवलिया बाबांच्या कार्याची दखल ही घ्यावीच लागली.
सातार्याचे तात्कालीन आमदार आपल्या सौभाग्यवतींना घेऊन वीरगावी प्रकटले आणि त्यांनी बाबांनी केलेल्या अमाप कार्याचा आणि गावाच्या कायापालटाचा आढावा घेतला. सुकन्या मशालकर ही त्यांची गावातील प्रमुख प्रतिनिधी ठरली. तावडे पाटीलही सुकन्यापुढे कसाबसा दिसू लागला होता. दोन दिग्गज व्यक्तीमत्वे, आमदार आणि अवलिया बाबा ह्यांची एकाच व्यासपीठावर आमनेसामने भेट झाली त्या क्षणी वीर गावाने उचंबळून आल्याने कित्तीतरी वेळ टाळ्यांचा उत्स्फुर्त कडकडाट केला. त्यातच गावाच्या भावनांची पूर्ण जाणीव ठेवून आमदारांनी आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या अवलिया बाबांना वाकून नमस्कार केला आणि तस्साच्या तस्साच फोटो दुसर्या दिवशी छापूनही आला. आमदार नाईक हे नाईक असूनही दलित समाजाचे प्रतिनिधी होते. वीर गावात तो समाज मोठ्या प्रमाणावर होता. खासगी भेटीत अवलिया बाबांनी आमदारांच्या राजकीय वाटचालीसाठी आपले वजन वापरण्याचे आश्वासन हसतमुखाने दिले. बदल्यात सातारा शहरात येत्या सहा महिन्यात स्थलांतरीत व्हावे व आमच्या संस्थेतर्फे बांधण्यात येणार्या आश्रमात कायमचे वास्तव्यास यावे अशी आमदारांनी अवलियाबाबांना गळ घातली. प्रेमापोटी अवलियाबाबांनी ती मागणीही मान्य केली.
आणि ज्याच्या बापाला कधी स्वखर्चाने जिल्ह्याचे ठिकाण पाहणे परवडले नसते, त्या अन्याचा केवळ चारच महिन्यांनी सातारा शहरात अभूतपूर्व जल्लोषात प्रवेश झाला......
...... फक्त, ह्या चार महिन्यात एकच क्षुल्लक बाब घडली होती...... ती म्हणजे ....... सोपान उदय संस्थेचे संस्थापक व संचालक मालुसरे ह्यांनी सहा वर्तमानपत्रांमध्ये एक लहानशी बातमी दिलेली होती......
'एडामट्टी मणी ह्या युवतीशी आमच्या संस्थेचा कोणताही संबंध नसून संस्थेच्या वतीने तिने दिलेली कोणतीही आश्वासने पाळण्यास आम्ही बांधील नाही. तसेच, ह्या युवतीच्या ताब्यात असलेल्या वस्तू, जसे संस्थेचे ओळखपत्र, प्रवेश परवाना पत्र, कॅमेरा, काही किल्ल्या ह्या अजूनही तिच्याच ताब्यात असून लवकरच तिच्यावर ह्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे'.
आणि त्याहूनही क्षुल्लक घटना म्हणजे...... अवलिया बाबांचे आता दोन्ही मैत्रिणींशी राजरोसपणे संबंध सुरू झालेले होते व दोघींनाही त्यात हरकत नव्हती......
पण अवलिया बाबा सातार्याला गेल्यापासून आपल्या आवाक्याच्या बाहेर गेल्यामुळे दोन व्यक्ती अतिशय संतापलेल्या होत्या......
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र!!!!!!
म्हणूनच दोन नवीन मित्रपक्ष आज वीर गावात एकमेकांशी भरपूर गप्पा मारून कसलीतरी योजना करत होते!
......सुकन्या मशालकर आणि तावडे पाटील, हे ते दोन नवीनच झालेले मित्र होते!
====================
-'बेफिकीर'!
लिहायला उशीर झाल्याबद्दल
लिहायला उशीर झाल्याबद्दल दिलगीर आहे.
धन्यवाद
धन्यवाद
मस्तं आहे. हा भाग आवडला.
मस्तं आहे.
हा भाग आवडला.
वाचतांना असं वाटलं की आता भाग
वाचतांना असं वाटलं की आता भाग संपूच नये ..... वाचतच जावं वाचतच जाव पण भाग संपला ...
नेहमी प्रमाणे एकदम मस्त... कथेत अजून एक वळण...
मस्तंच!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मस्तंच!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
नेहमीप्रमाणे हा पण भाग छान
नेहमीप्रमाणे हा पण भाग छान झाला आहे. नवीन भाग लवकर आणा. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
वाचतांना असं वाटलं की आता भाग
वाचतांना असं वाटलं की आता भाग संपूच नये ..... वाचतच जावं वाचतच जाव पण भाग संपला ...
नेहमी प्रमाणे एकदम मस्त... कथेत अजून एक वळण...>>>>>>>>> +१११११
आता पटापट पुढ्चे भाग टाका.
खुप छान आहे.मला तुमचे सगळे
खुप छान आहे.मला तुमचे सगळे लिखान आवडल आहे.सग्ळ्यात जास्त 'बुधवार पेट'वाला.
बेफी जी, एखादा मराठी सिनेमा
बेफी जी, एखादा मराठी सिनेमा काढायचं मनावर घ्याच... !
खुपच छान. आता पुढचे भाग पटापट
खुपच छान. आता पुढचे भाग पटापट येउद्यात प्लिज्ज
आता पुढचे भाग पटापट येउद्यात
आता पुढचे भाग पटापट येउद्यात प्लिज्ज
तुमच्या कथेतिल शेवटचे वाक्य
तुमच्या कथेतिल शेवटचे वाक्य नेहमिच कुतुहुल जागवत असते.
किती दिवस झाले अन्याची वाट
किती दिवस झाले अन्याची वाट पहात होतो. छान आहे हा हि भाग. पु. ले. शु.