९० डिग्री साऊथ - ८

Submitted by स्पार्टाकस on 7 May, 2014 - 08:53

स्कॉटच्या तुकडीची धीम्या गतीने प्रगती चालू होती. बर्फातून स्लेज ओढताना त्यांना अपार कष्ट पडत होते. दिवसाला ११ - १२ मैलांच्या पलीकडे मजल मारणं त्यांना अशक्यं होत होतं. १५ डिसेंबरला त्यांनी ८४ अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडलं. पृष्ठभागावरील बर्फाचा थर आता कमी होत होता. मात्रं त्या दिवशी संध्याकाळी कँपच्या नियोजीत जागी पोहोचण्यापूर्वीच पुन्हा बर्फवृष्टीला सुरवात झाली. निरुपायाने त्यांना थांबणं भाग पडलं. स्कॉटने निराशेने आपल्या डायरीत नोंद केली,

" बर्फ पडण्यास सुरवात झाल्याने आम्हांला थांबणं भागंच पडलं होतं ! अद्यापही आमचं भाग्यं साथ देत नाही. शॅकल्टनच्या तुलनेत आम्ही चांगलेच कमनशिबी ठरलो आहोत !"

टेरा नोव्हा मोहीमेतील ग्रिफीथ टेलरच्या मॅकमुर्डो साऊंडच्या पश्चिमेला ग्रॅनाईट हार्बर इथल्या संशोधनासाठी गेलेल्या तुकडीतील सदस्य ट्रेगेव्ह ग्रान याने १५ डिसेंबरला आपल्या डायरीत एक विलक्षण नोंद केली,

" अ‍ॅमंडसेन १५ ते २० डिसेंबरच्या दरम्यान दक्षिण धृवावर पोहोचला अशी तार आल्याचं मला स्वप्नं पडलं !"

बर्फातून वाट काढत स्कॉटची वाटचाल सुरूच होती. स्लेज ओढून नेण्याचे अपार श्रम त्यांना पडत होते, परंतु त्याला काहीही इलाज नव्हता.

" आम्हांला शक्यं तितक्या घाईने पुढे जावं लागेल !" स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली, " गेट वे जवळच्या वादळामुळे आणि नंतरच्या बर्फवृष्टीमुळे आम्ही शॅकल्टनच्या वेळापत्रकापेक्षा सुमारे ६ दिवस मागे आहोत. स्कीईंगच्या साहीत्याचं काय करावं हे समजत नाही ! त्याचं वजन खूप आहे, परंतु काही ठिकाणी त्याच्याशिवाय पर्याय नाही ! आम्ही भराभर पुढची मजल मारु शकलो, तर शॅकल्टनचं वेळापत्रक गाठणं अशक्यं नाही !"

अ‍ॅमंडसेनच्या तुकडीचा परतीचा प्रवास सुरु झाला. दिवसा विश्रांती घेऊन रात्रीचा प्रवास करण्याची त्यांची योजना होती. त्यामुळे सूर्यकिरण पाठीमागच्या बाजूने येणार होते आणि त्यामुळे येऊ शकणारा तात्पुरत्या अंधत्वाचा धोका टळणार होता.

अ‍ॅमंडसेनने दक्षिण धृव गाठण्यात स्कॉटवर मात केली असली, तरीही आपल्यापाठोपाठ एक-दोन दिवसांतच स्कॉट दक्षिण धृवावर येऊन पोहोचेल अशी त्याला अपेक्षा होती. दक्षिण धृवावर पोहोचल्याची बातमी सर्व जगाला आपण सर्वप्रथम द्यावी अशी अ‍ॅमंडसेनची रास्त इच्छा होती. त्या इराद्याने त्याने परतीच्या वाटेवर लवकर मार्गक्रमणा करण्याची सूचना केली. जालांड सर्वात पुढे होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी उत्तरेचा मार्ग अनुसरला.

अ‍ॅमंडसेनला स्कॉटच्या दक्षिण धृव गाठून परतण्याविषयीची वाटत असलेली भीती अनाठायी होती. स्कॉट धृवापासून अद्याप साडेपाचशे मैलांवर होता. अर्थात अ‍ॅमंडसेनला याची काहीच कल्पना नव्हती !

१८ डिसेंबरला स्कॉटने ८४'३४'' अंश दक्षिण अक्षवृत्त गाठलं. मात्रं वाटेत त्यांना बर्फाच्या लाटांमुळे काहीशा धोकादायक बनलेल्या प्रदेशातून मार्ग काढावा लागला होता. मात्रं हळूहळू परिस्थीती सुधरत होती. पॄष्ठभागावरील भुसभुशीत हिमाची जागा आता टणक बर्फाने घेतल्यामुळे भराभर अंतर काटणं त्यांना सोपं जात होतं.

२० डिसेंबरला स्कॉटने बिअर्ड्मूर ग्लेशीयरवर ६५०० फूट उंची गाठली. बर्फावर चालण्यासाठी आवश्यक असलेले क्रॅम्पॉन्स बुटांवर चढवल्याने आता त्यांना होणारा त्रास कमी झाला होता. मात्रं बॉवर्सच्या स्लेजचा स्लेजमीटर वाटेत बर्फात गायब झाला ! खूप शोधाशोध करुनही तो मिळालाच नाही !

पूर्वी ठरलेल्या योजनेप्रमाणे दुस-या दिवशी चार माणसांना मागे फिरुन केप इव्हान्सचा मार्ग सुधरावा लागणार होता. परत जाणा-या या तुकडीत स्कॉटने अ‍ॅटकिन्सन, कोहेन, राईट आणि चेरी-गॅराड यांची निवड केली. स्कॉटच्या या निर्णयावर राईटने नाराजी व्यक्त केली. तो म्हणतो,

" टेडी इव्हान्स पुढे जाणार होता आणि मी आणि चेरी-गॅराड मागे जाणार होतो ! स्कॉटचा हा निर्णय अनाकलनीय होता. टेडी इव्हान्स अत्यंत कमजोर होता. शारिरीकदृष्ट्या मी आणि गॅराड दोघंही त्याच्यापेक्षा अधिक सक्षम होतो !"

स्कॉटने राईटवर परतीच्या तुकडीच्या नॅव्हीगेटरची जबाबदारी सोपवली होती. मात्रं टेडी इव्हान्सला पुढे नेण्याचं कारण त्याने दिलं नाही. चेरी-गॅराड म्हणतो,

" मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती अखेर तेच झालं ! केप इव्हान्सला परतणा-या तुकडीत माझा समावेश करण्यात आला होता. स्कॉटने त्याला मदत करु शकणारे दर्यावर्दी पुढे जाणा-या तुकडीत निवडले होते."

विल्सनने अ‍ॅटकिन्सनला पुढे जाऊ शकणा-या लोकांविषयी त्याचं मत विचारलं होतं. अ‍ॅटकिन्सनने लॅशीची निवड केली. कोणत्याही परिस्थीत टेडी इव्हान्सला परत पाठवण्याबद्दल दोघांचं एकमत होतं. इव्हान्सच्या शारिरीक आणि मानसिक क्षमतेबद्दल दोघांचंही प्रतिकूल मत होतं, परंतु डिस्कव्हरी मोहीमेपासून स्कॉटची इव्हान्सवर मेहेरनजर होती. स्कॉटचा निर्णय दोघांनाही निमूटपणे मान्य करावा लागला.

२१ डिसेंबरला स्कॉटने ८५ अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडलं. वाटेत एका बर्फाळ कपारीत अ‍ॅटकिन्सन आणि टेडी इव्हान्स गळ्यापर्यंत रुतले होते ! सुदैवाने दोघांनाही बाहेर काढण्यात त्यांना यश आलं. बिअर्डमूर ग्लेशीयरवरील चढाई पूर्ण करुन ते आता त्याच्या माथ्यावर पोहोचले होते !

२२ डिसेंबरला ८५'१३'' अंश दक्षिण अक्षवृत्तावर स्कॉटने डेपो कँप उभारला. परतीच्या वाटेवर दोन तुकड्यांना आवश्यक असलेल्या साधनसामग्रीची त्यात तरतूद करण्यात आली होती.

Scotts Depot 85'7''.jpgअपर बिअर्डमूर ग्लेशीयरवरील स्कॉटचा डेपो कँप

अ‍ॅटकिन्सन, राईट, कोहेन आणि चेरी-गॅराडने परतीची वाट पकडली. निघण्यापूर्वी स्कॉटने अ‍ॅटकिन्सनला पुढील हालचालींविषयी सूचना दिल्या.

" मेयर्सला परत जावं लागण्याची शक्यता आहे. तसं झालं तर कुत्र्यांच्या दोन तुकड्या घेऊन शक्य तितक्या दक्षिणेला येण्याचा प्रयत्न कर ! आम्हांला परत येताना आवश्यंक त्या साधनसामग्रीची तजवीज डेपो मध्ये करुन ठेव. परंतु आम्ही परत येण्यासाठी कुत्र्यांच्या मदतीवर अवलंबून नाही ! पुढच्या वर्षी स्लेजसाठी कुत्र्यांची आवश्यकता लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांच्याबाबतीत जास्तं रिस्क घेऊ नका !"

स्कॉटच्या या सूचनेचा परिणाम काय होणार होता हे येणारा काळच ठरवणार होता !

चेरी-गॅराडने डायरीत नोंद केली,
" डेपो उभारल्यावर त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. बर्फवृष्टी सुरु होती. एका विशीष्ट वळणावर आम्ही मागे वळून पाहीलं तेव्हा दूर अंतरावर काळ्या ठिपक्याप्रमाणे आम्हाला तो डेपो दिसत होता ! त्या वळणानंतर तो दृष्टीआड गेला. इथून पुढे दक्षिण धृव गाठणं स्कॉटला सहजच शक्यं होईल. आम्ही उत्तरेची दिशा पकडली. लवकरात लवकर केप इव्हान्सला पोहोचणं हे आता आमच्यापुढचं ध्येयं होतं."

दक्षिण धृवावरुन परत फिरलेल्या अ‍ॅमंडसनची दिवसाला साडेसतरा मैलाच्या वेगाने अ‍ॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयरच्या दिशेने वाटचाल सुरु होती !

अ‍ॅटकिन्सनची तुकडी परत फिरल्यावर स्कॉटच्या आठ जणांच्या तुकडीची आगेकूच सुरु झाली. २३ डिसेंबरला वेड्यावाकड्या प्रदेशातून बाहेर पडून बर्फाचा टणक पृष्ठभाग असलेल्या प्रदेशात ते पोहोचले. २४ डिसेंबरला ख्रिसमस इव्हला त्यांनी नेहमीच्या रेशनपेक्षा थोडा जास्त आहार घेतला. ख्रिसमसच्या स्वागतासाठी हे आवश्यक होतं असं स्कॉटचं मत पडलं !

अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने ख्रिसमस इव्हला ८८'२५'' दक्षिण अक्षवृत्तावरील आपला शेवटचा डेपो कँप गाठला ! परतीच्या वाटेवर आवश्यक साधनसामग्रीची तरतूद त्यांनी आधीच करुन ठेवलेली होती. विस्टींगने बिस्कीटं आणि मिल्क पावडरचा वापर करुन पुडींग बनवलं ! दक्षिण धृवावर जालांडने दिलेल्या सिगारेट केसमधील सिगरेट्स अ‍ॅमंडसनने आपल्या सहका-यांना वाटल्या. इथून पुढे निघाल्यावर पुढचा डेपो १२४ मैलांवर होता. ८६'२४'' दक्षिण अक्षवृत्त !

ख्रिसमसच्या दिवशी स्कॉटच्या तुकडीचं पुन्हा कपारी आणि टेकड्यांनी भरलेल्या प्रदेशाने स्वागत केलं. सावधपणे मार्ग काढत ते पुढे निघाले असतानाच अचानकपणे लॅशी अदृष्यं झाला !

एका भल्या मोठ्या बर्फाच्या कपारीत लॅशी उभाच्या उभा खाली पडला होता ! सुदैवाने स्लेजला लॅशीची हार्नेस स्लेजला अडकवलेली असल्याने तो कपारीच्या तळाशी कोसळला नाही. मात्रं दोराचा जोरदार हिसका त्याला बसला होता. लॅशी म्हणतो,

" ख्रिसमसच्या दिवशी आणि विशेषतः माझ्या वाढदिवशी असा हिसका बसणं हे फारसं सुखावह नव्हतं ! ज्या कपारीत मी हार्नेसला बांधलेल्या दोराच्या सहाय्याने लटकत होतो, ती ५० फुटांवर खोल आणि किमान ८ फूट रुंद होती !"

स्कॉटच्या स्लेजवर असलेल्या दोराच्या सहाय्याने एडगर इव्हान्स, बॉवर्स आणि क्रेनने लॅशीला वर खेचून काढलं.

" हॅपी बर्थडे लॅशी !"

लॅशीला वर काढल्यावर क्रेन म्हणाला ! कोणालाच हसू आवरेना. सुदैवाने लॅशीला कोणतीही दुखापत झालेली नव्हती, पण कपारीत लटकत राहील्यामुळे तो चांगलाच गारठला होता !

Christmas Camp Scott.jpgस्कॉटचा ख्रिसमस कँप

परतीच्या वाटेवर असलेल्या जालांडने आता कुत्र्यांशी शर्यत लावण्याचा नवीनच खेळ आरंभला होता ! लवकरात लवकर ग्लेशीयर उतरुन रॉस आईस शेल्फ गाठण्याची त्याला घाई झाली होती. अ‍ॅमंडसेनने मात्रं दिवसाला साडेसतरा मैलांच्यावर पल्ला वाढवण्यास साफ नकार दिला होता. दिवसाचे सोळा तास ते स्लीपींग बॅगमध्ये विश्रांती घेत होते. ग्लेशीयरवरुन रॉस आईस शेल्फवर उतरण्याच्या कठीण मार्गावरील वाटचालीसाठी आपली शक्ती वाचवणं त्यांच्यादृष्टीने महत्वाचं होतं.

२६ डिसेंबरला स्कॉटने ८६ अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडलं. समुद्रसपाटीपासून ते ८००० फूट उंचीवर पोहोचले होते.

२४ नोव्हेंबरला परत फिरलेले डे आणि हूपर २६ डिसेंबरला केप इव्हान्सला येऊन पोहोचले. त्यांच्याकडून स्कॉटने पूर्वी ठरलेला बेत बदलून कुत्र्यांच्या तुकडीला आणखीन पुढे नेल्याची सिम्प्सनला कल्पना आली.

" कुत्र्यांची तुकडीतील किती कुत्रे परत येतील आणि आले तर कोणत्या परिस्थीतीत असतील याची काही खात्री देता येत नाही !" स्कॉटने सिम्प्सनला निरोप दिला होता, " कोणत्याही परिस्थीतीत एक टन डेपोवर साधनसामग्रीची तजवीज करून ठेव !"

कुत्र्यांसह मेयर्स आणि डिमीट्री १५ डिसेंबरपर्यंत परत येतील अशी सिम्प्सनची अपेक्षा होती. मात्रं स्कॉटने त्यांना ११ डिसेंबरला बिअर्डमूर ग्लेशीयरपर्यंत नेल्याची डे आणि हूपरलाही कल्पना नव्हती. ते न परतल्यामुळे सिम्प्सनने डे आणि हूपरची एक टनाच्या डेपोकडे रवानगी केली.

२८ डिसेंबरला इव्हान्सच्या तुकडीतील स्लेजवरच्या सामानात काहीतरी गडबड असल्याचं स्कॉटच्या ध्यानात आलं. स्वतः स्कॉट आणि लॅशीलाही ती स्लेज सहजपणे ओढणं जमत नव्हतं. अखेरीस स्कॉटने स्लेजवर लादलेलं सामान उतरवून पुन्हा बांधण्याची सूचना केली. इव्हान्स आणि लॅशी मोटरस्लेज नादुरुस्त झाल्यापासून स्लेज ओढत होते, परंतु इव्हान्सची प्रकृती खालावल्याचं स्कॉटच्या नजरेस आलं होतं.

स्कॉटला त्यावेळी कल्पना नसली तरी इव्हान्सला स्कर्व्हीने ग्रासलं होतं ! तो स्कर्व्हीच्या सुरवातीच्या स्टेजला होता !

अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने धृवीय पठाराचा माथा गाठला होता ! उत्तरेच्या दिशेने अ‍ॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयरकडे त्यांची वाटचाल सुरु झाली !

स्कॉटच्या तुकडीची दक्षिणेकडे आगेकूच सुरुच होती. स्लेजवर लादण्यात आलेल्या सामानाची स्कॉटच्या सूचनेबरहुकूम पुनर्रचना केल्यावर इव्हान्सचीही प्रगती समाधानकारक होती. स्कॉटच्या मतानुसार ३० डिसेंबरला त्यांनी शॅकल्टनचं वेळापत्रक गाठलं होतं. बर्फाच्या लाटांवरुन प्रवास करणं त्यांना जिकीरीचं जात असलं तरी पूर्वीपेक्षा परिस्थीती बरीच सुधारलेली होती.

३१ डिसेंबर ला स्कॉटने ८६'५६'' गाठलं. इथे त्याने आपल्या स्लेज संपूर्णपणे सुट्या करुन परत जोडणी करण्याचा घाट घातला ! स्लेजची मूळची बारा फूट लांबी कमी करुन दहा फूट करण्याची त्याची योजना होती. वजन कमी झाल्यामुळे स्लेज ओढण्यास सोपं जाणार होतं. हे काम काही तासांत आवरेल अशी स्कॉटची अपेक्षा होती, परंतु त्याला तब्बल आठ तास लागले होते ! ८७ अंश अक्षवृत्ताच्या अगदी जवळ असलेल्या या डेपोला स्कॉटने नाव दिलं ३ डिग्री डेपो ! ८ दिवसांच्या अन्नसामग्रीची इथे तजवीज करुन ठेवण्यात आली होती.

Scott Camp 86'56''.JPG३ डिग्री डेपो - ८६'५६'' अंश दक्षिण अक्षवृत्त

अ‍ॅमंडसेनची तुकडी उत्तरेच्या मार्गावर होती. स्कीईंग करणा-यांना स्लेजच्या कमी वेगाशी जुळवून घेताना कसरत करावी लागत होती. ८७ अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडून त्यांनी अ‍ॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयरची वाट धरली होती.

दक्षिण धृवाच्या मार्गावर असताना धुकं आणि हिमवादळामुळे अ‍ॅमंडसेनच्या तुकडीला आसपासच्या परिसराचं निरीक्षण करता येणं शक्यंच नव्हतं. मात्रं आता मोकळ्या हवामानात तो सर्व प्रदेश त्यांच्या नजरेस पडत होता. मात्रं त्यामुळे आता निराळीच समस्या उभी राहीली होती. आसपासच्या प्रदेशात त्यांना ओळखीच्या खुणा आढळत नव्हत्या ! अ‍ॅमंडसेनला दूर अंतरावरचं स्पष्ट दिसू शकत नसे, त्यामुळे त्याचा गोंधळ उडाला होता. भरीला ८८ अंश अक्षवृत्तानंतर त्यांनी रोवलेले खुणेचे झेंडेही दिसून येत नव्हते ! अशा गोंधळलेल्या अवस्थेतच काही मैलांचं अंतर काटल्यावर दूरवर बुचर्स शॉपच्या परिसरातील पर्वतशिखरं त्यांच्या दृष्टीस पडली !

स्कॉट आणि अ‍ॅमंडसेनच्या तुकड्यांमध्ये यावेळी जेमतेम १०० मैलांचं अंतर होतं ! अ‍ॅमंडसेन दक्षिण धृवीय पठारावरुन अ‍ॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयरच्या मार्गावर होता, तर स्कॉट बिअर्डमूर ग्लेशीयरवरुन धृवीय पठाराकडे सरकत होता !

विस्टींगला दातदुखीने ग्रासलं होतं. त्याला एक पाऊलही पुढे टाकणं अशक्यं झालं होतं. विस्टींग म्हणतो,

" दक्षिण धृवाच्या पठारावर डेंटीस्ट मिळणं अशक्यंच होतं. मी अ‍ॅमंडसेनला माझा दात उपटण्याची विनंती केली आणि त्याने आनंदाने ती मान्य केली. त्याने माझा दात उपटला तेव्हा उरलेले सर्व दात हादरले होते !"

१ जानेवारी १९१२ ला चॉकलेट आणि चहाच्या कपाने स्कॉटच्या तुकडीने नववर्षाचं स्वागत केलं. ग्लेशीयरवरुन चढाई करत त्यांनी समुद्रसपाटीपासून सुमारे ९६०० फूट उंची गाठली. स्लेजची लांबी आणि वजन कमी झाल्यामुळे त्यांची वाटचाल समाधानकारक रितीने सुरु होती. दक्षिण धृव १७० मैलांवर होता.

अ‍ॅमंडसेनने एव्हाना डेव्हील्स ग्लेशीयर गार्डन गाठलं होतं ! परतीच्या वाटेवर वाट चुकून ते माऊंट हॅसेल, माऊंट जालांड आणि माऊंट हॅन्सनच्या समोरच्या समतल प्रदेशात पोहोचले होते ! मात्रं वाट चुकणं त्यांच्या पथ्यावर पडलं होतं, कारण त्या वाटेवर पोहोचल्यामुळे डेव्हील्स बॉलरुमच्या टेकड्या आणि फसव्या कपारींनी भरलेल्या परिसरातून मार्गक्रमण करणं टळलं होतं ! अ‍ॅमंडसेन म्हणतो,

" डेव्हील्स बॉलरुमच्या प्रदेशाला बगल देऊन डेव्हील्स गार्डनच्या मार्गाला लागल्याचं ध्यानात आल्यावर आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला ! वी वेअर ब्लडी लकी !"

डेव्हील्स गार्डनच्या प्रदेशात पोहोचल्यावरही आपण नेमक्या कोणत्या भागात आलो आहोत याची त्यांना कल्पना नव्हती. वेगळ्याच वाटेने परतल्यामुळे जाताना रोवलेले खुणेचे झेंडेही त्यांना दिसून येत नव्हते ! डेव्हील्स ग्लेशीयरच्या पायथ्याशी असलेला आपला डेपो कँप नेमका कुठे आहे याची त्यांना कल्पना येत नव्हती. जालांडच्या मते ते डेपोच्या पश्चिमेला होते तर अ‍ॅमंडसेन आणि इतरांचं मत बरोबर विरुध्द होतं !

जालांडला आलेला अंदाज अचूक असल्याचं लवकरच त्यांच्या ध्यानात आलं. पूर्वेची दिशा पकडल्यावर काही अंतरावर त्यांना खुणेचा मार्कर आढळून आला ! त्याच मार्गाने सुमारे ८ मैलांवर डेपो असावा असा अ‍ॅमंडसेनचा अंदाज होता. डेपोपर्यंत पोहोचून तिथली अन्नसामग्री हस्तगत करणं आवश्यक होतं, परंतु दिवसभराची १५ मैलांची वाटचाल आधीच केल्यामुळे स्वतः अ‍ॅमंडसेनला चांगलाच थकवा जाणवत होता.

जालांड आणि हॅन्सनला मात्रं श्रमांची पर्वा नव्हती ! जालांडची स्लेज पूर्ण रिकामी करुन ते डेपोच्या शोधात बाहेर पडले !

नॉर्वेतील टेलीमार्क शहराचा रहिवासी असलेला जालांड स्कीईंग करण्यात तरबेज होता. त्याच्या वेगाशी जुळवून स्लेज चालवणं हॅन्सनला जड जात होतं ! अ‍ॅमंडसेनच्या अंदाजापेक्षा डेपो बराच दूरवर होता. जालांड म्हणतो,

" वा-याचा जोर हळूहळू वाढत होता. धुक्यामुळे आम्ही नेमके कोणत्या दिशेने जातो आहोत याचा अंदाज येत नव्हता. डेपो न सापडल्यास आम्हांला उघड्यावरच मुक्काम करावा लागला असता. आमच्यापाशी स्लीपींग बॅग्जही नव्हत्या !"

सुदैवाने काही वेळाने धुक्याचा पडदा उठला आणि दोन मैलांवर असलेला डेपो त्यांच्या नजरेस पड्ला. डेपो आठ मैलांवर असेल असा अ‍ॅमंडसेनचा अंदाज होता, परंतु प्रत्यक्षात ते अकरा मैलांचं अंतर पार करुन आले होते ! डेपोमध्ये थोडी विश्रांती घेऊन त्यांनी रिकाम्या स्लेजवर साधनसामग्री लादली आणि परतीची वाट पकडली.

आपल्या कँपमधून निघाल्यापासून दहा तासांनी जालांड आणि हॅन्सन सामग्रीसह परतले होते ! झोपेची पर्वा न करता अ‍ॅमंडसेन त्यांची वाट पाहत होता !

" त्या दोघांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे !" अ‍ॅमंडसेन म्हणतो, " दिवसभरात त्यांनी तब्बल बेचाळीस मैल अंतर काटलं होतं ! शारिरीक श्रम हा शब्दंच त्यांच्या शब्दकोशात नव्हता ! हॅन्सनच्या स्लेजला असलेले कुत्रेही प्रचंड दमलेले असले तरीही ठणठणीत होते !"

कुत्र्यांची ही उपयुक्तता स्कॉटला कळली असती तर ?

उत्तरेकडे शास्त्रीय संशोधनासाठी गेलेल्या स्कॉटच्या मोहीमेतील लोकांना घेण्यासाठी टेरा नोव्हा रॉबर्ट्सन बे मधील केप आद्रेला पोहोचलं. मात्रं घाईघाईने जहाज गाठावं लागल्याने लेव्हीकने गोळा केलेले काही नमुने तिथेच सोडून यावं लागलं.

३ जानेवारीला स्कॉटची तुकडी ८७'३२'' दक्षिण अक्षवृत्तावर पोहोचली. पूर्वी ठरलेल्या योजनेप्रमाणे चार जणांची तुकडी इथून केप इव्हान्सला परतणार होती.

" क्रेन, तुला सर्दी झालेली दिसते !" स्कॉट क्रेनला म्हणाला.

क्रेनने स्कॉटकडे रोखून पाहीलं. स्कॉटचा उद्देश त्याच्या ध्यानी आला होता. क्रेनची केप इव्हान्सला रवानगी होणार होती !

" मी समजू शकतो सर !" क्रेन शांतपणे उत्तरला.

क्रेनबरोबर स्कॉटने टेडी इव्हान्स आणि लॅशीला परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. पाच माणसांची तुकडी दक्षिण धृवाच्या दिशेने पुढे जाणार होती ! पुढे जाणा-यांत स्वतः स्कॉट, विल्सन, ओएट्स, एडगर इव्हान्स यांचा समावेश होता. शेवटच्या क्षणी पूर्वीच्या योजनेत बदल करुन स्कॉटने बॉवर्सचाही ' पोलर पार्टी ' मध्ये समावेश केला. बॉवर्स म्हणतो,

" टेडी इव्हान्स दक्षिण धृवावर जाणार नाही याची मला जवळपास खात्री होती. त्याने कितीही उत्साह दाखवला तरी त्याची शारिरीक क्षमता कमी पडणार होती हे उघड होतं !"

" स्कॉटने शेवटच्या क्षणी बॉवर्सला पुढे नेण्याचा निर्णय घेतला !" टेडी इव्हान्स म्हणतो, " लॅशी आणि क्रेनसह केप इव्हान्सला परत जाण्याविषयी त्याने मला विचारताच मी अर्थातच होकार दिला. ७५० मैलाचा परतीचा प्रवास आम्ही तिघे करु शकतो याची मला खात्री होती !"

" मी आणि क्रेन पूर्णपणे सक्षम असलो, तरीही पोलर पार्टीत किती़जण जाऊ शकतील यावर मर्यादा होती." लॅशीने आपल्या डायरीत नोंद केली, " मी केप इव्हान्स ऐवजी हट पॉईंटला राहण्याचा विचार स्कॉटला बोलून दाखवला. काही अडचण उद्भवलीच तर परतीच्या वाटेवर मी त्यांना मदत करु शकणार होतो, परंतु स्कॉटने नकार दिला. पुढच्या मोसमात आम्हाला मदतीसाठी म्हणून खेचरं येणार होती ! या खेचरांची देखभाल करण्याचं काम त्याने माझ्यावर सोपवलं ! काही कारणाने खेचरं आली नाहीत तर मात्रं मी हट पॉईंटला राहणार होतो ! आम्ही इथपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल त्याने आमचे मनापासून आभार मानले."

आपल्या पत्नीला लिहीलेल्या पत्रात विल्सन म्हणतो,
" पोलर पार्टीत माझा समावेश झाला आहे. सुमारे पंधरा दिवसांत आम्ही दक्षिण धृव गाठू असा माझा अंदाज आहे. एकंदर विचार करता एखादं स्वप्नं खरं व्हावं असाच आमचा हा प्रवास आहे !"

ओएट्सने आपल्या आईच्या नावाने पत्रं लिहीलं.

" ३ जानेवारी १९१२ - दक्षिणेच्या पठारावरुन मी हे पत्रं तुला लिहीत आहे. मी स्कॉट आणि इतरांबरोबर धृवावर जातो आहे ! त्यामुळे आणखीन वर्षभर मी घरी परत येऊ शकणार नाही ! शॅकल्टन पॉईंटपासून आम्ही जेमतेम ५० मैलांवर आहोत !"

आपल्या पत्रात ओएट्सने पुढे काही पुस्तकं पाठवण्याची सूचना केली. परतीच्या वाटेवर अभ्यास करण्याचा त्याचा विचार होता ! आपल्या डायरीत त्याने पाय दुखत असल्याची नोंद केली.

स्कॉटने आपल्या पत्नीच्या - कॅथलीनच्या नावाने तपशीलवार पत्रं लिहून आतापर्यंतची प्रगती कळवली.

" दक्षिण धृवावर पोहोचल्यावरही आणखीन एक वर्ष अंटार्क्टीकामध्ये राहाण्याचा माझा विचार आहे. मी हाती घेतलेलं शास्त्रीय संशोधनाचं काम पूर्ण करण्यास मला एवढा वेळ निश्चीतच लागेल !"

स्कॉटने मेयर्ससाठी टेडी इव्हान्सकडे तोंडी निरोप दिला होता.
" पूर्वी ठरलेल्या योजनेत थोडासा बदल झालेला आहे ! साधारण फेब्रुवारीच्या मध्यावर ८२ ते ८३ अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान आम्हाला गाठण्याच्या हिशेबाने कुत्र्यांसह तू प्रस्थान ठेव ! परतीच्या वाटेवर केप इव्हान्स गाठण्यासाठी आम्हांला त्यांच्या मदतीची गरज लागण्याची शक्यता आहे !"

दक्षिण धृवावर जाणा-या शेवटच्या तुकडीत चार सदस्यांचा समावेश असेल या हिशेबाने सर्व अन्नसामग्रीची त्या प्रमाणात वाटणी करुन पॅकींग करण्यात आलं होतं. परंतु स्कॉटच्या निर्णयामुळे अन्नसामग्रीची नव्याने वाटणी करावी लागणार होती. त्याचप्रमाणे आवश्यक इंधनाचे सीलबंद कॅन उघडून त्याचीही वाटणी करण्याचं काम उभं राहीलं होतं. परतीच्या वाटेवरील प्रत्येक डेपोवर लॅशी, क्रेन आणि स्कर्व्हीची सुरवात झालेल्या टेडी इव्हान्सला साधनसामग्रीचं हे नियोजन करावं लागणार होतं !

टेडी इव्हान्सच्या तुकडीने आपलं स्कीईंगचं साहीत्य मागील डेपोवर ठेवलं होतं. स्कॉटने बॉवर्सला पुढे नेण्याचा निर्णय घेतला तरी बॉवर्सला पदयात्रा करणं भाग होतं. स्कॉट, विल्सन, ओएट्स आणि एडगर इव्हान्स मात्र स्कीईंग करु शकत होते.

शेवटच्या क्षणी बॉवर्सचा पोलर पार्टीत समावेश करण्याच्या स्कॉटच्या निर्णयाचा परिणाम काय होणार होता ?

४ जानेवारीला अ‍ॅमंडसेनची तुकडी बुचर्स शॉपला पोहोचली ! दक्षिण धृवाच्या दिशेने जाताना धुकं आणि वादळातून या परिसरातून गेल्यामुळे स्वच्छ हवामानात हा प्रदेश पूर्णपणे अनोळखी भासत होता ! तीक्ष्ण नजरेच्या हेन्सनने मात्रं आपल्या डेपोची जागा नेमकी शोधून काढली !

बुचर्स शॉपच्या आसपास असलेल्या अनेक हिमशिखरांच्या उंचीचा आपण केलेला अंदाज साफ चुकीचा असल्याचं अ‍ॅमंडसेनच्या ध्यानात आलं ! ज्या शिखरांची उंची १८ ते २० हजार फूट असल्याचं त्याने राजा हकूनला लिहीलेल्या पत्रात नमूद केलं होतं, ती प्रत्यक्षात ९ ते १० हजार फूट असल्याचं त्याला आढळून आलं !

बुचर्स शॉपवरील साधनसामग्री स्लेजवर लादून त्यांनी अ‍ॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयरचा उतार उतरण्यास सुरवात केली. खाली असलेलं ग्रेट आईस बॅरीयर त्यांना खुणावत होतं. ३००० फूट उतरल्यावर त्यांनी दिवसभराचा प्रवास आवरता घेतला.

४५ दिवसांनी अ‍ॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयरवरुन ते खाली उतरत होते !

६ जानेवारीला स्कॉटने ८८ अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडलं. स्कॉटने वाटेत स्कीईंगचं साहीत्या ठेवून पायी चालण्याचा निर्णय घेतला होता, परंतु लवकरच त्याला आपल्या निर्णय बदलावा लागला ! तसंच चार ऐवजी पाच माणसांचं जेवण बनवण्यासाठी लागणारा वेळ बराच जास्तं असल्याचं त्याच्या ध्यानात आलं.

" पाच माणसांचं जेवण बनवण्यासाठी तुलनेने अर्धा तास जास्तं लागत होता !" स्कॉट म्हणतो, " हा विचार माझ्या आधी डोक्यातच आला नव्हता !"

लॅशी, क्रेन आणि टेडी इव्हान्स ८६'५६'' अक्षवृत्तावरील ३ डिग्री डेपोमध्ये पोहोचले. आपलं स्कीईंगचं साहीत्य ताब्यात घेऊन त्यांनी केप इव्हान्सची वाट पकडली. क्रेन आणि इव्हान्सला स्नो ब्लाईंडनेसचा त्रास जाणवत होता. परंतु त्यांच्या स्लेजला स्लेजमीटर नसल्याने नेमकं किती अंतर आपण पार केलं हे त्यांना कळून येत नव्हतं !

अ‍ॅमंडसेनने माऊंट बेटीच्या पायथ्याशी असलेला आपला डेपो गाठला. स्कीईंग करत असल्याने अ‍ॅमंडसेन, जालांड आणि हॅलन ग्लेशीयरच्या उतारावरुन सफाईदारपणे उतरुन आले होते, परंतु स्लेज हाकारणा-या विस्टींग आणि हॅन्सनला मात्रं खाली उतरणं तितकंसं सोपं गेलं नव्हतं. अनेकदा त्यांना वेडीवाकडी वळणं घ्यावी लागली होती. कुत्र्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवणं हेदेखील कौशल्याचं काम होतं.

त्यांच्याजवळ आता १२ कुत्रे उरले होते. विस्टींग आणि हॅन्सनने माऊंट बेटीचा माथा गाठला आणि तिथे मार्कर उभारला. अ‍ॅमंडसनच्या हस्ताक्षरातील संदेश, १७ लिटर पॅराफीनचा टिन आणि २० काड्यापेट्या त्यांनी तिथे ठेवल्या होत्या.

Betty Matchbox - Mabo.jpgमाऊंट बेटी वरील काड्यापेटी

( १९२९ मध्ये अ‍ॅडमिरल रिचर्ड बायर्डच्या अमेरिकन मोहीमेला माऊंट बेटीवरील काड्यापेट्या सापडल्या. )

जालांड म्हणतो,

" अ‍ॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयरवरुन उतरुन ग्रेट आईस बॅरीयरवर आल्यावर आम्हांला घरी आल्यासारखं वाटलं ! इथून फ्रामहेम पर्यंत पोहोचणं अजिबात कठीण नव्हतं. वाटेत ठिकठिकाणी आमचे सामग्रीने भरलेले डेपो होते !"

९ जानेवारीला स्कॉटने ८८'२३'' दक्षिण अक्षवृत्तावरील शॅकल्टन जिथून परत फिरला होता तो प्रदेश ओलांडला.

" रेकॉर्ड !" स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली, " आम्ही शॅकल्टन परत फिरला होता त्या जागेच्या पुढे आलो आहोत ! पुढे सर्व अज्ञात आहे ! ८८'२५'' अंश दक्षिण !"

स्कॉटच्या दृष्टीने शॅकल्टनवर मिळवलेल्या विजयाची चव न्यारीच होती !

फ्रामहेमच्या दिशेने निघालेल्या अ‍ॅमंडसेनला हिमवादळाने गाठलं होतं, परंतु त्याची पर्वा न करता तो झपाट्याने उत्तरेला सरकत होता. दिवसाला साडेसतरा मैल वाटचाल करण्याची आपली योजना त्याने बदलली होती. दर साडेसतरा मैल अंतरावर सहा तास विश्रांती घेऊन पुन्हा पुढे निघण्याची त्याने सूचना केली. याचा फायदा असा होता की दिवसाला जवळपास दुप्पट ३५ मैलाची मजल त्यांना मारता येत होती !

स्कॉटच्या आधी दक्षिण धृवावरील आपल्या यशाची वार्ता जगाला सांगण्यास अ‍ॅमंडसेनचा आटापिटा चालला होता !

ब्युनॉस आयर्सहून साधनसामग्रीने भरलेलं फ्राम जहाच व्हेल्सच्या उपसागरात परतलं !

१० जानेवारीला स्कॉटने ८८'२९'' दक्षिण अक्षवृत्तावर आपला शेवटचा डेपो कँप उभारला. सात दिवसाची अन्नसामग्री त्याने या डेपोमध्ये ठेवली होती. दक्षिण धृव गाठून परतण्याच्या दृष्टीने १८ दिवस पुरतील इतके अन्नपदार्थ बरोबर घेऊन त्याने पुढे कूच केलं. या शेवटच्या डेपोला त्याने नाव दिलं १ १/२ अंश डेपो !

ढगांचं आवरण आणि बर्फाच्या मा-यामुळे स्कॉटच्या तुकडीची प्रगती मंदगतीने होत होती. स्लेज ओढणं हे अतिशय कठीण झालं होतं. बर्फवृष्टीतून मार्ग काढताना त्यांना प्रचंड मेहनत करावी लागत होती. स्कॉटच्या मनात आपल्या सहका-यांच्या प्रकृतीविषयी चिंता उत्पन्न झाली होती.

" स्लेज ओढण्याच्या श्रमांमुळे आम्ही दिवसेदिवस अशक्तं होत चाललो असल्याची मला भीती वाटते आहे !" स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली.

केप इव्हान्सच्या वाटेवर असलेल्या टेडी इव्हान्सच्या तुकडीलाही वादळाचा मुकाबला करावा लागत होता. सतत होणा-या बर्फवृष्टीमुळे आणि कधीही आडव्या येणा-या कपारींमुळे त्यांची वाटचाल मंदावत होती.

१४ जानेवारीला स्कॉटने ८९'२०'' अंश दक्षिण अक्षवृत्त गाठलं होतं. वातावरणात आलेला अनाकलनीय गारवा त्याला चिंतीत करत होता. मात्रं सर्वजण शारिरीकदृष्ट्या अत्यंत सक्षम असल्याचं तो स्वतःला पुन्हा पुन्हा बजावत होता !

टेडी इव्हान्स, लॅशी आणि क्रेनने बिअर्डमूर ग्लेशीयरच्या माथ्यावर असलेला डेपो गाठला ! त्यांच्याजवळील अन्नसामग्री संपत आली होती, त्यामुळे डेपो गाठताच त्यांना हायसं वाटलं ! लॅशीने स्कॉटच्या नावाने तिथे चिठी लिहून ठेवली आणि चार दिवस पुरेल इतकी सामग्री घेऊन त्यांनी पुढचा रस्ता सुधारला.

अ‍ॅमंडसेनने ८३ अंश दक्षिण अक्षवृत्तावरील आपला डेपो गाठला होता !

१५ जानेवारीला स्कॉटने ८९'३७'' अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडलं. आपल्याप्रमाणेच अ‍ॅमंडसेनही बिअर्डमूर ग्लेशीयरवरुनच दक्षिण धृवाच्या मार्गावर येईल ही स्कॉटची कल्पना होती, त्यामुळे अद्यापही अ‍ॅमंडसेनची कोणतीही खूण न आढळून आल्याने स्कॉटला हायसं वाटलं होतं.

" इथून आता फक्त सत्तावीस मैल ! दोन दिवसात आम्ही दक्षिण धृव गाठणार हे निश्चीत ! फक्त आमच्या आधी नॉर्वेजियन तिथे पोहोचले नसले की झालं !"

स्कॉटच्या दुर्दैवाने त्याच्यावर नेमकी हीच वेळ येणार होती !

अ‍ॅटकिन्सनच्या तुकडीने एक टन डेपो गाठला होता. वाटेतील प्रत्येक डेपोवर त्यांना मेयर्सकडून हालअपेष्टांचं वर्णन करणा-या चिठ्या मिळत होत्या. परतीच्या वाटेवर मेयर्सला हिमवादळाने गाठलं होतं. त्याचा अन्नसाठाही मर्यादीतच होता. परत येणा-या तुकड्यांना आवश्यक साधनसामग्रीची केप इव्हान्सहून एक टन डेपोमध्ये आणण्याची कामगिरी स्कॉटने त्याच्यावर सोपवली होती, परंतु मेयर्सला ते अशक्यंच होतं !

मेयर्सची ही परिस्थीती असूनही एक टन डेपोवर साधनसामग्रीची रेलचेल पाहून अ‍ॅटकिन्सनला सुखद आश्चर्याचा धक्का बसला होता ! चेरी-गॅराड म्हणतो,

" एक टन डेपोवर साधनसामग्री पूर्ण भरलेली पाहून आम्ही चकीतच झालो ! हूपरच्या चिठीवरुन त्याचा उलगडा झाला. २१ डिसेंबरला केप इव्हान्सला पोहोचलेल्या डे आणि हूपरकडून मेयर्सला परतण्यास उशीर होणार असल्याचं सिम्प्सनच्या ध्यानात आलं होतं. २६ डिसेंबरला डे, हूपर, नेल्सन आणि क्लिसॉल्ड यांनी केप इव्हान्सहून एक टन डेपोच्या दिशेने साधनसामग्री घेऊन प्रस्थान केलं होतं !"

१६ जानेवारीला फ्रामहेममध्ये असलेल्या थॉरवाल्ड निल्सनला व्हेल्सच्या उपसागरात आलेलं आणखीन एक जहाज दृष्टीस पडलं !

काईमान मारू !

जहाजावर जपानचा झेंडा फडकत होता. नोबू शिरासच्या जपानी अंटार्क्टीक मोहीमेची तुकडी त्या जहाजावर होती. फेब्रुवारीमध्ये आपल्या पहिल्या प्रयत्नात अयशस्वी ठरल्यावर त्यांनी ऑस्ट्रेलियाहून पुन्हा अंटार्क्टीका गाठलं होतं.

Japenese.jpgकाईमान मारुवरील जपानी दर्यावर्दी - व्हेल्सच्या उपसागरात

निल्सन आणि प्रेस्टर्डने काईमान मारूला भेट दिली. जपानी मोहीमेत एकूण २७ माणसांचा समावेश होता. त्याखेरीज जहाजावर २६ कुत्रेही होते. निल्सन म्हणतो,

" त्यांच्या जहाजावर अनेक गोष्टी अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या. स्वच्छता नावालाही नव्हती. त्यांचं लक्ष्यं दक्षिण धृवावर पोहोचणं हे नसून किंग एडवर्ड ७ लँड हे होतं. त्यांच्या मोडक्या-तोडक्या इंग्लीशमुळे जास्तं संवाद साधणं शक्यं नव्हतं !"

काईमान मारुने दुस-या दिवशी व्हेल्सच्या उपसागरातून दक्षिणेकडे प्रस्थान केलं. २६ जानेवारीला त्यांनी किंग एडवर्ड ७ लँडवर उतरण्यात यश मिळवलं. डिस्कव्हरी ( १९०२ ), निम्रॉड ( १९०८ ) आणि टेरा नोव्हा मोहीमेने तिथे उतरण्याचे केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले होते.

अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने ८२ अंश दक्षिण अक्षवृत्तावरील आपला डेपो गाठला होता ! अन्नसामग्रीची रेलचेल असल्याने त्यांनी जोरदार पार्टी केली ! स्लेजवरील वजन कमी करण्यासाठी अ‍ॅमंडसेनने कुत्र्यांचा आहार दुप्पट केला होता ! फ्रामहेममध्ये पोहोचण्याची त्याला घाई झाली होती ! स्कॉट अद्यापही दक्षिण धृवावर न पोहोचल्याची अ‍ॅमंडसेनला काहीच कल्पना नव्हती !

बिअर्डमूर ग्लेशीयरच्या वरच्या डेपोवरुन दोन दिवसांपूर्वी निघालेल्या लॅशी, क्रेन आणि इव्हान्सला आपला मार्ग थोडासा चुकल्याची शंका येत होती. मिडल ग्लेशीयर डेपोवर पोहोचल्यावर त्यांना अन्नसामग्री मिळू शकणार होती. मात्रं हवामान अद्याप पूर्णपणे अनुकूल नव्हतं !

८९'३७'' दक्षिण अक्षवृत्तावरुन निघालेल्या स्कॉटची तुकडी अतिशय उत्साहात होती. दुस-या दिवशी आपण दक्षिण धृवावर पोहोचणार याची त्यांना खात्री होती. दुपारी त्यांनी ८९'४२'' दक्षिण अक्षवृत्त गाठलं.

आघाडीवर असलेल्या बॉवर्सच्या तीक्ष्ण नजरेने दूरवर असलेला एक मार्कर टिपला होता. मात्रं तो मार्कर आहे हे मानण्यास त्याच्या मनाची तयारी नव्हती ! तो बर्फाच्या लाटेचा मध्येच आलेला उंचवटा असावा अशी त्याने स्वतःची समजूत करुन घेतली.

आणखीन अर्ध्या तासाने एक गडद काळा ठिपका बॉवर्सच्या दृष्टीस पडला !

काळा झेंडा !

काही वेळातच स्कॉट आणि इतर सर्वजण त्या झेंड्यापाशी पोहोचले ! स्लेजच्या एका भागाला तो झेंडा लावण्यात आला होता. स्लेजच्या कित्येक खुणा आणि बर्फात अद्यापही टिकून असलेले कुत्र्याच्या पंजांचे ठसे त्यांना आढळून आले ! हा अ‍ॅमंडसेनचा १४ डिसेंबरचा कँप होता !

स्कॉटला वाटणारी भीती दुर्दैवाने खरी ठरली होती !
अ‍ॅमंडसेनने त्यांना चकवलं होतं !
नॉर्वेजियनांनी त्यांच्यापूर्वी दक्षिण धृव गाठला होता !

स्कॉटच्या तुकडीने तिथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांना प्रचंड निराशेने ग्रासलं होतं.

Amundsen Flag.jpg" आम्ही अत्यंत निराश मनस्थितीत आहोत !" ओएट्सने आपल्या डायरीत नोंद केली, " स्कॉट अत्यंत निराश झाला असला तरी आपला पराभव त्याने मानाने स्वीकारला आहे ! अ‍ॅमंडसेन.. त्याचं डोकं फोडावं असा संताप आला आहे !"

" स्लेजच्या खुणा आणि कुत्र्यांच्या पंजांचे ठसे किती जुने आहेत याची काहीही कल्पना येत नाही !" विल्सन म्हणतो, " दोन-तीन आठवडे.... कदाचित त्यापेक्षाही जुन्या !"

" मला स्कॉटबद्दल फार वाईट वाटतं आहे !" बॉवर्स म्हणतो, " आपला पराभव त्याने खिलाडूपणाने स्वीकारला अहे !"

" ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती, दुर्दैवाने अखेरच्या क्षणी ती खरी ठरली !" स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली, " आमच्या आधी नॉर्वेजियन्स इथे येऊन गेले आहेत ! मला इथवर साथ देणा-या माझ्या सहका-यांविषयी मला वाईट वाटत आहे ! आता उद्या धृवावर पोहोचून लवकरात लवकर परत फिरणं एवढंच आमच्या हाती उरलं आहे ! परतीच्या वाटेवर आमची चांगलीच दमछाक होणार आहे ! अ‍ॅमंडसेनला नक्कीच कोणती तरी सोपी वाट सापडली असावी !"

दुस-या दिवशी स्कॉटने धृवाचा मार्ग प़कडला. अ‍ॅमंडसेनच्या स्लेजच्या खुणांच्या अनुरोधाने ते पुढे जात होते. स्लेजच्या खुणांवरून दोनच माणसं असावीत असा स्कॉटचा अंदाज होता. तीन मैलांवर अ‍ॅमंडसेनचा मार्ग पश्चिमेच्या दिशेने जातो आहे असा त्यांनी निष्कर्ष काढला.

१७ जानेवारी १९१२ संध्याकाळी ६.०० वाजता कॅप्टन रॉबर्ट फॅल्कन स्कॉट दक्षिण धृवावर पोहोचला.

" दिवसभर अतिशय ढगाळ वातावरण होतं." विल्सन म्हणतो, " आम्हाला तिथे कोणताही मार्कर अथवा झेंडा आढळून आला नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे अ‍ॅमंडसेन धृवापासून तीन मैल दूरच असावा ! मात्रं दक्षिण धृवावर सर्वात प्रथम पोहोचल्याचा दावा तो निश्चीतपणे करू शकतो यावर आमचं एकमत झालं ! त्याने या सगळ्या प्रकाराला शर्यतीचं स्वरुप आणलं आणि त्यात आम्हाला हरवलं ! परंतु आम्ही आमच्या मोहीमेचं लक्ष्यं गाठण्यात यशस्वी झालो आहोत !"

" या ठिकाणी पोहोचण्यासाठी घेतलेली मेहनत फळाला आली असली तरी नॉर्वेजियनांनी आमच्यावर मात केल्याचं शल्यं कायम राहील !" बॉवर्स म्हणतो, " पण आम्ही पारंपारीक ब्रिटीश पध्दतीने कोणत्याही प्राण्याच्या मदतीशिवाय स्वत:च्या पायांवर इथे पोहोचलो आहोत याचा मला अभिमान आहे !"

' गिरे तो भी टांग उपर !' या ब्रिटीश मानसिकतेपुढे काय बोलणार ?

स्कॉटने मात्रं आपला पराभव प्रांजळपणे मान्य केला.

" दक्षिण धृव !" स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली. " गेल्या काही दिवसांतील खडतर प्रवासानंतरही सर्वप्रथम धृवावर पोहोचल्याचं श्रेय मिळू नये हे निराशाजनक होतं ! आता शक्य तितक्या लवकर परत जाऊन दक्षिण धृवावर पोहोचल्याची बातमी प्रथम सर्वांना देणं हेच आमच्या हाती शिल्लक आहे ! मात्रं त्यात कितपत यश येईल याची शंकाच आहे !"

अ‍ॅमंडसेन महिन्याभरापूर्वीच धृवावरुन परत फिरल्याची आणि झपाट्याने व्हेल्सच्या उपसागरात फ्रामहेमकडे जात असल्याची स्कॉटला काहीच कल्पना नव्हती.

१८ जानेवारीला सकाळी स्कॉटच्या तुकडीला आपण दक्षिण धृव पार करुन सुमारे तीन मैल पुढे आल्याचं ध्यानात आलं. त्यांनी इशान्येची वाट पकडली.

दोन मैल अंतरावर बॉवर्सच्या तीक्ष्ण नजरेला अ‍ॅमंडसेनचा तंबू दृष्टीस पडला !

पोलहेम !

तंबूत ठेवलेल्या कागदावरुन अ‍ॅमंडसेनच्या तुकडीतील पाचजणांची नावं स्कॉटला कळून आली.

रोनाल्ड अ‍ॅमंडसेन
ओलाव्ह ओलाव्हसन जालांड
हेल्मर हॅन्सन
स्वेर हॅसल
ऑस्कर विस्टींग

१५ डिसेंबर १९११

Scott at Poleheim.jpg
पोलहेम इथे स्कॉट आणि इतर - १८ जानेवारी १९१२

अ‍ॅमंडसेनने दक्षिण धृवाच्या आपल्या प्रवासातील सर्व नोंदी फ्रामच्या बे ऑफ व्हेल्स इथल्या वास्तव्याला धरुन केल्या होत्या. त्याच्या कॅलेंडरनुसार तो १५ डिसेंबरला दक्षिण धृवावर पोलहेममध्ये पोहोचला असला, तरीही दक्षिण धृवाजवळ त्याने आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा ओलांडली होती. त्यामुळे स्कॉटच्या कॅलेंडरप्रमाणे अ‍ॅमंडसेन १६ डिसेंबरला दक्षिण धृवावर पोहोचला होता. आपल्या कॅलेंडरची त्याने तशी स्पष्ट नोंद करुन ठेवली होती.

" अ‍ॅमंडसेनचा तंबू उत्तम स्थितीत होता !" स्कॉटने आपलं मत नोंदवलं. " केवळ एकाच बांबूचा त्याला आधार आहे. वर नॉर्वेचा राष्ट्रध्वज फडकतो आहे !"

स्कॉटला नॉर्वेचा राजा ७ वा हकून याच्या नावाने लिहीलेलं अ‍ॅमंडसेनचं पत्रं मिळालं. स्कॉटला लिहीलेल्या चिठीत अ‍ॅमंडसेनने लिहीलं होतं,

" डियस कॅप्टन स्कॉट,

आमच्यानंतर सर्वप्रथम तुम्हीच इथे येऊन पोहोचाल अशी मला खात्री आहे. राजे हकून ७ वे यांच्या नावाने मी ठेवलेलं पत्रं त्यांना पोहोचवण्याची कृपया व्यवस्था करावी ! तंबूत ठेवलेल्या कोणत्याही सामग्रीचा तुम्हांला उपयोग असेल तर अवश्य करावा ! परतीच्या सुखरुप प्रवासासाठी शुभेच्छा !

रोनाल्ड अ‍ॅमंडसेन. "

विल्सनने तंबूतील सामग्रीची नोंद केली.
" अ‍ॅमंडसेनने ब-याच गोष्टी मागे ठेवल्या होत्या. रेनडीयरच्या कातड्यापासून बनवलेल्या स्लीपींग बॅग्ज आणि कपडे, मोजे, सेक्स्टंट, कृत्रीम क्षितीज, हिप्सोमीटर ( मी त्याचा स्पिरीटचा लँप घेतला आहे ) आणि इतर सामन !"

बॉवर्सने त्यातील रेनडीयरच्या कातड्यापासून बनवलेल मोजे उचलले. स्कॉटने आपण तिथे येऊन गेल्याची एका कागदावर नोंद करुन ठेवली.

आणखीन सहा मैलांवर स्कॉटने एका बर्फाच्या उंचवट्यावर बांबूच्या आधाराने युनियन जॅक उभारला.

बॉवर्सने अनेक फोटो काढले. कॅमे-याचं शटर रिलीज करण्यासाठी दोरीचा वापर करुन त्याने सर्वांचे एकत्रीत फोटो काढण्यात यश मिळवलं !

काही अंतरावर त्यांना अ‍ॅमंडसेनचा आणखीन एक झेंडा आढळला. सोबतच्या चिठीत नोंद होती,

" नॉर्वेजियन पोलहेम ८९'५९'' अंश दक्षिण अक्षवृत्तावर आहे - १५ डिसेंबर १९११, रोनाल्ड अ‍ॅमंडसेन. "

स्कॉटला आढळलेला तो झेंडा अ‍ॅमंडसेनने दक्षिण धृवाच्या चारही दिशांनी रोवलेल्या खुणेच्या झेंड्यांपैकी एक होता.

अ‍ॅमंडसेन महिनाभर आधी दक्षिण धृव गाठून परत फिरल्याची कल्पना आल्यावर स्कॉटची उरलीसुरली आशा धुळीस मिळाली.

Scott at South Pole - 1.jpg
विल्सन, बॉवर्स, इव्हान्स आणि स्कॉट, ऑएट्स ( खाली बसलेले ) - दक्षिण धृव - १८ जानेवारी १९१२

" नॉर्वेजियनांनी पध्दतशीरपणे धृवावर मार्कींग केलं आहे !" स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली, " माझ्य अंदाजाप्रमाणे समुद्रसपाटीपासून दक्षिण धृव सुमारे ९५०० फूट उंचीवर आहे. नॉर्वेजियन १५ डिसेंबरला इथे पोहोचले असावे आणि १७ तारखेला परतले असावे. २२ डिसेंबर ही दक्षिण धृवावर पोहोचण्याची योग्य तारीख आहे असं मी मागेच लंडनमध्ये जाहीर केलं होतं. अ‍ॅमंडसेन त्यापूर्वीच इथून परतलेला आहे ! त्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगलं हवामान मिळालं असावं असा माझा कयास आहे. आम्ही आता इथून परत निघत आहोत !"

केप इव्हान्सला पोहोचण्यासाठी स्कॉटच्या तुकडीला ८०० मैलांची पायपीट करावी लागणार होती. त्यात ते कितपत यशस्वी होणार होते ?

क्रमश :

९० डिग्री साऊथ - ७                                                                                                            ९० डिग्री साऊथ - ९

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परतीचा प्रवास अजूनच खडतर असणार.. कारण पोहोचता पोहोचताच निम्म्याहून अधिक शक्ती खर्च पडलेली आहे.

हे जे कोणी होते त्यांचे नक्की प्रोफेशन काय होते हा एक पडलेला प्रश्नच आहे..

स्कॉटच्या मोहीमेतील बहुतेक सर्वजण नेव्हीत होते. विल्सन शास्त्रज्ञ होता. अ‍ॅमंडसेनच्या तुकडीतही नेव्हीतील लोकांचा समावेश होता, परंतु अनेक नॅव्हीगेटर्स होते. जालांड स्कीईंग चॅंपीयन होता.