पावले माझ्यापरीने टाकतो आहे

Submitted by जयदीप. on 27 April, 2014 - 00:59

पावले माझ्यापरीने टाकतो आहे
अन् जगाला वाटते मी झिंगतो आहे

हरवलो आहे अता हे ही कळत नाही
आरशामध्ये कुणाला पाहतो आहे

मी जसा होतो तसा मी राहिलो आहे
रोज शून्याला जमाना भागतो आहे

सूर्यही थकला असावा तळपुनी आता
सावली थोडी स्वतःला मागतो आहे

तो जगाला झुकवतो शब्दांपुढे त्याच्या
का कळेना तो नळावर भांडतो आहे

राहुदे ओठांतले ओठांमधे आता
मी तुझ्या डोळ्यात सारे वाचतो आहे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users