योग आणि व्यसनाधीनता

Submitted by अतुल ठाकुर on 26 April, 2014 - 06:54

yoga_20110926.jpg

मुक्तांगणला गेल्यावर तेथे रुग्णमित्रांसाठी जो पस्तीस दिवसांचा उपचार चालतो त्यात योगाभ्यास हा एक महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे योग शिकवणार्‍या शिक्षकांना भेटणं ओघाने आलंच. मात्र ते शिक्षक महेंद्र कानिटकर आहेत हे माहित नव्हतं. माधव सरांनी माझी ओळख त्यांच्याशी करुन दिली. महेंद्र कानिटकर हे नाव कानावरुन गेलं होतं. पण ते विवाहसंस्थेच्या आणि त्याबाबतीतल्या समुपदेशनाच्या संदर्भात. उंचेपुरे असलेले महेंद्र सर मुक्तांगणला योग शिकवतात हे माहित नव्हतं. भेदक डोळ्यांनी त्यांनी टवकारुन माझ्याकडे पाहिलं. काही माणसे नजरेनेच बोलतात. आणि अशा नजरेसमोर आपण थापा ठोकु शकत नाही अशा तर्‍हेचे ते डोळे होते. महेंद्र सरांनी शांतपणे आपण नंतर भेटु असे सांगितले. मला वाटले हे आता कसले भेटताहेत. नेहेमीसारखंच हेही एक आश्वासन. पण आश्चर्य म्हणजे थोड्यावेळाने कामातुन मोकळे झाल्यावर महेंद्रसर स्वतः मला त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. बाहेर थोडा आवाज होता तेव्हा दार बंद करुन म्हणाले," आता निवांतपणे बोलु." आणि त्यानंतर एका अगदी वेगळ्या जगाची सफर महेंद्र सरांनी मला घडवली.

बरेचदा योगाच्या व्याख्यानांमध्ये डॉक्टरांना पाचारण केलं जातं. आणि दुर्दैवाने त्यातल्या फार क्वचित काही डॉक्टर हे योगाभासी असतात. किंवा जाणकार असतात. त्यामुळे बहुतेक योग माहित नसलेले डॉक्तर हे अंदाजा अंदाजानेच बोलत असतात. त्यामुळे त्यातुन काही ठाम निष्कर्ष काढणं हे कठीण जातं. योग हा विषय असा आहे कि त्याची नुसती माहिती असण्यात अर्थ नसतो. त्याचा अभ्यास आणि अनुभवही आवश्यक असतो. येथे महेंद्र सर मुक्तांगणमध्ये अनेक वर्षे शिकवत असल्याने ते सहजपणे बोलत होते आणि मी लागोपाठ प्रश्न विचारत होतो. सर्वसाधारणपणे योगोपचार हा शारिरीक मानसिक आजारांवर केला जातो. मात्र ते आजार कुठले? तर, हृदय विकारा पासुन ते संधीवाता पर्यंत आणि नैराश्यापासुन ते चिंताग्रस्ततेपर्यंत सर्वच समस्या त्यात आणल्या जातात. मात्र व्यसनावर उपचार म्हणुन योगाभ्यास वापरला गेल्याचं फारसं ऐकलं नव्हतं. त्याचा कशा तर्‍हेने वापर केला जातो हे माहित देखिल नव्हतं. त्यामुळे उत्सुकता होती. महेंद्र सरांनी या कामात स्वतःला पुर्णपणे झोकुन टाकलेलं दिसत होतं त्यामुळे त्यांच्या कडे माहितीचा खजिनाच होता.

सर्वप्रथम त्यांनी "योग" शब्दाचा अर्थ "जोडणे" असा असुन तो संस्कृतातल्या "युज" धातुवरुन आला आहे ते सांगितलं. ही माहिती मला नवीन नव्हती. योगाचा अध्यात्मिक दृष्टीने अभ्यास करणारी मंडळी आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचा संबंध येथे लावतात. मात्र महेंद्रसरांनी लावलेला अर्थ वेगळाच होता. त्यांचं म्हणणं असं होतं की येथे आम्ही मनाला शरीराशी जोडण्यासाठी योग शिकवतो. हे ऐकुन मी एकदम भूतकाळात गेलो. अनेक वर्षापूर्वी आम्हाला टंबे सर नावाचे गुरुजी दादरच्या हिंदु कॉलनीत योग शिकवत असत. सहा सव्वासहा फुट उंचीचे टेंबे सर नवीन विद्यार्थ्याला सांगत कि वय तरुण असताना शरीर आणि मनाचा सुसंवाद असतो. मन जे म्हणेल ते शरीर करु शकतं. मात्र जस जसं वय वाढत जातं तस तसं शरीर थकतं. मन मात्र तरुणच राहतं आणि मग मनाच्या मागण्या शरीर पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे शरीर - मनात विसंवाद निर्माण होतो. हा विसंवाद नाहीसा करण्यासाठी योग शिकायचा आहे. टेंबे सरांची सांगण्याची पद्धत अतिशय परिणामकारक असे. मात्र महेंद्र सर हे तत्त्व रुग्णमित्रांसाठी कशा तर्‍हेने वापरत आहेत हे अजुनही कळलं नव्हतं.

सर पुढे म्हणाले," दारुच्या व्यसनाने त्यांच्या प्राथमिकता बदललेल्या असतात. अर्थात दारु हिच प्राथमिकता झालेली असते. ती वारंवार प्यायल्याने आधी शरीर आणि हळुहळु मनावर तिने ताबा मिळवलेला असतो. आधी माणुस दारुला पितो. कालांतराने दारु माणसाला पिऊ लागते. दारुला प्राथमिकता दिल्याने आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी मागे पडलेल्या असतात. माणसाला कुटुंब, मुलेबाळे, आईवडील्,पत्नी, आपला व्यवसाय उद्योग यांची फिकिर राहात नाही. दारुने मनाचा ताबा घेतलेला असतो. अशा तर्‍हेने मन आणि शरीराचे को ऑर्डीनेशन नाहीसे झालेले असते. शरीराला त्रास होतो. तरीही मन दारुची मागणी करीत राहते. त्यामुळे आमच्या येथे मुक्तांगणमध्ये शरीर - मनाचा हा विसंवाद दुर करण्यासाठी योग शिकवला जातो." आता माझ्या डोक्यात नीट प्रकाश पडला. मुक्तांगणमध्ये दारुमुळे शरीर आणि मनात जो विसंवाद होतो त्याचा विचार केलेला होता. पुढे योगाच्या अनुषंगाने बरेच बोलणे झाले.

व्यसनाच्या काळात दारुने माणसाचा एवढा ताबा घेतलेला असतो की त्याला शरीराचा विचार करण्याची शुद्धच राहात नाही. व्यसनाच्या चरम अवस्थेत माणसे आजारी पडतात, डॉक्टरकडे जातात. उपचार घेतात. तेवढ्यापुरता दारुपासुन दुर राहतात. जरा बरं वाटलं कि पुन्हा प्यायला सुरुवात करतात. मुक्तांगण मध्ये मात्र यात खंड पडतो. तेथे येणार्‍या जाणार्‍याला नीट तपासले जाते. त्यामुळे चोरुन दारु आणण्याची सोय नाही. गेल्या काही वर्षांपासुन तंबाखुवर कडक बंदी आणल्याने, सिगारेट विडीवरच काय पण तंबाखुयुक्त टुथपेस्टवरसुद्धा तेथे बंदी आहे. त्यामुळे उपचारांच्या पस्तीस दिवसांच्या काळात रुग्णाला आत्मपरीक्षणाला पुरेसा वाव मिळतो. निदान आत्मपरीक्षणाची सवय जडते. आपल्या परंपरेत आसने करताना त्यात मनाचा सहभाग असणं अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. या मनाच्या सहभागासहीत आसने करताना हे रुगणमित्र आपल्या मनाच्या आणखि जवळ जातात. मनाच्या परीक्षणाला आणखि वाव मिळतो. मुक्तांगणचे उपचार सुरु असताना बरेचदा दुपारी मोकळा वेळ असतो. त्यावेळी यातली काही मंडळी वाचनालयात वेळ घालवतात. काहींना दैनंदिनी लिहिण्याची सवय मुक्तांगणमध्ये लागते.

एकुणच व्यसनाच्या काळात मनाने दारुची मागणी करायची आणि माणसाने ती पूर्ण करण्यासाठी कसलाही विचार न करता धडपड करायची अशी जी वागण्याची सवय रुग्णाला लागलेली असते त्यात योगामुळे खंड पडतो. त्या सवयीचे दगडाप्रमाणे कठोर झालेले संस्कार हळुहळु मृदु होऊ लागतात. कालांतराने रुग्णाला आपले भान येते. यामुळेच रोज सकाळी योगाभ्यास हा मुक्तांगणच्या जीवनपद्धतीतला अविभाज्य घटक झालेला आहे. आसने आणि प्राणायामाचे निरनिराळे प्रकार तेथे करुन घेतले जातात. मात्र आसनांची आणि प्राणायामाची निवड ही व्यसनकाळात शरीर आणि मनावर कशा तर्‍हेचे दुष्पारीणाम घडतात ते नजरेसमोर ठेऊन करण्यात आलेली असल्याने तेथे केला जाणारा अभ्यास हा रुग्णमित्रांसाठी "टेलरमेड" स्वरुपाचा आहे हा विशेष आवर्जुन नमुद करावासा वाटतो.

आपल्याकडे अध्यात्मिक परंपरेत एक गंमत आहे. आपण एका बाजुने "शरीरमाद्यं खलुधर्मसाधनं" असं म्हणतो. दुसर्‍या बाजुने निवृत्तीची प्रशंसा करुन शरीर तुच्छ देखिल मानतो आणि हठयोगासारख्या शरीर निरोगी राखण्यासाठी मदत करणार्‍या जीवनपद्धतीला कमी लेखतो. मुक्तांगणमध्ये योगाचा अंगिकार करताना भुमिका नि:संदिग्ध आहे. त्यांनी शीतली सारख्या प्राणायामाला स्विकारले आहे. कारण व्यसनामुळे रुग्णाच्या शरीरातील उष्णता वाढलेली असते. आणि शीतलीमुळे ती कमी होण्यास मदत होते. आसनांचेही तसेच. दारुचा यकृतावर परिणाम होत असल्याने त्यावर सकारात्मक परिणाम करणारी आसने. चेता संस्थेवर सकारात्मक परिणाम घडवणारी आसने. अशा तर्‍हेची निवड केली गेली आहे. महेंद्रसर बोलत होते आणि मी थक्क होऊन ऐकत होतो. मुक्तांगण हे व्यसनमुक्तीसाठी प्रसिद्ध आहेच. मात्र व्यसनमुक्तीच्या विविध पैलूंचा इतक्या बारकाईने विचार येथल्या लोकांनी केला आहे आपल्याला अवाकच व्हायला होतं. मुक्तांगण मध्ये गेल्यावर आता मी आश्चर्याचे धक्के पचवण्याची सवयच लावुन घेतली आहे इतके निरनिराळे चमत्कार येथे पाहायला मिळतात. महेंद्रसरांनी योगसंदर्भातल्या चमत्काराची ओळख त्यादिवशी करुन दिली होती.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुल ठाकूर,

लेख वाचनीय आहे. आवडला. वाढत्या वयाच्या पार्श्वभूमीवर शरीर आणि मन यांची सांगड घालण्याची कल्पना नव्याने समजली. धन्यवाद! Happy

असं म्हणतात की ईश्वरभक्ती, साधना, इत्यादिंची तारुण्यातच सवय लागणे आवश्यक असते. या केवळ म्हातारपणी करायच्या गोष्टी नाहीत. यामागील तत्त्वही शरीराने मनाचे ऐकावे हेच दिसते.

आ.न.,
-गा.पै.

सर्वांचे मनःपूर्वक आभार Happy

गापैजी तुमच्या प्रतिसादात नवीन मुद्दा आहे धन्यवादः) बेफीकिरजी धन्यवाद Happy

atishay mahiti purn lekh.....dhanyawad...
niyamit yoga karatech....pan yamule tyache mahatva adhikach patale....

उत्तम लेख.
आसनांचेही तसेच. दारुचा यकृतावर परिणाम होत असल्याने त्यावर सकारात्मक परिणाम करणारी आसने. चेता संस्थेवर सकारात्मक परिणाम घडवणारी आसने. अशा तर्‍हेची निवड केली गेली आहे.>>>>> यावर थोडी जास्ती माहिती वाचायला आवडेल. कोणत्या आसनांची निवड व्यसनाधीन लोकांसाठी केली आहे आणि त्याची कारणं

शूम्पी

साधारणपणे पोटावर भर देणारी आसने असतात. त्यांचा प्रभाव यकृतावर पडतो. त्यानंतर क्रमांक लागतो तो पाठीच्या कण्याला व्यायाम देणार्‍या आसनांचा. त्यासाठी मत्स्येंद्रासनासारखी पीळ देणारी आसने महत्वाची आहेत. शवासनासारखे विश्रामदायक आसन तर महत्वाचेच.

मात्र या आसनांची योजना जाणकाराकडुन करावी लागते. व्यसनाच्या काळात शरीराची अतिशय आबाळ झालेली असते. माणसे पडली झडलेली असतात. मधुमेह, यकृताचे निरनिराळे विकार, अशक्तपणा, मानसिक अस्थैर्य, पायांना सुज येणे यासारखे अनेक विकार व्यसनी व्यक्तींना असु शकतात. त्यामुळे या सार्‍या विकारांना लक्षात घेऊन त्यावर आसन प्राणायामाची योजना करण्यासाठी तज्ञ व्यक्तीची आवश्यकता असते.

योगासने नियमित करणारे लोक सहसा दारू वगैरेच्या व्यसनाकडे जाणारे नसतातच .जे व्यसनाधिन आहेत त्यांना दारू सोड सांगितल्यास उलट तेच आपल्याला मूर्खात काढतात .अरे तूने तो कभी पीहि नही ,तू क्या जाने -,दारू पिणे मर्दाचे लक्षण आहे इत्यादि 'चांगली' उदा०ऐकवतात .दारूचा मनावर ताबा पटले .पण जो कोणी व्यसनी म्हटतो "दारू सोडायला काय करू ?"त्याने नव्वद टक्के लढाई जिंकलेली असते .आता त्याचा मनावर ताबा मिळवण्याची धडपडच त्याचे दारूचे व्यसन सोडवते .त्यासाठी योगासनेच केली पाहिजेत असं नाही .बाकी दारूने भोके पडलेली लिवर केवळ योगाने पूर्ववत होणे हा भ्रम वाटतो .हा दावा पटत नाही .तुमचा योगाबद्दल आणि गुरुजींचा आदर याविषयी विरोध नाही .

छान लेख.
एक विनंति, निदान योग शिक्षंकाबाबत तरी सर हा शब्द न वापरता गुरु हा शब्द वापरावा. ( तसाही सर हा शब्द नावाच्या आधी वापरणे योग्य आहे, नंतर नाही जसे कि सर आयझॅक न्यूटन... न्यूटन सर नव्हे. )

अधिक माहितीबद्दल धन्यवाद !

बाकी दारूने भोके पडलेली लिवर केवळ योगाने पूर्ववत होणे हा भ्रम वाटतो .हा दावा पटत नाही>>> मला नाही वाटत वरच्या लेखामध्ये असा काही दावा केला आहे असं. असो.

Srd

आता त्याचा मनावर ताबा मिळवण्याची धडपडच त्याचे दारूचे व्यसन सोडवते .त्यासाठी योगासनेच केली पाहिजेत असं नाही .बाकी दारूने भोके पडलेली लिवर केवळ योगाने पूर्ववत होणे हा भ्रम वाटतो .हा दावा पटत नाही .

१. त्यासाठी योगासने केलीच पाहिजेत असं नाही

२. दारुने भोके पडलेली लिवर केवळ योगाने पूर्ववत होणे हा दावा पटत नाही.

हे दोन्ही दावे मी लेखात केलेले नाहीत. तुम्हाला जर माझ्या लिखाणातुन असं काही ध्वनित झाल्यासारखं वाटत असेल तर ते लिखाण सपशेल फसलेलं आहे असं समजुन मला गप्प बसावं लागेल. आपली प्रतिक्रिया काहीशी उतावळेपणाची वाटते आहे.

एक विनंति, निदान योग शिक्षंकाबाबत तरी सर हा शब्द न वापरता गुरु हा शब्द वापरावा. ( तसाही सर हा शब्द नावाच्या आधी वापरणे योग्य आहे, नंतर नाही जसे कि सर आयझॅक न्यूटन... न्यूटन सर नव्हे. )

दिनेशजी, लेख आवडल्याबद्दल धन्यवाद.

आपल्या भावना पोहोचल्या. मात्र एकुणच गुरु या प्रकाराबद्दल माझी मते अत्यंत कडवट आहेत. हे कळल्याने आपल्याला धक्का बसणार नाही अशी आशा आहे. माझी प्रकृती आणि प्रवृत्ती अध्यात्मिक नाही. कदाचित गतजन्मातील पापे अजुन सरली नसावीत. त्यामुळे त्यावाटेवर अजुन माझी निवड झालेली नाही.

या निरुपद्रवी धाग्यावर "गुरु कुणाला म्हणावे" यावर रणकंदन होऊन त्याचे मातेरे होऊ नये म्हणुन गुरु या विषयावर माझे मत सविस्तर लिहित नाही.

या निरुपद्रवी धाग्यावर "गुरु कुणाला म्हणावे" यावर रणकंदन होऊन त्याचे मातेरे होऊ नये म्हणुन गुरु या विषयावर माझे मत सविस्तर लिहित नाही.<<< Lol

मुक्तांगणमध्ये व्यसनाधीनता दुर होण्यासाठी केल्या जाणार्‍या अनेक उपायांमध्ये योगाचा देखिल अंगिकार केला गेलेला आहे. त्यासंदर्भात शरीर आणि मनाचा सुसंवाद कसा साधला जाईल त्यासाठी योगाचा उपयोग केला गेला आहे. हा लेखाचा आशय आहे.

योगाने व्यसनाधीनता पूर्णपणे नक्कीच दूर होत नसेल .पण अनेक उपायांपैकी तो एक उपाय आहे. इतर सुद्धा उपाय आहेतच. ते उपाय अंगिकारल्याने व्यसनावरती तुम्ही मात करू शकता एवढे मात्र नक्की. परत व्यसनी माणसाची स्वताची व्यसन सोडण्याची तीव्र ईछ्या ही पाहिजेच Happy

चांगली माहिती. धन्यवाद.

नावाआधी 'सर' लावतात ते knighthood मिळालेल्यांसाठी. बाकी सर हे लेखात वापरल्याप्रमाणे आदरवाचक संबोधनच आहे. असो.

लेख आवडला.
फोटो मध्ये कोणाचाही चेहरा दिसणार नाही ही घेतलेली काळजीपण आवडली.

सुजा बरोबर .अनेक उपायांपैकी एक ,शरीर आणि मन समन्वय वगैरे ठीक आहे . आणि ज्याने इतकी वर्षे पैसे ,आरोग्य आणि कौटुंबिक शांती दालूच्या ग्लासात डुबवली आहे त्याच्याकरता आणखी चार हजार "थोडाफार फरक पडला "म्हणण्यासाठी खर्च करायला तयार होणार ."लीवर डैमेज आहे ,इकडे योगाने काही उपाय होईल का ? "असे प्रश्नसुध्दा विचारले जात असतील .(टोकाची भुमिका)

आपण नेहमी गुरुजी म्हणायला सुरुवात करू त्या संबोधनाच्या महात्म्याने ते लोक त्यांचे आचरण ठेवू लागतील .महाप्रतापी मठाधिपतीँना लोक गुरू म्हणत नाहित तर बाबाजी म्हटतात आणि फक्त ते गुरूतल्या 'ग' पर्यँतच पोहोचलेले असतात .

Pages