कृपा अनंताची !.......हळुवारपणे काढला नागाच्या फणीवरील मणी !

Submitted by SureshShinde on 23 April, 2014 - 21:54

image_21.jpg
"जाने कैसे सपनेमे खो गयी अखियां,  मै तो हूं जागी, मेरी सो गयी अखियां"

जगप्रसिद्ध सतारवादक पं. रविशंकर यांनी संगीतबद्ध केलेले अनुराधा चित्रपटातील हे गीत कदाचित आपणही गुणगुणला असाल ! 
कधीकधी डॉक्टरांना मात्र काही पेशंटकडून ही अशीच विचित्र तक्रार ऐकावी लागते आणि त्या तक्रारीमागे दडू शकलेला असतो एखादा जीवघेणा आजार!
 काही दिवसांपूर्वी अशीच तक्रार घेवून श्री अनंतराव गायकवाड माझ्या क्लिनिकमध्ये आले होते. सुमारे पंचेचाळीस वर्षांचे अनंतराव लेखनिकाची नोकरी करीत असत. जरी त्यांची आई माझीच पेशंट असली तरी स्वतःला मात्र  कोठलीही शारीरिक व्याधी नसल्यामुळे पेशंट या नात्याने ते माझ्याकडे प्रथमच आले होते.  
"सर, आजकाल दिवसभर काम करून संध्याकाळी जेव्हा मी घरी येतो तेव्हा मी खूपच दमून जातो. सायंकाळी जेवताना पहिली चपाती मी व्यवस्थित खावू शकतो.  पण त्यानंतर दुसरी चपाती खाताना मात्र माझा घास तोंडातच फिरतो. मला घास चावताच येत नाही.  माझे जबड्याचे स्नायू इतके दमतात की मला तोंडाची उघडझाप मुळीच करता येत नाही.   थोडा वेळ विश्रांतीनंतर मात्र मी पुन्हा चावू शकतो पण काही घासांनंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या ! पुन्हा माझे स्नायू माझ्याशी असहकार पुकारतात. काही वेळी मी घास गीळूदेखील शकत नाही. काही वेळी माझ्या सौं. ना माझा आवाजही काहींसा खोल गेल्यासारखा वाटतो.” 
"हे असे किती दिवसांपासून होते आहे?" मी.
"हा प्रकार गेले चारपाच आठवड्यांपासून चालला आहे. मी सुरुवातीस अशक्तपणामुळे असे होत असेल असे समजून  त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते पण हळूहळू त्याचे प्रमाण वाढतच चालले आहे, असे वाटल्यामुळे आपला सल्ला घेण्यासाठी आलो आहे.”
अनंतराव त्यांच्या या तक्रारी सांगत असताना मी मात्र त्यांच्या चेहेऱ्याच्या हालचालींचे बारकाईने निरीक्षण करीत होतो. 
"अनंतराव, तुमच्या पापण्या एखाद्या झोपाळू माणसाप्रमाणे अर्धवट मिटल्यासारख्या दिसत आहेत, हे तुमच्या अथवा घरातील दुसऱ्या कोणाच्या लक्ष्यात आले आहे का?"
"नाही, मला तसे कधी जाणवले नाही"
इतका वेळ शांत बसलेल्या सौप्रथमच अनंतरावांनी आमच्या संभाषणामध्ये भाग घेतला.
"डॉक्टर, तुम्ही म्हणता तसा बदल मला आजकाल लक्षात येवू लागला आहे.   यांच्या पापण्या कधीकधी एखाद्या पेंगणाऱ्या माणसाप्रमाणे अर्धवट मिटलेल्या असतात तर कधीकधी त्या एकदमच नॉर्मल असतात. अर्थात हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते याची मला काहीच माहिती नव्हती. संध्याकाळी बोलत असताना त्यांचा आवाज हळूहळू लहान होत जातो व थोड्या वेळाने तो पुन्हा पूर्ववत होतो, हे ही माझ्या लक्षात आले आहे.  कदाचित या तक्रारींचा या खाण्याच्या तक्रारीशी काही संबंध असू शकेल काय? " 
"अगदी बरोबर, ताईसाहेब, तुमच्या निरीक्षणशक्तीचे  खरोखरच कौतुक करावयास हवे."  अनंतरावांना तपासतानाच मी त्यांच्या सौं.शी बोलत होतो. 
"अनंतराव, तुमचे स्नायू इतर सामान्य माणसापेक्षा लवकर थकतात असे मला वाटते. आपण एक छोटीशी टेस्ट करून पाहू या. आपले डोळे बंद करणाऱ्या स्नायूंच्या कार्यक्षमतेविषयी आपण तपासणी करणार आहोत. आता मी सांगितल्यानंतर तुम्ही दोन्ही डोळे अगदी घट्ट मिटून घ्या. मी तुमचे डोळे माझ्या हातांनी उघडण्याचा  प्रयत्न करणार आहे.तुम्ही तुमचे डोळे घट्ट मिटून ठेवा व मला तुमचे डोळे उघडू देवू नका."
अनंतरावांनी मी सांगितल्या बरहुकूम डोळे घट्ट बंद करून ठेवले व मी खूप जोर लावूनही ते उघडू शकलो नाही. 
"शाब्बास,  तुमच्या डोळ्यांच्या स्नायूंची  सुरुवातीची शक्ती अगदी नॉर्मल आहे. आता तुम्ही एक मिनिटभर तुमचे दोन्ही डोळे पुन्हा घट्ट बंद करून ठेवणार आहात.  एक मिनिटभर डोळे घट्ट बंद करण्याचे काम केल्यानंतर मी पुन्हा एकदा तुमच्या डोळ्यांच्या स्नायूची शक्ती तपासून पाहणार आहे.”
माझ्या सूचना व्यवस्थितपणे समजून घेवून अनंतरावांनी बरोबर एक मिनिट डोळे घट्ट मिटून ठेवले. त्यानंतर लगेचच मी पुन्हा त्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला  आणि काय आश्चर्य ! त्यांच्या डोळ्याचे स्नायू इतके दुर्बल झाले होते कि मी ते अगदी सहजपणे उघडू शकत होतो.
अनंतरावांना स्नायू अशक्त होण्याचा एक विशिष्ट आजार असण्याचे प्राथमिक अनुमान मी आत्तापर्यंत काढले होते. ही  या आजाराची प्राथमिक अवस्था असल्यामुळे त्यांना इतर काही लक्षणे अजून तरी दिसत  नव्हती.  डोळ्यांची हालचाल करणारे स्नायू कमजोर झाल्यामुळे डोळ्यांमधील सहकार्य बिघडून एकाऐवजी दोन प्रतिमा दिसणे,  अन्ननालिकेचे स्नायू दुबळे झाल्यामुळे गिळताना त्रास होणे, चालल्यानंतर पायांतली शक्ती कमी होणे, श्वासपटल दुबळे झाल्यामुळे श्वासाला त्रास होणे इत्यादी गंभीर लक्षणे अजून तरी दिसत नव्हती.
पेशंटची शारीरिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर, मी त्या दोघांशी बोलत होतो, " हे पहा, अनंतराव,  तुम्हाला एक आजार झालेला दिसतो आहे व त्याचे नाव आहे – "स्नायू दौर्बल्य "! इंग्रजीमध्ये त्याला 'मायस्थेनिया ग्राव्हीस' किंवा 'एम जी' असे म्हणतात.  अर्थात या आजाराचे नेमके व नक्की निदान होण्यासाठी आणखी काही चाचण्या करणे आवश्यक आहे.”
या विचित्र आजाराविषयीचे माझे वक्तव्य ऐकून गायकवाड पतीपत्नी अतिशय चिंतीत झाले होते. एक चांगले निदान केल्याचा आनंद , गायकवाड कुटुंबीयांवर अचानक  कोसळलेल्या या प्रसंगामुळे केव्हांच विरून गेला होता.
" डॉक्टर, आम्ही दोघेही या आजारामुळे अगदीच घाबरून गेलो आहोत.  आम्हाला थोडी आणखी माहिती दिलीत तर फार बरे होईल."
"हा आजार समजण्यासाठी आपल्याला शरीरशास्त्राची थोडीशी माहिती करून घ्यावी लागेल.  निसर्गाने आपल्या शरीरामध्ये हालचाल होण्यासाठी स्नायू पेशींची योजना केली आहे. या स्नायूपेशी आपल्या इच्छेप्रमाणे हालचाल करतात म्हणजेच आपले स्नायू आपल्या मेंदूच्या नियंत्रणाखाली असतात.  मेंदूमधील चेतापेशी केंद्रामध्ये निर्माण झालेली  'हालचाल करा' अशी आज्ञा योग्य त्या स्नायुंपर्यंत पोहोन्चविण्याचे काम 'नर्व्हस' किंवा 'नसा' करतात.  आज्ञावाहक चेतातन्तुन्द्वारे ही आज्ञा 'विद्युत लहरींच्या' स्वरूपामध्ये स्नायुपेशीपर्यंत पोहोंचते. चेतातंतू आणि स्नायूपेशी या  भिन्न प्रकारच्या पेशी असून त्या एका विशिष्ठ ठिकाणी एकमेकांना जोडलेल्या असतात. या भागास आपण 'संदेश संक्रमण केंद्र' म्हणू या. विद्युत लहरी हे केंद्र ओलांडू शकत नाहीत. म्हणून  संदेश वहनासाठी या केंद्रामध्ये  'अॅसीटीलकोलीन'  नावाच्या एका रासायनिक रेणूची मदत घेतली जाते. अनेक आजारांमध्ये हे संदेश संक्रमण केंद्र निकामी होते. नाग या जातीचा सर्प चावल्यामुळे होणारी विषबाधा,  शिळे व बोटुलीनम जन्तुसंसर्गीत अन्न-विषबाधा, ढेकूण मारण्याच्या अथवा शेतीमधील किटकनाशकांमुळे उद्भवणारी विषबाधा यामुळेदेखील स्नायूंची शक्ती कमी होते.  मायेस्थेनिया या आजारामध्ये शरीरामध्ये काही विघातक प्रथिने म्हणजेच एंॅयार होतात व त्या प्रथिनांमुळे हे संक्रमण केंद्र अशक्त होते.  त्यामुळे मेंदूमधून आलेला संदेश स्नायुंपर्यंत पोहोंचत नाही. थोड्या विश्रांतीनंतर हे दुबळे संक्रमण केंद्र पुन्हा कार्यरत होते आणि  अशाप्रकारे उद्भवतो  'मायस्थेनिया'! "
"पण डॉक्टर, या आजारावर काही इलाज आहे की नाही?" अनंतरावांच्या पत्नीने अतिशय चिंताक्रांत सुरात विचारले.
"होय,  या आजारावर अनेक उत्तम उपाय उपलब्ध आहेत.  काही औषधांमुळे या संक्रमण केंद्रामधील अॅसीटिल्कोलीनचे प्रमाण वाढविता येते. स्टेरोईड नावाच्या औषधांमुळे या संक्रमण केंद्रावर होणारा प्रथिनांचा हल्ला परतवता येतो.  दुसऱ्या काही औषधांमुळे ज्या पेशीमध्ये हे विघातक प्रथिने तयार होतात त्या पेशींची वाढ थोपविता येते.  बऱ्याच रुग्णांमध्ये छातीमध्ये असलेल्या थायमस नावाच्या ग्रंथीमध्ये एक 'ट्युमर' तयार होवून त्यातील पेशी हे विघातक प्रथिने तयार करीत असतात. हे ट्युमर शोधून जर शस्त्रक्रियेद्वारे ते काढून टाकले तर मायस्थेनिया हा आजार कायमचा बरा होवू शकतो. म्हणून आता जास्त काळजी न करता पुढील तपासण्या करून आपले निदान प्रथम पक्के करू या."
मी त्यांना एवढे समजावून सांगितल्यामुळे त्यांच्या मनावरील दडपण बरेच कमी झाले असावे.
"या काही प्राथमिक तपासण्या व छातीचा एक्स-रे करून मला उद्या पुन्हा भेटा. तसेच या दोन खास तपासण्यादेखील कराव्या लागतील. पहिली तपासणी म्हणजे रक्तामध्ये मी सांगितलेले विघातक प्रथिन अर्थात 'ए. सी.एच.आर.एंॅटीबॉंडी' आहे काय व असल्यास तिचे प्रमाण किती आहे ही आहे. दुसऱ्या तपासणीमध्ये तुमच्या स्नायूंची कार्यक्षमता विद्युत लहरींद्वारे मोजली जाते.  या तपासणीस  'ई.एम.जी.' असे म्हणतात. या सर्व तपासण्यांचा अहवाल मिळाल्यानंतर आपल्याला पुढील इलाज सुरु करता येईल." तपासण्यांसाठी आवश्यक कागदपत्र व पत्ते बरोबर घेवून गायकवाड पतीपत्नी चिंताक्रांत चेहेऱ्याने बाहेर पडले.
काही वर्षांपूर्वी बॉलीवूडमधील एका सुप्रसिध्द ‘ करोडपती’ हस्तीला या आजाराचे निदान झाल्यामुळे मायेस्थेनिया हा आजार प्रसिध्दिझोतामध्ये  आला होता. मायेस्थेनिया हा जरी तसा क्वचित आढळणारा आजार असला तरी गेल्या पस्तीस वर्षांमध्ये मी बऱ्याच रुग्णांमध्ये या आजाराचे निदान केले होते. त्यातील अनेक जण पूर्ण बरे ही झाले होते.  काही रुग्णांमध्ये 'थायमोमा' नावाचा ट्युमर सापडला होता व शस्त्रक्रिया करून तो काढल्यानंतर त्यांच्या तक्रारी पूर्णपणे नाहीशा झाल्या होत्या.  एकदोन रुग्णांना या ट्युमरचे कॅन्सरमध्ये रुपांतर झाल्यामुळे मात्र या आजारामुळे प्राण गमवावे लागले होते. वैद्यकीय ललितसाहित्य व संदर्भ यांचा परामर्ष घेतल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे या आजाराचे जेवढे लवकर निदान होईल तेवढीच उपाययोजना देखील जास्त परिणामकारी ठरते.  जर मेंदूला माहिती नसेल तर डोळ्यांना दिसणार नाही अशा अर्थाची एक म्हण इंग्रजीमध्ये प्रसिध्द आहे, त्याप्रमाणे जर तुमच्या डॉक्टरांना ह्या आजाराविषयी माहिती नसेल तर त्या रुग्णाला निदान होण्यासाठी योग्य वेळेची वाट पहावी लागते.  नवनवीन औषधे व दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रियेचे तंत्र यामुळे आजकाल मायेस्थेनिया रुग्ण सहसा दगावत नाही. 
दोन-तीन दिवसांनतर अनंतराव सर्व रिपोर्ट्स घेवून पुन्हा माझ्या क्लिनिकमध्ये आले. माझे निदान बरोबर होते. अनंतरावांच्या तपासण्यांचे सर्व निष्कर्ष त्यांना मायस्थेनिया हा आजार असल्याचे स्पष्ट दाखवीत होते. विघातक प्रथिनाचे प्रमाण खूपच वाढल्याचे दिसत होते. ई एम जी च्या रिपोर्टमध्ये त्यांचे स्नायू अतिशय लवकर फटिग होत असल्याचे दिसत होते. 

"अनंतराव, या सर्व रिपोर्ट्स वरून तुम्हाला मायस्थेनिया हा आजार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे निदान नक्की करण्यासाठी नेओस्टिग्मिन टेस्ट नावाची एक तपासणी करावी लागते. परंतु आपले रिपोर्ट्स इतके स्पष्ट आहेत कि आपण ताबडतोब औषधोपचार सुरु करू या. तुमच्या छातीचा एकस-रे जरी नॉर्मल दिसत असला तरी आपल्या छातीमध्ये  'थायमोमा' नावाचे ट्युमर  नाही याची नक्की खात्री करण्यासाठी आपल्याला छातीची 'सी.टी. स्कॅन' नावाची एक तपासणी करणे आवश्यक आहे."

दुसया दिवशी दुपारी मी क्लिनिकचे काम सुरु करण्याच्या आधीच सी-टी स्कॅनचा रिपोर्टसह  गायकवाड-द्वय माझी वाटच पाहत थांबले होते.  

"डॉक्टर, तुमच्या औषधाने कमालच केली. अनेक दिवसांनतर प्रथमच काल व आज मी एका दमात पोटभर जेवण जेवू शकलो. पण आता या स्कॅन च्या रिपोर्टचे नवीनच टेन्शन निर्माण झाले आहे." 

एखाद्या अधाशी मुलाप्रमाणे मी तो रिपोर्ट त्यांच्या हातातून जवळजवळ हिसकावूनच घेतला. 
 
"गायकवाड, तुमच्यासाठी एक वाईट तर एक आनंदाची बातमी आहे. तुमच्या छातीमध्ये हृदयाच्या वरील भागामध्ये मुख्य रोहिणीच्या शेजारी एक लिंबाच्या आकाराएवढे ट्युमर आहे. आनंदाची गोष्ट अशी की त्याच्या आकारावरून त्यात कॅन्सर हा आजार असण्याची शक्यता दिसत नाही. हे ट्युमर जर शस्त्रक्रियेने काढून टाकले तर तुमचा 'मायेस्थेनिया' कायमचा बरा होण्याची शक्यता आहे. माझे मित्र, जागतिक कीर्तीचे सर्जन डॉ. शशांक शहा यांनी अशा प्रकारची अनेक ऑपरेशन्स यशस्वीपणे व तीही दुर्बिणीद्वारे केली आहेत. आपण त्यांची वेळ ठरवून त्यांचा सल्ला  घ्यावा असे मी सुचवितो."

पुढील दोन आठवड्यांनंतर डॉ. शहांनी अनंतरावांची सर्जरी केली.  तेंव्हा डॉ. शहा मला फोनवर म्हणाले, " सर, ही सर्जरी खूपच कठीण होती. हृदय आणि महारोहीणीचे सतत स्पंदन आणि त्यातच पसरलेले थायमस ग्लॅंडचे ट्युमर पाहून मला तर परीकथेमधील आपल्या फण्यावर मणि धारण करणाय्रा नागाचीच आठवण झाली. दुर्बिणीमधून ही शस्त्रक्रिया करणे अतिशय अवधड होते पण नशिबाने हात दिल्यामुळेच काहीही अनुचित प्रसंग उद्भवला नाही.  ते ट्युमर मी संपूर्ण स्वरूपात काढून टाकले आहे व तो नमुना हिस्टोपॅथॉलॉजी तपासणीसाठी पाठविला आहे. या तांत्रिकदृष्टीने कठीण अशा रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची संधी दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!" 
अनंतरावांच्या ट्युमर मध्ये कॅन्सरची लक्षणे आढळून आली नसल्याने ते या विचित्र आजारामधून संपूर्णपणे मुक्त झाले होते.  

अनंतरावांच्या आरोग्याची गाडी आता पुन्हा रुळावर आली आहे. हळूहळू त्यांची औषधेही कमी झाली आहेत. मात्र  भारावलेल्या पापण्यांनी देवाची दैनंदिन पूजा करताना हे सर्व श्रेय 'त्या अनंतालाच' याची आठवण श्री व सौ गायकवाड विसरू शकत नाहीत !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं!
माझ्याकडे आत्तापर्यंत फक्तं एकच मायस्थेनिया आली आहे.
तिची पण अशीच विस्मयकारक कहाणी आहे.
आमच्या गावात तोपर्यंत कुणीच पायरिडोस्टिग्मिन वापरले नव्हते इतकेच काय पण जवळचं शहर असणार्या हैद्राबादेतही त्यावेळी मिळाले नव्हते. माझ्या परिचितांतील एकीने मुंबईहून स्टॉक पाठवेपर्यंत मी त्या पेशंटला निओस्टिस्मिन इंजेक्शनांवर तगवून ठेवले होते.
त्यावेळी (५ वर्षांपूर्वी) आमच्या पूर्ण जिल्ह्यात एकही वेंटिलेटर उपलब्ध नव्हता.
सुदैवाने या पेशंटला तात्पुरत्या स्वरूपाचा आजार असल्याने ती बरी होऊन आता मुले बाळेही आहेत.

तिला आम्ही मजेने ' लेडी अमिताभ ' म्हणतो.
पार तिरूपतीहून ती मला भेटायला येते.
तिचा नवरा जो अजिबात कन्नड बोलू शकत नाही त्याने 'तिरूपतीहून तुम्ही मला वंदनीय' इतक्या अर्थाचं कानडी बोलायला शिकून घेतलंय. Wink

माझी अत्यंत लाडकी पेशंट आहे.

वैद्यकिय क्श्तेत्रात काय कमालीचे अनुभव येत आहे आपल्याला ...आणी आप्ल्या लेखन शैली मुळे आम्हालाही त्यातील कळु लागले आहे .

Interesting

>>>> बरीच नवनवीन माहिती ती ही रंजक शैलीत मिळते तुमच्यामुळे.
असेच लिहित रहा. <<<<
अनुमोदन Happy छान माहिती

कायहो डॉक्टर? तुमचे हे लेख जसेच्या तसे कॉपी करुन तुमचे नाव/लिन्क वगैरे देऊन माझ्या फेसबुक अकाऊण्टवर पेस्ट करु का?

नेहमीप्रमाणेच उत्कंठावर्धक!
साती, तुमचे अनुभव पण छान आहेत. जरा खुलवून लिहित चला की, सुरेशकाकांसारखे Happy

माझी अत्यंत लाडकी पेशंट आहे.>>> सातीअम्मा, ह्ये अस नुसतं ट्रेलर नका दाखवु.
फुल पिक्चर लावा की. Happy

डॉक्टर, वेगवेगळ्या आजारांबद्दल तुम्ही आम्हा वाचकांचे जे व्यवस्थितरित्या प्रबोधन करत आहात त्याला तोड नाही. धन्यवाद.

डॉक्टर, वेगवेगळ्या आजारांबद्दल तुम्ही आम्हा वाचकांचे जे व्यवस्थितरित्या प्रबोधन करत आहात त्याला तोड नाही. धन्यवाद. >>>> +१०० ....

शॉल्लेट....
डॉक्टर साहेब, या सर्व अनुभवांचे एकत्रीत पुस्तक काढा ना. एकाहून एक अफाट अनुभव आहे. _/\_

डॉक्टरसाहेब,

खाण्याचे स्नायू थकतात म्हणजे जबरदस्त आजार झाला की! या आजाराचा वजन कमी करायला उपयोग होईल का? Lol

विनोदाचा भाग सोडला तर एक प्रश्न आहे. हा आजार हृदयापर्यंत पोहोचला तर प्राणावर बेतू शकते का? होकारार्थी उत्तर असल्यास तो आजार हृदयाकडेच आधी पोहोचायला हवा होता ना? गाठ हृदयाजवळ होती म्हणून मनी शंका आली.

आ.न.,
-गा.पै.

Pages