येक ब्येणं…. गण्या…।

Submitted by चेतन.. on 23 April, 2014 - 05:06

वेडीच माणसं इतिहास घडवतात… इतिहास घडतो तो वेड्याच माणसांकडून.…. इतिहास जर घडवायचा असेल तर कुठलं ना कुठलं वेड हे रक्तात मुरवून घ्यावंच लागतं.… वगैरे वगैरे विधानं वक्तृत्व स्पर्धेतून हमखास उच्चारली जातात. अगदी तारस्वरात जर ही विधानं केली गेली तर हमखास टाळ्या पण मिळतात. आणि कदाचित बक्षीसं पण मिळतं. पण दैनंदिन जीवन जगताना आपण जी वेडी माणसं बघतो, ती सगळीच काही इतिहास घडवत नाहीत. हां… तसं पहायला गेलं तर प्रत्येकच माणूस इतिहास घडवत असतो पण त्याची दखल इतरांनी घ्यावी अशी व्यक्तिमत्वं थोडीच. मुळात इतिहास बितिहास गेला खड्ड्यात मला जसं जगायचंय तसंच मी जगणार.… अशीच काही मंडळी असतात, त्यापैकी आमचा गण्या. मुळात ह्याचाही इतिहास कच्चाच होता. आमच्या वर्गातलं प्रॉपर ब्येणं.…

बार्शीच्या सुलाखे हायस्कूलमध्ये शिकत असताना सातवीमधून आठवीत जेंव्हा गेलो तेंव्हा मी संस्कृत विषय घेतल्याने माझी तुकडी बदलली आणि मी "फ" तुकडीत गेलो. "फ" तुकडीचं एकंदरीत स्वरूप हे अगदी प्रॉपर "फ" तुकडीला साजेसंच होतं. म्हणजे जर चुकुन सरांनी काही प्रश्न विचारला तर पुस्तकातलं उत्तर यायचे चान्सेस कमीच….
....
एकदा विज्ञानाचा तास सुरु होता आणि आमचे सर पदार्थांच्या अवस्था शिकवत होते.
"मुलांनो कोणत्याही पदार्थांच्या तीन अवस्था असतात." मागच्या बाकावर काही जणांचं लक्ष नव्हतं. आता मागचा बाक …. कसं लक्ष असणार.… सरांनी खडू फेकून मागे विचारलं…
"किती असतात??"
"बर्य्याच सर…." त्यांपैकी कोणीतरी पचकलं. आणि वर्गात खसखस पिकली,
"उठा…. कोण आहेत महाशय??"
चाचरत चाचरत एक जण उठला.
"वेदपाठकांचाच ना रे तू?"
"हो..."
"बोल काय बर्याच असतात…?" वर्गात पुन्हा खसखस.
"मला… वाटलं… " तेव्हढ्यात त्याच्या शेजारच्यानं त्याला एका कागदावर सरांनी विचारलेला प्रश्न आणि उत्तर दोन्ही लिहून दिलं .
"सर… कोणत्याही पदार्थाच्या तीन अवस्था असतात… द्रव, स्थायू आणि वायू."
"शाब्बास… पण मी तर पुढचं काहीच शिकवलं नव्हतं."
"पण मला माहित होतं सर.... " आता सरांसहित सगळा वर्ग हसला.
"ठीके … आता मला स्थायुस्थित द्रव आणि द्रवस्थित स्थायुचे उदाहरण सांग... "
पोरानं एकही मिनिटाचाही विलंब नं लावता उत्तर दिला.
"सोप्पं आहे सर… दुधात दही आणि दह्यात दूध. "
आणि नंतर जो काही हशा पिकला त्यात पुढच्या तासाचा टोल कधी पडला ते काही कळलं नाही.
…… तर अशी ही आमची ही "फ" तुकडी.

संपूर्ण शाळेत सगळ्यात जास्त गोंधळ जर कोणत्या वर्गात असतो तर "फ"च. माईक वरून काही घोषणा चालू असेल आणि जर कोणत्या वर्गातून आवाज येत असेल तर, घोषणा देणारे सर नेहमी म्हणायचे. "फ" वाले शांत बसा. एकदा तर आमच्या वर्गशिक्षकांना जाउन सांगावं लागलं होतं कि "फ" शांत आहे आवाज दुसर्या वर्गातून येतोय…… नंतर वर्ग बदलत गेले पण तुकडी "फ"च राहिली… आणि ह्या "फ"तुकडीचा खंदा शिलेदार म्हणजे 'गणेश पाटील उर्फ गण्या''…।

माझी उंची तशी बर्यापैकी (म्हणजे वर्गातल्या इतरांच्या तुलनेत) असल्याने माझी रवानगी शेवटून दुसर्या बाकावर झाली. अस्मादिक तेंव्हा अगदी म्हणजे अगदीच शेळपट होते. अगदी मुंडी खाली घालून आमचे चंबुगबाळे उचलून आम्ही त्या बाकावर जाऊन बसलो. मागून कोणाचीतरी सतत टिंगल टवाळी चालूच होती. मारामारी चालू होती. तेव्हढ्यात कोणीतरी कोणालातरी एक कागदाचा बोला फेकून मारला आणि त्याचा नेम चुकून तो मला लागला. मी काहीच बोललो नाही. आणि तसा काही बोलूनही फायदा नव्हता. तेव्हढ्यात कोणीतरी ओरडलं….
"ए ए ए ए … शांत बसा बे लेकाच्यांनो…. करप्या जामून आलाय... "

आमच्या शाळेतले महाजन सर…. रंग सावळा कम काळा असल्यासारखा. डोकं तसं बर्यापैकी उजाडलेलं. आणि त्यांच्या टकलावर कसलेतरी काळे डाग होते… आणि एकंदरच त्यांच्या डोक्यावरून अख्खी शाळा त्यांना करपलेला जामूनच म्हणायची. प्रचंड कडक असामी होती… आणि मारण्यात तर कोणीच हात धरायचा नाही. मुळात तशी हिम्मतही कोणी दाखवायचं नाही….

प्रचंड चिडलेल्या अवतारात सर वर्गात आले. आणि त्यांच्या सोबत आमच्याच वर्गातली सकीना रडत आत आली.
"घातलीच शेवटी… सांगत होतो"
माझ्यामागून काही आवाज कुजबुजले…
"कोणी केलंय हे??"
कोणीच काही बोललं नाही…
झालं होतं असं …. आमच्यावर्गातले एक महाशय ह्या सकीनावर प्रेम करत होते थोडक्यात लाइन मारत होते. आणि ती मुलगी त्या महाशयांना भीकसुद्धा घालत नव्हती. त्याच उच्च कोटीच्या प्रेमासक्तीतून त्यांनी वर्गातल्या फळ्यावर एक गाणं लिहिलं होतं
"कब तक रुठेगी …चीखेगी… चिल्लायेगी….
… दिल केहता है इक दिन सकीना मान जायेगी…. सकीना मान जायेगी"
आणि म्हणून हे सगळं रामायण घडत होते…
"कोणी हात वर करतंय…. का मी करायला लावू???"
तरीही कोणी काही बोलायला तयार होईना…
"गण्याSSSS…."
सगळ्यांच्या माना मागे गेल्या…
सगळ्या वर्गावर नजर टाकत आणि आपली टपोरी कॉलर खाली करत गण्या उठला… ह्या गण्याचा अवतार ठरलेला असायचा. पायात पॅरेगॉनचीच चप्पल… अंगात शाळेचा थोडास्सा कळकट असा शर्ट …. मार खाऊनही कधीही इनशर्ट नसायचा.... डोळ्यावरचा चष्मा पार नाकाच्या टोकापर्यंत आलेला. वेड्यासारखा.... खूप विचारात असो किंवा खूप मजेत असो किंवा खूप टेन्शन मध्ये असो… तोंडाचा चंबू कायम.… तर साहेब उठले.
"का केलंस?… बोल…"
"ना… य…. स …. र …. म्या …. कसाला?"
"गप…. तुझी नाटकं आता घरी सांगायलाच पाहिजेत…. आतातर मुलींनापण छेडायला लागलास??" सर आवाज वाढवत म्हणाले…
"ओ सर …. कायबी…… बोलू…… नगा… म्या नाय केलं…."
"मग कोणी केलंय??"
"नाय माहित…"
"मग कोणाला माहीत?"
"ते बी…. नाय…. माहित"
"उलटं आणि मला?" सर तावातावानं आले आणि त्याच्या कॉलरला धरत वर्गासमोर आणलं… आणि खाडकन एक वाजवली. गण्या ठेचकाळल्यासारखा कोपर्यात गेला. अख्खा वर्ग स्तब्ध आणि मुलींच्या बाजूनं स्स्स असा ऑम्लेट करताना जसा आवाज येतो तसा आला. आणि सकीना अगदी गोठल्यासारखी उभी राहिली….
सर आणखी अजून एक वाजवणार तेव्हढ्यात ती म्हणाली… "सर मला नाही वाटत गणेश नं केलं असेल..."
"मग??" सर आणखी चिडून बोलले.
"नाही जाऊ द्या…. मला काही नाही म्हणायचं त्यावर…"
"काय जाऊ द्यायचं?? आज तू आहेस … उद्या दुसरं कोणीतरी असेल…"
सार्या वर्गाला उद्देशून आणि शेवटच्या बाकाकडे बोट रोखून सर म्हणाले, "संध्याकाळ पर्यंत जर मला नाव कळालं नाही तर… शेवटचा बाकडा…. लक्षात ठेवा…"
गण्या कोपर्यात उभा होता. सर बाहेर जाताच गाल चोळत म्हणाला…
"मार खाउन खाउन... घट्टं पडलीत घट्टं…. असा नाय बोलणार... "
मागे बाकावर बसताना ते महाशय उठत उठत गण्याला म्हणाले …
"च्यायला गण्या… माझ्यामुळं मार खाल्लास … जातो अन सांगतो जाम्न्याला … मीच केलंय म्हणून"
"येड्या भोकाचा हैस?? संध्याकाळी कोण कुणाला बोलवंत नसतंय… बस … " त्याचा हात धरून त्याला गण्यानं खाली बसवलं. खरंतर सारं माहित असून काहीच माहित नसल्याची अ‍ॅक्टिंग केल्याबद्दल त्याला ऑस्करच द्यायला हवा असं मला तेंव्हा अगदी मनापासून वाटलं....

ज्याप्रमाणे गावात एखादा गुन्हा घडल्यावर कोणी काही नं सांगता पारध्याच्या वस्तीवर पोलिसांची धाड पडतेच. आणि काही जणांना पोलिस पकडतातच. आणि त्यांची चूक असो वा नसो त्यांना मार बसतोच. तसा गण्या होता. मुळात त्यानं कधी कोणाला त्रास दिलाय किंवा कधी कोणाच्या भांडणात तो आलाय असं कधीच झालं नाही. मुळात ही गोष्ट सगळ्यांना माहित होतीच. पण ज्या मुलांमध्ये तो असायचा ती तशाप्रकारची असल्याने त्याच्या पदरात ते पडायचं आणि तो ही त्याबद्दल कधी तक्रार करायचा नाही. आणि कदाचित ह्यामुळेच त्याचा मित्रपरिवार फार मोठा असायचा.

अभ्यासात अगदीच म्हणजे अगदीच जेमतेम किंवा त्याच्या ही खाली असणारा गण्या इतर बाबतीत फार चलाख. आणि सर्वात म्हणजे काहीही करायला एका पायावर तयार. खेळाचा विषय काढायचा अवकाश… साहेब अनवाणी पायांनी पण फुटबॉल खेळायला तयार असायचे. तो फुटबॉल म्हणजे आपण खेळतो तसा नाही तर क्रिकेटचाच बॉल.. गण्या तुफान खेळायचा.... शाळेत यायला उशीर झाला आणि कारण विचारलं तर ह्याचं उत्तर ठरलेलं… "काय करणार सर …. आता रस्त्यात जर कोन भेटलं तर नं बोलता कसं निघायचं?? " अर्थात नंतर वर्गाबाहेर ह्याचा कोंबडा व्हायचा ते सांगणे न लगे.....

शाळा सुटल्यावर आमच्या गावाबाहेरच्या कॉमर्स कॉलेजवर कट्टा भरायचा. मी फारसा त्या कट्ट्यावर गेलो नाही पण कळायचं काय चालतं तिकडे. नुसती टिंगल टवाळी. कोणाच्या कुणाशी कसल्या भानगडी चाळूयेत… त्याच्या उखाळ्यापाखाळ्या काढणं चालू असायचं. कोणाला कसली तरी चिट्ठी आलेली असायची किंवा कोणालातरी पाठवायची असायची. एकदा ह्या गण्याला एक चिट्ठी आलेली होती....
दहावीचं वर्ष होतं. आणि गणिताच्या तासाला त्याच्या बाकावर एक चिट्ठी येउन पडली. त्यानं इकडे तिकडे पाहिलं पण नाही समजलं कोणी टाकली ते. लगेच त्यानं उघडून पाहिलं तर ती कोरी चिट्ठी… च्यायला… आपलं नशीबंच कोरं…. असं म्हणून त्यानं तो कागद खिडकीतून बाहेर फेकला. दुसर्या दिवशी पण तसंच. तिसर्या दिवशी पण तसंच. आता त्याला अंदाज येऊ लागला. काहीतरी आहे. आणि त्याला पोरांनी भरवलंच होतं एक पोरगी चोरून चोरून त्याच्याकडे बघते म्हणून. मग ट्यूब पेटायला कितीसा वेळ लागतो?? बास्स … आता आपल्यालाच जाऊन बोलावं लागेल. एके दिवशी शाळा सुटल्यावर त्यानं तिला गाठलंच.
"ए ... थांब जरा... "
ती जरा दबकतच थांबली.
"ती चिट्ठी त्वा पाठवलीस?"
"कुठली.. "
"ती.. "
"आ ... ता .. म्या कसाला पाठवू??" असं म्हणून ती लाजून पळून गेली. आणि गण्याला उत्तर मिळालं. नंतर काही दिवस ती पण अधून मधून कॉमर्स कॉलेज वर यायची म्हणे…

नंतर माझी दहावी झाली. गण्या पण दहावी काठावरच का होईना पण झाला. बारावी नंतर मी लॉ ला अ‍ॅडमिशन घेतली. गण्या कधीतरी अधूनमधून दिसायचा. "काय रं दिक्स्या …. ओळख विसरलास व्हंय रं…" म्हणून नेहमीप्रमाणे तोंडाचा चंबू करून आणि चष्मा जरा वर करून विचारायचा. आणि आपली वाट चालायचा. गण्या नंतर खूपच बदलला होता.. चांगलंच गुटगुटीत बाळ झालं होतं… मुळात खराब व्हायला कधी ताण... टेन्शन... किरकिर... ह्या सगळ्याशी त्यांचा संबंध थोडाच होता.
तसं पहायला गेलं तर मी आणि गण्या कधी फार बोललो असं नाही. मुळात मला बोलणं कमीच होतं. तरी पण एक सुप्त आकर्षण म्हणतात तसं माझ्या मनात त्याच्या बद्दल होतंच. मला आवडायची त्याच्या जगण्याची स्टाईल. बिनधास्त… हर्फन्मौला.... खुशालचेंडू.... टेन्शन घ्यावं ते दुसर्यांनी… आपण नाही. मुळात आयुष्याची व्याख्याच वेगळी. कधीच नाही कळाली. खरं सांगायची तर कधी कळूनच नाही घेतली.

लॉ च्या दुसर्या वर्षाला असताना मला एक दुपारी मित्राचा फोन आला.
"काय करतोस रे... "
"काहीच नाही."
"आज संध्याकाळी आपण जगदाळे मामांच्या हॉस्पिटलला जातोय…"
"का??"
"अरे गण्याला अ‍ॅडमिट केलंय"
"क्क्काय?? का?"
"काही नाही रे माहित … पण आज जातोय आपण सगळे…"

मला जरा विचित्रच वाटलं सगळं. जायचं तर सगळे का म्हणून …?? आणि तेही एकदम. मी आवरलं. आणि एका दोघांना अजून घेऊन आम्ही सगळे हॉस्पीटल मध्ये गेलो. त्याची रूम वगैरे माहित होतीच मित्रांना. त्याच्या सेकंड फ्लोवर वर जातानाच त्याची आई जिन्यावर भेटली. डोळ्यांखालचं काळं खूप वाढलं होतं. आम्हाला बघताच त्यांच्या डोळे लगेच भरून आले...

"प्वारांनो आलात व्हंय?... लई बरं झालं... आमच्या गण्या सारखं इचारत होता. पोरं का न्हाई आलीत अजून... प्वारांशिवाय न्हाई रं करमत त्याला... सारखं कोण ना कोण लागतंय... "
"पण झालंय काय त्याला.?? काही सिरियस नाही ना??" आम्ही विचारताच त्या माउलीला काही रहावलंच नाही. आम्ही जरा बाजूला गेलो. त्यांच्या अश्रुंचा आवेग जरा कमी झाल्यावर त्याच बोलू लागल्या.
"अरं प्वारांनू काय सांगू… हे पोरगं काही सांगायचं नाही… मुळात त्येलाबी काही तरास होयाचा नसंल… पण लैच जाड हू लागला. कधी कधी गरम बी होयाचा.. उलट्या बी कधी कधी करायचं... पण डाक्टराकडं जायचं बोललं कि यायचं नाही हे पोरगं... पण जावा तोंड बी लैच सुजायलागलं कि मी काय नाय ऐकलं अन घ्येउन आले अन…. उगाच आले असं वाटायलंय बगा... " असं म्हणून त्यांनी परत डोळ्याला पदर लावला.
"सार्या टेस्ट बीस्ट झाल्या अन रिपोर्ट बगून डाक्टर म्हनालं कि..... हेला..... र…. ग… ता… चा …. कें... स.... र … " त्यांना पुढचं काही बोलवलंच नाही.... गण्या कॅन्सरच्या तिसर्याच्या अवस्थेशी झुंझत होता. तेंव्हा कळालं त्याच्या गुटगुटीत होण्याचं कारण… आता त्याला काय भेटायचं आणि कसं भेटायचं ह्या विचारात असताना त्याची आई म्हणाली
"गण्याला काय नाय माईत ... तुमी पन नका काई सांगू... "

आम्ही ठीके म्हणून निघालो. साधारण कल्पना होती पण एव्हढं भयंकर काही झालं असेल असं स्वप्नात पण नव्हतं वाटलं. गण्याच्या रूम मध्ये गेलो तेंव्हा गण्या नेहमीप्रमाणे नाकावरचा चष्मा सावरत पेपर वाचत होता. अंगावर अजूनही शाळेसारखाच नीळा शर्ट... तसाच थोडास्सा कळकट.... अधुनमधून थोडा खोकला येत होता त्याला... गण्या प्रचंड सुजल्यासरखा दिसत होता... आम्ही आत जाताच तेच मनमोकळं हसू खुललं…
"भोसडीच्यांनो.... आज आलात व्हंय... " म्हणून त्यानं आमचं स्वागत केलं… खूप दिवसांनी बोलल्यासारखं आमच्याशी खूप वेळ बोलत होता. सगळ्यांची चौकशी केली. कोण कोण कुठे कुठे आहे… काय काय करतंय... वगैरे वगैरे ... लफडी सुद्धा उकरून झाली. त्याच्या "ती"चं लग्न झाल्याची बातमी पण त्यांनंच आम्हाला अगदी अगदी हसत हसत दिली. अर्थात आम्हाला आधी माहित होतंच ते... कोणी काहीच बोलत नव्हतं ... मुळात इतकं भरून आलं होतं कि बाहेर शब्द नाही तर अश्रूच आले असते…. शेवटी चिडून तोच म्हणाला...
"कुत्र्यांनो …आता बोलाल....???? "
एक नाही दोन नाही
"का मी मेल्यावर ……??"
"गण्या...... भाड्या..... काय...... बी बोलू..... नगंस..." एक आवंढा गिळत मागून येत त्याचा भाऊ बोलला…
"आरं मला च्युत्यात नगा काढू.... मला ठावंय सगळं... मला काय झालंय ते बी … अन माजं काय हुनारे ते बी... " सगळेच शॉक्ड …
"जाऊ द्या…. दिक्स्या … लई दिस जाले बग… टपरीवर चा पिलाच नाई बग… पाजतू??" लगेच गण्यांनं विषय बदलला.
"त्यात काय गण्या… सगळेच जाऊ… पण तुला चालेल का?"
"ह्ह … डाक्टर मन्लेत सगळं खा…. आता काय…."
"चला... "

आम्ही सगळे मग खालच्या टपरीवर गेलो. चालताना गण्याला जरा त्रास होत होता खरंतर पण तेव्हढाच वातावरण बदल म्हणून तो खाली आला होता. आणि काकू पण काही म्हणाल्या नाहीत… कशा काही म्हणाल्या असत्या त्या म्हणा… अश्या अवस्थेत कोणीच कोणाला नाही म्हणत नाही. पण गण्याच्या वागणुकीत काहीच बदल जाणवला नाही. तीच टिंगल... तीच चेष्टा... तोच खुशालचेंडूपणा... तीच हर्फन्मौला वृत्ती… तेच तोंडाचा चंबू करून बोलणं… तश्शीच कॉलर... तस्साच चष्मा नाकावर आलेला... तसाच अर्धवट इन शर्ट... तसंच टाळी देऊन बोलणं... तश्याच शिव्या…. काही काही बदललं नव्हतं… जे काही बदललं होतं ते आमच्याच नजरेत बदललं होतं… तरी जाणवायचं कि त्रास होतोय त्याला… खोकताना जरा आठी ठळक व्हायची कपाळावरची पण तेव्हढ्यापुरतीच… मग सगळं नॉर्मल...
त्याचा निरोप घेताना मात्र त्याचा आवाज जरा बदलला. आणि भरलेल्या आवाजात तो आम्हाला म्हणाला…

"येक ऐकता का?? माझे लई थोडे दिवस र्हाइलेत हे म्हातारीला नगा सांगू… तिला… न्हाई...... सहन हुनार…. म्या तसं न्हाई दावलं कि....... मला म्हाइतंय ते…. "
अश्रूंना रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते म्हणजे काय याचा अनुभव सगळ्यांना येत होता. साक्षात आनंद चित्रपटच माझ्यापुढे साकार होत होता. गण्या तसा वेडाच होता. हे असलं ऐकायला, बोलायला, पहायला तसं खूप साधं सरळ आणि सोप्पं वाटत असेल… किंबहुना कदाचित वाटेलच… पण जेंव्हा आयुष्य तुमच्या झोळीत प्रत्यक्षात असं काही विचित्र दुर्दैवाचं दान टाकतं ना तेंव्हा भलेभले भरकटतात. डोकं फिरवून बसतात. डोक्यावरचा ताबा हरवतात. गण्या कुठल्या क्लासला गेला होता माहित नाही… पण इतका वेळ नॉर्मल असणारं हे पोरगं जेंव्हा
"माझे लई थोडे दिवस र्हाइलेत हे म्हातारीला नगा सांगू… तिला… न्हाई...... सहन हुनार…. म्या तसं न्हाई दावलं कि....... मला म्हाइतंय ते…." म्हणत होता तेंव्हा इतका कावराबावरा झाला होता कि अजूनही जेंव्हा मी वाक्य आठवतो तेंव्हा माझे डोळे पाणावल्याशिवाय रहात नाहीत … ब्येणं होता ब्येणं…. गण्या.....
.
.
.
.
खरंतर सारं माहित असून काहीच माहित नसल्याची अ‍ॅक्टिंग केल्याबद्दल त्याला कुठला ऑस्कर द्यायला हवा होता???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणु, त्याची आई आणी त्याचे भाऊबन्द यान्च्याविषयी खूप वाईट वाटले. कल्पना करवत नाही हो.:अरेरे:

Oh! Sad

हृदयद्रावक !
दोन्ही किडन्या निरुपयोगी असताना नेहमी आनंदी राहणारा माझा मित्र आठवला मला. "मी कधी दारू ला स्पर्श केला नाही पण मलाच हा आजार का व्हावा ?" असा अनुत्तरीत प्रश्न देखील खेळीमेळीत विचारणारा माझा मित्र मी कधीच विसरणार नाही !!

अगदी सेम किस्सा माझ्या मित्राच्या बाबतीत घडला. तोही असाच कॅन्सरने गेला. त्याच्याशी शेवटचं बोलताना अगदी असेच सगळे शाळेतले दिवस आठवत होते... सगळं काही अगदी सेम टू सेम गण्याच. फक्त त्याचं नाव होतं सुन्या.. सुनील. फरक एवढाच गण्याचं लग्न झालं नव्हतं आणि सुन्या आपलं तीन वर्षांचं बेणं बायकोच्या झोळीत टाकून कायमचा गेला.

कॅन्सर विषयी एक नविन विचार ऐकायला मिळाला. सातत्याने एखाद्या गोष्टीबाबत नकारात्मक विचार करण्याने मग ते जीवनातले व्यावसायीक अपयश असो वा नातेसंबंध आनंदाने टिकवण्यात आलेले अपयश असो. प्रत्येक गोष्ट स्विकारता आली पाहिजे आणि पुढे सकारात्मक विचार करता आला पाहिजे.

सतत नकारात्मक विचार केल्याने शरीरात काही बदल होतात आणि त्यामुळे कॅन्सर होतो असे म्हणतात.

http://lifestyle.inquirer.net/122139/is-cancer-caused-by-negative-emotions

हेच वाक्य प्रजापिता ब्रह्मकुमारी प्रणित अरोग्य विषयक व्याख्यानात एका डॉक्टर साहेबांनी केलेल ऐकल. "मी कधी दारू ला स्पर्श केला नाही पण मलाच हा आजार का व्हावा ?" असा अनुत्तरीत प्रश्न देखील खेळीमेळीत विचारणारा माझा मित्र मी कधीच विसरणार नाही !! या प्रश्नाच उतार या ठिकाणी दडलय अस मला वाटत.

मलाच का आयुष्यात असा जगाचा वाईट अनुभव आला या विषयावर विचार करण्यापेक्षा ठीक आहे आता पुढे काय करता येईल हे सातत्याने आपल्या जवळच्या माणसांना जे सतत असा विचार करतात त्यांना सांगत रहायला हवे.

नितीनचंद्र,

उत्तम विचार! अहो एवढेच काय, चारच दिवसांपूर्वी मला एक ऑन्को सर्जन भेटला होता तो म्हणाला की मनात चांगले विचार ठेवले तर खरंच हा रोग होण्याची शक्यता कमी असते. आता एका सर्जनने अंधश्रद्धा बाळगली असेल असे मला तरी वाटले नाही.

ह्या निमित्ताने सर्व प्रतिसाददात्या मित्रांना एक लहानशी विनंती करावीशी वाटत आहे. कृपया ह्याला भोचकपणा किंवा शहाणपणा मानू नयेत.

एखादी व्यक्ती एक दोन पानभर काही लिहिते तेव्हा त्यावर निदान दोन ओळी तरी प्रतिसादात लिहायचे कष्ट घ्यावेत असे वाटते. नुसते स्मायली देणे बरे वाटत नाही. बघा बुवा!

रुला दिया यार.. गण्या आपला कोणी लागत नसूनही.. हे खरे आहे की खोटे हे माहीत नसूनही.. असा एकही गण्या स्वताच्या आयुष्यात पाहिला नसूनही.. माणूसकीच्या नात्यानेच का होईना रिलेट झाल्यासारखे वाटले .. वाईट वाटले..

रुला दिया यार.. गण्या आपला कोणी लागत नसूनही.. हे खरे आहे की खोटे हे माहीत नसूनही.. असा एकही गण्या स्वताच्या आयुष्यात पाहिला नसूनही.. माणूसकीच्या नात्यानेच का होईना रिलेट झाल्यासारखे वाटले .. वाईट वाटले.. >>>>>> +१०० ....

चांगले जीवन जगण्यासाठी पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड केव्हाही उपयोगीच ठरतो .....

रुला दिया यार.. गण्या आपला कोणी लागत नसूनही.. हे खरे आहे की खोटे हे माहीत नसूनही.. असा एकही गण्या स्वताच्या आयुष्यात पाहिला नसूनही.. माणूसकीच्या नात्यानेच का होईना रिलेट झाल्यासारखे वाटले .. वाईट वाटले.. >>>>>>+११११
खूप छान लिहिले आहे.....
पाणी आले डोळ्यात......

बेफिकीर अनुमोदन. अहो मी खरच अशा एका घटनेबद्दल वाचले होते की काही वर्षापूर्वी अमेरीकेत की युरोपातच एक महिला कॅन्सर ग्रस्त होती. नेहेमी चर्चला जाणारी ही महिला एके दिवशी रडायला लागल्यावर तिथल्या लोकाना, जे चर्चमध्ये प्रार्थनेकरता येत होते, तिच्या दुखण्याबद्दल कळले.

त्यानाही वाईट वाटले पण त्यानी तिला सान्गीतले की धीर सोडु नकोस, बी पॉझीटिव्ह, आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. तुझ्या साठी रोज प्रार्थना करु.

या विचाराने आणी सहानूभुतीने ती महिला खूप खुश झाली. नियमीत औषधे, आनन्दी जीवन आणी सकारात्मक विचारानी ती कॅन्सरमुक्त झालीच, पण नन्तर इतरान्करता ती काम करु लागली.

मन चन्गा तो पडोसमे गन्गा असे काहीसे म्हणतात ना?

दिनेश., अनिश्का., चिनूक्स,हिम्सकूल, रश्मी.,स्नेहनिल,मित,नितीनचंद्र,वत्सला,अमित M.,तुमचा अभिषेक,सुसुकु,
पुरंदरे शशांक,ravikant, रंगासेठ,अमृतवल्ली,मन्या सज्जना रश्मी.... सर्व प्रतिसाददात्यांचे खूप खूप आभार
टोच्या … अरे अरे … खूपच वाईट…
टोच्या … अरे अरे … खूपच वाईट…

नितीनचंद्र... खूपच वेगळा विचार आहे…
सतत नकारात्मक विचार केल्याने शरीरात काही बदल होतात आणि त्यामुळे कॅन्सर होतो>> आयुष्याच्या अत्यंत महत्वाच्या वळणावर खूप महत्वाची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद…
बेफ़िकीर जी तुमचा प्रतिसाद बघून खूप भारी वाटलं… धन्यवाद…
तुमचा अभिषेक… प्रतिसादाबद्दल आभारी आहे. आमच्या वर्गात असाच एक गण्या होता.
अमृतवल्ली… क्या बात है … विपु केली आहे.