हल्ली म्हणे मी सापडत नाही तुला

Submitted by बेफ़िकीर on 22 April, 2014 - 13:18

हल्ली म्हणे मी सापडत नाही तुला
मी हरवणेही आवडत नाही तुला?

जखमेप्रमाणे काळजी घेतो तुझी
खपलीप्रमाणे खरवडत नाही तुला

गालातल्या गालात का हासू नये
कोडे खळीचे उलगडत नाही तुला

हे पंख कुठुनी चोरले आहेस तू
आता हवासुद्धा नडत नाही तुला

टाळी नको झाल्यामुळे टाळी मिळे
पण काम तितकेही पडत नाही तुला

काया फुलवतो पावसाळ्यांनी तुझ्या
हृदयावरी मी शिंपडत नाही तुला

इतके दरिद्री मन कसे आहे तुझे
फुकटातही मी परवडत नाही तुला

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय लिहू?

नेहमीचा प्रश्न

सगळेच सही

दुसरा आणि शेवटचा सगळ्यात जास्त आवडले सर

धन्यवाद Happy

इतके दरिद्री मन कसे आहे तुझे
फुकटातही मी परवडत नाही तुला

व्वा!

इतर शेरही छान.

"प्रेम" ह्या विषयाशी निगडीत शेरांना आवश्यक असलेली भावनांची तीव्रता आपल्या शेरांतून अनेकदा बघायला मिळते.

व्वाह.

विदिपा,

>> "प्रेम" ह्या विषयाशी निगडीत शेरांना आवश्यक असलेली भावनांची तीव्रता आपल्या शेरांतून अनेकदा बघायला मिळते.

अगदी अगदी! नात्याचा (की वेदनेचा?) एक लांबलचक प्रवास चित्रित झाल्यासारखा वाटतोय!

आ.न.,
-गा.पै.

सुंदर विश्लेषण गापै , नात्यातल्या वेदनेचा प्रवास बेफिकीर खूप उंचीवर नेऊन ठेवतात.

भारतीताई,

प्रस्तुत गझल एक प्रवास आहे हे मला थोड्या प्रयत्नांती ओळखता आलं. स्वत:वर खूष झालो. नात्याचा प्रवास म्हणावा की वेदनेचा या द्वंद्वात सापडलो होतो. पण ही तर नात्यातली वेदना आहे हे तुम्ही किती सहजपणे दाखवून गेलात! तुमच्या पायाशी बसून रसग्रहणाचे धडे का घ्यावेत, हे पुनरपि कळतंय! Happy

खरा रसग्राहक कविसोबत स्वर्गात भराऱ्या मारत असतो तर माझ्यासारख्या रसिकाला स्वर्ग दोन बोटे उरलेला असतो!

आ.न.,
-गा.पै.

नात्यातील वेदनेचा प्रवास - वॉव्ह!

माझ्या गझलेला इतकी चांगली काँप्लिमेन्ट आजवर आलेली नव्हती.

सर्वांच्या ऋणात!

-'बेफिकीर'!